माधवची आई नुकतीच घरी आली होती. माधवने आईला पाहिले आणि तिला विचारले.
” काय गं आई…यावेळेला जरा जास्तच राहिलीस मामाकडे…”
” हो रे…दादा काळजीत होता यावेळी…म्हणून दोन दिवस जरा जास्त राहिले तिथे…” आई म्हणाली.
” काय ग आई…काय झालंय…सगळं ठीक आहे ना मामाकडे…” माधव म्हणाला.
” मीराच्या घरी जरा प्रॉब्लेम सुरू आहे रे…तिचा नवरा तिला चांगला वागवत नाही…” आई म्हणाली.
मीराचा विषय निघताच माधवच्या मनाची घालमेल झाली. त्याला वाटले होते की मीरा तिच्या सासरी खूप खुश असेल. ती खुश असेल असा विचार करूनच त्याने स्वतःला तिच्या विचारांपासून वेगळे करून घेतले होते. म्हणूनच तो हल्ली जवळच आलेल्या मामाच्या गावी सुद्धा जात नव्हता.
कारण तिथे गेल्यावर त्याला मिराच्या आणि त्याच्या लहानपणीच्या आठवणी आठवायच्या आणि मग त्या आठवणी त्याला असह्य व्हायच्या. पण नेमकं काय झालं असेल मीरासोबत? माधवच्या मनात आता असंख्य प्रश्नांनी थैमान घातले होते. म्हणून मग त्याने आईला विचारले.
” काय झालंय आई मीराला…? बरी आहे न ती…?”
” तिच्या नवऱ्याला म्हणे ती आवडत नाही…अगदी लग्नाच्या आधीपासूनच त्याला ती आवडली नव्हती…पण त्याच्या घरच्यांनी ती एकुलती एक असल्याने तिच्या मागे दादाची संपत्ती सुद्धा येईल म्हणून लग्नाला होकार दिला आणि दादाने त्याला चांगली नोकरी आहे आणि शहरात राहतो म्हणून लग्नाला होकार दिला…
लग्न झाल्यापासून तो कधीच तिच्याशी चांगला वागला नव्हता…घरचे काळजी करतील आतापर्यंत तिने माहेरी कोणाला सांगितलं नव्हतं…पण आता त्याची वागणूक तिच्या घरच्यांच्या सुद्धा लक्षात यायला लागली होती…म्हणून मग घरच्यांनी मीराला याबाबत खूप विचारल्यावर तिने सगळं सांगितलं…” आई म्हणाली.
” अगं पण का नाही आवडत ती त्याला…असे काय कमी आहे मीरा मध्ये…सगळ्या बाबतीतच सर्वगुण संपन्न आहे ती…” माधव अगदी तळमळीने म्हणाला.
” त्याला म्हणे एखादी मॉडर्न मुलगी पाहिजे होती…मीरा पडली साधीसुधी…शिकलेली आली तरी राहणीमान खूप साधं आहे रे तिचं… खरंतर तिने प्रयत्न केला त्याला जसं आवडतं तसच राहण्याचा…पण माणसाचा मूळ वागणं बदलणं एवढे सोपे नाही…पोरीच्या आयुष्याचा पार खेळ चाललाय रे…तरीही दादाला मी म्हटलं होतं की मिराचं लग्न तुझ्याशी लावून दे म्हणून…पण दादा आपला मुलखाचा हट्टी आहे…” आई म्हणाली.
” जाऊ दे आई…कशाला पुन्हा त्याच गोष्टी उकरून काढायच्या…मोठ्या मुश्किलीने तुम्हा दोघा बहीण भावाचा अबोला संपला…आता राहू दे जुन्या गोष्टी…आणि मीरा च्या घरी लवकरच सगळं काही सुरळीत होईल…ती आहेच तितकी चांगली…तिच्या नवऱ्याला तिचा चांगुलपणा कळेलच लवकर…” माधव म्हणाला.
” ते पण आहेच म्हणा…सगळं होईलच सुरळीत…” आई म्हणाली.
माधवने आईला जरी या गोष्टीवर निश्चिंत राहायला सांगितलेले असेल तरी तो मात्र अजूनही याच गोष्टीचा विचार करत होता. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, जिला मनाच्या एका कोपऱ्यात गोड आठवणी बनून कायमचं बंद केलं ती मीरा कोणाला नावडती सुद्धा असू शकते हे ऐकूनही त्याला विचित्र वाटलं.
तिला आता तिच्या नवऱ्याची कीव येत होती. परमेश्वराने त्याच्या पदरात निर्मळ प्रेमाचे दान दिले होते पण त्याला साधी तिची कदर सुद्धा नव्हती. आणि दुसरीकडे माधव ने तिला मिळवण्यासाठी कितीतरी देवांना साकडे घातले होते.
मीरा माधवच्या मामाची मुलगी. माधव पेक्षा चार वर्षांनी लहान. लहानपणी दोघेही एकत्र खेळायचे. दोघांना एकत्र खेळताना पाहून माधवची आई नेहमीच म्हणायची की दोघांचा जोडा खूप छान दिसतो. मी मिरालाच माझ्या घरची सून करून घेईल. तेव्हा दोघांनाही त्यातलं फार काही कळत नसे. पण जसजसे मोठे व्हायला लागले तसतसे माधवला मीरा आवडायला लागली.
मिराचा साधेपणा, नम्रपणा तर कधी अवखळ वागणे. कधी खूप समजुतदार आणि कधी लहान मुलांसारखी हट्टीपणा. हे सगळं माधव ला आवडायला लागलं होतं. आणि जसजसे ते दोघे मोठे झाले तसतसे माधवची आवड प्रेमात बदलली. तो मिरावर मनापासून प्रेम करायला लागला.
पण हे सगळं मीराजवळ बोलायची त्याची कधीच हिम्मत होत नव्हती. त्याने विचार केला की आधी आयुष्यात काहीतरी बनून दाखवेन आणि मगच मीराला लग्नाची मागणी घालेन. आणि म्हणूनच त्याने आधी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे सुरू केले.
आणि लवकरच त्याच्या मेहनतीला यश मिळाले. माधव सरकारी शाळेवर शिक्षक म्हणून नोकरीला लागला. आणि माधवच्या आईने त्याच्या लग्नाचे मनावर घेतले. माधवच्या मनात मीराबद्दल काही भावना आहेत हे माधवच्या आईला माहीत नव्हते. तरीसुद्धा त्यांनी सगळ्यात आधी माधव साठी मीराचा विचार केला.
कारण मीरा आपल्या घरची सून व्हावी असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून जराही वेळ न दवडता माधवची आई आपल्या भावाकडे गेली आणि तिने आपल्या भावाजवळ त्याच्या मुलीचा हात मागितला. पण माधवच्या आईला अपेक्षित नसताना अचानकपणे मीराच्या वडिलांनी त्यांना या लग्नासाठी नकार दिला.
मीरा त्यांची एकुलती एक मुलगी होती. आणि त्यांच्या घरी बारा एकर बागायती शेती होती. जी त्यांना मुलगा नसल्याने पुढे चालून मीरालाच मिळणार होती. आणि म्हणूनच मीरासाठी बरीच चांगली स्थळे येत होती. त्यामध्ये अनेक मोठ्या शहरातील मोठ्या पदावर कार्यरत मुलांची स्थळे सुद्धा येत होती.
म्हणूनच मीराच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलीला एखाद्या मोठ्या शहरात द्यायचे. एखाद्या लहानशा खेड्यातील शिक्षकाला जावई करून घेण्यापेक्षा कुणीतरी मोठ्या पदावर कार्यरत असणारा आणि मोठ्या शहरात राहणारा जावई त्यांना हवा होता.
शिवाय माधवच्या वडिलांचे आणि त्याच्या मामाचे आधी बरेच मतभेद व्हायचे. आणि माधव च्या घरची परिस्थिती सुद्धा फार चांगली नव्हती. आपल्या आर्थिक स्थितीचा अभिमान असलेल्या मामांना माधव सारख्या साधारण व्यक्तीला त्यांची एकुलती एक देखणी, शिकलेली आणि लाडकी मुलगी द्यायची नव्हती.
शिवाय लग्नात भरपूर खर्च करायची सुद्धा त्यांची तयारी होती. म्हणून मुलगा आपल्या तोलामोलाचा किंवा त्याहून श्रीमंतच असावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी माधवच्या स्थळाला सपशेल नकार दिला. माधवला हे कळताच तो कोलमडला. त्याने नेहमीच मीराला आपल्या जोडीदाराच्या रुपात पाहिले होते.
तिच्याशिवाय इतर कुणाचाही विचार करणे त्याला शक्यच नव्हते. पण मामाच्या नकाराने सगळ्याच आशा धूसर झाल्या होत्या. त्यानंतर अनेक दिवस तो स्वतःला सावरू शकला नाही. आणि तो स्वतःला सावरतच होता इतक्यात बातमी आली ती मीराचे लग्न जुळल्याची. पुन्हा तेच दुःख नव्याने माधवच्या वाट्याला आले.
माधवची आई त्याच्या मामावर रागावली होती. माधवचे स्थळ नाकारले म्हणून नाही तर स्थळ नाकारण्याची कारणे त्यांनी माधवच्या आईला स्पष्टपणे सांगितली म्हणून. आणि अर्थातच माधवच्या बाबतीत आपल्या भावाने असा विचार केलेला माधव च्या आईला अजिबात आवडले नव्हते. आणि म्हणूनच बरेच दिवस दोघेही एकमेकांशी बोललेले नव्हते.
पण मीराच लग्न जुळल तसं आईने स्वतःची नाराजी बाजूला ठेवली आणि मनापासून मीराच्या लग्नात सामील झाली. नाईलाजाने माधव सुद्धा मीराच्या लग्नात गेला. मीरा च्या वडिलांनी तिच्या लग्नात भरपूर खर्च केला होता. शिवाय त्यांच्या भरघोस मागण्या पूर्ण करायच्या म्हणून चार एकर शेती सुद्धा विकली होती.
लग्न खूपच थाटामाटात लागलं होतं. पण तिचं लग्न होताना माधव पाहू शकला नाही आणि लग्नमंडपाच्या बाहेर येऊन ढसाढसा रडला होता. आणि त्याने स्वतःशीच ठरवून टाकले होते की मीराला मनाच्या कप्प्यात फक्त आठवणी पुरते ठेवायचे.
मीरा आता कुणाची तरी बायको आहे. त्यामुळे तिच्याबद्दल तसल्या भावना मनात आणणे देखील चुकीचे. म्हणून मग त्याने पुन्हा कधी मीराचा उल्लेख स्वतः समोर देखील केला नाही. पण त्यामुळे त्याचं दुःख कमी झालेलं नव्हतच मुळी. आपलं पहिलं प्रेम अपूर्णच राहिलं ह्या जाणिवेने त्याच्यातील चैतन्यमयी व्यक्तिमत्त्वाला पार झाकोळून टाकले होते.
तिच्या लग्नाच्या दिवसापासून ते आजतागायत तो अगदी यंत्रवत आयुष्य जगत होता. त्याच्या आईने बराच प्रयत्न केला त्याचे लग्न जुळवण्याचा. पण माधव ने लग्नाचा विषय सतत टाळला होता. म्हणून मग त्याच्या आईने सुद्धा इतक्यात त्याच्यासाठी स्थळे पाहणे जरा थांबवलेच होते. त्या माधवच्या होकाराची वाट बघत होत्या.
पण आज मात्र पुन्हा मीराच्या उल्लेखाने त्याला दुःख कमी आणि काळजी जास्त वाटत होती. त्याने आज देवाला हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली की मीराच्या आयुष्यात पुन्हा सर्वकाही ठीक होऊ देत म्हणून.
पण मीराच्या आयुष्यात अजुन बरीच दुःख लिहिलेली होती. आणि म्हणूनच दिवाळीत तिला माहेरी सोडून गेलेला तिचा नवरा तिला परत घ्यायला आलाच नाही. त्यानंतर बरेच दिवस मीरा कुणाशीच बोलत नव्हती. मीरा च्या वडिलांनी सुद्धा बराच प्रयत्न केला दोघांचा संसार वाचवण्याचा. पण तिच्या नवऱ्याला ती नकोच होती.
क्रमशः
तुझ्याविना – भाग २ (अंतिम भाग)