( सत्यघटनेपासून प्रेरित )
मोहन सोबत राधाचं लग्न झालं अन् ती गावातून शहरात राहायला आली. आधी फक्त कधीतरी ती शहरात यायची. बारावीपर्यंत शिक्षणाची सोय गावातच होती. म्हणून शहराशी संबंध हा फक्त कामापुरताच होता. पण राधाला शहराच आधीपासूनच खूप आकर्षण होतं.
मोहनच चहाचं दुकान होतं. बऱ्यापैकी चालायचं. म्हणजे तसं चालायला तर चांगलंच चालायचं. पण मोहनच लक्ष दुकानाकडे जरा कमीच होतं. मोहनवर तिथल्याच एका स्थानिक नेत्याचा जरा जास्तच प्रभाव होता. त्यामुळे मोहन दुकानात कमी आणि भाऊंच्या सोबत जास्त असायचा. कट्टर समर्थक म्हणून.
पण राधाला यापैकी कुठल्याच गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. तिची संसाराची गणितं साधी आणि सरळ होती. जे आहे त्यातच समाधानी राहून सुखाने संसार करायचा. आणि नवऱ्याला भक्कम साथ द्यायची. तिने ठरवलं होतं. नवऱ्याला सोबत घेऊन प्रगती करायची. जर त्याने परवानगी दिली तर बी. ए. ला प्रवेश घ्यायचा हे देखील तिने ठरवले होते.
दोघांचं लग्न घरच्यांनी ठरवल्याने त्यांचं एकमेकांशी बोलणं फार जुजबीच झालं होतं. पण राधाने ठरवलं होतं. पुढे शिकायची इच्छा मोहन जवळ बोलून दाखवायची. मग मोहन ने होकार दिला तर ठीक. नाहीतर मग आपलं जसं आहे तसं राहायचं. नशीबाने शहरात राहणारा निर्व्यसनी नवरा मिळाला आहे ह्याचं समाधान सुद्धा तिला खूप होतं.
नाहीतर गावात असे कितीतरी नवरे बघितले असतील जे काहीही काम न करता नुसते दारुतच असतात. अन् आपल्या बायका मुलांना मारतात. पण आपल्या नशिबात ते सगळं नाही हीच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. गावातील बायका तिच्या नशिबाचे गुणगान करत होत्या. दोघांचं लग्न सुद्धा बऱ्यापैकी थाटात लावून देण्यात आलं होतं.
लग्न झाल्यावर मांडव परतणी, सत्यनारायण सगळं आटोपलं आणि दोघांच्या पहिल्या रात्रीची तयारी घरच्यांनी केली. घरातील पाहुणे आपापल्या गावी निघून गेले होते पण तिच्या नणंदा घरीच होत्या. सोबतीला मोठी जाऊ सुद्धा. सगळ्या मिळून राधाला चिडवत होत्या. आधीच घाबरलेली राधा त्यांच्या चिडवण्याने आणखीनच अवघडली होती.
घरातलं वातावरण एकदमच आनंदी होतं. पण अचानकच मोहनला एक फोन आला. समोरच्या माणसाचे बोलणे ऐकून मोहन च्या चेहऱ्यावरील हावभाव एकदमच बदलले. मोहन च्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता. मोहन रागातच घराच्या बाहेर जायला निघाला. इतक्यात त्याच्या बाबांनी काळजीने त्याला विचारले.
” अरे मोहन…कुणाचा फोन होता…आणि तू इतक्या रागात कुठे जात आहे…?”
” पक्याचा फोन होता बाबा…आज भाऊ बाहेरगावी दौऱ्यावर गेले होते…तिथे हल्ला झाला त्यांच्यावर…मला तिथे अर्जंट जायला पाहिजे…”
एवढे बोलून कोणाच्या परवानगी ची वाट न पाहता मोहन घरातून निघाला देखील. नेमकं काय होतंय ते राधाला काहीच कळत नव्हतं. पण ती बोलणार तरी काय. घरातल्या मोठ्या लोकांनीच त्याला अडवल नाही तर ही नवी नवरी कशी अडवणार.
मग तिच्या जाऊने आणि तिच्या दोन्ही नणंदा नी तिची समजूत घातली. आणि तिला सांगितले की मोहन हा भाऊंचा खूप मोठा समर्थक आहे. भाऊ सुद्धा त्याला खूप मानतात. त्यांच्या बाहेरगावच्या दौऱ्यात थोडा राडा झाला म्हणून मोहन तातडीने निघून गेला असेल. येईल लवकरच. आज तुमची पहिली रात्र आहे हे थोडी विसरणार तो. असे सांगून त्यांनी तिची समजूत घातली.
राधाला सुद्धा त्यांचे म्हणणे पटले. म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन मोहनची वाट पाहू लागली. हुरहूर, बेचैनी, लाज अशा अनेक भावना आज तिच्यामध्ये दाटून आल्या होत्या. पण बराच वेळ झाला तरी मोहन आलाच नाही. तिने मोहनला फोन सुद्धा केला पण त्याने उचललाच नाही. शेवटी मध्यरात्री केव्हातरी तिचा डोळा लागला. आणि ती झोपी गेली.
सकाळी तिची झोप उघडली ती तिच्या सासूबाईंच्या तोंडून निघालेल्या किंकाळीनेच. सासुबाई मोठमोठ्याने कुणाशी तरी बोलत होत्या. राधा तशीच उठली आणि तिने स्वतःचा अवतार जरा नीट केला आणि लगेच बाहेर गेली. नेमकं काय झालंय हे तिला कळतच नव्हतं.
तिला पाहून तिची जाऊ तिच्याजवळ आली आणि म्हणाली.
” तुला काही कळलय का…?”
” नाही…तुम्ही काय म्हणताय ते मला काहीच कळत नाही आहे…” राधा जरा घाबरून च म्हणाली.
” अगं काल मोहन भाऊजी बाहेर गेले होते ना…तिथे दोन गटात हाणामारी झाली…अगदी तलवारी पण निघाल्या…आणि त्यात समोरच्या गटातील माणूस खूप जास्त जखमी झाला…आणि त्याच आरोपाखाली भाऊंच्या सोबत आठ दहा जण जेल मध्ये आहेत…” जाऊबाईंनी तिच्या कानात सांगीतले.
” पण आई का अशा रडत आहेत…?” राधा ने पुन्हा जरा घाबरून विचारले.
” कारण त्या आठ दहा लोकांमध्ये मोहन भाऊजी सुद्धा आहेत…?” जाऊबाई म्हणाल्या.
आणि हे ऐकताच राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. जे घडलं ते तिच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. कुठे तिने तिच्या संसाराची मखमली स्वप्ने पाहिली होती, आणि कुठे हे भयानक वास्तव समोर येत होते. आपला नवरा आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेल मध्ये आहे हे पचवणे तिला खूप कठीण जात होते. गावात असताना तिने कधीतरी जेल बद्दल ऐकले होते. पण ते सगळेच इतके भयानक होते की ते आठवून सुद्धा राधाच्या अंगावर काटा उभा राहिला होता.
काय करावे आणि काय नाही हे कुणालाच सुचत नव्हते. घरचे सगळेच काळजीत होते. आणि सगळ्यात जास्त दुःखी राधा होती. जो माणूस जखमी झाला होता ती बरीच मोठी असामी होती. त्यामुळे समोरच्या पक्षाने केस चांगलीच मजबूत उभी केली होती.
पण भाऊसाहेबांनी खूप प्रयत्न केल्यावर त्यांना जामीन मिळाला. त्यांच्यासोबत आणखी चार पाच जणांना जामीन मिळाला. पण मोहन ला अजूनही जामीन मिळाला नव्हता. कुणीतरी भांडण सुरू असतानाचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्यामध्ये मोहन सुद्धा दिसत होता. हल्ला करताना नसला तरी आवेशात भांडताना दिसत होता. आणि म्हणूनच त्याला संशयित म्हणून जामीन नाकारला होता. आठवडा झाला तरी मोहनला जामीन मिळाला नाही म्हणून मग एके दिवशी राधाच तिच्या सासर्यांच्या सोबतीने मोहनला भेटायला गेली. मोहनला पाहिल्यावर राधाला कसेतरीच वाटले. लग्नात एकदम रुबाबदार दिसणाऱ्या मोहन चा पार अवतार झाला होता. तरीपण स्वभावातला तोरा अजूनही तसाच होता. राधाला पाहून तो म्हणाला.
” तू इथे कशाला आलीस…?”
” तुम्हाला भेटायला…बरेच दिवस झाले तुम्हाला इथे म्हणून…?” राधा कशीबशी म्हणाली.
” हे बघ…तू काळजी करू नकोस…भाऊसाहेब आहेत ना…ते करतीलच काहीतरी…लवकरच घरी येईल मी…” मोहन राधाला म्हणाला.
” पण कधी…? अजुन किती वेळ लागणार आहे या सगळ्याला…?” राधाने न राहवून विचारले.
” लवकरच होईल…भाऊंनी एका माणसाला निरोप घेऊन पाठवलं होतं…म्हणाले लवकरच इथून बाहेर काढतील…” मोहन म्हणाला.
आणि मोहनचे बोलणे ऐकुन राधाला जरा दिलासा मिळाला. तिला वाटले की भाऊसाहेब प्रयत्न करतायत तर तिचा नवरा लवकरच जामिनावर बाहेर येईल. पण दिवसामागून दिवस अन् महिण्यांमागुन महिने निघून गेले. मोहनला जेल मध्ये जाऊन पाच महिने होऊन गेले होते. पण जामिनावर सुटका अजूनही झाली नव्हती.
या पाच महिन्यात राधा साठी परिस्थिती खूपच बदलली होती. तिच्या सासरच्या मंडळींनी झालेल्या सगळ्या प्रकारासाठी तिलाच दोष दिला. राधाचा पायगुण खराब म्हणूनच तिचा नवरा जेल मध्ये आहे म्हणून तिला हिनवणे सुरू केले. नवऱ्याच्या माघारी सासरी तिला काडीचीही किंमत उरली नाही.
तिने फक्त खायचं, प्यायचं आणि घरातली कामे करायची. यापुढे तिचा वावर घरात नव्हताच. आणि चुकून जर घरात कुणाचा मूड खराब झाला आणि राधा त्याच्यासमोर आली तर मग सगळा राग हिच्यावरच निघायचा. राधा ह्या सगळ्याने खूप थकली होती.
क्रमशः
तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)
खूप छान कथा…योग्य निर्णय..👌👌👍👍🙏🙏😊😊❤❤