सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. तीन खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत तीन खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत. अजूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतले आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसलातरी हिशेब करत होता.
इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका झोपडीवजा घरात राहणारा महादेव उर्फ महादूने सुहासला बघितले. सुहास आणि महादू लहानपणी गावातल्या शाळेत एकाच वर्गात शिकायला होते. पण महादूने अर्ध्यावरच शिक्षण सोडले आणि त्याच्या बाबांना कामात मदत करायला लागला. सुहास मात्र चांगला शिकून नोकरीवर लागला.
सुहास नोकरीनिमित्ताने शहरात राहायला गेला आणि तिथलाच झाला. कधीकधी गावाच्या उत्सवाला यायचा तेव्हा महादुची आणि त्याची भेट व्हायची. महादूची परिस्थिती बेताचीच. पण महादू आणि त्याची बायको गिरिजा चांगली मेहनत करायचे आणि सुखाचा संसार करायचे. पण सुहास मात्र आता महादुशी पाहिल्याप्रमाणे बोलत नसे.
दोघांच्या परिस्थिती तली आर्थिक दरी दोघांच्या मैत्रीच्या आड आली होती. आता फक्त कामापुरते बोलणे व्हायचे. तो सुहास जवळ आला आणि सुहासला म्हणाला.
” काय सुहास…आज अचानक गावी…?”
” काही नाही रे…विचार करतोय की हे घर विकून टाका व…बरेच दिवस झालेत बंद पडून आहे…आणि आता घरून इथे येणारं सुद्धा कुणीच नाही…आईचं आता वय झालंय…आणि आम्हाला नवरा बायकोला मुलांमुळे वेळ मिळत नाही…” सुहास म्हणाला.
” अस्स होय…ते पण बराबर हाय तुझं…”
महादू म्हणाला. मग थोडा वेळ मनातल्या मनात विचार करून म्हणाला.
” कितीला इकनार हायेस…म्हणजे काही ठरवलं असशील ना…?”
” तसं काही ठरवलं नाही…पण विचार करतोय की ह्या घराचे दीड लाख जरी मिळाले तरी बस होईल…लहान घर आहे आणि त्यात कौलारू….आणि गावात असल्याने फार काही किंमत पण मिळणार नाही…म्हणून म्हटलं दीड लाख मिळाले तरी चालेल…” सुहास म्हणाला.
महादू ने मनातल्या मनात कसलातरी हिशेब मांडला आणि म्हणाला.
” तुला काई हरकत नसेल तर मीच तुझं घर इकत घ्यायला तयार हाय…फक्त मला महिनाभराचा वेळ दे…”
त्यावर सुहासने विचार केला की नाहीतरी घर विकायचं म्हंटल की वेळ लागतोच. आणि जर घरबसल्या घे विकल्या जात असेल तर महिनाभर पैशांसाठी थांबायला काही हरकत नाही. म्हणून मग त्याने महादुला होकार दिला. तसाच महादू त्याच्या घरी गेला आणि घरून एक हजार रुपये आणून दिले. आणि म्हणाला.
” तर मग सौदा पक्का…मी महिनाभराच्या आत तुला पैसे देऊन टाकेन…आणि मग पुढचा व्यवहार करू…”
सुहास ने त्याला होकार दिला आणि घरी निघून आला. एकाच दिवसात घराचा सौदा झाल्याने तो निवांत होता. त्यानंतर तो त्याच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झाला आणि घराच्या सौद्याचा जणू त्याला थोडा विसर पडला.
पण एके दिवशी त्याला त्याच्या गावातूनच त्याच्या एका दुसऱ्या मित्राचा फोन आला आणि मित्र ह्याला म्हणाला.
” काय रे सुहास…मी ऐकलंय की तू घर विकणार आहेस म्हणुन…”
” हो रे…विकणार आहे…महिनाभरात व्यवहार पूर्ण सुद्धा होईल…” सुहास म्हणाला.
” अच्छा…कुणाला विकणार आहेस…?” त्याने प्रश्न केला.
” आपला महादू आहे ना त्याला विकणार आहे…” सुहास म्हणाला.
” जर अजुन सौदा बाकी असेल तर मला सुद्धा घर घेण्यात इंटरेस्ट आहे…त्याच्यापेक्षा पन्नास हजार शिल्लक सुद्धा देऊ शकतो…मला शेतातील माल ठेवायला जग हवी आहे म्हणून…” मित्र म्हणाला.
तेव्हा सुहासने काही उत्तर दिले नाही. पण त्याच्या मनात मात्र विचार येऊन गेला की पन्नास हजार शिल्लक मिळत असेल तर घर ह्याला विकायला काय हरकत आहे. नाहीतरी महादू सोबत काही कागदोपत्री व्यवहार थोडीच झालाय अजुन. फक्त हजारच रुपये तर घेतलेत. आणि आपण त्याला दोन हजार परत देऊ.
आणि सांगू की मी सौदा नाही करू शकत. शेवटी करून करून काय करणार आहे. गरीबच तर आहे. आणि जरी त्याला राग आला तरी आपल्याला थोडे त्याच्याशी काही काम पडणार आहे भविष्यात. असा सुहासने विचार केला.
तसे पाहता सुहासला पैशांची अशी काही फारशी गरज नव्हती. त्याला भरपूर पगार होता. घरी सुद्धा काहीच कमी नव्हते. पण तरीही पैशांची हाव त्याच्यातील माणुसकीच्या वरचढ झाली आणि त्याने विचार केला की पन्नास हजार शिल्लक येत असेल तर काय हरकत आहे.
आणि म्हणूनच एके दिवशी महादूला नकार द्यायला म्हणून तो गावी गेला. घराजवळ गेला असता त्याने पाहिले की महादू ने त्याच्या घराजवळचा परिसर स्वच्छ केला होता. अगदी घराच्या भोवती त्याने नवीन झाडे सुद्धा लावली होती.
त्यानंतर महादूला भेटायला म्हणून तो महादूच्या घरी गेला. महादू घरी नव्हता पण त्याची दोन्ही मुले घरीच होती. त्याच्या दोन्ही मुलांनी सुहासला घरात बसायला सांगितले आणि त्याच्या सात वर्षाच्या मुलीने लगेच जाऊन स्वयंपाक घरातून पाणी आणले आणि सुहासला दिले. काहीतरी बोलावं म्हणून सुहास महादुच्या मुलीला म्हणाला.
” काय मग बाळ…कशी सुरु आहे दिवाळीची तयारी…नवीन कपडे घेतले की नाही…?”
” नाही काका…आम्ही यावर्षी काहीच घेणार नाही आहे… नविनकपडे नाही अन् फटाके सुद्धा नाही…” त्याची मुलगी म्हणाली.
” अगं पण का…?” सुहास ने विचारले.
” कारण आमचे बाबा आमच्यासाठी नवीन घर घेणार आहेत…याच्यापेक्षा मोठं घर…आमच्या या घराची मागची भिंत पडली ना म्हणून…बाबांनी बाबांची गाडी सुद्धा विकली आणि आईने आईचे तिचे सोन्याचे मणी विकून टाकले घर घेण्यासाठी…बाबा म्हणाले की यंदा कपड्यांसाठी पैसे नाहीत…पुढच्या वर्षी आम्हाला दोन दोन ड्रेस घेऊन देतील…” महादूची मुलगी निरागसपणे म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून सुहासला स्वतःचीच लाज वाटली. आपल्यासाठी घर विकणे हा एक सौदा असला तरी महादू सारख्या गरीब व्यक्ती साठी हे घर विकत घेणे हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही ह्याची जाणीव त्याला झाली. आपण फक्त थोड्या पैशांसाठी एका कुटुंबाचे स्वप्न मोडायला निघालो होतो हे कळल्याने त्याला स्वतःचीच लाज वाटत होती.
तो विचार करत असतानाच महादू आणि महादुची बायको शेतातून घरी आले. सुहास ने महादू ला बघितले. थकलेला आला तरी त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसत होतं. त्याच्या बायकोच्या अंगावर काळया मण्याच्या मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिना नव्हता पण नवऱ्याला आहे त्या परिस्थितीत साथ देण्याची मनाची तयारी होती. आणि मुलंसुद्धा इतक्या लहान वयात खूपच समजुतदार होते.
महादू ने सुहासला आपल्या घरी पाहिले महादूला वाटले की सुहासला पैसे जरा लवकर पाहिजे असल्याने तो आला असेल. तो सुहास जवळ येत म्हणाला.
” मी लवकरच सोय करतो पैशांची…”
” नाही महादू…पैशांची काही घाई नाही…उलट मी तर म्हणतो दहा वीस हजार कमी दिले तरीही काही प्रोब्लेम नाही…तू कर तुझ्या सोयीने पैसे जमा…आधी दिवाळी चांगली साजरी करू मग पाहू व्यवहाराचं…” सुहास म्हणाला.
आणि त्यासरशी महादुच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने पुन्हा मनातल्या मनात सगळा हिशोब मांडला. सुहासला जर जरा उशिरा पैसे दिले तर त्याची दिवाळीची गरज भागणार होती. निदान मुलांना चांगले कपडे तरी घेता येणार होते. त्याने मानेनेच सुहासला होकार दिला आणि सुहास जायला निघाला.
पण जाताना त्याच्या डोळ्यासमोर महादुचा समाधानी चेहरा सारखा सारखा येत होता आणि त्यामुळे सुहास सुद्धा मनातून समाधानी झाला होता. आज त्याला स्वतःमध्ये माणुसकीचं दर्शन घडून आलं होतं. पैशांपेक्षा माणुसकी ही नेहमीच मोठी असते ह्याची जाणीव त्याला झाली होती. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणे ह्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही हे सुहासला कळले होते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.