नकुल आल्यावर नंदिनीच्या बाबांनी औपचारिकता म्हणून त्याची विचारपूस केली. सगळे जण नकुलसाठी जेवायला थांबले होते. मग सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली. सगळेच आनंदात होते. मात्र नकुलच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. जेवण वगैरे झाल्यावर सगळे जण गप्पा करत बसले. थोड्या वेळाने नंदिनी चे आई बाबा घरी जायला निघाले. निघताना ते सुनील रावांना म्हणाले.
” लग्न झालं तेव्हापासून नंदिनी एकदाही घरी आली नाही…माझी अशी इच्छा होती की नंदिनी ला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जावे…तुमची हरकत नसेल तर आठ दहा दिवसांनी मी तिला घ्यायला येईल…”
” अहो परवानगी काय मागताय…तुमचीच मुलगी आहे…जेव्हा वाटेल तेव्हा न्या तिला…” सुनील राव म्हणाले.
हे ऐकून प्रकाशरावांना खूप समाधान वाटले. उषाताई आणि प्रकाशराव दोघेही घरी निघून आले. प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर आज अनेक दिवसानंतर स्थैर्य दिसून येत होते. नंदिनीसुद्धा कधी नव्हे इतकी खुश दिसत होती आज. नकुलच्या मनाला सुद्धा वेगळ्याच विचारांनी घेरले होते.
त्याला वाटत होते की आपण नंदिनी वर प्रेम करायला लागलो पण नंदिनी च्या मनात आपल्याबद्दल काय आहे हे आपल्याला माहीतच नाही. आपण तिला गृहीत धरले का हा विचार त्याच्या डोक्यात वारंवार डोकावत होता. इतक्या दिवसांत नंदिनी आपल्यासोबत कधीच प्रेमाने वागली नाही.
आपल्याला आधी तिचा राग आला होता पण हळूहळू ती आवडायला लागली. पण एवढे दिवस सोबत असून सुद्धा तिच्या मनात माझ्याबद्दल तशा भावना नाही आहेत. म्हणजे असत्या तर आपल्याला जाणवल्या असत्या ना.
आपल्याप्रमाणे तिचे लग्न सुद्धा नाईलाजास्तव झाले आहे. पण आपण ह्या लग्नाला स्वीकारले. मात्र नंदिनी ने अजूनही आपल्याला स्वीकारले नसेल का. म्हणूनच तिच्या बाबांना पाहून ती एवढी आनंदी दिसत होती पण इतके दिवस माझ्यासोबत कधी एवढ्या आनंदात दिसली नाही.
तिने तिच्या बाबांना तेच सांगितले असेल का ? एवढ्या दिवसातून आजच का तिचे बाबा तिला माहेरी घेऊन जातो असे म्हणाले. नंदिनी ने त्यांना असे सांगितले असेल का की तिला इथे राहायचे नाही. म्हणूनच डोळ्यातून आसवं गाळत होती का ती.
नंदिनीच्या मनात नेमकं काय सुरू असेल ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता. इतके दिवस सोबत राहूनही तिने कधीच आपल्याकडे त्या नजरेने बघितले नसेल का हा प्रश्न त्याला राहून राहून छळत होता. अशातच दुसऱ्या दिवशी तो जेव्हा ऑफिस ला जायला निघाला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली.
” नकुल…थोडा थांब…तुझ्यासोबत नंदिनीला सुद्धा घेऊन जा…तिला सुद्धा तिच्या कॉलेज मध्ये जायचे आहे…तिचं कॉलेज सुरू झालंय…तिला काही पुस्तके वगैरे हवे असतील तर ते घेऊन दे आणि संध्याकाळी येताना तिला सोबत घेऊन ये…”
नकुल काही बोलणार इतक्यात नंदिनी मध्येच म्हणाली.
” कशाला त्यांना त्रास आत्या…मी बस ने किंवा ऑटो ने जाईल ना…”
” त्यामध्ये त्रास कसला…गाडीवरच जायचं आहे…तो तिथेच जात आहे…एकाच शहरात जाताना वेगवेगळे जाण्यात काय अर्थ आहे…”
” अगं पण तिला नाही यायचं माझ्यासोबत तर राहूदे…” नकुल त्रासिक स्वरात म्हणाला.
असे म्हणून तो घरातून बाहेर निघून सुद्धा गेला. नंदिनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. नकुल च्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत हे सरला आत्याने आधीच हेरले होते. आज त्याचे वागणे पाहून त्यांना त्याची खात्री पटली. त्या नंदिनी जवळ गेल्या आणि म्हणाल्या.
” नंदिनी…तुझे आणि नकुल चे काही भांडण झाले आहे का…?”
” नाही आत्या…” नंदिनी म्हणाली.
” तुझी नकुल बाबत काही तक्रार आहे का…?” आत्याने विचारले.
” नाही…” नंदिनी म्हणाली.
” मग तू त्याच्यासोबत जायला नकार का दिलास…?” आत्याने विचारले.
” म्हणजे मी नकार नाही दिला पण मला वाटलं त्यांना आवडणार नाही माझे त्यांच्यासोबत जाणे…” नंदिनी म्हणाली.
” असं का वाटतंय तुला…त्याला आवडलं नसतं तर तो तसा बोलला असता ना…पण तू स्वतःहून नाही म्हणालीस…अशाने कसे चालेल…आता तुम्ही नवरा बायको आहात…तुला आता नेहमीच कॉलेजला जावं लागेल…मग काय दोघेही वेगवेगळे जाणार आहात का..? आणि तू त्याच्यासोबत जायला नकार दिल्यावर त्याचा चेहरा किती पडला होता ते तू पाहिलं नाहीस का…?” आत्या म्हणाली.
आता मात्र नंदिनी गप्प होती. मग सरला आत्या पुढे तिला म्हणाली.
” मी खूप दिवसांपासून पाहत आहे नंदिनी…तू घरात एकदमच मोकळी वावरतेस…पण नकुल असला की अवघडल्या सारखी वावरतेस…आधी तो सुद्धा तसाच वागायचा पण आता त्याचे वागणे बदलले आहे…तो तुझ्या आजूबाजूला असला की आनंदात असतो…म्हणून मला वाटतं की तू आता तुझं अवघडलेपण जरा सोडलं पाहिजे…
लग्न म्हणजे फक्त सासू सासऱ्यांची सेवा, घरकाम फक्त एवढंच नाही…तुम्ही दोघांनी आता सामान्य नवरा बायको सारखे वागायला काहीच हरकत नाही…तो त्याच्या बाजूने प्रयत्न करतोय ते दिसत आहे मला…लगेच एकमेकांना नवरा बायको माना असेही म्हणत नाहीये मी..पण तुझ्या बाजूने मात्र काहीच प्रयत्न नाहीत…
अशाने तुमच्यात असलेला दुरावा वाढत जाईल…आता तुम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवे…त्यासाठी तुम्हा दोघांना थोडा वेळ सोबत घालवायला हवा…तुम्ही हवा तेव्हढा वेळ घ्या…पण निदान समजून घेण्याची सुरुवात तरी करा…” सरलाआत्या म्हणाली. नंदिनी काहीच बोलत नव्हती. तिने होकारार्थी मान हलवली.
इकडे नकुल मात्र नंदिनीच्याच विचारात होता. नंदिनी ला आपल्यासोबत यायचे नसेल असा त्याचा समज झाला होता. नंदिनी ला आपण आवडत नसू. तसेही तिचे लग्न तिच्या मर्जीने थोडीच झाले आहे. आपण तिच्या प्रेमात पडलो पण ती आपल्या प्रेमात नाही.
त्यामुळे आता आपण आपल्या भावनांवर जरा आवर घालायला हवा. असा विचार करून तो त्याच्या कामाला लागला. पण मनातून तो खूप नाराज होता. तो त्याच्या मनातील भावना तिला सांगणार होता पण तिच्या अशा तूसड्या वागण्याने त्याने तिला काहीच न सांगायचे ठरवले.
त्या दिवशी ती कॉलेजला बसने गेली. पण तिच्याही मनात विचारांनी थैमान घातले होते. आपण चुकीचं वागतोय का ह्याची जाणीव तिच्या मनाला झाली. आपण सकाळी त्याच्यासोबत जायला हवे होते. पण आधी त्यानेच तर सांगितले होते की माझ्याशी फक्त कामापुरते बोलायचे.
पण मग लगेच तिला आठवले की त्याने त्याच्या वागण्याबद्दल तिची माफी सुद्धा मागितली होती. आणि आता तो तिच्याशी हसून बोलायचा. तिला काय हवं नको ते विचारायचा. तिच्या मागे पुढे घुटमळायचा. त्याच्या मनात आपल्याबद्दल नेमके काय विचार असतील.
तो आपल्याला बायको मानू लागला असेल का. आणि आपण का नाही एवढे दिवस का नाही त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला. आपण आपल्याच दुःखात अन् विचारात होतो. बाबा बोलत नाहीत, नाराज आहेत म्हणून आपण आपल्या नात्याला कधी गंभीरतेने घेतलेच नाही. आपण आपल्या दुःखाचा, परिस्थितीचा बाऊ केला पण नकुलच्या मनाचा कधी विचार केलाच नाही.
तो मनाने खूप चांगला आहे. आपण त्याच्यावर अन्याय करतो आहे का. अशा एक ना अनेक विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातले होते. ती कॉलेजमध्ये गेली पण तिचे मन लागत नव्हते. इतक्यात तिला तिची मैत्रीण नेहा भेटली. तिला पाहून नेहा म्हणाली.
” नंदिनी…तू आणि कॉलेजमध्ये…म्हणजे तुझं लग्न झालंय ना…?”
” हो…” नंदिनीने थंडपणे सांगितले.
” तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का…?” नेहा कचरत म्हणाली.
” विचार ना…” नंदिनी म्हणाली.
” मी ऐकलं तुझ्या लग्नाबद्दल…आधी तुझे लग्न इंदूरला ठरले होते पण ऐन वेळेला तुझे लग्न दुसऱ्या मुलाशी झाले म्हणून…” नेहा म्हणाली.
” बरोबर ऐकलं आहेस तू…” नंदिनी म्हणाली.
” पण असे का झाले…म्हणजे नेमकं काय घडलं होतं…?” नेहाने विचारले.
मग नंदिनी ने तिला सगळा घटनाक्रम विस्ताराने सांगितलं. सगळं काही ऐकून नेहा अगदीच शॉक झाली.
” तरीही तू कॉलेजमध्ये आलीस…? म्हणजे आपल्याकडे कसं लग्न झालं की मुलींचं कॉलेज बंद होऊन जातं ना म्हणून मला आश्चर्य वाटले…त्यातच तुझे लग्न अशा पद्धतीने झाले…तुझ्या सासरच्यांनी विरोध नाही केला तुला कॉलेजला यायला…” नेहाने विचारले.
” नाही…उलट त्यांनी स्वतःहून मला कॉलेजला जा असे सांगितले…मी तर आशाच सोडली होती…त्यांचे म्हणणे आहे की तुला वाटेल तेव्हढे शिक…त्यांचा माझ्या शिक्षणाला पाठिंबा आहे…माझ्या आई बाबांपेक्षा सुद्धा जास्त पाठिंबा आहे मला त्यांचा…” नंदिनीने सांगितले.
” ग्रेट आहेत यार तुझे सासू सासरे…आजच्या काळात सुध्दा असे सासरचे लोक असतात का…?” नेहा आश्चर्याने म्हणाली.
” अगं कारण माझी सासुबाई माझी आत्याच आहे…आधीपासूनच माझ्या खूप लाड करायच्या त्या…त्यांना फार कौतुक आहे शिक्षणाचं…” नंदिनीने सांगितले
” खरंच नशीबवान आहेस यार तू…” नंदिनी म्हणाली.
” थँक यू… बरं चल आता…मला काही पुस्तके घ्यायची आहेत…त्यानंतर टाईमटेबल सुद्धा समजून घ्यायचा आहे…” नंदिनी म्हणाली.
नंदिनीचे कॉलेजमधील काम आटोपत आले होते. नकुलच्या ऑफिसला सुटायला आता थोडाच वेळ बाकी होता. मग नंदिनीने स्वतःच नकुलला फोन लावला. नंदिनीचा फोन आलेला पाहून नकुलला आश्चर्य वाटले. त्याने फोन उचलला. समोरून नंदिनी म्हणाली.
” माझं कॉलेजमधलं काम संपलय…तुमचं ऑफिस संपलं की तुम्ही मला घ्यायला याल का इथे…दोघेही सोबतच घरी जाऊ…”
नकुलच्या मनात आले की हिला नकारच द्यावा. सकाळी तर आपल्या सोबत आली नाही. आता म्हणावे की तू जा बस ने. पण तो तिला नाही म्हणूच शकला नाही. त्याच्याही नकळत तो तिला हो म्हणाला. तिलाही आनंद झाला.
खरेतर नकुलला त्या दिवशी जरा जास्तच काम होते. पण नंदिनी ने स्वतः फोन करून घ्यायला बोलावले म्हणून त्याला काही कामच सुचत नव्हते. मग तो लवकरच ऑफिसमधून बाहेर पडला. आणि थोड्याच वेळात नंदिनीच्या कॉलेज समोर हजर झाला.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
इथून या दोघांमध्ये सगळं काही आलबेल होईल का ? नकुल चा गैरसमज दूर होऊ शकेल का…? रवी आणि सुजाता च्या आयुष्यात यावेळी काय सुरू असेल..? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
कथेचा हा भाग लिहायला काही कारणास्तव थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पुढील भाग रोज वेळेवर प्रकाशित केल्या जातील.
Nice.