राजन आणि अनिल दोघेही लहानपणापासूनचे मित्र. दोघांच्या वयात फक्त एका महिन्याचे अंतर होते. बालवाडी पासून ते बारावी पर्यंत दोघेही सोबतच शिकले. दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे लोकांना.
लहानपणापासूनच दोघेही सोबत अभ्यास करायचे. खेळायचे आणि जेवायचे देखील सोबतच. दोघांचाही शाळेत पहिल्या पाचात नंबर ठरलेलाच असायचा.
एकमेकांचे चांगले मित्र आले तरीही दोघांचा स्वभाव मात्र एकमेकांपासून भिन्न होता. राजन फार बोलका, अगदी मनात येईल ते जसेच्या तसे ओठांवर यायचे पण अनिल मितभाषी होता. तो मनातले जात बोलून दाखवाय चा नाही. पण दोघांचाही स्वभाव एकमेकांना पूरक होता.
दोघेही अभ्यासू होते पण हळूहळू अनिल चे अभ्यासात मन लागेना से झाले होते. अकरावीला कॉलेज ला गेल्यावर त्यांना नवीन मित्रपरिवार मिळाला होता. अनिल हळूहळू त्या आभासी दुनियेत रमू लागला होता. त्याच्या वर्गातच शिकणारी जान्हवी त्याला आवडायला लागली होती.
हळूहळू जान्हवी आणि त्याची चांगलीच ओळख झाली आणि दोघेही चांगले मित्र बनले. पण आधीच अबोल असलेला अनिल जान्हवीला त्याच्या मनातील भावना सांगू शकत नव्हता. आपण तिच्यावर प्रेम करतो हे तिला कळले आणि तिला ते आवडले नाही तर दोघांमध्ये मैत्रीचे नाते देखील राहणार नाही ह्याची त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने त्याच्या मनातील प्रेम कधीच कोणाला कळू दिले नाही. अगदी राजनला सुद्धा नाही.
राजन अनिल मध्ये होणारे बदल पाहत होता. राजन ने अनिल ला अभ्यासात लक्ष द्यायला सांगितले. मित्र मैत्रिणी तर आयुष्यभर बनणार आहेत पण हे दिवस आपल्या करियर कडे लक्ष देण्याचे आहेत हे राजन त्याला वारंवार समजावून सांगत होता. अनिलला सुद्धा हे कळत नव्हते असे नाही. पण तरीही त्याचे लक्ष काही अभ्यासात लागत नव्हते.
राजन आणि अनिल अजूनही सोबतच राहायचे. सोबत कॉलेजला जायचे, घरी यायचे आणि अभ्यास आणि जेवण सुद्धा सोबतच करायचे. फक्त फरक एवढाच उरला होता की अनिल आता अभ्यासात पूर्वीप्रमाणे लक्ष देत नसे. राजन त्याला सतत समजावून सांगायचा पण अनिलवर त्या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही.
परिणामी बारावीत अनिल एका विषयात नापास झाला. पण राजन मात्र नेहमीप्रमाणे पहिला आला होता. राजनच्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले होते. राजन आणि अनिल या दोघांनाही पायलट व्हायचे होते. पण अनिल नापास झाल्याने ते आता त्याला शक्य नव्हते. राजन एकटाच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी निघून गेला. पण जाताना त्याने अनिलला पुन्हा जोमाने अभ्यास करून काहीतरी करून दाखवायची समज दिली.
अनिल खूप निराश झाला होता. तो एका विषयात नापास झाला ह्यापेक्षा जास्त वाईट त्याला राजन त्याला सोडून पुढील शिक्षणासाठी एकटाच जाणार असल्याचे वाटत होते. त्याने राजनला निराश मनानेच निरोप दिला.
राजनने पुन्हा परीक्षा दिली आणि बारावीत राहिलेल्या एका विषयात तो उत्तीर्ण झाला. पण त्यापुढे काही करणे त्याला जमलेच नाही. कारण त्याच्या अभ्यासात आता सातत्य उरले नव्हते. शेवटी त्याने शिक्षण सोडून दिले आणि घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात दिली. पण मनात कुठेतरी राजन बद्दल असूया निर्माण झाली होती.
एकदा असेच काहीतरी कामानिमित्ताने अनिल बाहेरगावी गेला होता. तिथे त्याला जान्हवी भेटली. त्याला पाहताच तिला खूप आनंद झाला. ती त्याच्याशी बोलायला लागली. जान्हवी आपल्याला अजूनही विसरली नाही हे पाहून अनिलला खूप आनंद झाला.
बोलता बोलता जान्हवीने अनिलकडे राजनची चौकशी केली. जान्हवी आपल्याबद्दल कमी आणि राजनबद्दल जास्त बोलत आहे हे अनिलला आवडले नव्हते पण त्याचा राग अनावर झाला जेव्हा जान्हवीने अनिलसमोर तिला राजन आवडत असल्याचे सांगितले. आणि अनिलकडे राजनचा नंबर मागितला. अनिलने राजनचा नंबर माहिती नसल्याचे सांगितले आणि तिथून निघून गेला.
आता अनिल मनोमन राजनचा द्वेष करू लागला होता. त्याचं पहिलं प्रेम असणारी जान्हवी त्याला सोडून राजनला पसंत करत होती. तसं पाहता यात राजन किंवा जान्हवीचा काहीच दोष नव्हता. अनिलने कधीही जान्हवी ला त्याच्या मनातील भावना बोलून दाखविल्या नव्हत्या. त्यामुळे अनिलला ती आवडते हे तिच्या ध्यानीमनी ही नव्हते. जान्हवीला राजन आवडतो ह्याची पुसटशी कल्पना देखील राजनला नव्हती. यावेळी त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या करीअर कडेच होते.
पण काहीही कारण नसताना अनिलने मात्र या सर्व गोष्टींसाठी राजन लाच जबाबदार ठरवले होते. अनिलच्या घरचे आणि गावातील लोक देखील त्याची आणि राजनची सतत तुलना करायचे. हळूहळू अनिलच्या मनात राजन विषयीची आधी वाढतच होती.
असेच मध्ये काही वर्षे निघून गेली. राजन आता एक यशस्वी पायलट झाला होता. गावकऱ्यांनी त्याचा एक मोठा सत्कार करण्याचे ठरवले. राजन गावात येण्याआधी गावकऱ्यांच्या त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. हे सर्व पाहून अनिलच्या मनात अधिकच इर्षा उत्पन्न होत होती.
राजन गावात दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. गावात त्याचा जंगी सत्कार झाला. ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ राजनचेच नाव होते. राजन गावी आला तेव्हापासून तो जास्तीत जास्त वेळ अनिलसोबत राहायचा. राजनच्या दृष्टीने अजूनही अनिल आणि त्याच्या मैत्रीमध्ये काहीच बदल झाला नव्हता. अनिल अजूनही राजनचा सर्वात चांगला मित्र होता.
पण अनिलचा राजनकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदलला होता. तो राजनकडे केवळ एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहत होता, ज्याला पाहून अनिलला केवळ आपण आयुष्यात खूप मागे राहिलो ह्याची भावना प्रबळ होत होती. पण त्याने राजनला हे अजिबात जाणवू दिले नाही. त्याची राजन सोबतची वागणूक नेहमीप्रमाणेच सामान्य होती.
अनिल आणि राजन दोघेही दिवसभर रानावनात भटकत, अधूनमधून त्यांच्या जुन्या मित्रांना भेटून येत असत. राजनचा परतण्याचा दिवस जवळ आला होता. एके दिवशी राजनला काही कामानिमित्ताने शेजारच्या गावी जायचे होते, त्याने अनिलला सोबत यायला सांगितले तेव्हा अनिलने आज मला शेतात फार महत्त्वाचे काम आहे असे सांगून जाण्याचे टाळले. त्यामुळे राजनला एकट्यालाच तिथे जावे लागले.
रात्र खूप झाली होती तरीही राजन काम संपवून घरी परतला नव्हता तेव्हा त्याच्या घरचे चिंतातुर झाले. त्यांनी राजनला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण राजनला फोन सुद्धा लागत नव्हता. त्यामुळे सर्व घरच्यांनी त्याला शोधायला जायचे ठरवले. काही गावकरी सुद्धा त्याच्या शोधार्थ निघाले. सर्वांनी आधी अनीलकडे चौकशी केली पण
अनिल त्याच्या घरी एकटाच होता. अनिलला सुद्धा राजनची काळजी वाटली त्यामुळे तो सुद्धा तडक त्याला शोधायला घराबाहेर पडला.
गावकऱ्यांनी आणि घरच्यांनी मिळून आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली पण राजनचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच काही गावकऱ्यांना राजनचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला.
त्याचा अक्सिडेंट झाला असावा असा अंदाज लावल्या गेला. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात पसरली. सारा गाव दुःखी झाला.
राजनच्या घरच्यांच्या दुःखाला तर पारावार उरला नाही. राजनच्या आईचा विलाप तर बघता बघवत नव्हता. सारा गाव हळहळत होता.
अनिल सुद्धा खूप रडला. त्या दिवशी मी राजनच्या सोबत गेलो असतो तर असं काहीच घडलं नसतं असे म्हणून तोही खूप विलाप करत होता. पण आता जे घडायचे ते घडून गेले होते. राजनचा अंत्यविधी उरकून अनिल घरी आला होता. अनिलचे अश्रू अजूनही थांबत नव्हते.
अनिल रडता रडता अचानक गप्प बसला आणि हसायला लागला. तो एखाद्या सैताना प्रमाणे हसत होता. त्याचा चेहरा अगदी क्रूर दिसत होता. हसता हसता त्याला आठवले.
त्या दिवशी कामाचे निमित्त सांगून अनिलने राजन सोबत जाण्याचे टाळले होते. राजनने मनात सर्व योजना आधीच तयार ठेवली होती. राजन परत येत असताना त्याला ऐन रस्त्यातच अनिल भेटला होता. अनिलने त्याला रस्त्यातच थांबवले आणि दोघे बोलायला लागले.
इतक्यात कुणीतरी मागून येऊन राजनच्या डोक्यात जोरात रॉड मारला. त्या अवस्थेत राजन आशाळभूपणे अनिलकडे पाहत होता. घायाळ नजरेने त्याच्याकडे मदतीची याचना करत होता. पण अनिलने अत्यंत थंडपणे राजन कडे बघितले आणि त्या वार करणाऱ्या व्यक्ती कडून रॉड घेऊन राजनच्या डोक्यावर आणखी एक वार केला. आणि त्यातच राजनचा जीव गेला होता.
अनिल हे सर्व आठवून स्वतःशीच हसत होता. इतक्यात त्याला त्याच्यामागे कुणीतरी असल्याचे जाणवले. अनिलने मागे बघितले तर मागे राजन उभा होता. फाटलेल्या कपड्यांत आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा असलेला राजन खूप भयानक दिसत होता.
अनिलकडे बघून राजन हसायला लागला. त्याच्या बीभत्स हसण्याने अनिल खूप घाबरला. अनिलने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हात पाय अजिबात हलत नव्हते. इतक्यात अनिलच्या घशाला कोरड पडली आणि तो तिथेच जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला.
राजन पाठोपाठ अनिलचा देखील मृत्यू झाल्याची बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात पसरली. राजनच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अनिल चा जीव गेल्याचे गावकरी बोलू लागले. अनिलच्या जाण्याचे सुद्धा गावकऱ्यांना खूप दुःख झाले पण त्यापेक्षा जास्त दोघांच्या मैत्रीचे किस्से गाजले.
आजवर एका मित्राच्या जाण्याच्या दुखणे दुसरा मित्र देखील जग सोडून गेला असे उदाहरण गावकऱ्यांनी बघितले नव्हते. तेव्हापासून त्यांच्या आणि आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये राजन आणि अनिलच्या अतूट मैत्रीचे उदाहरण दिले जाते. अगदी त्यांच्या मैत्रीचे शपथा देखील घातल्या जातात. पण प्रत्यक्षात काय घडले हे मात्र आजवर कोणालाही कळलेले नाही.
समाप्त.
फोटो – साभार Pixel
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.