” आम्ही नाही वागवू शकत तुमच्या मुलीला आता…आम्हालाही नातवंडं पाहिजेत…लग्नाला सहा वर्षे झालीत पण अजूनही गोड बातमी नाही…शेवटी वाट तरी किती पाहायची…कितीतरी दवाखाने केले…देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही…” रामराव त्यांच्या सूनबाईच्या वडिलांना म्हणाले.
” अहो पण पोरीचा इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो…तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी…पण देवाने तिच्या पदरात लेकराच दान दिलं नाही अजुन त्यात तिची तरी काय चूक हाय…” किसन विनवणीच्या सुरात म्हणाला.
” पण आम्ही आता आणखी थांबू शकत नाही…आमच्या धाकट्या लेकाला दोन मुले देखील झालीत…पण थोरल्या मुलाला मात्र अजुन मुलबाळ नाही…शेवटी म्हातारपणात मुलांचाच आधार असतो…त्याच्यासाठी आमचा जीव तुटतो…” रामराव म्हणाले.
” देवाची कृपा झाली तर आज ना उद्या तिची कुस बी उजवेल…होईल तिला बी मुलबाळ…आणखी काही दिवस वाट पाहू…” किसन म्हणाला.
” आता आम्ही ह्यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही…पण तुला जर योग्य वाटत असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे…ज्यामुळे तुझ्या मुलीचा संसार सुद्धा मोडणार नाही आणि आमचा प्रश्न सुद्धा सुटेल…” रामराव म्हणाले.
” कोणता पर्याय..?”
” तू तुझ्या धाकट्या मुलीचं लग्न आमच्या केशवा सोबत लावून दे…जेणेकरून तुझ्या दोन्ही मुली एकाच घरात राहतील आणि तुझ्या मोठ्या मुलीचा संसार सुद्धा वाचेल…कारण आम्ही केशवचे लग्न एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर लावून दिले तर मोठ्या सूनबाईला माहेरी परत यावे लागेल…पण जर तिच्या सख्या बहिणीसोबत तिच्या नवऱ्याने लग्न केले तर दोघी बहिणी समंजसपणे एका घरात राहू शकतील…” रामराव म्हणाले.
” हे काय बोलताय तुम्ही…मोठ्या मुलीच्या नवर्यासोबत धाकटीच लगीन… असं कसं होऊ शकतं..” किसन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला.
” हे बघ…मी सर्व विचार करूनच बोलत आहे…तू सुद्धा विचार कर आणि मला तुझा निर्णय सांग…मी दोन दिवसांनी परत येईल…तोपर्यंत हे सर्व केशवला कळता कामा नये…” रामराव म्हणाले.
रामराव गेल्यानंतर किसन बराच वेळेपर्यंत डोक्याला हात लावून बसला होता. दोन दिवसांपूर्वीच माहेरी आलेल्या सरिताने तिच्या सासऱ्यांचे आणि वडिलांचे बोलणे ऐकले होते. सरितावर तर जणू आभाळच कोसळले होते. तिचे केशव वर जीवापाड प्रेम होते. पण कधीतरी असे होईल ह्याची तिला कल्पना होतीच. पण आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आपल्या लहान बहिणीचा विचार होईल ह्याची पुसटशी कल्पनाही तिला आली नसेल.
सरिता दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी आली होती तेव्हा तिचा रामरावांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. अभ्यासात हुशार आणि दिसायला देखणी असणारी सरिता त्यांना पहिल्या नजरेत आवडली होती.
रामराव गावातील एक मोठे प्रस्थ होते पण मनाने फार चांगले होते. ते गरीब आणि श्रीमंत असा भेद मानत नव्हते. त्यांनी लगेच तिच्या वडिलांना वाड्यावर बोलावून घेतले आणि सरिता व त्यांच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावाने किसन तर अगदी हुरळून गेला होता.
किसन मजुरी करून स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. पदरात तीन मुली होत्या. बायको तर मुली लहान असतानाच कसल्याशा आजाराने देवाघरी निघून गेली होती. घरी जे असेल नसेल ते विकून कसेतरी मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले पण किसनला नेहमीच दोन मुलींच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली असे. पण आज राम रावांनी स्वतःहून त्याच्या मुलीचा हात स्वतःच्या मुलासाठी मागितला होता. किसनसाठी हि खूप मोठी गोष्ट होती. अगदी स्वप्नवत.
किसन घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सरिताला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण बापाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ती पुढे काही बोललीच नाही. रामरावांनी मोठ्या थाटामाटात केशव आणि सरिताचे लग्न लावून दिले.
केशव आणि सरिताचा संसार सुरू झाला. केशव उच्चशिक्षित तरुण होता. लहान भावाला सोबत घेऊन आपल्या वडिलांचा कारभार तो अगदी व्यवस्थिपणे सांभाळायचा. सरिता सुद्धा लहानसहान कामांमध्ये त्याची मदत करायची.
खरतर आधी मैत्री मग प्रेम आणि त्यानंतर नवरा बायकोचे नाते असे व्हायला पाहिजे पण या दोघांचे थोडे उलट झाले. लग्न झाल्यावर दोघांमध्ये आधी नवरा बायकोचे नाते उमलले आणि नंतर मैत्री झाली. आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं.
सरिता घरात आणि केशव कारभारात लक्ष द्यायला सुरुवात झाल्यापासून घरादाराची नुसती भरभराट झाली होती. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता. आता सगळेजण फक्त गोड बातमीची वाट पाहत होते. पण लग्नाला दोन वर्ष उलटून गेले तरीही त्यांच्या संसाराला बाळाची चाहूल लागली नाही.
शेवटी सरिताला शहरातल्या एका मोठ्या डॉक्टरला दाखवण्यात आले. प्रॉब्लेम सरितामध्येच होता पण तो ठीक होऊ शकत होता. सरीतावर उपचार सुरू झाले पण तरीही सरिताला दिवस गेले नाहीत. घरच्यांनी देवाला नवस केले. पण काहीच फायदा झाला नाही.
तिच्या दीराला मात्र दोन मुले झाली देखील. त्यामुळे सरिता वर आणखी दबाव वाढत होता.
दिवसेंदिवस सरीताचे नैराश्य वाढतच होते. पण या सर्वांमध्ये केशव सरिताला समजून घेत होता. तो सरिताला नेहमीच म्हणायचा की आपल्याला मुलबाळ झालं नाही तरी चालेल. आपण दोघेच एकमेकांना जन्मभराची साथ देऊ.
पण रामरावांना मात्र नेहमीच वाटायचं की केशवला सुद्धा मुलं व्हावीत. मोठा मुलगा असल्याने केशवला त्यांनी खूप लाडाने वागवले होते. आणि केशवला मुलबाळ हवेच या हट्टामुळे त्यांनी केशवला न सांगता त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली होती. सरिताला ह्याची आधीच कल्पना होती. पण तिचाही नाईलाज होता.
सरिता दोन दिवसांपूर्वी सहज म्हणून माहेरी आली होती. केशव स्वतः तिला सोडायला आला होता. पण रामरावांच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. सरिताने इतके वर्ष त्यांच्या घराला खूप चांगले सांभाळले होते.
त्यामुळे सरिताला कायमचे माहेरी पाठवल्यापेक्षा जर तिच्या लहान बहिणीसोबत केशवचे लग्न केले तर दोघी बहिणी एकत्र कुटुंबात नांदू शकतील असे त्यांना वाटले होते. म्हणून ते केशवला काहीही कल्पना न देता किसन शी बोलायला आले होते. एकदा का किसन आणि सरिताने या गोष्टीसाठी होकार दिला की केशवला दुसऱ्या लग्नासाठी राजी करणे खूप सोपे होईल असा त्यांचा मानस होता.
सरिता आणि केशव चे आयुष्य आता कोणते वळण घेईल हे पाहूया पुढील भागात…
क्रमशः
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग २
भाग २ इथे वाचा
फोटो साभार
आरती लोडम खरबडकर.