” नंदिनीचे लग्न होईल…आजच होईल…ह्याचं मांडवात…पण मुलगा मात्र तो नसेल…”
सगळेजण ह्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागले. तर समोर सरलाताईंचे मिस्टर म्हणजेच सुनिलराव उभे होते. त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सरलाताई पुढे येऊन म्हणाल्या.
” म्हणजे…तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे…?”
” म्हणजे हेच की ह्या मुलाशी तिला लग्न करायचे नाहीये…पण तिने लग्न करायला मात्र नकार दिला नाही…म्हणजे एखादा निर्व्यसनी, चांगल्या घरातला, साधा सरळ मुलगा असेल तर तिला काही हरकत नसावी लग्नाला…म्हणजे असा माझा तरी अंदाज आहे…” सुनिलराव म्हणाले.
यावर सगळेच विचारात पडले. सुनिलराव पुढे म्हणाले.
” आणि प्रकाशरावांना आज ह्याचं मांडवात नंदिनीचे लग्न लावायचे आहे…कारण आज जर नंदिनी चे लग्न झाले नाही तर त्यांची बदनामी होईल आणि पुढे नंदीनीचे लग्न होणे कठीण जाईल असे त्यांना वाटते आहे…”
” हो…अगदी बरोबर आहे…पण आता पुढे काय करायचे…?” सरलाताईंनी प्रश्न विचारला.
” मग आता वेळेवर एखादा दुसरा मुलगा पाहायचा आणि नंदिनीचे लग्न लागून द्यायचे…हाच एक उपाय आहे…ह्यामुळे नंदिनी च्या मनासारखे सुद्धा होईल आणि प्रकाशरावांच्या इभ्रतीला सुद्धा धक्का लागणार नाही…” सुनिलराव म्हणाले.
आजी त्या सरशी सगळे विचारात पडले. सुनिल रावांचे म्हणणे चुकीचे सुद्धा नव्हते. पण तिथे शालू आत्या होती. ती रागाने म्हणाली.
” असे कसे…मी माझ्या शब्दावर त्यांना इथवर घेऊन आली आहे…माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सोयरिक केली आहे…आता काय त्यांना खाली हाताने परत जायला लावणार का तुम्ही… मी त्यांना ग्वाही दिली होती की ह्या दोघांचं लग्न निर्विघ्न पार पडेल आणि कुणी काहीही बोलणार नाही म्हणून…मी काय तोंड दाखवणार आहे परत जाऊन सगळ्यांना…माझ्यावरचा विश्वास उडून जाईल ना त्यांचा…”
” त्यांचा विश्वास तो विश्वास आणि आम्हा लोकांचा विश्वास तो काय मग…की इथे सुद्धा गरीब आणि श्रीमंत असा भेद करणार आहेस तू शालू…इथे तुझ्या भावाने सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला होता ना…त्यांचा विश्वास तर तोडलास ना तू…” सरलाताई म्हणाल्या.
आता मात्र शालू ताई खाली मान घालून तिथून जायला निघाल्या. इतक्यात कुणीतरी बाहेरून ओरडत सांगू लागले.
” अरे…नवरदेवाकडील मंडळी गाडीमध्ये बसून मारुती मंदिराकडे गेलेत…तिथून सामान घेऊन घरी जातो म्हणालेत…”
आता मात्र प्रकाशरावांनी डोके पकडले. ते म्हणाले.
” मुलाकडचे जायला निघालेत…आणि तुम्ही म्हणताय ते ऐकायला बरं वाटत आहे पण इतक्या लवकर चांगला मुलगा कुठे मिळणार आहे…? त्यांना जाऊन थांबवले पाहिजे…आणि उषा तू माफी मागितल्या शिवाय ते थांबणार नाहीत…चल लवकर…घाई कर…”
” जात आहेत तर चांगलंच आहे ना…मी तर म्हणते जाऊ देत…एखादा दुसरा मुलगा मिळतोय का ते पाहुयात आपण…” उषाताई हिम्मत करून म्हणाल्या.
” इतकं सोप्पं आहे का ते…मुलं काय बाजारात मिळतात का…? सोयरिक व्हायला वेळ लागतो…ओळखीचा ना पाळखीचा असा कोणीही नाही चालत…” प्रकाशराव ओरडुन म्हणाले.
” तुझ्या बायकोचं डोकं काम करत नाहीये प्रकाश…स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीचं आयुष्य बरबाद केलंय हिने…या घरात नंदिनीचं लग्न झालं असतं तर सुखात लोळली असती ती…पण म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं म्हणून… तसं च झालंय तुमच्यासोबत…आता बसा तिला आयुष्यभर घरात घेऊन…” शालूआत्या हातवारे करत मुलाकडच्यांकडे जायला निघून गेली.
तिकडे मुलाला अशी मांडवात उठून जायची अजिबात इच्छा नव्हती. पण त्याच्या वडिलांनी त्याला चांगले समजावून सांगितले होते की आता उठून गेला तर आयुष्यावर ते लोक आपल्या मुठीत राहतील. आणि लग्न वगैरे काहीच थांबणार नाही. आपण जायला निघालो की ते लोक आपल्या मागे पळतच येतील बघ. म्हणून मग नवरा मुलगा सुद्धा नाइलाजाने जायला निघाला होता. पण त्याचे डोळे मात्र नंदिनी च्या घराच्या दिशेनेच होते.
इकडे नंदिनीच्या घरात आता स्मशानशांतता असल्यागत लोक गप्प होती. नंदिनी चे बाबा डोक्यावर हात देऊन एका जागी जमिनीवर बसले होते. आजी भयंकर रागात बाहेरून आतमध्ये फेऱ्या मारत होती. पाहुणे मंडळींना तर काय बोलावे आणि काय नको ते कळत नव्हते. काही पाहुणे नंदिनी च्या बाबांच्या बाजूने होते तर खूप कमी नंदिनीच्या आईच्या बाजूने होते. नंदिनी च्या आईला विरोध करण्यामध्ये सगळ्यात जास्त बायकाच पुढे होत्या.
शेवटी नंदिनी ची आई सुनीलरावांना म्हणाली.
” दादा…तुमच्या नजरेत आहे का कुणी मुलगा…?चांगल्या घरातला आणि चांगला शिकलेला…परिस्थिती जेमतेम असली तरी चालेल…मुलगा चांगला हवा फक्त…आणि आज लग्न करायला तयार सुद्धा झाला पाहिजे…”
” अशावेळी कुणी अनोळखी व्यक्ती लवकर तयार होणार नाही लग्नाला…शिवाय आपण सुद्धा त्यांच्यावर इतक्या लवकर विश्वास नाही ठेवू शकत…नाहीतर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होईल…म्हणून एखादा नात्यातला मिळाला तर चांगलं होईल…” सुनिलराव म्हणाले.
” अशा वेळी कुणी नाही येत समोर…वाईट काळ आला की कुणी साथ नाही देत…तू अजून दुनियादारी पाहीली नाही आहेस म्हणुन हे सगळं बोलत आहेस उषा…मी तर म्हणतो अजूनही वेळ आहे…चल माझ्यासोबत…आपण विनवू त्या लोकांना… मी तर निघालो आहे…कारण मी माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं नाही पाहू शकतं…”
असे म्हणत प्रकाशराव उठून उभे राहत दारात ठेवलेल्या वहाणा पायात सरकवू लागले. इतक्यात सुनीलराव त्यांना म्हणाले.
” सगळे नातेवाईक सारखे नसतात प्रकाशराव…तुम्हाला चालत असेल तर मी माझ्या नकुलचे नंदिनीसोबत लग्न लावायला तयार आहे…”
आता मात्र सगळ्यांनी एकटक सुनील रावांकडे पाहिले. उषाताईना तर जणू एक आशेचा किरण दिसून आला. सरला ताई सुनील रावांकडे पाहत म्हणाल्या.
” अगदी माझ्या मनातलं बोललात…माझ्याही मनात हा विचार आला होताच…पण तुमचे आणि नकुलचे यावर काय मत असेल ते माहिती नव्हते म्हणून मी गप्प होते…”
” नकुल काही आपल्या शब्दांपालिकडचा नाही…आपण सांगितल्यावर तो एका शब्दात हो म्हणेल बघ…मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे…” सुनीलराव म्हणाले.
त्यांचे हे बोलणे बाहेरून आत येणाऱ्या नकुलच्या कानावर पडले होते. साहजिकच हे कानावर पडल्यावर तो चिडला. कारण आतापर्यंत घरात हीच चर्चा चालू होती की नंदिनीने नशीब काढलंय. खूपच श्रीमंत घरात चालली आहे. मुलगा शिकलेला आणि दिसायला सुंदर आहे म्हणून. आजी आता त्यांचं जरा बिनसलंय म्हणून लगेच त्यांना मी चालेल सुद्धा. देव करो अन् नंदिनीच्या बाबांनी नकार देवो असे तो मनातल्या मनात बोलला.
पण त्या आधीच नंदिनीची आई म्हणाली.
” आम्हाला चालेल…नकुलला आम्ही लहानपणी पासून पाहतोय…चांगला शिकलेला मुलगा आहे…आधीपासूनच हुशार आणि गुणी आहे…शिवाय घरदार सुद्धा चांगलंच ओळखीचं आहे आणि जवळ सुद्धा आहे…त्यांच्याशी सोयरिक म्हणजे नंदिनी ला आपल्याच घरात दिल्यासारख होईल…आहे ना हो…” नंदिनी ची आई प्रकाश रावांकडे पाहत म्हणाली.
तिकडे मुलाकडचे मारुती मंदिरातील सभागृहात थांबलेले होते. कशी एकदा नवरीकडचे येतात आणि कधी आम्ही त्यांना चांगले सुनावत पायावर नाक घासायला लावतो ह्याची वाट पाहत. तिकडे शालू ताई सुद्धा त्यांच्यात सामील झाल्या होत्या. त्यांना पाहून सगळे जण एका सुरात म्हणाले.
” काय हो शालूताई…तुम्ही तर सगळी जबाबदारी घेतली होती ना…तुम्ही म्हणाला होतात की काहीच गडबड होणार नाही म्हणून…मग वेळेवर काय लावलय त्यांनी हे…किती अपमान झालाय आमचा ह्याचा काही अंदाज आहे का…?”
” मला माहिती आहे झाल्या प्रकाराने तुम्हाला खूप वाईट वाटले असेल…मला सुद्धा वाटलं नव्हतं ती गरीब गायी सारखी दिसणारी नंदिनी वेळेवर अशी वागेल ते…लग्न तर जवळपास झालं सुद्धा होतं…तिच्या बाबांना सुद्धा मी समजावलं होतं…पण ऐन आज लग्नाच्या दिवशी दारूच्या नशेत झिंगायला कुणी सांगितलं होतं रवीला…फक्त अन् फक्त तेवढ्याने हा घोळ झालाय…”
आता सगळेजण रविकडे पाहू लागले. त्याची आई त्याला म्हणाली.
” तुला सांगितले होते ना रवी…आजच्या दिवस घेऊ नकोस म्हणून… कुणी सांगितला होता हा शहाणपणा करायला…आणि दारू मिळाली कुठून तुला…?”
” जास्त नाही घेतली…थोडीशीच घेतली होती… ते…मित्र म्हणाले की लग्न आयुष्यात एकदाच होतं मग थोडीशी घ्यायला काय हरकत आहे…” रवी खाली मान घालून म्हणाला.
आता मात्र त्याचे ते हौशी मित्र मान खाली घालून उभे होते. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले.
” ते काहीही म्हणतील…पण मुळात तुला स्वतःची अक्कल नाही का…आजच्या दिवस तरी थांबायचं असतं…मग एकदा लग्न झालं की आम्ही सुटलो असतो ह्यातून…मग तुझ्या बायकोनेच सांभाळलं असतं तुला…तुझे नखरे उचलले असते…पण तुलासुद्धा चैन नाही…”
त्यावर रवी काहीच बोलला नाही. मग सगळी मंडळी ह्याच विचारात होती की जेव्हा नंदिनी च्या घरचे त्यांना विनवायला येतील तेव्हा त्यांच्याशी नेमके कसे वागावे. आधी आढेवेढे घ्यायचे आणि नंतर लग्नासाठी तयार व्हावे हे ठरवल्या गेले होते.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
सुनील रावांनी ठेवलेल्या प्रस्तावासाठी नकुल तयार होईल का…? की नंदिनीचे बाबा रवीच्या घरच्यांची माफी मागून त्याच्याशी नंदिनी चे लग्न लावून देतील…? शालू आत्या इतक्या सहजासहजी हार पत्करेल का…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.