प्रकाशरावांनी ठरवल्याप्रमाणे लग्नाची चोख व्यवस्था लावण्याची तयारी सुरू सुद्धा केली होती. तसा एक महिना म्हणजे फार कमी वेळ होता. पण त्यांना सगळं काही व्यवस्थित पार पाडायचं म्हणून त्यांनी आतापासूनच तयारीला लागणे योग्य समजले होते.
प्रकाशराव आनंदाने सगळ्या तयाऱ्या करत होते. आजी सुद्धा प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होती. नंदिनी ची आई मात्र नंदिनी च्या सासरी जाण्याच्या विचाराने वारंवार भावूक होऊन जायची. पण आजीला उदास चेहऱ्याने घरात वावरलेलं चालायचं नाही म्हणून अलगद अश्रू टिपून सुद्धा घ्यायची.
प्रकाशरावांनी एक दोनदा मुलाशी बोलायचं म्हणून शालू ताईंकडे विषय काढला होता तेव्हा मोठ्यांच काय ते आपण बोलू असे म्हणून विषय टाळला. पण एकदा त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मुलाला नंदिनीशी बोलायचं म्हणून सांगितलं. मग प्रकाश रावांनी सुद्धा स्वतःहून नंदिनी कडे फोन नेऊन दिला.
” हॅलो…” नंदिनी जराशी घाबरत आणि काहीशी कुतूहलाने म्हणाली.
” हाय बायको…” मग स्वतःशीच मोठ्याने हसत म्हणाला “म्हणजे लवकरच होणारी बायको…”
“_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ “
” काय झालं…? बोल ना ? लाजतेस काय राणी…? मी फक्त फोनवरून बोलतोय…अजुन समोर आलोच नाही…”
” _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ “
” समोर यायचं होतं मला पण घरच्यांनी सांगितलं की आता डायरेक्ट लग्नातच भेटायचं म्हणून…पण तुला पाहिलं नसलं तरी तुझा फोटो पाहून आपण एकदमच फिदा झालो हा तुझ्यावर…तू पण झाली असशील ना मला पाहून म्हणजे माझा फोटो पाहून…”
” ते… तसं…काही…नाही…”
” मला माहिती आहे तू लाजतेस बोलायला…गावच्या मुली म्हणूनच तर आवडतात आपल्याला…लग्न झालं ना की राणी बनवून ठेवेल आपण तुला…तुला जे काही हवं असेल ते सगळचं देईल तुला…फक्त तू आपल्याला खुश ठेवायचं…”
इतक्यात मागून त्याच्या आईचा आवाज आला. त्याची आई त्याला म्हणाली.
” काय रे…एकटाच बोलणार आहेस का…? मला सुद्धा बोलायचं आहे… दे फोन…”
इतक्यात त्याच्या आईने त्याच्या हातचा फोन जवळजवळ हिसकलाच. फोन स्वतःच्या कानाला लावत त्या नंदिनीला म्हणाल्या.
” नुसतं होणाऱ्या नवऱ्याशीच बोलणार आहेस का सासुशी बोलायला सुद्धा आवडेल तुला…”
” आवडेल ना…बोला ना…” नंदिनी म्हणाली.
आणि मग तिच्या सासुबाई तिच्याशी बोलायला लागल्या. थोड्या वेळाने त्यांनी फोन ठेवून दिला. नंदिनी च्या घरच्यांना मात्र आता खूप आनंद झाला होता. इतके दिवस मुलाच्या वतीने त्यांच्या मनात जी धाकधूक होती ती आता दूर झाली होती. मुलाच्या बाजूने तिच्या घरचे निश्चिंत झाले होते.
नंदिनीला मात्र त्याच्या बोलण्याची पद्धत अजिबात आवडली नव्हती. पहिल्यांदाच बोलत होता आणि राणी आणि बायको बोलण्यापर्यंत त्याची मजल गेली हे तिला तितकेसे पटले नव्हते. त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं की तो दारू पिऊन बोलतोय. पण तिला नुसतीच शंका होती. कदाचित दुरून बोलत असल्याने असे वाटत असेल किंवा एखाद्याची बोलण्याची पद्धतच तशी असते असेही तिला वाटले होते.
शिवाय ह्याबद्दल जर घरी बोललो तर घरातील वातावरण उगीच आपल्यामुळे खराब होईल म्हणून तिने ही मनातील शंका कोणाला बोलून दाखवली नाही. पण तिचा गोंधळलेला चेहरा पाहून तिच्या आईने मात्र तिला रात्री झोपताना विचारलेच. तेव्हा मात्र तिने आईला मनातील सगळे बोलून दाखवले. तेव्हा तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची समजूत काढली.
फोनवरून व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येत नाही हे सुद्धा समजावून सांगितले. शिवाय ते शहरात राहत असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्याची पद्धत आपल्या पेक्षा भिन्न आहे हे देखील सांगितले. त्यामुळे आपल्याला जे बोलणं विचित्र वाटतं ते बोलणं त्यांच्या रोजच्या संभाषणात येत असतील असेही समजावून सांगितले. त्यामुळे तात्पुरतं का होईना नंदिनीची समजूत देखील पटली.
लग्नाला आता केवळ दहा दिवसच उरले होते. लग्नाच्या पत्रिका आज छापून घरी आल्या होत्या. पहिली पत्रिका देवाजवळ ठेवायला जायचं होतं. नंदिनीने सुद्धा तयारी केली. आई, बाबा, नंदिनी आणि निखिल सगळे मिळून मंदिरात गेले. मनोभावे पहिलं आमंत्रण देवाला दिलं. देवाजवळ पत्रिका ठेवताना नंदिनीचं लक्ष पत्रिके कडे गेलं. मध्यभागी गणेशाचे चित्र आणि त्याच्या दोन्ही बाजूला लिहिलेलं होतं.
चि. रवी आणि चि. सौ. का. नंदिनी यांचा शुभविवाह
__________________________________
लग्नाला फक्त पाचच दिवस राहिले होते. प्रकाशरावांच्या अंगावर आता पत्रिका वाटण्याची आणि इतर तयाऱ्या करण्यासाठी खूपच कमी दिवस राहीले होते. उषाताईंच्या मागे सुद्धा खूपच गडबड होती. त्या स्वयंपाक घरात काम करत होत्या. इतक्यात अंगणातून एक ओळखीचा आवाज आला.
” नंदिनी…अगं ए नंदिनी…” उषाताईंनी बाहेर येऊन पाहिले आणि समोर सरला वन्स ना पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्या उत्साहाने सरला ताईंकडे गेल्या आणि म्हणाल्या.
” आल्यात तुम्ही ताई… बरं केलंत…तुम्हाला पाहूनच आधार वाटायला लागलाय…”
” अगं का नाही येणार…माझ्या एकुलत्या एक भाचीचं लग्न आहे आणि मी नाही का येणार…” सरला ताई हसून म्हणाल्या.
” नकुल आणि दादा नाहीत का आले…?” उषाताईंनी विचारले.
” नकुल आलाय…बाहेर प्रकाशशी बोलतोय…आणि त्याचे बाबा लग्नाच्या आदल्या दिवशी येतो म्हणाले…” सरलाताईंनी सांगितले.
असे म्हणून त्यांनी स्वतःची बॅग नेऊन आतमध्ये ठेवली आणि सरळ किचन मध्ये आल्या. त्यांना किचन मध्ये आलेलं पाहून उषाताई म्हणाल्या.
” अहो ताई…तुम्ही कशाला आल्यात आत्ताच स्वयंपाक घरात…मी चहा घेऊन येतेच बैठकीत…आताच आल्यात जरा पंख्याखाली बसून हवा घ्या…”
” आराम वगैरे होतच राहील गं…आणि मी काही पाहुणी वगैरे नाहीये…आता मला सांग काय काय करायचं आहे ते…पटापट कामे आवरू…” सरलाताई म्हणाल्या.
उषाताई त्यांना काही म्हणतील त्या आधीच त्यांनी कमरेला पदर खोचला आणि कामाला सुद्धा लागल्या. त्यांना पाहून उषाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाच हसू दाटून आलं. पण नंदिनीच्या आजीने मात्र सरलाताईंना पाहून नाक मुरडले. मनातल्या मनात म्हणाल्या. ” हिचा बरा आधार वाटते उषाला. आणि माझी शालू जिने हिच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलंय तिची काही किंमत नाही.”
सरलाताई प्रकाशरावांची चुलत बहीण होती. त्यांच्या काका काकूंना एकच अपत्य. तेही मुलगी. त्यामुळे प्रकाशरावांची आई सतत त्यांना कमी लेखायची. त्यामुळे दोघी जावांचे कधी पटलेच नाही. पण भावंडात मात्र खूप प्रेम होतं. सरलाताई आणि शालूताई एकाच वयाच्या होत्या. लग्न सुद्धा जवळपास सारख्याच वयात झाली.
पण शालूताई श्रीमंत सासर पाहून बदलली आणि सरलाताई मात्र भल्यामोठ्या एकत्र कुटुंबात जाऊनही आपल्या या माहेराला विसरल्या नाहीत. त्या दर रक्षाबंधनाला आणि दिवाळीला न चुकता भावाला ओवाळायच्या. वर्षातून एकदा माहेरपणाला सुद्धा यायच्या. आपली शालू दोन तीन वर्षांतून एकदा येते आणि ही चुलत असून सुद्धा दरवर्षी माहेरपणाला येते म्हणून प्रकाशरावांच्या आईच्या मनात सरला बद्दल अढी होतीच.
पण उषाताईला मात्र सरलाताईंचा खूप आधार वाटायचा. त्यांचा स्वभाव सुद्धा खूप गोड होता. त्यांचं कुटुंब सुद्धा खाऊन पिऊन सुखी होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. आज सुद्धा त्यांच्या येण्याने उषाताईंवरील कामाचं ओझं बऱ्याच प्रमाणात हलकं झालं होतं. नकुल सुद्धा त्याच्या मामांना पत्रिका वाटण्यात मदत करत होता.
________________________________
आता मात्र लग्न अगदी उद्यावर येऊन ठेपल होतं. पाहुणे मंडळी आदल्या संध्याकाळीच गावात येऊन दाखल झाली होती. सगळ्यांची व्यवस्था गावातल्या मारोतीच्या मंदिरावर केलेली होती. रात्री उशिरा नवरदेवाला हळद लावली अन् त्याची उष्टी हळद नंदिनीला लागली.
पोरीचं उद्या लग्न आहे या विचाराने प्रकाशराव सुद्धा आज हळवे झाले होते. सगळी आवराआवर झाली आणि पाहुणे मंडळींची निजानीज सुरू झाली. नंदिनी अजूनही जागीच आहे हे पाहून प्रकाशराव तिच्याजवळ गेले आणि म्हणाले.
” नंदिनी बाळ…झोपली नाहीस अजुन…?”
” बस झोपणारच होते बाबा…” नंदिनी म्हणाली.
” सगळं सामान बांधून झालंय ना…उद्या लग्न झाल्यावर लगेच संध्याकाळी निघावे लागेल…” हे बोलताना त्यांना भरून आले होते.
” हो बाबा…” नंदिनी चा आवाज सुद्धा आता जड झाला होता.
ते तिथून जाणार इतक्यात पुन्हा मागे वळले आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाले.
” मला तुझा खरंच अभिमान वाटतो बाळ…फक्त आपल्या आई वडिलांनी सांगितलंय म्हणून तू लग्न करायला तयार झालीस…ते ही इतक्या दूर…पण आम्ही जे काही करतोय ते फक्त अन् फक्त तुझ्या भल्यासाठीच…मुलगी ही परक्याच धन आहे हे मानणारे आपण नाही…तुला चांगलं घर मिळावं…
चांगला नवरा मिळावा आणि तू सुखी रहावी म्हणून काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला बघ…पण ह्याचा अर्थ असा नाही की हे घर तुझं नाही…तुला जेव्हा कधी इथे यावं वाटेल ना तेव्हा ये…सासरी काही त्रास असला तर कसलाही किंतू मनात न ठेवता घरी सांगायचा…मला फक्त तुझं सुख हवंय…आणखी काहीच नको…” प्रकाशराव जड अंतःकरणाने म्हणाले. आणि तिथून जायला निघाले.
नंदिनीच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली होती आणि प्रकाशराव सुद्धा अलगदपणे आपले अश्रू पुसत होते.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
इथून नंदिनीच्या सुखद संसाराची सुरूवात होईल का…? रवीचं रहस्य नेमकं काय आहे…? हे लग्न निर्विघ्न पार पडेल का…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.