पाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासुबाई किचन मध्ये आल्या तेव्हा प्रियाने विचारलेच..
” आई…तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का..?”
” आता माझी आवड असो वा नसो…त्याने काही फरक पडणार आहे का…?” सासुबाई म्हणाल्या.
” पण आई…मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना…आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी ह्यासाठी मी पण मोहित च्या बरोबरीने काम करते…घरची कामे करूनच मी नोकरीसाठी बाहेर पडते ना…” प्रिया म्हणाली.
” आमच्या घरची परिस्थिती एवढी वाईट नाही की आम्हाला तुझ्या पैशांवर अवलंबून राहावे लागेल…माझ्या मुलाला आम्ही चांगलं शिकवलंय… तो समर्थ आहे आम्हाला पोसायला…तू नोकरी करायला बाहेर पडते कारण तुम्हा आजकालच्या मुलींना घरात राहायला आवडत नाही…नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर राहायला मिळतं…घरातल्या कामांपासून सुटका मिळते…” सासुबाई म्हणाल्या.
” नाही आई…नोकरी करतानासुद्धा खूप दगदग होते…आणि मुंबईसारख्या महानगरात प्रवास करणे सुद्धा तितके सोईचे नसते आई…शिवाय कामाचं टेंशन असतं ते वेगळं…मला नाही वाटत कोणतीही स्त्री बाहेर पडायला मिळावं म्हणून नोकरी करत असेल…बायका नोकरी करतात ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी, संसाराला हातभार लावण्यासाठी, आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आणि आपल्या शिक्षणाचं, बुद्धिमत्तेच चीज व्हावं म्हणून…” प्रिया काकुळतीने म्हणाली.
” मला नकोस शिकवू…तुला काय वाटतं…तू अशा मोठमोठ्या शब्दांचा वापर करशील आणि तू जे म्हणतेस ते मला पटेल…मी चांगलीच ओळखून आहे तुम्हा आजकालच्या मुलींना…माझी मुलगी मोना सुद्धा शिकलीय…पण ती गपगुमान घरात सगळ्यांची सेवा करते…तिच्या सासूला साधा चहाचा कप सुद्धा ठेवावा लागत नाही हो…” सासुबाई म्हणाल्या.
” आई पण….”
” काही बोलू नकोस…उद्या माझी मोना दिवाळसणाला घरी येत आहे…म्हणून तीन चार दिवस ऑफिस मधून सुट्टी घे…बिचारीला सासरी कामच काम असतात निदान चार दिवस माहेरच सुख मिळू दे तिला…” सासुबाई म्हणाल्या.
” पण आई इतके दिवस सुट्टी मिळणार नाही…” प्रिया.
” ते मला माहिती नाही…पण सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची…” सासुबाई एवढं बोलून तिथून निघून गेल्या. प्रियाला सासूबाईंच्या बोलण्याचे वाईट वाटले होते. पण यावेळी तिने बोलून न दाखवता काहीतरी वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचे ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी प्रिया आरामात सकाळी सहा वाजता उठली. घरातील सर्व कामे आरामात करत होती. स्वयंपाक करताना गाणं गुणगुणत होती. एरव्ही सतत घाईत काम करणाऱ्या प्रियाला इतकं आरामात काम करताना पाहून सासूबाईंना नवल वाटलं.
” आज काय विशेष सूनबाई…एकदम गाणं गुणगुणत काम करत आहेस…?” सासूबाईंनी विचारलेच.
” आई…आज मोनाताई येणार आहेत न म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे…” प्रिया ने उत्तर दिले आणि पुन्हा गुणगुणत कामाला लागली.
सासूबाईंना बरे वाटले की मोना येणार म्हणून प्रियाने ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे. प्रिया सुद्धा शांतपणे आपले काम करत होती. तिने आज तिच्या नणंद साठी चांगला साग्रसंगीत स्वयंपाक केला होता.
दुपारी तिची नणंद आली आणि मायलेकी च्या गप्पांना ऊत आला. प्रियाला मात्र दोघींनी आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेतले नाही उलट दिवसभर तिलाच हे आण ते आण म्हणून राबवून घेतले. संध्याकाळी मोहित आला आणि सर्वांनी सोबत जेवण केले. प्रियाच्या हातचे जेवण तिच्या सासूला आणि नणंद ला खूप आवडले होते पण तसे त्यांनी बोलून मात्र दाखवले नाही. जेवण झाल्यानंतर सर्वांनी आरामात बाहेर जाऊन आइस्क्रिम खाल्ले पण प्रिया मात्र स्वयंपाकघरात एकटीच भांडी घासत होती. नणंद च्या येण्याने सर्व कुटुंब एकत्र झालं होतं आणि प्रियाला मात्र सपशेल वेगळी वागणूक दिली जात होती. पण प्रिया मात्र कमालीची शांत होती. एकाही शब्दाने तक्रार नाही की काही भांडण नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा प्रिया शांतपणे सहा वाजता उठली आणि आरामात कामे करायला लागली. सर्वांचा चहा नाश्ता झाल्यावर प्रियाने सुद्धा स्वतःसाठी नाश्त्याची प्लेट घेतली आणि ती आरामात बसून नाश्ता करायला लागली. मोहित ऑफिस ला जाण्याच्या तयारीत होता. प्रिया अजूनही ऑफिस साठी तयार नाही हे पाहून तो प्रियाला म्हणाला.
” अजुन तयार झालेली नाहीस…आज पण सुट्टी आहे का…?”
” हो…आजपण सुट्टी आहे आणि आता नेहमीच सुट्टी असेल…” प्रिया म्हणाली.
” म्हणजे…मला कळलं नाही…?” मोहित ने विचारले.
” म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे…” प्रिया म्हणाली.
” काय..?” मोहित.
” मी नोकरीचा राजीनामा दिलाय…” प्रिया म्हणाली.
” काय…” मोहित अक्षरशः किंचाळत म्हणाला. ” तुझ्या लक्षात येत आहे का तू काय बोलत आहेस ते…”
मोहित चे बोलणे ऐकुन प्रियाच्या सासुबाई आणि नणंद मोना तिथे आल्या.
” हो…बरोबर तेच बोलत आहे…” प्रिया म्हणाली.
” कोणाला विचारून हा शहाणपणा केलास तू…” मोहित ने विचारले.
” स्वतःला विचारून…नोकरी करण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचाच होता आणि नोकरी न करण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचाच आहे…” प्रिया शांततेने म्हणाली.
” आजकाल नोकरी मिळणं किती कठीण आहे वहिनी आणि तू तुझ्या इतक्या चांगल्या पगाराच्या नोकरी चा राजीनामा दिला…” मोना म्हणाली.
” हो पण आपल्या घरी माझ्या पगाराची काहीच गरज नाही…मोहित खूप चांगलं कमावतात आणि त्याने आमचं आरामात भागत…आणि मलासुद्धा आता माझ्या सासूबाईंची सेवा करायची आहे घरी राहून…अगदी जशी तुम्ही तुमच्या सासूबाईंची करता तशीच…” प्रिया म्हणाली.
” अग वहिनी…मला माझ्या मनाजोगती नोकरी मिळाली नाही म्हणून नोकरी केली नाही…नाहीतर मी तरी कशाला घरी काम करत बसली असती…” मोना म्हणाली.
” पण आईंना नाही आवडत माझं नोकरी करणं…आणि मला घरी यायला बरेचदा उशीर होतो तेव्हा मोहीतची चिडचिड होते…मलाही वाटतं की जेव्हा मोहित घरी येतील तेव्हा मी चांगलं तयार होऊन हसून त्यांचं स्वागत कराव…” प्रिया म्हणाली.
” अग ए बाई…मला नकोय तुझं ते हसून स्वागत करणं…तू चल माझ्यासोबत…आपण ऑफिस मध्ये बोलून तुझा राजीनामा त्यांनी स्वीकारू नये म्हणून त्यांना विनंती करू…” मोहित म्हणाला.
” पण मला नाही करायची नोकरी…मला आता गृहिणी म्हणून घर सांभाळायचं आहे…” प्रिया म्हणाली.
” घर सांभाळायला बायको हवी म्हणून तुझ्याशी लग्न केलं नाहीये मी…तू चांगल्या नोकरीवर आहेस आणि चांगला पगार कमावत आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केलंय मी…नाहीतर कितीतरी मुलींचे बाप मला भरघोस हुंडा द्यायला तयार होते…पण तुझ्या बाबांकडून हुंडा न घेता मी तुझ्याशी लग्न केलंय…ते काय गृहिणी बनायला नाही…” मोहित म्हणाला.
” अरे वा मोहित…शेवटी खरं काय ते बोललात तुम्ही…तुम्ही मुलीचे गुण अवगुण न पाहता फक्त हेच पाहिलत की तिच्याकडून तुम्हाला किती पैसा मिळू शकतो…नोकरी करणारी बायको हवी हा हट्ट एकदा मी समजून घेऊ शकते पण बायकोच्या पगारासाठी तुम्ही लग्न केलत हे मात्र न पटणार आहे…
मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं…तुमच्या घराला आपलं घर मानलं…तुमच्या आईला आपली आई मानली…पण तुम्ही मात्र मला कधीच तुमच्या घरात सामावून घेतलं नाही…मी सर्वकाही करून परकीच राहिली…मी माझं घर सोडून फक्त या आशेवर तुमच्यासोबत इथे आले की तुम्ही मला प्रत्येक पावलावर सोबत कराल…मला समजून घ्याल…
पण तुम्ही कधीच मला समजून घेतलं नाहीत…मला प्रेमाने तर सोडा पण कधी माणूस म्हणून सुद्धा समजून घेतलं नाहीत तुम्ही…तुमच्या अपेक्षा आहेत की मी रात्रंदिवस नुसतं काम करावं… त्यातही आईंना मी नोकरी करते म्हणून कधीच मी आवडले नाही…त्यांच्या मते मी बाहेर फक्त फिरायला जाते…
आजकाल जनरली सर्वांच्या घरीच कामाला बाई असते…आपल्या घरी सुद्धा आधी कामाला बाई यायची पण की या घरात आले आणि तुम्हाला वाटलं की बायकोच्या रुपात तुम्हाला मोलकरीण मिळाली आहे.
सकाळी पाच वाजता उठून, घरची कामे करून, दिवस भर ऑफिसमध्ये थकून घरी आल्यावर दिवसभराची भांडी घासून, स्वयंपाक करून, सगळी कामे करून रात्री तुमच्या….” बोलता बोलता प्रिया थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
” तुला प्रॉब्लेम काय आहे…हाच ना की घरात कामाला बाई हवी…आपण उद्यापासूनच बोलावू कामाला बाई…पण तू नोकरी सोडू नकोस…” मोहित म्हणाला.
” कमाल आहे ना मोहित…तुम्हाला अजूनही कळत नाहीय मला काय म्हणायचं आहे ते…तुम्हाला वाटत की घरात कामासाठी बाई हवी म्हणून मी हे बोलतेय…तुमचं नेमकं काय चुकतंय हे तुम्हाला कळतच नाही आहे…” प्रिया म्हणाली.
” हे बघ सूनबाई…मोहित जसं म्हणतोय तसच कर तू जर नोकरीचा राजीनामा दिला तर तुला आमच्या घरात राहता येणार नाही…तुला कायमचं माहेरी पाठवून देऊ आम्ही…”
प्रियाच्या सासुबाई मध्येच म्हणाल्या.
” तुम्ही काय मला घरातून काढणार सासुबाई…उलट मीच तुमच्या या घरात राहणार नाहीय…तुमच्या सारखे विचार असणाऱ्या लोकांबरोबर मी इतके दिवस राहिले ह्याचेच मला नवल वाटत आहे…मी तुमचं हे घर सोडून जात आहे…” प्रिया म्हणाली.
” आई मी बोलत आहे ना तिच्यासोबत…तू थांब ना थोडावेळ मी समजावून सांगतो तिला…ती जाईल पुन्हा नोकरीवर…” मोहित त्याच्या आईला म्हणाला.
” हो…नोकरीवर तर मी जाईलच…कारण मी खूप मेहनत करून चांगली नोकरी मिळवलीय…माझ्या आईवडिलांनी गरीब परिस्थिती असतानाही मला चांगलं शिकवलं….नोकरी सोडून त्यांच्या कष्टाचा अपमान नाही करणार मी…म्हणून नोकरी तर मी करेनच पण ती माझ्या माहेरून…मला आता तुझ्यासोबत राहायचं नाहीय…तुमच्यासारख्या स्वार्थी माणसा बरोबर राहण्यापेक्षा मी एकटी राहणे कधीही पसत करेन…लवकरच घटस्फोटाची नोटिस मिळेल तुम्हाला…जाते मी…” प्रिया म्हणाली.
एवढे बोलून प्रिया सुटकेस घेऊन निघून गेली…तिला जाताना सगळेजण बघतच राहिले…पण कुणालाही आता तिला थांबवण्याची हिम्मत झाली नाही…
समाप्त.
( माझ्या या कथेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल मी तुम्हा सर्व वाचकांची खूप खूप आभारी आहे…माझ्या खराब तब्येती मुळे मी या कथेचे भाग सलग देऊ शकले नाही त्याबदद्ल सॉरी…एका नवीन कथेसह पुन्हा लवकरच भेटू…)
लेखिका – आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Khup chan story hoti…. Exactly me swtala ya story madhe bgt shoti…. Bas dewacha krupene ami lagn modl……. 1-2meet madhe apn lokana judge nahi kru shakt but tech apl 4-5 meet jalet ki apn thod bar Guess kru shkato tyancha behaviour wrun