भाग २ – मोहन आणि राधा
माहेरी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिथे आधी राधा च्या नवऱ्याच सगळ्यांना कौतुक होतं तिथे आता त्याच्या नावाने सुद्धा लोक नाक मुरडत. राधा इतक्या दिवसात फक्त एकदाच तिच्या माहेरी गेली होती पण तिथे सगळ्यांनीच तिला वाईट वागणूक दिली. आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला दिल्या घरी सुखी राहा असाच सल्ला दिला.
नशिबात आहे ते तर भोगावेच लागणार म्हणून आईने तिला धीर दिला पण माहेरी आधार मिळू शकला नाही. म्हणून मग राधा ने ठरवले की एकदा तिच भाऊसाहेबांनी भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत बोलेन. म्हणून ती एकदा हिम्मत करून भाऊसाहेबांच्या घरी गेलीच. भाऊसाहेबांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेबांना तिची मोहन ची बायको अशी ओळख करून दिली. भाऊसाहेब तिला पाहून म्हणाले.
” या…इकडे काय काम काढलत…?”
” ते ह्यांना जामीन नाही मिळाला ना अजुन…ते म्हणाले की तुम्ही प्रयत्न करत आहात…” राधा कशीबशी चाचरत म्हणाली.
” आम्ही तर पूर्ण प्रयत्न करतोय…पण समोरची पार्टी सुद्धा काही कमी नाही…म्हणून उशीर लागतोय…पण तुम्ही काळजी करू नका…येईल तो बाहेर…” भाऊसाहेब म्हणाले.
” पण आणखी किती वेळ लागणार…पाच महिने झालेत बघा…” राधा अडखळतच म्हणाली.
” अहो बाई…तुम्हाला यातलं फार काही कळत नाही…एक तर त्याला मी त्या भांडणात बोलावलं नव्हतं…तो फसलाय तर आम्ही करतोय ना प्रयत्न…”
दादासाहेब जरा ओरडतच म्हणाले. पण आजूबाजूला लोक आहेत जे ध्यानात आल्यावर जरा नरमाई ने म्हणाले.
” आम्हाला कळतंय तुम्हाला त्याची काळजी आहे ते…पण लवकरच येईल तो बाहेर…आणखी काही मदत लागली तर सांगा आम्हाला…” भाऊसाहेब म्हणाले.
आणि राधा तशीच हताशपणे निघून आली. भाऊसाहेब काही त्याची मदत करणार नाहीत हे तिला कळून चुकले होते. कारण शहर तिच्यासाठी नवीन असले तरी लोकांना ओळखायला ती फारशी चुकत नसे. म्हणून तिने तिच्या मनातील शंका मोहन जवळ बोलून दाखवली.
त्याला सांगितले की आपणच एखादा वकील शोधू आणि जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करू. तर मोहन उलट तिच्यावरच भडकला. तो म्हणाला की त्याला तिच्यापेक्षा जास्त भाऊसाहेबांवर जास्त विश्वास आहे. आणि तो प्रसंगी तिला सोडू शकेल पण भाऊसाहेबांना नाही.
आता मात्र राधाला मोहनचा खूप राग आला. काहीही सारासार विचार न करता आहे त्या परिस्थिती स्वतःची मदत न करता डोळे बंद करून दुसऱ्यावर अवलंबून असण्याचा. स्वतःचा, स्वतःच्या घरादाराचा, बायकोचा, भविष्याचा काहीच विचार करत नाही याचा. तिने ठरवले की आता बस झालं.
राधा खिन्न होऊन कोर्टाच्या बाजूला एका दुकानाबाहेर विचार करत उभी होती. इतक्यात तिची मैत्रीण अंकिता तिथे आली आणि तिने विचार करत स्वतःतच मग्न असलेल्या राधाला आवाज दिला.
” इथे काय करत आहेस राधा…?” अंकिता म्हणाली.
” कोर्टात आले होते…तुला तर सगळं माहीतच आहे ना…” राधा उदासपणे म्हणाली.
ते ऐकून राधाची मैत्रीण गप्प बसली. मग राधा नेच तिला प्रश्न केला.
” तू इकडे कशी काय…?”
” अगं पोलिस कॉन्स्टेबलच्या जागा निघाल्या आहेत…त्याचा फॉर्म भरायला आले होते…” अंकिता ने माहिती दिली.
” पण तू तर फक्त बारावी पर्यंतच शिकलेली आहेस ना…मग फॉर्म भरू शकतेस का…?” राधा ने विचारले.
” हो…बारावी पास वरच जागा निघाल्यात…” अंकिता ने माहिती दिली.
आणि लगेच राधा च्या मनात विचार आला. आपण सुद्धा प्रयत्न केला तर. आणि लगेच ती अंकिताला म्हणाली.
” थांब…मी पण येते…मी पण फॉर्म भरते…”
राधा चे बोलणे ऐकुन मैत्रिणी ला आनंद झाला. राधा आणेक महिन्यांपासून किती टेंशन मध्ये आहे हे तिला माहिती होतं. दोघींनी मिळून परीक्षेचा फॉर्म भरला आणि अंकिता ने राधा ला तीन चार पोलिस भरतीची पुस्तके विकत घेऊन दिली. आणि राधा ने घरच्यांच्या लपून ती पुस्तके तिच्या खोलीत नेऊन ठेवली.
रिकाम्या वेळेत राधा पुस्तके वाचू लागली. मिळेल त्या वेळात अभ्यास करू लागली. जेव्हा जेव्हा घरच्यांचे टोमणे ऐकायची तेव्हा तेव्हा नोकरीला लागायची तिची इच्छा अधिक तीव्र होत होती. मग ती आणखी जिद्दीने अभ्यासाला लागायची.
आणि पुढच्या काही दिवसातच मैत्रिणीच्या मदतीने आणि सोबतीने तिने लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी दोन्ही उत्तीर्ण केल्या. महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा सुद्धा फायदाच झाला. लवकरच राधाला नोकरी मिळाली. राधाला खूप आनंद झाला. आणि तिने आनंदातच ही बातमी घरी सगळ्यांना सांगितली.
राधाला पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी लागल्याचे ऐकून तिच्या सासरी सगळ्यांनीच नाक मुरडले. आमच्या घरची सून नोकरी करणार नाही असे सगळ्यांनीच तिला सुनावले. मोहन ला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला खूपच राग आला. तो राधाला म्हणाला की तिने जर ही नोकरी केली तर मी तिला वागवणार नाही. माहेरच्यांनी सुद्धा समजावून सांगितले की सासरची मंडळी जशी म्हणतील तसेच वाग. नाहीतर ते तुला घटस्फोट द्यायलाही मागे पुढे बघणार नाही.
आपल्या नोकरी च्या बाबतीत घरच्यांची उदासीनता आणि एकदम टोकाचे धोरण राधाला अजिबात पटले नव्हते. पण तीसुद्धा विचारात पडली. नोकरी की संसार. पण मनाने आणि बुद्धीने एकाच वेळी एकच कौल दिला. तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या बुरसट विचारसरणीला बगल देऊन स्वतःसाठी जगण्याचा तो पहिलाच प्रयत्न होता.
जे लोक तिच्या मनाचा विचार करत नाही ती सुद्धा त्यांचा विचार करणार नव्हती. तिने निर्धार केला आणि नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आणि त्या घरातून बाहेर पडली ती कायमचीच. आता ती सज्ज होती नवीन आयुष्याची सुरुवात करायला. आयुष्याने दिलेल्या संधीचे सोने करायला.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.