” रागिणी…तू माझ्यासाठी साधारण साडी आणली हे मी समजू शकते…कारण कितीही झालं तरी आपण जावा आहोत…बहिणी नाही…पण मुलांच्या बाबतीत हा काय भेदभाव आहे ग…जाई आणि सिया साठी किती हलके कपडे आणलेस तू…माझ्या बाबतीत तू कशीही वागली तरी मी सहन करेन…पण इतक्या लहान मुलींच्या बाबतीत का अशी वागतेस तू…” साधना म्हणाली.
” मला वाटलं हे आवडतील तुम्हाला…तुम्हाला जास्त बटबटीत कपडे आवडत नाहीत म्हणून असे आणलेत…मला काय माहिती तुम्हाला आवडणार नाही ते…” रागिणी निष्काळजी पणाने म्हणाली.
” ती तुझी मोठी जाऊ आहे रागिणी.. तिला सरळ उत्तर दे…आणि उत्तर तर मलाही हवंय…तू जाणूनबुजून असे केलेस हे न कळण्याईतपत लहान नाही मी…फक्त तू असे का केलेस ते सांग…” रागिणी च्या सासुबाई म्हणाल्या.
” कारण की अनय आणि अबीर दोघेही या मुलगे आहेत…तुमचे नातू आहेत…आणि मुलींपेक्षा मुलांना भारीच लागतं…” रागिणी म्हणाली.
” असे का वाटते तुला…?” सासुबाई म्हणाल्या.
” कारण तेच घराचे वारस असतात आई…मुली कितीही झाल्या तरी परक्याच असतात ना…” रागिणी पुन्हा निष्काळजी पणाने म्हणाली.
रागिणीचे हे बोलणे ऐकून साधना आणि तिच्या सासुबाई दोघींनाही राग आला. तिच्या सासुबाई तिला म्हणाल्या.
” अगं कुठल्या काळात जगत आहेस तू… आजकाल मुलगा आणि मुलगी मध्ये कुणी इतका फरक करत नाही…आणि वारस म्हणजे काय ग…मुली परक्या असतात हे तुझं तूच ठरवून टाकलेस…”
” आणि तू इतक्या दिवसांपासून माझ्याशी जी तुटकपणाने वागते आहेस त्याच्यामागे हे कारण आहे…मला आजवर वाटलं तुला माझ्या एखाद्या गोष्टीचा राग आला असेल म्हणून…” साधना म्हणाली.
” बरं…तुझ्या माहितीसाठी सांगते की आपल्या घरात असे मानत नाहीत…आमच्या मागे आमची जी संपत्ती आहे त्यामध्ये सुरेश आणि राजेश बरोबरच त्यांच्या बहिणीचा राधिकाला सुद्धा तिचा वाटा दिलाय आम्ही स्वखुशीने…आणि राजेश आणि सुरेशने सुद्धा यावर कधीच हरकत घेतली नाही…आम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद मानत नाही…आणि तू ही मानू नकोस…या घरावर जितका अनय आणि अबीरचा अधिकार आहे तेवढाच जाई आणि सियाचा सुद्धा आहे…” सासुबाई म्हणाल्या.
रागिणी मात्र एका जागी स्तब्ध उभी होती. सासुबाई तिला असले काही तरी बोलतील अशी तिने आशाच केली नव्हती. तिला वाटले होते की सासूबाईंची आपल्यावर विशेष मर्जी आहे म्हणून आपल्यालाच नेहमी खरेदीला पुढे करतात. पण आज तिचा हा गैरसमज सुद्धा दूर केला होता त्यांनी.
त्यानंतर साधना आणि तिच्या सासुबाई रागिणीशी केवळ कामापुरत्याच बोलत होत्या. एव्हाना ही गोष्ट राजेश च्या कानावर सुद्धा गेली होती. आणि त्याने रागिणीला यावरून खूप सुनावले होते. तो सुद्धा रागिणीशी नीट बोलत नव्हता.
कशीबशी दिवाळी पार पडली. रागिणी तर पार एकटी पडली होती. त्यानंतर भाऊबीज आली. इकडे तिच्या सासरी तिची नणंद राधिका आली होती. आणि रागिणी तिच्या माहेरी निघून गेली होती.
दरवेळी जेव्हा रागिणी माहेरी यायची तेव्हा नुसती उत्साहात असायची. सतत तिच्या सासरचे कौतुक सांगायची. पण यावेळी मात्र रागिणीला असे गप्प बगून तिच्या आईला कळून चुकले की रागिणी आणि जावई बापुंमध्ये अबोला आहे म्हणून. म्हणून मग तिच्या आईने रागिणी ला विचारले…
” काय झालंय रागिणी…तू जरा नाराज दिसत आहेस…जावई बापूंशी भांडण वगैरे झालं का..?”
” हो आई… भांडणच समज…पण यात माझी काहीच चूक नाही आई…ते सगळे जाणूनबुजून असे वागत आहेत माझ्याशी…” रागिणी म्हणाली.
” पण नेमकं काय झालंय ते तरी सांग…?” आई ने विचारले.
आणि रागिणीने झालेला सगळा प्रकार सांगितला…
त्यावर रागिणीची आई म्हणाली.
” तू चुकली आहेस रागिणी…निदान मला तुझ्याकडून तरी या सर्वांची अपेक्षा नव्हती…”
” तुला पण मीच चुकीची वाटत आहे का…मला दोन मुलं असल्यावर घरात जास्त मान तर मलाच मिळायला नको का…?” रागिणी म्हणाली.
” हो…कारण जेव्हा मला मुलगा नव्हता तेव्हा मला या घरात काय काय सहन करावं लागलं हे तुझ्या इतर बहिणींपेक्षा तुला जास्त माहिती आहे…कारण तू मोठी आहेस…ज्या गोष्टींचा तुला राग यायला हवा होता तू तर त्याचंच अनुकरण केलंस…तो काळ वेगळा होता…
आजकाल तर आपल्या गावातील लोक सुद्धा मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाहीत…आणि तू तर शहरात राहतेस आजकाल…तरीही तुझे विचार असे का ग झाले…जे तुझ्या आजीने, काकूंनी माझ्यासोबत केले तेच तू तुझ्या जाऊसोबत करायला निघाली होतीस…तू या घरची लेक आहेस…पण म्हणून तुला मी परकी मानत नाही…
तुझ्या इतर बहिणीप्रमाणे हे तुझे सुद्धा घर आहेच ना…उद्या तुला तुझ्या भावाने परके समजले तर तुला कसे वाटेल…आणि तू मात्र इतक्या लहान मुलांमध्ये ही भेदभाव केलास…एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्री शी अशी वागली…एक मुलगी असून दुसऱ्या मुलींची अवहेलना करायला निघाली होतीस…तुझ्या सासरच्यांच काहीच चुकलेले नाही…तू कधी अशी वागशील असा मी कधीच विचार केला नव्हता…” रागिणीची आई म्हणाली.
रागिणीच्या आईने तिची कानउघडणी केल्यानंतर मात्र रागिणीला तिची चूक लक्षात आली. आपण किती मूर्खपणाने वागलो ह्याची सुद्धा तिला जाणीव झाली. ती आईला म्हणाली…
” खरंच आई…माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे…माझ्या जाऊने आजवर मला बहिणी सारखी वागणूक दिली होती…पण वर्चस्व सुद्धा करायचं म्हणून मी तिच्याशी सुद्धा चांगली वागत नव्हते…माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला खूप जीव लावला पण मी मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला की मला मुलं आहेत म्हणून सासुबाई अशा वागतात…त्यांच्यासमोर सुद्धा जायची लाज वाटतेय ग मला आता…” हे बोलताना रागिणीच्या डोक्यात अश्रू दाटून आले होते. तेव्हा तिची आई म्हणाली…
” तू त्यांची माफी माग…त्या स्वभावाने खूप चांगल्या आहेत …तुला नक्कीच माफ करतील…जेव्हा तुझ्या सासरच्यांनी लग्नात हुंडा नको म्हणून सांगितलं होतं ना त्याचवेळी आम्हाला त्यांच्या मनाचा मोठेपणा कळून चुकलं होते…आपली त्यांच्या तोलामोलाचे नसताना ही त्यांनी आपल्याशी सोयरिक केली आणि लग्न सुद्धा अगदी साधेपणाने केले…पण त्यांच्या चांगुलपणाच्या बदल्यात तू मात्र अशी वागली त्यांच्याशी…पण तू मनापासून माफी मागशील तर ते नक्कीच माफ करतील तुला…” आई म्हणाली.
आईचे म्हणणे रागिणीला पटले होते.रागिणी दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी निघून गेली आणि घरी जाऊन सगळ्यांची हात जोडून माफी मागितली. तिच्या सासरच्यांनी सुद्धा तिला मोठ्या मनाने माफ केले. त्यानंतर मात्र रागिणी ने पुन्हा कधीच साधना च्या मुलींमध्ये आणि तिच्या मुलांमध्ये भेदभाव करण्याचा साधा विचारही मनात आणला नाही.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.