राघव नुकताच घरी आला होता. आज घरचे दुकान जरा उशीराच बंद केले होते. नवीन मालाची तपासणी करताना आधीच राघवला उशीर झाला होता. तितक्यात घराच्या दारात पाय ठेवताच त्याची आई त्याला म्हणाली.
” राघव…जरा चौकातून आइस्क्रीम घेऊन येतोय का…? विभासला आईस्क्रीम खायची आहे पण फ्रीज मधली संपलीय…”
” हो आई…” राघव म्हणाला.
पण आता यावेळी त्याची बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. तो खूप थकलेला होता पण कोणत्याही कामाला नाही म्हणण्याची सवय नसलेल्या राघवला आजही नाही म्हणवले नाही आणि तो चौकात आईस्क्रीम आणायला निघून गेला.
विभास राघवचा लहान भाऊ. लहान असल्याने आधीपासूनच आई बाबांचा लाडका. त्यात शाळेतही एक दोनदा पहिला नंबर आणलेला असल्याने त्याला आई बाबा राघव पेक्षा जरा जास्तच महत्त्व द्यायचे. राघव च्या सुद्धा लाडाचा होता विभास. पण आई बाबांचा कल आपल्यापेक्षा विभास कडे जात आहे हे कळल्यावर देखील राघवला त्याचे विशेष वाईट वाटायचे नाही. राघव मुळातच समजुतदार होता.
राघवच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. दुकान चांगलेच चालायचे. आणि जाणते झाल्यापासून राघव सुद्धा आपल्या बाबांना दुकानात मदत करायचा. आणि मागच्या वर्षीपासून विभास सुद्धा दुकानात यायला लागला होता. पण केवळ नाममात्र.
विभास नुसता गल्ल्यावर बसून राहायचा. राघव मात्र पडेल ते काम करायचा. पण तिथेही राघवच्या वडिलांना विभासचे महत्त्व जरा जास्तच वाटायचे. कारण शाळेत हुशार असणारा आपला मुलगा आपल्याला दुकानात मदत करतोय ह्याचे त्यांना खूप कौतुक वाटायचे. कामावरील नोकर सुद्धा राघव पेक्षा विभास च्याच शब्दाला महत्त्व द्यायला लागले होते.
राघव मात्र तरीही काहीच बोलायचा नाही. पण राघवच्या बायकोला राधाला मात्र घरच्यांनी तिच्या नवऱ्याला विभास पेक्षा कमी लेखणे आवडायचे नाही. पण बोलणार तरी कोणाला. राघवला तिने एक दोनदा हे बोलून दाखवले पण राघव मात्र हसून टाळायचा. आणि सासुबाई जवळ बोलायला सोय नव्हती.
कारण सासऱ्यांच्या पाठोपाठ सासूबाईंचा सुद्धा लाडका होता विभास. घरी नेहमीच विभासच्या आवडीचा स्वयंपाक बनवला जाई. राघवला मात्र त्यांनी सतत गृहीत धरले होते.
तसे पाहता राघव सुद्धा कुठल्याही गोष्टीत कुणा पेक्षा कमी नव्हता. अभ्यासात सुद्धा त्याची प्रगती चांगली होती फक्त कधी नंबर आला नाही शाळेत. पण तरीही विभास च्या तुलनेत त्याला घरच्यांनी कमीच महत्त्व दिले होते. अनय त्यामुळेच नातेवाईकांचा ओढा सुद्धा विभास कडे जास्त असायचा. राघवचे कर्तृत्व मात्र ह्या सगळ्यात झाकोळले जाई.
राघव आणि विभासच्या लग्नानंतर सुद्धा घरच्यांनी विभास च्या बायकोला विशाखाला राधाच्या तुलनेत खूप महत्त्व दिले होते. राधा सकाळपासून रात्रीपर्यंत किचन मध्ये काम करायची. पण घरी पाहुणे आलेले असेल की सासुबाई स्तुती मात्र विशाखाची करायची. घरातील लहान सहान निर्णयात सासुबाई विशाखाशी सल्ला मसलत करायच्या पण राधाला मात्र कधीच काही विचारले नव्हते.
तसे पाहिल्यास राधा घरातील मोठी सून होती. विशाखा च्या दोन वर्षे आधी ती या घरात आली होती. आणि घरातील प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडली होती. पण विभासच्या लग्नानंतर सासूबाईंनी विशाखा ला अगदीच डोक्यावर बसवले होते. आणि सासूबाईंच्या दोन्ही सूनांच्या बाबतीत वेगवेगळे वागणे राधाला आवडलेले नव्हते. पण राघव तिची नेहमीच समजूत काढायचा आणि तेवढ्यापुरती ती गप्प बसायची.
आजही घरात सगळ्यांची जेवणं झाली होती. फक्त राघव आणि राधा राहिलेले होते. राधा नेहमीच राघव सोबतच जेवायची त्यामुळे आजही ती त्याच्यासाठी थांबलेली होती. पण नुकतंच जेवण करून टीव्ही समोर बसलेल्या विभास ला आईस्क्रीम खायची इच्छा होत होती आणि दुकानात जायचा त्याला कंटाळा आला होता म्हणून आईने राघवला आईस्क्रीम आणायला सांगितली.
पण राधाला माहिती होते की राघवला कडाडून भूक लागली असेल म्हणून तिला वाईट वाटले होते. दहा मिनिटात राघव आईस्क्रीम घेऊन आला. राघवच्या आईने त्याच्याकडून आईस्क्रीम घेतले आणि एका वाटीत विभासला काढून दिले पण राघवला साधे जेव असेही म्हटले नाही.
राघव फ्रेश झाला आणि राधा ने दोघांसाठीही ताटे वाढून घेतली. राधाकडे पाहून तिला राग आलाय हे राघव ला कळले होते. एकीकडे विभास, विशाखा, आणि आई बाबा टीव्ही पाहत गप्पा करत होते तिकडे राधा मात्र जेवण झाल्यावर किचन आवरत होती. राघव सुद्धा दुकानाचा काही महत्त्वाचा हिशोब करत होता.
दोन दिवसांनी घरात पूजा ठेवली होती. नेहमीप्रमाणेच या पूजेत बसण्याचा मानही विभास आणि विशाखा ला मिळाला होता. राधा आणि राघव मात्र नेहमीप्रमाणे कामात गुंतलेले होते. पूजेची तयारी करणे, पाहुण्यांचा मानपान करणे ह्या सगळ्याच जबाबदाऱ्या राधाकडे दिल्या होत्या. संध्याकाळपर्यंत पूजा आटोपली होती.
दिवसभरापासून आताच राधाचे रिकामपण झाले होते. विशाखा मात्र पूजेत बसायचं म्हणून चांगली नटूनथटून बसली होती. आणि पूजा झाल्यावर सेल्फी काढण्यात मग्न होती. राधाला आता थोडीशी ताप आल्यासारखी सुद्धा वाटत होती. राधा खूप थकली आहे हे राघवच्या लक्षात आल्यावर राघव तिच्याजवळ आला आणि तिला थोडावेळ आराम करायला जा असे सांगितले. तिला हात लावल्यावर तिच्या अंगात ताप भरली आहे हे सुद्धा त्याला कळले होते. राधा आराम करायला म्हणून तिच्या रूम मध्ये जाईल इतक्यात राधा ची सासू राधाला म्हणाली.
” राधा… अगं आता यावेळी कुठे जातेस रूम मध्ये.. अजुन रात्रीचा स्वयंपाक सुद्धा करायचा आहे…त्याची तयारी आतापासूनच करावी लागेल ना…”
” आई मला जरा बरं वाटतं नाही आहे… मी थोडी आराम करून येते…” राधा म्हणाली.
” आतापर्यंत तर चांगलीच होती…आता अचानक काय झालंय तुला…की तुला घरातील कामे करायची नाहीत म्हणून आराम करायला जात आहेस…तू झोपा काढशील तर घरातील कामे काय मी करणार आहे का…?” सासुबाई म्हणाल्या.
” नाही आई…तुम्हीपण नका करू…आजा विशाखाला सांगा रात्रीचा स्वयंपाक करायला…” राधा म्हणाली.
” ती दिवसभर पूजेत बसली होती…थकली असेल आता… तिला जरा आराम करू देत…तू जा स्वयंपाकघरात…” सासुबाई म्हणाल्या.
आता मात्र राधाला राग आला. विशाखा पूजेत बसली होती फक्त. पण सगळी कामे तर तिनेच केलेली होती. आणि एरव्ही आपण कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही हे सासूबाईंना चांगलेच माहिती आहे. तरीही एक दिवस जर आपली तब्येत खराब आहे तर आपल्याला आराम करायला मिळू नये म्हणून काय. कधी नव्हे ते आज राधाने तिच्या सासूबाईंना उलट उत्तर दिलेच.
क्रमशः
फरक – भाग २ (अंतिम भाग)