राघवला पाहून राधाची आई पुढे आली आणि त्याला म्हणाली.
” राघव…तू यावेळेला इथे…आणि अशा अवतारात काय करत आहेस…तू तर वराती सोबत यायला पाहिजे होतं ना…लग्नाला वेळच काय उरलाय…”
राघव काहीच बोलला नाही. नेमकं काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्यालाही कळत नव्हतं. तो फक्त राधाच्या वडिलांकडे पाहत होता. त्याला पाहून राधा ची आई पुन्हा म्हणाली.
” मी काय विचारतेय राघव…मला कुणीच काही का सांगत नाहीये…राधाचे वडील सुद्धा काहीच बोलत नाही आहेत…तूच सांग काय झालंय ते…”
आता मात्र राधालाही भीती वाटायला लागली होती. काहीतरी अघटीत घडलंय हे नक्कीच होतं. त्यात तिचे बाबा आणि राघव दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी राघव म्हणाला.
” मामी…धीरज कालपासून घरातून कुठेतरी निघून गेला आहे…”
” काय…निघून गेलाय म्हणजे काय…आज लग्न आहे ना दोघांचं…मग कुठे निघून गेला…?” राधाची आई अस्वस्थतेने म्हणाली.
” तो कालपासून बॅग घेऊन घरातून निघून गेलाय…आणि त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय…” राघव मान खाली घालून म्हणाला.
” निघून गेलाय म्हणजे काय…लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतोय का त्याला…माझ्या मुलीचं लग्न आहे आज…आणि नवरदेव पळून गेलाय म्हणजे काय…?” त्यानंतर राधाच्या बाबांकडे पाहून म्हणाली. ” अहो ऐकताय का तुम्ही…राघव काय म्हणतोय ते…आज राधाचं लग्न आहे अन् राघव म्हणतोय की नवरदेव घरून निघून गेलाय…”
त्यावर राधाचे बाबा खिन्नपणे म्हणाले.
” खरं बोलतोय तो…धीरजचा कालपासून काहीच पत्ता नाहीये…सगळेच त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याचा फोन बंद आहे…”
हे ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसला. राधा तर अक्षरशः हादरून गेली होती. हे सगळं काही असं होईल अन् ते ही आपल्या लग्नाच्या दिवशी अशी तिने कधीच कल्पना सुद्धा केलेली नसेल.
” काय…?” राधाची आई जवळपास किंचाळलीच. ” तुम्ही आधी का नाही सांगितलं हे…”
” हो दादा…हे सगळं आधी का नाही सांगितलंस तू मला…अरे आपण काहीतरी केलं असतं…त्याला शोधलं असतं…” राधाचे काका म्हणाले.
” आता कसं होईल… तो लग्नाचा मुहूर्त येईपर्यंत सापडलाच नाही तर…?” मोठी काकू म्हणाली.
” आणि लग्न मुहूर्ताला फक्त पाऊण तास बाकी आहे…वेळेवर लग्न नाही लागलं तर किती मानहानी होईल आपल्या कुटुंबाची…” लहान काकू म्हणाली.
सगळेच जण आपापल्या शंका कुशंका बोलून दाखवत होते. इतक्यात राधाचे बाबा औदासिन्याने म्हणाले.
” तुम्हाला लग्नाच्या मुहूर्ताची, लोक काय म्हणतील आणि बदनामीची काळजी पडलीय…पण मला फक्त माझ्या राधाची काळजी वाटत आहे…तिचं काय होईल आता…”
” दादा…तू काळजी नको करुस…आपण धीरजला शोधून आणू…आपण सगळेच कामाला लागुयात…” राधाचे काका म्हणाले.
असे म्हणून तिचे दोन्ही काका, चुलते, राघव, कावेरीचा नवरा केशव आणि काही पाहुणे मंडळी बाहेर जाऊन त्याला कुठे कुठे शोधायचे ह्याचा अंदाज घेत घरातून बाहेर पडले सुद्धा. तोवर तिथे केशवराव म्हणजेच राघवचे वडील सुद्धा आले होते. राधाच्या बाबांना सावरायला त्यांच्या जवळ कुणीतरी असावे म्हणून ते जातीने तिथे आले होते. बाकी मुलाकडची मंडळी सुद्धा त्याला शोधतच होती.
राधाच्या वडिलांना काही सुचत नव्हते. ते तिथेच घरातल्या ओट्यावर बसून होते. राधाचा तर दगड झाला होता. तिला आता काहीच सुचत नव्हते. सारखे सारखे मनात विचार येत होते. धीरज कुठे गेला असेल. त्याला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर मग दिवसरात्र प्रेमाची कबुली तरी का द्यायचा. त्याच्या मनात काय होते ते त्याने आधी का नाही सांगितले.
राधाच्या डोक्याचा विचार करून पार भुगा झाला होता. कावेरी ताई आणि आई तिला सांभाळत होत्या. तिच्या दोन्ही काकू मात्र राधा किती कमनशिबी आहे, राधाच्या बाबतीतच असे का झाले असेल, राधाचं आता पुढे काय होईल, धीरजला राधा आवडली नसेल का, धीरज सापडला नाही तर राधा तशीच राहील का…असे एकामागून एक काळजीवजा टोमणे मारतच होत्या.
राधाच्या आईला आणि कावेरीला सगळेच कळत होते. पण आज प्रसंगच असा होता की सगळ्यांचं ऐकण्यावाचून काही पर्यायच नव्हता. अशाच मनोवस्थेत एक एक क्षण त्यांना कठीण वाटत होतं. राधाच्या आईने तर घरातल्या दत्तगुरुंच्या मूर्तीकडे बघितलं आणि मनातल्या मनात त्यांना विचारले की राधासोबत हे सगळं का म्हणून घडतंय. आजवर आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही तरीही आमच्याच सोबत हे सगळं का म्हणून घडतंय. आज त्या त्यांच्या परमेश्वरावर नाराज होत्या.
इकडे धीरजला शोधायला गेलेल्या लोकांपैकी कुणालाच धीरजचा काहीच पत्ता लागला नाही. लग्नाचा मुहूर्त सकाळी पावणेअकरा वाजताचा होता. पण दुपारचे साडेतीन वाजले तरीही काहीच पत्ता लागलेला नव्हता. शेवटी सगळेच थकून घरी आले. त्यांना पाहून राधाचे वडील म्हणाले.
” काय झालं…अजुन मिळालाच नाही का धीरज…?”
” नाही दादा…धीरजचा काहीच पत्ता लागला नाही अजुन…?” राधाचे काका म्हणाले.
” आता कसं होईल…कसं होईल आता…?” राधाचे बाबा कळवळून म्हणाले.
” दादा…मला नाही वाटत धीरज आता परत येईल…म्हणजे तो स्वतःहून बॅग घेऊन निघून गेलाय याचा अर्थ की त्याला हे लग्न करायचे नाहीये…” काका म्हणाले.
” मग असे होते तर आधी का हो म्हणाला तो…रोज फोन करायचा राधाला…इतक्या दिवसात एकदाही नाही बोलला की त्याला हे लग्न करायचे नाही म्हणून…” राधाची आई म्हणाली.
” पण तो आता निघून गेलाय हे सुद्धा खरंच आहे ना…मी तर म्हणते राधाला काही कल्पना दिली होती का त्याने ह्याची…म्हणजे दोघांमध्ये काही वाद वगैरे झाले होते का…?” राधाची काकू म्हणाली.
” तुम्ही काय बोलताय हे जाऊबाई…असे काही असते तर राधा ने आपल्याला कल्पना नसती का दिली…” राधाची आई म्हणाली.
” मी तर म्हणते…तुम्ही एकदा राधाला का नाही विचारत या बद्दल…तिला काही सांगितलं होतं का त्याने..” काकू पुन्हा म्हणाली.
यावर सगळ्यांनी राधाकडे पाहिले. राधा काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. तिने फक्त शून्य नजरेने आईकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली. तिला पाहून आज प्रत्येकाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. फक्त तिच्या काकू काकांना वाटत होते की काहीही करून तिचे आज लग्न लावून द्यावे. आज तिचं लग्न झालं नाही तर या बदनामीमुळे त्यांच्या मुलीच्या लग्नात अडथळे येईल असे वाटले त्यांना. तिचे काका म्हणाले.
” तो का गेला…कुठे गेला…कोणासोबत गेला का…ह्या सगळ्या गोष्टींचा आता यावेळी विचार करून काही फायदा नाही…वेळ जात आहे…थोड्या वेळाने दिवस सुद्धा मावळेल…धीरज परत येईल अशी काही शक्यता सुद्धा नाही वाटत…आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करावा लागेल आपल्या सगळ्यांना…”
यावर सगळेच विचारात पडले. राधा चे वडील म्हणाले.
” तो नाही आला तर काय…फार तर फार राधाचं आज लग्न होणार नाही…आपण आता काय करू शकतो…?”
” तसं नाही दादा…पण आज जर राधाचं लग्न झालं नाही तर ते पुढे ही होईल ह्याची काय शाश्वती…?” काका म्हणाले.
” म्हणजे…तुला काय म्हणायचं आहे…” राधाचे वडील म्हणाले.
” म्हणजे आज जर राधाचं लग्न नाही झालं तर आपल्या घराची खूप बदनामी होईल…पुढे चालून आपल्या घरातील लग्नात खूप अडथळे येतील…म्हणून….” राधा चे काका एवढे बोलून गप्प बसले.
” स्पष्ट बोला भाऊजी…काय बोलायचं आहे तुम्हाला…” राधाच्या आईने विचारले.
” मला वाटतं की धीरज मिळाला नाही तर आपल्याला दुसरा एखादा मुलगा पाहून राधाचं आजच ह्या मंडपात लग्न लावून द्यायला हवं…” राधा चे काका एकादमात म्हणाले.
हे ऐकून सगळेच विचारात पडले. तेव्हा राधाची आई म्हणाली.
” पण इतक्या लवकर एखादा चांगला मुलगा कसा मिळेल…आणि कुठलीही शहानिशा न करता माझ्या मुलीचं मी कुणाच्याही सोबत लग्न लावून देऊ का…लाखात एक आहे माझी पोर… असं घाई घाई लग्न होत असतं का..?”
” इतकीच लाखात एक होती तर मग तिचा होणारा नवरा का म्हणून पळून गेला…तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे…आज जर तिचं लग्न झालं तर तिचंच भलं होईल…” राधाची काकू म्हणाली.
यावर राधाचे वडील आणि आई दोघेही विचारात पडले. राधा तर काही विचार करण्याच्या पलीकडे गेलेली होती. इतक्यात घरातल्या एका पाहुण्या ने शंका वर काढली. तो म्हणाला.
” पण इतक्या लवकर मुलगा कुठे मिळेल…म्हणजे आधीच वेळ खूप कमी आहे…”
हे ऐकून सगळे पुन्हा विचारात पडले. इतक्यात राधाची काकू कसला तरी विचार करून म्हणाली.
” तुम्हा सगळ्यांची काही हरकत नसेल तर की काही सुचवू का…?”
” सुचवा ना वहिनी…आमचं तर डोकंच काम करत नाहीये…” राधाचे लहान काका म्हणाले.
” म्हणजे माझ्या बहिणीच्या नणंदेचा मुलगा लग्नाचा आहे…दोन चार वेळा आपल्या घरी पण येऊन गेला असेल…त्याला आई नाही…लहानपणी पासून माझ्या बहिणी नेच लहानाचा मोठा केलाय त्याला…मी जर शब्द टाकला माझ्या बहिणीजवळ तर ती मला नाही म्हणणार नाही…आणि ती माझ्या बहिणीला नाही म्हणणार नाही…” काकू म्हणाली.
काकूचे बोलणे ऐकुन सगळ्यांच्याच नजरेसमोर काकूंच्या बहिणीच्या नंदेचा मुलगा सागर आला.
सागरची आई लहानपणीच वारली होती. त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्र आई त्याला खूप छळायची म्हणून त्याच्या मामांनी त्याला आपल्या घरी आणले. त्यांना वाटले की आपल्या घरी सागरची चांगली काळजी घेतली जाईल. सागरच्या मामीला आणखी एका मुलाची जबाबदारी नको होती. पण नवऱ्याच्या पुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत. शिवाय त्यांची सासू म्हणजेच सागरची आई ह्या सुद्धा सागरला सोबत ठेवायचं म्हणून अडून बसली होती.
मामीने मग सागरला गोड बोलून घरातील कामांत जुंपले. घरातील सगळी लहान मोठी कामे त्या त्याच्याकडूनच करवून घ्यायच्या. त्याला जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी शिकवायच्या. अशातच त्याचं अभ्यासाकडे फार दुर्लक्ष झालं. आधीच अभ्यासात साधारण असलेल्या सागरच अभ्यासात दुर्लक्ष झालं.
बारावी पर्यंत त्याने कसेबसे शिक्षण घेतले. पुढे शिक्षण घेण्याची त्याची इच्छाच उरली नव्हती. मग कुठेतरी लहान सहान नोकरी करून मामाच्या घरी आश्रयाला राहायचा. मित्रांच्या संगतीने कधीकधी दारू सुद्धा प्यायला लागला होता. मध्येच त्याला गुटख्याचे व्यसन जडले होते. मामीची इच्छा तर त्याला घराबाहेर काढण्याची होती. पण सागरचा मामा अन् आजी ह्यांच्या मुळे त्या तसे करू शकत नव्हत्या.
त्याच्या मामीला त्याचे लग्न लावून त्याला त्याचा वेगळा संसार थाटून द्यायचा होता. पण त्याची साधी नोकरी, स्वतःच घर नाही आणि त्याचे व्यसन यामुळे त्याला लग्नाला मुलगी सुद्धा मिळत नव्हती. काकूंना हे सगळे त्यांच्या बहिणीने सांगितले होते. म्हणून मग त्यांना आता राधासाठी तो मुलगा आठवला.
क्रमशः
राधाचं लग्न सागर.शी होईल का…? की ऐन वेळेला धीरज परत येईल…? की तिचं लग्नच होणार नाही…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
खुप छान
धन्यवाद 😊🙏