राधाने बराच वेळ ती साडी घेऊन आरशात स्वतःला न्याहाळले. मोरपंखी रंग हा तिचा आवडीचा रंग होता. साखरपुड्यात नाहीतर पुन्हा कधीतरी ती साडी घालता येईलच ह्या विचाराने ती खुश झाली. तिने साडीला नीट कपाटात ठेवले.
इकडे शनायाला धीरजच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. आधी दिवसभर सोबत राहायचा तरीही संध्याकाळी घरी गेल्यापासून ते सकाळी पुन्हा ऑफिसला येईपर्यंत नुसते कॉल च करायचा. पण आज त्याने स्वतःहून एकही कॉल केला नव्हता. आणि जेव्हा तिने स्वतः त्याला कॉल केला तेव्हा त्याने तिचा कॉल सुद्धा उचलला नाही.
बरेच कॉल केल्यानंतर त्याने तिचा एक कॉल उचलला. ते ही त्याला नुसती फोन ठेवायची घाई झाली होती. धीरजला आपल्यापेक्षा ती राधा जास्त महत्त्वाची वाटायला लागलीय ह्या विचाराने तिच्या डोक्यात अशीच गोंधळ घातला होता. ती तशीच तिच्या कार मध्ये बसून गाणी ऐकत विचार करत होती.
इतक्यात तिला समोरून एक जोडपं येताना दिसलं…बहुतेक नवरा बायको होते. त्याने गाडी पार्किंग मध्ये थांबवली आणि स्वतः गाडीमधून उतरून तिच्या साईडचा दरवाजा उघडायला गेला. त्याने बाजूचे दार उघडुन अगदीच रोमँटिक अंदाजाने त्याच्या बायकोला बाहेर उतरवले. मग दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन मॉल च्या दिशेने जायला लागले.
ते जसजसे तिच्या जवळून जायला लागले तसतसे त्या दोघांचे चेहरे तिला स्पष्ट दिसू लागले. आणि त्याचा चेहरा पाहून तिला एकदम धक्काच बसला. तो तोच होता. तिचा एक्स बॉयफ्रेंड राजवीर. जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिच्याशिवाय जगणंही ह्याला अशक्य वाटायचं. जो लग्न कर म्हणून तिच्या मागे लागला होता. आणि हिला लग्नच करायचं नसल्याने त्याचं प्रेम लाथाडून ती आयुष्यात पुढे निघून गेली होती.
आज त्याला आणि त्याच्या बायकोला असे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहून तिला त्याचा भयंकर राग आला. ती मनातल्या मनात म्हणाली. ‘ हा तर मला म्हणायचा की मी त्याच्या आयुष्यात नसले तर हा जगू शकणार नाही. आणि हा तर मला विसरून त्याच्या बायकोच्या प्रेमात पागल झालेला दिसत आहे. असं काय आहे हीच्यात.’
पण मग तिच्या लक्षात आले की ह्या जगात कुणीच कुणासाठी थांबत नाही म्हणून. मग हा तरी कसा थांबेल. आपण जर आयुष्यात पुढे निघून आलोय तर हा कसा काय तिथेच हिच्या आठवणीत झुरत बसेल. त्याने लग्न केलं आणि तो आयुष्यात पुढे निघून गेला. शिवाय ती त्याची लग्नाची बायको आहे. कधी ना कधी तर तो तिच्या प्रेमात पडलाच असता.
पण त्याला असं खुश बघून आज तिचा मनातून जळफळाट होत होता. त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंद तिला तिच्या पैशांपेक्षा आणि पोझिशन पेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटत होता. आज तिला एकटं एकटं वाटत होतं. आणि अचानक तिच्या मनात विचार आला. धीरज सुद्धा असच लग्न झाल्यावर बायकोच्या प्रेमात येऊन आपल्याला विसरला तर.
तिच्याच्याने तर कल्पना सुद्धा करवत नव्हती. राजवीर आणि त्याच्या बायकोच्या जागी आता तिला धीरज आणि राधा दिसू लागले होते. तिला तर वाटले होते की धीरज तिच्यावर लट्टू आहे आणि तिला कधीच सोडून जाणार नाही. पण लग्नाचे बंधन त्याला तिच्यापासून कायमचं दूर नेऊ शकते ह्याची तिला कल्पना आली. लग्नाचं पवित्र बंधन हे आपल्या प्रेमाच्या नात्यापेक्षा वरचढ ठरेल ह्याची तील कल्पना आली होतीच. त्या दिवशी ती रात्रभर झोपू शकली नाही.
चार दिवसांनी राधा आणि धीरजचा साखरपुडा पार पडला. साखरपुडा खूपच थाटामाटात करण्यात आला. राधाच्या वडिलांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. धीरज आणि राधा दोघेही अगदी राजबिंडे दिसत होते. साखर पुड्याचे फोटो सगळ्या मित्र मैत्रिणींच्या स्टेटसवर फिरत होते.
शनायाला आपले फोटो दिसू नयेत ह्याची काळजी म्हणून धीरजने तिला हाइड करून स्टेटस ठेवले होते. राधाशी लग्न होतेय ह्याचा आपल्याला खूप आनंद होतोय असे शनायाला वाटू नये हे त्या मागचे प्रयोजन. कारण त्याला शनायाला आपण हे लग्न केवळ आपल्या आई बाबांसाठी करतोय असे पटवून द्यायचे होते.
पण धीरजच्या एक दोन मित्रांचे नंबर शनायाकडे सेव्ह होते. आणि त्यांच्या स्टेटस वर ठेवलेल्या फोटोत धीरज आणि राधा एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते. त्यात धीरज तर खूपच जास्त खुश दिसत होता. त्याला राधासोबत खुश बघून शनाया मनातल्या मनात चरफडली. आपल्या हातून काहीतरी निसटून जात असल्याची तिला जाणीव झाली.
साखरपुड्यातच धीरजने राधाला नवीन फोन गिफ्ट केला होता. त्यामुळे धीरज आता रात्रंदिवस राधाशी बोलण्यात बिझी राहू लागला. राधाला फोन करताना धीरज दिवस, रात्र, वेळ, काळ काहीच पाहत नसे. त्याच्या मते राधावर आता त्याची मालकी झाल्यातच जमा होती. शिवाय साखरपुडा आणि लग्नात फक्त पंधरा दिवसांचे अंतर बाकी होते. राधाच्या घरच्यांची सुद्धा आता दोघांच्या फोनवर बोलण्यात काही हरकत नव्हती.
धीरजचे शनायावर असलेले लक्ष आता हळूहळू कमी होत होते आणि ते शनायाला देखील कळत होतेच. ते दोघे सोबत असले तरीही धीरज मनाने दुसरीकडेच आहे असे सारखे तिला वाटायचे. हळू हळू तिच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ लागली होती. ऑफिस मध्ये सुद्धा बाजूला जाऊन तो राधाला कॉल करायचा.
राधा दिवसभर काय करते. कुठे जाते. काय घालते, काय जेवते ह्याची सगळीच माहिती त्याला हवी असायची. राधाच लाघवी बोलणं त्याला खूप आवडायचं. कधी एकदा राधा बायको म्हणून घरी येते आणि पूर्णपणे आपली होते ह्याची त्याला खूप घाई झाली होती. धीरजला आता अजिबात धीर धरवल्या जात नव्हता.
त्याने तिला चंद्र तारे तोडून आणण्यापासून अनेक वचने दिली होती. मुळात जास्त बडबड करण्याची सवय नसलेल्या राधाला धीरजचे इतके फोन करणे जास्त आवडायचे नाही. तिला आता उरलेल्या दिवसात आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता. त्यांच्यासोबत खूप गप्पा मारायच्या होत्या. मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा होता पण धीरज तिला तसं करायला अजिबात वेळ देतच नव्हता. त्याचं दिवसभर काही ना काही सुरूच होतं.
तिला आता घरचे सुद्धा त्याच्या नावाने चिडवायचे. त्याच्या फोन करण्याला तिची ना नव्हती पण दिवसभर नुसतं आपण काय केले आणि काय नाही ह्याची त्याला माहिती पुरवायची आणि मग त्यावर स्पष्टीकरण सुद्धा द्यायचं ह्यातच तिचा सगळा दिवस निघून जायचा. पण धीरज आता आपला होणारा नवरा आहे आणि त्याची आवड जपणे आणि स्वतःला त्याच्या आवडीनुसार बदलवणे हे आपले काम आहे ह्याची सुद्धा तिला जाणीव होती.
हळूहळू दिवस सरत होते. आज राधा आणि धीरजची हळद होती. राधाला हळद लागली होती. पण आज सकाळपासून तिला धिरजचा एकही फोन आलेला नव्हता. एरव्ही रोज तिचा फोटो मागणारा धीरज आज तिच्या हळदीच्या फोटो साठी सुद्धा कॉल करत नव्हता. ना कॉल ना व्हिडिओ कॉल. काहीच नाही. राधाला नवल वाटत होते.
मग तिने स्वतःहून त्याला फोन केला. तेव्हा त्याचा फोन बंद येत होता. तिला जरा विचित्र वाटले पण नंतरच तिने विचार केला की आज त्यालाही हळद लागली असेल. आणि लग्नाच्या तयारी सुद्धा सुरू असतील. उद्या तर सकाळी लग्नात भेटेलच. तेव्हाच विचारू त्याला आज फोन का नाही केला ते. असा विचार करून मग तिने सुद्धा तो विचार झटकला.
शिवाय घरी खूप सारे पाहुणे आलेले होतेच. सगळ्यांच्या गप्पांच्या ओघात हळदीचा दिवस कसा निघून गेला ते तिचं तिला सुद्धा नाही कळलं. राधा उद्या लग्न करून सासरी जाणार म्हणून तिच्या आईला आणि बहिणीला तर रात्रीपासूनच रडू येत होतं. राधा कधी त्यांना समजावून सांगत होती तर कधी स्वतः च्या मनाला समजावून सांगत होती. रात्री लवकर झोपू म्हणता म्हणता तिला झोपायला उशीर झालाच.
दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची गडबड सुरू होती. सगळेजण लग्नाच्या तयारीमध्ये गुंग होते. एकीकडे राधा तयार होत होती तर दुसरीकडे तिचे दोन्ही काका लग्नाच्या हॉलमध्ये जाऊन लग्नाची तयारी करत होते. पण राधाचे बाबा मात्र घरात एकीकडे जाऊन कुणाला तरी फोन लावत होते. समोरची व्यक्ती त्यांचा फोन उचलत नाहीये हे स्पष्ट ओळखू येत होते.
मग त्यांनी दुसऱ्या कुण्या व्यक्तीला फोन केला आणि फोनवर जणू ते काही विनवण्या करत होते. ते नेमके काय बोलत होते हे काही कळत नव्हते. पण कावेरीचे लक्ष जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते खूप जास्त काळजीत असल्याचे तिला जाणवले. ती काळजीने तिच्या बाबांकडे गेले तेव्हा तिच्या बाबांचे बोलणे तिच्या कानावर गेले.
” तुम्ही मला समजून घ्या…त्यांच्याशी जर लवकर संपर्क झाला नाही तर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल…तुम्हाला लागेल तर तुम्ही माझी सगळीच मिळकत घेऊन घ्या…पण माझ्या मुलीवर हा ठपका लागू देऊ नका…” राधाचे बाबा बोलत होते.
समोरची व्यक्ती काय बोलतेय हे कावेरीला कळत नव्हते. पण कावेरी बाबांना काही विचारणार तितक्यात समोरच्या व्यक्तीने फोन सुद्धा ठेवून दिला. त्या सरशी तिचे बाबा मटकन खालीच बसले. कावेरी लगेच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना विचारले.
” काय झाले बाबा…तुम्ही असे खाली का बसलात…सगळं काही ठीक आहे ना…तुम्ही राधाबद्दल बोलत होतात का…काही झालंय का बाबा…?”
कावेरीला पाहून तिचे बाबा स्वतःला सांभाळत म्हणाले.
” काही नाही…सगळं ठीक आहे…आणि जर नसलं तर मी सगळं काही ठीक करेल…तुम्ही नका काळजी करू…तुमचा बाप अजुन समर्थ आहे…”
” नक्की काहीतरी झालंय बाबा…मला सांगा ना काय झालंय ते…” कावेरी घाबरून म्हणाली.
कावेरीचा आवाज ऐकून तिथे तिची आई अन् काकू देखील आल्या. काहीतरी बिनसलंय ह्याची चाहूल एव्हाना त्यांना लागली होती. आतमधील गलका ऐकून बाहेरची मंडळी सुद्धा तिथे आली. सगळेच जण राधाच्या वडिलांना काय झालंय ते विचारात होते. राधाच्या वडिलांना आता काय बोलू आणि काय नको ते सुचत नव्हते.
इतक्यात राघव अगदी धावत पळतच तिथे आला. राघव नवरदेवासोबत चांगल्या तयारीने येईल अशीच अपेक्षा सगळ्यांना होती. पण तो असा घरच्याच कपड्यांवर, घामाघूम झालेला, चेहऱ्यावर टेंशन असलेला आलेला पाहून सगळ्यांच्या काळजात धस्स झाले. बाहेर सुरू असलेल्या गलक्याचा आवाज राधाला सुद्धा आला.
ती तयारी अर्धवट सोडून बाहेर आली. बाहेर आली तर काय पाहते, तिचे बाबा अतिशय काळजीत एका खुर्चीवर बसले होते. कावेरी ताई अन् आई त्यांना काय झालंय ते विचारत होत्या. त्यांच्या भोवती काका, काकू अन् सगळे नातेवाईक काळजीत असलेले दिसत होते. काय झालंय ते तिला काहीच कळत नव्हते. इतक्यात तिची नजर राघव कडे गेली. या अवतारात त्याला पाहून तिला सुद्धा आता काळजी वाटायला लागली होती.
क्रमशः
राधाचे वडील इतक्या काळजीत का पडले असतील…? धीरज ने राधाला फोन का केला नसेल…? राघव असा घाईघाईने आणि धावतपळत राधाच्या घरी का आला असेल…? जाऊन घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.
खुप छान
पुढील भागाची आतुरता
धन्यवाद 😊🙏