प्रकाशराव बाहेरून आले. अंगणातल्या ओसरीवर ठेवलेल्या बादलीतील पाणी पायावर घेतले आणि बाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसले. ते बराच वेळ तिथे बसून होते तरीही उषाताई चहा घेऊन आल्या नव्हत्या. नाहीतर रोज त्यांची येण्याची चाहूल लागताच उषाताई सगळ्यात आधी चहाचं आधण ठेवायच्या. रोजचा नियम काही चुकायचा नाही. पण आज मात्र बराच वेळ झाल्यावर ही त्या आल्याच नाही हे पाहून प्रकाशराव घरात गेले. उषाताई दिवाणखान्यातील खुर्चीत विचारात हरवलेल्या अवस्थेत बसून होत्या. प्रकाशराव त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले.
” काय झालंय…तुम्ही अशा का बसलात…ते ही संध्याकाळच्या वेळेला…”
प्रकाशरावांचा आवाज ऐकून उषाताईंची तंद्री तुटली. त्या थंडपणे म्हणाल्या.
” अरे देवा…संध्याकाळ झाली सुद्धा…”
” हो…तुम्हाला ते सुद्धा कळलं नाही…अशा कोणत्या विचारात गढून गेला होतात…” प्रकाश रावांनी विचारले.
” शालूताईंचा फोन आला होता इंदोरहून…त्यांनी सांगितलं की रवी गेला…” उषाताई म्हणाल्या.
” गेला म्हणजे…?” प्रकाशराव जरा साशंकतेने म्हणाले.
” गेला म्हणजे आता तो नाहीये या जगात…दोन महिन्यांपासून हॉस्पिटल मध्ये ॲडमिट होता…अन् काल गेला….” उषाताईंनी सांगितले.
” काय…? पण मला तर शालूताईंनी काहीच सांगितले नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” कशा सांगतील…अन् कोणत्या तोंडाने…?” उषाताईंनी विखारी नजरेने प्रकाशरावांकडे पाहत विचारले.
आता मात्र प्रकाशराव एकदमच गप्प बसले. उषाताई तिथून निघून गेल्या. प्रकाशराव मात्र मनातून अगदीच हादरले होते. त्यांना दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस अजूनही लख्ख आठवत होता.
त्या दिवशी शालू ताईंचा फोन आला आणि त्यांनी अगदीच उत्साहात सांगितले की नंदिनी साठी खूप चांगले स्थळ आहे त्यांच्याकडे. मुलगा लाखात एक आहे, खूप श्रीमंत आणि दिसायला सुद्धा राजबिंडा आहे. तशी तर मुलासाठी खूप स्थळे येत आहेत. पण माझ्या समोर सगळ्यात आधी नंदिनी आली. म्हटलं हे लग्न झालं तर मुलीचं भलं होईल. आयुष्याचं कल्याण होऊन जाईल.
प्रकाशराव तर एकदमच आनंदले. काय करू नि काय नको असे झाले त्यांना. त्यांची परिस्थिती म्हणजे खाऊन पिऊन सुखी अशी होती. वडिलोपार्जित अशी दहा एकर शेती होती. आई, बायको, एक मुलगी नंदिनी आणि मुलगा निखिल व ते असं सुखी कुटुंब होतं. मुलीची मागच्याच वर्षी बारावी झाली होती. आता बी एस सी च्या पहिल्या वर्षाला शिकत होती.
तिला चांगलं शिकायचं होतं. निदान पदवीधर तरी व्हायचं होतं. प्रकाशराव वांना सुद्धा काही अडचण नव्हती. पण नंदिनीची आजी मात्र सतत त्यांना सांगत राहायची की मुलीला एवढं शिकवून काही फायदा नाही. लग्न करून टाक म्हणून. पण उषाताई मात्र मुलीला आधी शिकू द्यावं आणि मग जाणती झाल्यावर तिचं लग्न करायचं ह्या मताच्या.
प्रकाशराव मात्र दोघींचं ही ऐकायचे. त्यांच्या मते शिकतेय तर शिकू द्यायचे. पण जर एखादे चांगले स्थळ आले तर लग्न लावून द्यायचे. आणि हे स्थळ तर त्यांच्यासाठी जणू स्वतःहून चालून आलेली सुवर्ण संधी होती. आजवर जेमतेम परिस्थितीत राहिलेल्या आपल्या सारख्या शेतकऱ्याची मुलगी मोठ्या शहरात, मोठ्या बंगल्यात राहणार, तिच्या भोवती नोकर चाकर असणार ह्यापेक्षा जास्त चांगलं स्थळ तर अनेक वर्ष शोधून ही मिळणार नाही ह्या मताचे ते होते.
शिवाय शालू ताई सांगतेय म्हणजे मुलगा चांगलाच असेल ह्यावर त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यांनी खूप उत्साहाने आईला आणि आपल्या बायकोला आवाज दिला. देवघरातून आई, अन् स्वयंपाकघरातून उषाताई लगेच त्यांच्याजवळ गेल्या. त्यांची आई त्यांना म्हणाली.
” काय रे प्रकाश…काय झालंय…कुणाचा फोन होता…?”
” अगं आई…शालूताईचा फोन होता….तिने नंदिनीसाठी स्थळ सुचवलंय…मुलगा लाखात एक आहे म्हणाली…” प्रकाशराव म्हणाले.
” असं होय…ही तर खूप चांगली गोष्ट आहे…देवच पावला म्हणायचा…” आई म्हणाली.
यावर उषाताईंच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. त्या हळू आवाजात प्रकाशरावांना म्हणाल्या.
” अहो पण…निदान तिचं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण होऊ द्या…”
प्रकाशराव काही बोलायच्या आधी सासुबाई त्यांच्यावर खेकसल्या आणि म्हणाल्या.
” शिक्षणाची हौस पुरी झालीच नाही का अजुन…वेळेवर मुलीचं लग्न केलेलं केव्हाही बरं…उशीर झाला तर अडचणी येतात…आणि संसार करायला काही शिक्षण बिक्षण घ्यायची गरज नाही…माझी सगळी आठवी पर्यंत शिकलेली आहे तरीपण सुखाने संसार करत आहे ना…अन् तू दहावी पर्यंत शिकलेली आहेस तरी अजूनही सगळं मलाच सांगावं लागतं तुला…”
” पण आई…?” उषाताई काहीतरी म्हणणार होत्या पण त्यांना मध्येच थांबवत सासुबाई म्हणाल्या.
” आता पण नाही ना बिन नाही…जा अन् माझ्यासाठी चहा ठेव…”
सासूबाईंनी असे म्हटल्यावर उषाताई काहीही न बोलता आतमध्ये निघून गेल्या.
थोड्या वेळाने प्रकाशराव उषाताई जवळ आले आणि त्यांना म्हणाले.
” काही दिवसात मुलाकडचे येतील…आपल्या नंदिनीला पाहायला…तुम्ही तुला व्यवस्थित समजावून सांगा…”
” अहो पण मलाच हे पटत नाहीये तर मी तिला काय सांगू..?” उषाताई म्हणाल्या.
” आता तुम्हाला काय अडचण आहे ह्यात…?” प्रकाशराव जरा चिडतच म्हणाले.
” अहो…पोरीला अजुन दोन वर्ष शिकू दिलं असतं तर…बरं झालं असतं…” उषाताई हळूच म्हणाल्या.
” अगं शिक्षण काय कधीही शिकू शकतो…पण अजा हे चांगलं स्थळ आलंय हे काय दोन वर्ष थांबणार आहे का तिच्यासाठी…अगं इंदूरला मोठा बंगला आहे त्यांचा…घरी चारचाकी…नोकरचाकर… चांगला शिकलेला…दिसायला सुंदर…शिवाय त्याच्या घरच्यांच्या काही अपेक्षा सुद्धा नाही आहेत…त्यांना फक्त एखादी सुंदर आणि घर सांभाळणारी मुलगी हवी आहे…आणि त्यांना वाटले तर ते पुढे शिकवतील सुद्धा नंदिनीला…” प्रकाशरावांनी शांततेने उषाताईंनी समजावून सांगितले.
आता मात्र उषाताईंचा विरोध जरासा मावळला. त्यांच्या बोलण्यात तथ्य सुद्धा होते. कारण चांगले स्थळ पाहायचे म्हटल्यावर लग्नात चांगला खर्च करण्याची तयारी सुद्धा असायला पाहिजे. शिवाय हे लोक जर समजूतदार असतील तर आपण ह्यांना नंदिनिला पुढे शिकवण्याबद्दल सांगूयात असे असा विचारही त्यांनी केला.
आता मात्र नंदिनीला कसं सांगायचं हा विचार त्यांना पडला होता. सासूबाईंनी कठोरपणे ह्या स्थळाबद्दल सांगितल्यास नंदिनीचे मन नाराज होऊन जाईल अशी भीती त्यांना होती. नंदिनी कॉलेज मधून आल्यावर त्यांनी तिला जवळ बोलावून घेतले आणि तिला म्हणाल्या.
” नंदिनी…मला तुला काही सांगायचे आहे…तू शांत मनाने ऐकून घे…”
” सांग आई…” नंदिनी कुतूहलाने म्हणाली.
” तुझ्या शालू आत्याने तुझ्यासाठी एक खूप छान स्थळ आणले आहे…आणि तुझ्या बाबांना ते स्थळ पसंत सुद्धा पडले आहे…”
आधी तर नंदिनीच्या काहीच लक्षात आले नाही. पण लक्षात आल्यावर ती आईला म्हणाली.
” नाही आई…मला आत्ताच लग्न करायचं नाही…बाबांना सांग ना “
” त्यांचं पण काही चुकत नाहीये बाळ…ते फक्त तुझ्या चांगल्याचा विचार करून सगळं करत आहेत…मुलगा खरंच चांगला आहे…आत्या थोड्या वेळाने मुलाचा फोटो सुद्धा पाठवणार आहे…मुलगा चांगला शिकलेला आणि सुंदर आहे…”
” अगं पण आई…” नंदिनी म्हणाली पण तिला मध्येच अडवत आई म्हणाली.
” हे बघ नंदू…अजुन काही लग्न ठरलं नाही आहे…इतके श्रीमंत आहेत ते…त्यांना आपल्याशी सोयरिक करायचीच आहे ते काही नक्की नाही ना अजुन…ह्या सगळ्या पुढील गोष्टी आहेत…पण एवढं चांगलं स्थळ नेहमी येणार नाही म्हणून आपण आपल्या बाजूने तयार असलेलं बरं…” आई म्हणाली.
आता मात्र नंदिनी आई समोर काही बोलू शकली नाही. बोलणार तरी काय होती. ती फक्त एकोणविस वर्षांची होती. आई बाबांसमोर ठाम मत मांडू शकत नव्हती. शिवाय छोट्या गावांमध्ये जोडीदार निवडण्याचा अधिकार मुलींना कमीच मिळतो. शिवाय आई बाबांच्या गाठीला अवघ्या आयुष्यभराचा अनुभव होता. त्यामुळे त्यांना अर्थातच चांगल्या वाईटाच ज्ञान आपल्यापेक्षा जास्तच आहे हे ही ती जाणून होती.
नंदिनी प्रकाशराव आणि उषाताई ह्यांची मोठी मुलगी. तिचा भाऊ निखिल तिच्यापेक्षा अवघ्या पाच वर्षांनी लहान होता. अभ्यासात हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेली नंदिनी बारावी चांगल्या मार्कांनी पास झाली होती. आई बाबांना तिचं कौतुक होतंच पण तिलाही आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती.
आपल्या बाबांनी आपल्याला इतर मुलींपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलंय हे माहिती असल्याने आपल्या वडिलांबद्दल तिला खूप आदर वाटायचा. जिथे बारावीनंतर बहुसंख्य मुलींचं शिक्षण थांबतं तिथे नंदिनी च्या वडिलांनी तिला बी एस सी करायची म्हणून तालुक्याच्या शाळेत टाकलं होतं. रोज जाण्या येण्यासाठी गावातून साधन भेटलं नाही तर ते तिला दोन किलोमीटर दूरच्या फाट्यावर सोडून द्यायचे.
आजी अनेकदा सांगायची की मुलीचा एवढं लाड करू नकोस. पण बाबांनी आजीचं न ऐकता नंदिनीला कधी कशाची कमतरता भासू दिली नव्हती. आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे आणि ते जे काही करतील ते आपल्या चांगल्या साठीच हे जाणून असल्याने तिने सुद्धा आपल्या वडिलांच्या निर्णयावर शंका घेतली नाही.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
हा रवी कोण असेल…? त्याच्या मृत्यूने प्रकाशराव आणि उषाताई ह्यांना एवढा धक्का का बसला असेल…? नंदिनीचे लग्न होईल का…?