लवकरच दोघांचाही घट’स्फो’ट झाला. ह्या धक्क्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. मीराला त्या अवस्थेत पाहून माधवच्या आईला खूप वाईट वाटत होते. मीराच्या वडिलांनी जरी माधव आणि मीराच्या लग्नाला नकार दिलेला असला तरी यात मीराची काहीच नाही हे माधवची आई जाणून होती.
आणि म्हणूनच आपला आधीचा अपमान विसरून माधवच्या आईने पुन्हा एकदा मीराच्या आईजवळ माधव आणि मीराच्या लग्नाबद्दल विषय काढला. मीराच्या आईला आधीपासूनच माधव आवडायचा. पण नवऱ्याच्या निर्णयापुढे तिचे काहीच चालले नाही.
पण एवढे सगळे होऊन सुद्धा माधवची आई पुन्हा एकदा मीराला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार आहे हे ऐकून त्यांना खूप चांगले वाटले. पण मीराच्या आईने माधवच्या आईला थोडा वेळ मागितला. कारण आता जरा घाई होईल असे त्यांना वाटले.
शिवाय मीरा सुद्धा अजुन सावरलेली नव्हती. आणि मीराचे बाबा काय उत्तर देतील ह्याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. माधवच्या आईने सुद्धा थांबायला होकार दिला. कारण त्यांना सुद्धा माधव कडून होणार मिळवायचा होता. माधवच्या मनात नेमकं काय सुरू आहे ह्याची त्यांना कल्पना नव्हती.
इकडे मीराच मन लागावं म्हणून तिच्या काकांनी तिला पुढील शिक्षण घेण्याचे सुचवले. शिवाय काही स्पर्धा परीक्षा सुद्धा द्यायचे सुचवले. मीराच्या वडिलांना हे फारसे रुचले नव्हते पण घरी सगळ्यांनी दुजोरा दिल्याने मग त्यांनी नाईलाजाने तिला शहरात असणाऱ्या काका काकूंच्या घरी राहण्याची परवानगी दिली.
तिथे तिच्या दोन चुलत बहिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. मग मीरा ने सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्याच परीक्षेत तिला यश मिळाले. आणि मीरा चांगल्या नोकरीवर लागली. घरी सगळ्यांनाच आनंद झाला. आधी तिच्या वडिलांना तिचे परीक्षा देणे, अभ्यास करणे फारसे रुचले नव्हते आता तेच मुलीच्या यशाने हुरळून गेले होते.
मीरा चांगल्या नोकरीवर लागली हे कळल्यावर तिला दुसऱ्या लग्नासाठी स्थळे येऊ लागली. ती सुद्धा पहिल्यापेक्षा सुद्धा चांगली. तेव्हा मीरा च्या वडिलांनी ठरवले की तिच्या पहिल्या नवऱ्याच्या नाकावर टिच्चून मीरासाठी आधीपेक्षा ही चांगला आणि श्रीमंत मुलगा पाहायचा.
एके दिवशी काही कामानिमित्ताने माधव मामाच्या गावी आला होता. मीराच अभिनंदन करावं म्हणून न राहवून तो मीराच्या घराच्या दिशेने निघाला. मीरा सुद्धा त्या दिवशी घरीच होती. योगायोगाने त्याच दिवशी एक मध्यस्थ मीरासाठी स्थळ घेऊन आले. मुलाचं हे पहिलंच लग्न होतं. शिवाय मुलाला चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती. मीराचे वडील ह्या लग्नासाठी लगेच तयार झाले. ते मध्यस्त गेल्यावर त्यांनी लगेच मीराच्या आईला आणि मीराला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले.
” बघितलं मीरा ची आई…आपल्या मीरा ने नशीब काढलं…आधीपेक्षा ही चांगला नवरा मिळणार आहे बघ तिला…चांगला भरपूर पगार आहे…मी तर लगेच हो सांगीतलं त्यांना…”
” अहो पण…” मीराची आई म्हणाली.
” आता काय मध्येच तुझं…बोल काय म्हणायचं आहे ते…” मीराचे वडील त्यांना म्हणाले.
” मी तुम्हाला सांगितलं होतं ना की वहिनींनी पुन्हा एकदा माधव साठी मीरा ला मागणी घातली होती म्हणून…आणि तुम्ही तेव्हा म्हणाले होते की तुम्ही विचार करणार म्हणून…इतकंच नाही तर तुम्ही होकार द्यायला सुद्धा तयार होतात…मग आता आधी त्यांच्या स्थळाचा विचार व्हायला नको का…?” मीराची आई म्हणाली.
त्यासरशी मीराने तिच्या आईकडे पाहिले. आत्याने माधवसाठी आपल्याला मागणी घातली ह्याची थोडीफार कल्पना होती. पण तेव्हा ती वेगळ्याच मनस्थितीत असल्याने तिने इतके लक्ष दिले नव्हते. पण आज मात्र विषय निघालाच होता तर तिला याबाबत बोलणे भाग होते. आता बाबा यावर काय बोलतात याकडे तिचे लक्ष लागले होते. बाबा आईला म्हणाले.
” ती आधीची गोष्ट आहे…आधी आपल्या मीराला नोकरी लागलेली नव्हती…पण आता आपल्याला त्यांचा विचार करायची काहीच गरज नाही…आता तर कितीतरी चांगले स्थळं सांगून येत आहेत मीराला…आणि आजचा मुलगा तर सगळ्यात चांगला वाटला मला…” मीरा चे बाबा म्हणाले.
मीराच्या बाबांचे बोलणे घराबाहेर उभे राहून घरात जावे की न जावे या विचारात असलेल्या माधवच्या कानावर पडले. आणि तो आतमध्ये न जाता बाहेरच भिंतीच्या आधाराने असलेल्या ओट्यावर बसला. आता त्याच्या मनात मीरा ला मिळवण्याची काही आशा नव्हती. तरीही आई का वारंवार हा प्रयत्न करतेय ह्याचे त्याला वाईट सुद्धा वाटले. कारण पुन्हा एकदा नकाराने त्याच्या दुःखाचे सावट अधिकच गडद होत जात होते. तो विचारातच असताना आतमधून मीरा चा आवाज आला. मीरा तिच्या बाबाला म्हणाली.
” चांगला म्हणजे नक्की काय बाबा…त्याला जास्त पगार आहे म्हणून तो चांगला आहे असं असतं का…आणि तसं असेल तर मग याच्यापेक्षा जास्त पगार ज्याला असेल तो या मुलापेक्षाही चांगला असेल ना बाबा…” मीरा म्हणाली.
” तू अशी का म्हणतेस बाळा…तू माझी एकुलती एक मुलगी आहेस…मग तुझ्यासाठी चांगल्यात चांगलं स्थळ शोधणं माझं कामच आहे…” बाबा म्हणाले.
” पण चांगलं म्हणजे नक्की काय…मला माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिला तेव्हा मला नाव ठेवणारे लोक मला नोकरी लागली म्हणून माझ्यासाठी स्थळ आणत आहेत…माझ्या सोबतच तुमची शेती सुद्धा त्यांना मिळेल या आशेने अनेक मुलं मी घटस्फोटित आहे हे विसरून माझ्याशी लग्न करायला तयार आहेत…पण मला हे सगळं नकोय बाबा…” मीरा म्हणाली.
” मग तुला काय हवंय…?” बाबांनी विचारले.
“पहिल्या लग्नात वाईट अनुभव घेतल्यावर इतक्या लवकर मी दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नाही…पण कधीतरी ते होईलच हे ही मला ठाऊक आहे…पण जर माझ्यासाठी मुलगा पाहायचाच असेल तर मी जशी आहे तशी मला स्वीकारणारा नवरा हवाय मला…माझ्यामागे किती संपत्ती आहे हे न बघता ज्याला फक्त माझी सोबत हवी असेल असा नवरा हवाय मला…
फक्त माझ्या चांगल्या काळात मला सोबत न करता माझ्या वाईट वेळेत सुद्धा माझ्यासोबत खंबीर उभा राहील असा नवरा हवाय मला…मी कशी दिसते यापेक्षा मी मनाने कशी आहे हे पाहणारा नवरा हवाय मला…आणि मला वाटतं की माधवपेक्षा चांगला नवरा मला मिळू शकणार नाही…तुम्हाला हवाय तितका श्रीमंत नाही पण त्याच्या मनाच्या श्रीमंतीची बरोबरी कोणी करू शकणार नाही…” मीरा निर्धाराने म्हणाली.
बाहेर उभा असणारा माधव मात्र मीराचे बोलणे ऐकुन तृप्त झाला. तिचं आपल्यावर प्रेम जरी नसलं तरी तिचा आपल्यावर इतका विश्वास आहे ह्या जाणिवेने त्याला त्याचे प्रेम सार्थक झाल्यासारखे वाटले. ह्या क्षणाला त्याला आणखी काहीही नको होते.
इकडे बाबा मात्र नुसतेच विचार करत उभे राहिले. मीराची आई म्हणाली.
” मीराचा घटस्फोट झाल्यावर सगळ्यांनीच तिला दूषणं दिली…नवऱ्याला जशी बायको हवी होती तशी का नाही झाली म्हणून…पण या सगळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त आधार कुणी दिला असेल तर तो फक्त ताईंनी दिलाय…एवढेच नाही तर स्वतःच्या एकुलत्या एक मुलासाठी तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली…म्हणून मला वाटतं तुम्ही माधवच्या स्थळाचा विचार करावा…”
थोडा वेळ घरात भयानक शांतता पसरली. आजपर्यंत एक बाहुली सुद्धा स्वतःसाठी न घेतलेल्या मीराने आज स्वतःसाठी इतका मोठा निर्णय स्वतःच घेतला होता. आणि तिच्या डोळ्यात निर्धार दिसून येत होता. मीरा च्या आईला देखील मीरा चा निर्णय पटला होता. आणि मीरा चे म्हणणे योग्य असल्याची जाणीव आज तिच्या बाबांना सुद्धा झाली होती. जास्त पगार म्हणजे जास्त चांगलं स्थळ या निकषाला आज सुरुंग लागला होता. इकडे बाहेर उभा असणारा माधव घराच्या बाहेरूनच माघारी फिरणार इतक्यात मीरा चे काका म्हणजेच त्याचे लहान मामा तिथे आले आणि त्याला म्हणाले.
” अरे माधव…तू इकडे कसा…?”
” काही नाही…जरा इकडे आलो होतो म्हटलं मामांना भेटून जावं…” माधव म्हणाला.
” चल मग…मी पण आताच आलोय…” असे म्हणत काका त्याला आतमध्ये घेऊन सुद्धा गेले.
माधवला अचानक घरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण मीराच्या लग्नापासून तो इकडे फिरकला नव्हता. त्याला पाहताच मीरा चे वडील म्हणाले.
” ये माधवा…बस…” मीरा च्या आईकडे पाहून म्हणाले. ” तुम्ही चहपाण्याच बघा…आपले जावई आलेत…”
आणि त्या सरशी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलले. तेवढ्यातच मीरा आणि माधवची नजरा नजर झाली आणि मीरा च्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली आणि नजर आपोआप झुकली. आपल्या अशा पाहण्याने मीरा अवघडली हे लक्षात येताच त्याने आपली नजर फिरवली. पण आजवर फक्त त्याच्याच नजरेत असणारं प्रेम आज तिच्या नजरेत सुद्धा उतरल्याचं पाहून तो मनोमन सुखावला.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.