केशवने मुलीला डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी चेकअप केला आणि बाळाचे काही टेस्ट करायला सांगितले. केशव मनोमन खूप घाबरला होता. आणि टेस्टचा रिपोर्ट आल्यावर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाच्या रक्तात इन्फेक्शन झाले होते. त्याला तातडीचा उपचार मिळणे गरजेचे होते.
डॉक्टरांनी बाळाला एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला. अजिबात वेळ न दवडता केशव आणि यशोदा बाळाला घेऊन मोठ्या हॉस्पिटल मध्ये आल्या. हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही बाळावर होणाऱ्या उपचारांची आणि खर्चाची कल्पना दिली. संपूर्ण इलाजावर जवळपास पाच ते सात लाख रुपये खर्च होणार होते. केशवने सांगितले की तो सर्व रक्कम जमा करून देईल फक्त बाळाचा इलाज लवकरात लवकर सुरू करा. हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू झाले.
केशव जवळ मात्र इतकी रक्कम नव्हती. त्याने तातडीने त्याच्या लहान भावाला फोन केला. आणि सांगितले की मुलीच्या उपचारासाठी त्याला पाच लाख रुपयांची गरज आहे. त्याला लवकरात लवकर पैसे पाठवायला सांगितले. पण माधव म्हणाला की त्याच्याकडे इतके पैसे नाही आहेत. त्याच्याकडे फार तर पन्नास हजार रुपये असतील आता.
माधव चे बोलणे ऐकून केशवला धक्काच बसला. कारण माधव जवळ भरपूर पैसा आहे ह्याची कल्पना केशव ला आधी पासूनच होती. ज्या लहान भावाला आपण कधीच पैशांसाठी नकार दिला नाही. कधी गावातील शेतीत हिस्सा मागितला नाही. त्याच लहान भावाने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या एकुलत्या एक मुलीच्या उपचारासाठी पैसे नाकारावेत म्हणजे काय…?
यशोदा नेहमीच म्हणायची की एक दिवस तुमच्या घरचे तुम्हाला नक्कीच एकटं टाकतील तेव्हा केशव अभिमानाने म्हणायचा की माझा भाऊ वेळ पडल्यास जीव सुद्धा देऊ शकतो बघ माझ्यासाठी. आणि आज तिला कोणत्या तोंडाने हे सांगू की त्याने पैसे देण्यासाठी नकार दिलाय.
पण तिला हे सांगणे गरजेचेच होते. शेवटी त्याने तिला सांगितलेच की उपचारासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत आणि माधवकडे मागितले तेव्हा तो सुद्धा हेच म्हणाला की त्याच्याकडे सुद्धा इतके पैसे नाही आहेत. हे ऐकून यशोदा खूप संतापली.
” घ्या…हेच दिवस पाहायचे बाकी होते…मी नेहमी म्हणायचे की आपल्यासाठी काहीतरी पैसा बाजूला काढून ठेवा…पण नाही…तुम्ही तर सगळे पैसे इतरांना वाटायचे…आपल्याला गरज पडली तर आपला पांडुरंग मदत करेल असेच नेहमी समजावत आलात ना मला..आता आपल्याला गरज आहे…खूप जास्त गरज आहे…आता येईल का तो पांडुरंग माझ्या बाळाला वाचवायला…तुमचा चांगुलपणा येईल का माझ्या बाळाच्या कामाला…कसा काय वाचणार त्याचा जीव…”
“आपल्या बाळाला काहीच होणार नाही यशोदा…माझा पूर्ण विश्वास आहे देवावर…तो नक्कीच काहीतरी करेल बघ आपल्यासाठी…”
” अजूनही तुमचं तेच सुरू आहे…अहो जे काय आहे ते तुमच्या समोर आहे…आता कुणीच नाही येणार आपल्या मदतीला…ना माणूस ना देव…आपली मदत आपल्यालाच करावी लागेल…तुम्ही घरी जा आणि माझ्या लग्नाचे जितके दागिने आहेत ते सगळे विकून या…बघू किती पैसा जमा होईल…”
केशवला यशोदेचे बोलणे ऐकुन खूप वाईट वाटले. तिच्या लग्नात केलेले दागिने विकायची वेळ केवळ आपल्यामुळे आली आहे तिच्यावर म्हणून त्याच मन आतून दुखावले गेले होते. पण हा सर्व विचार करायची ही वेळ नव्हती.
तो घराच्या दिशेने जात असताना रस्त्याने त्याला विठ्ठलाचे मंदिर लागले. सवयीप्रमाणे विठ्ठलाला हात जोडावे म्हणून त्याने गाडी थांबवली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्याकडे अजूनही दीड लाख रुपये कमी आहेत. तो तसाच विठ्ठलाच्या मंदिरात गेला. देवासमोर हात जोडले आणि म्हणाला.
” देवा…तुला माहिती आहे ना मी आयुष्यात कधीच कुणाचं वाईट केलं नाही…आयुष्यात अनेक संकटे आली पण तुझ्या भरवशावर मी निश्चिंत होतो…तू प्रत्येक गोष्टीतून निभावून नेलंस….मग आज का अशी परीक्षा पाहत आहेस.. आधी घरच्या लोकांनी पाठ फिरवली आणि आता तू…माझी आठ दिवसांची मुलगी खूप आजारी आहे…त्या लहानग्या जीवाला का इतका ताप देतोस…तिचं रडणं बघवत नाही रे…यशोदा मला आजवर सांगत आली की तुमच्या विठ्ठलाला तुमची अजिबात काळजी नाही…पण आज जर तू माझी मदत केली नाहीस तर तिला मी काय सांगणार…माझा तुझ्यावर अजूनही विश्वास आहे…तू आमच्या पदरात बाळाचं दान टाकलस…आता त्या बाळाच्या आयुष्याचा भार मी तुझ्यावर सोपवतो पांडुरंगा…आता माझा विश्वास सार्थ ठरवा यचा की नाही ते तुझ्या हातात आहे…” एवढे बोलून देवासमोर हात जोडून केशव मंदिरातून घरी जायला निघाला.
तो लगेच घरी आला. त्याने बायकोचे दागिने घेतले आणि सोनारकडे विकायला नेले. सोनाराने ते दागिने पाहिले आणि ह्या दागिन्यांचे केवळ अडीच लाख मिळतील असे सांगितले. केशव ने ते अडीच लाख घेतले आणि तो दवाखान्याच्या दिशेने जायला निघाला. त्याच्याजवळ सुद्धा एक लाख रुपये जमा होतेच. अजूनही दीड लाख रुपयांची गरज होतीच.
दवाखान्यात आल्यावर पाहतो तर त्याची बायको मुलीला जवळ घेऊन तिला खेळवत होती. हातातल्या सलाईन वगैरे डॉक्टरांनी काढल्या होत्या. केशवला पाहताच यशोदा धावतच त्याच्याजवळ आली. आणि म्हणाली…
” अहो…देवच पावला म्हणायचा…दवाखान्यात ॲडमिट केल्यावर डॉक्टरांनी जेव्हा पुन्हा आपल्या बाळाचे रक्त तपासले तेव्हा त्यांना कुठलेच इन्फेक्शन आढळले नाही…ते म्हणाले की तिला फक्त साधा ताप आहे…डॉक्टरांनी औषध गोळ्या दिल्यात आणि घरी जायला सांगितले आहे…”
हे ऐकून केशवच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने प्रेमाने मुलीला जवळ घेतले. आणि लगेच डॉक्टरांकडे धावत गेला. आणि डॉक्टरांना म्हणाला…
” डॉक्टर साहेब…तुमचे खूप खूप आभार…अहो माझी मुलीला बरं वाटायला लागलं हो….”
” मिस्टर केशव…तुमच्या मुलीची तब्येत इतक्या लवकर चांगली होणे हे काही दैवी चमत्कारापेक्षा कमी नाही… इट्स अ मिराकल…अशा केसेस बऱ्या व्हायला खूप जास्त वेळ घेतात…बरेचदा पेशंटना महिनाभर तरी हॉस्पिटल मध्ये अंडर ओबसर्वेशन ठेवावे लागते…पण तुमच्या मुलीला एकाच दिवसात बरं वाटत आहे… तसा मी तुम्हाला हाच सल्ला दिला असता की काही दिवस मुलीला हॉस्पिटल मध्ये अंडर ऑब्सर्वेशन ठेवा म्हणून…पण सध्या कोरोना मुळे विनाकारण जास्त दिवस इतक्या लहान बाळाला हॉस्पिटल मध्ये ठेवणे बरे नाही…मी तुम्हाला काही मेडीसिन लिहून देतो…तिला वेळच्या वेळी द्या आणि खूप काळजी घ्या…काही वाटलच तर पुन्हा हॉस्पिटलला घेऊन या…” डॉक्टर म्हणाले.
केशव मनातून आनंदला. त्याला माहिती होते हे सर्व त्याच्या विठ्ठलाने घडवून आणले होते. त्याने आपला त्याच्यावर असलेला विश्वास ढळू दिला नाही. त्याला खरंच आपली काळजी असते. केशवने तिथूनच विठ्ठलाला हात जोडले. आजच्या घटनेने यशोदेचे डोळे सुद्धा उघडले होते. देवावर असणारा विश्वास आज दृढ झाला होता.
केशवच्या लहान भावाची माधवची मात्र दोन दिवसांनी पैशाने भरलेली पिशवी गहाळ झाली. जे पैसे तो एका जमिनीच्या व्यवहारासाठी घेऊन चालला होता. आपल्याला नेहमी मदत करणाऱ्या भावाशी बेइमानी केल्याचे हे फळ त्याला देवानेच दिले होते हे त्याच्याही लक्षात आले होते.
परमेश्वर असाच असतो. तो त्याच्या भक्तांना कधीच एकटा सोडत नाही. तो भक्तांची परीक्षा पाहतो पण त्याच परीक्षेत सफल होण्यासाठी भक्ताला मदत देखील करतो. जेव्हा माणसाला कुणाचा आधार शिल्लक राहत नाही तेव्हा साक्षात देवच त्याच्या मदतीला येतो. आणि त्याच्या भक्तासोबत वाईट करणाऱ्याला शिक्षा सुद्धा तोच करतो. कधी मायेचा पाखर बनून तर कधी करुणेचा सागर म्हणून तो सतत भक्तांच्या पाठीशी असतो. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत रहा. बाकी आपल्या भक्तांची काळजी घ्यायला तो सदैव पाठीशी असतोच.
||जय हरी विठ्ठल||
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खूप छान कथा वाचतांना मंन भरून आलं🙏
भाव तिथे देव🙏