तसेच समर्थ ने सुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा, त्यांच्या मागेपुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं. समर्थ नुसता आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचं. पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या तेव्हापासून त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंडं जशी आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं. शाळेतून आला की सर्वात आधी आजी जवळ यावं. पण समर्थला अजूनही म्हणावा तसा आजीचा लळा लागला नव्हता. तसं तो आजीशी गप्पा मारायचा पण इतर सगळ्याच गोष्टीत त्याला आईच पाहिजे असायची आणि कधी नव्हे ती समर्थची हीच गोष्ट सुरेखा ताईंना खटकायची.
असाच एकदा शाळेतून घरी आल्यावर समर्थ उत्साहाने आईला हाका मारत होता. तिथे जवळ सोफ्यावर बसलेल्या सुरेखा ताई त्याला म्हणाल्या.
” काय रे समू…काय झालंय…?”
” सांगतो आजी…आईला तर येऊ देत…” समर्थ म्हणाला.
” असं काय आहे जे तुला तुझ्या आईला आधी सांगायचं आहे…?” सुरेखाताई जरा चिडून म्हणाल्या.
तितक्यात मंजिरी तिथे आली. तिला पाहून समर्थ उत्साहाने म्हणाला.
” आई…हे बघ माझं ड्रॉइंग…टीचरने मला शाबासकी दिली…आणि स्टार पण दिला…” समर्थ उत्साहाने सांगत होता.
” अरे वा…खूप छान काढलं आहेस… शाब्बास…” मंजिरी त्याला प्रेमाने जवळ घेत म्हणाली.
लहानगा समर्थ आईच्या मिळालेल्या शाबासकीने खुश झाला आणि पळतच आतल्या खोलीत शाळेचे कपडे बदलायला गेला. मंजिरी सुद्धा तिथून जाणार इतक्यात सुरेखाताई तिच्याकडे पाहत रागाने म्हणाल्या.
” समर्थ ला हे सगळं तूच शिकवतेस ना…”
मंजिरीला आधी काही कळलेच नाही. मग त्यांच्या बोलण्याचा अंदाज घेत ती म्हणाली.
” हे सगळं म्हणजे… ड्रॉइंग बद्दल बोलत आहात का आई तुम्ही…?”
” नाही…तू जे समर्थला माझ्या विरोधात भरवून देतेस ना त्या बद्दल बोलत आहे…” सुरेखा ताई रागाने म्हणाल्या.
” आई…अहो मी का करेन असे काही…समर्थ फक्त पाच वर्षांचा आहे…त्याला ह्यातलं काही कळत सुद्धा नाही…” मंजिरी म्हणाली.
” मग तो नुसता आई आई करत का फिरतो तूझ्या मागे…बाकी घरात जाऊन बघ जरा…मुलं आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त असतात… सुधाताईंचे दोन्ही नातवंडं नुसते त्यांच्याजवळच असतात…त्यांची सून त्या मुलांना अशी त्यांच्या आजीपासून दूर ठेवत नाही ना म्हणून…” सुरेखाताई आपले म्हणणे पटवून देत म्हणाल्या.
” आई… सुधा मावशींची नातवंडं त्यांच्या मागेपुढे का असतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती असेल… सुधा मावशी त्यांच्यासाठी किती करते हे सगळ्यांनाच माहिती आहे…अगदी दोन तीन महिन्यांचे असल्यापासून मावशींनी मुलांना स्वतःच्या अंगाखांद्यावर वाढवले आहेत..त्यांना काय हवं काय नको हे त्या अगदी सगळं मनापासून करतात…तुम्ही समर्थसाठी असं काही केलंय का…नाही ना…” मंजिरी ने सुद्धा सासूबाईंना स्पष्ट सुनावले.
” घरात सून असताना मी का म्हणून करायचे काम…ती तुझी जबाबदारी नाही का ?…आणि जगातली प्रत्येक आई तिच्या मुलांसाठी हे सगळं करतेच…तू काही नवीन केले नाहीस…” सुरेखाताई सुद्धा आता चिडल्या होत्या.
” मग जबाबदारी मी निभवायची…त्याला हवं नको ते मी बघायचं…त्याच्या आजारपणात मी एकटीने राबायचं…त्याच खाणं, पिणं ह्याची तुम्ही कधीही फिकीर केली नाहीत…प्रत्येक गरजेसाठी तो माझ्यावर अवलंबून असतो…तुम्ही आजी म्हणून त्याचा लाड केलेला किंवा त्याला स्वतःच्या हाताने भरवलेलं तुम्हाला तरी आठवतंय का…मग का म्हणून तो त्याच्या आईपेक्षा आजी जवळ जास्त राहील…” मंजिरी सुद्धा आता गप्प बसली नाही.
” या वयात मी करायचं का मग काम…? मोठ्या कष्टाने सुहासला लहानाचं मोठं केलंय मी…ते पुरेसं नाही का…? नाही होत माझ्याच्याने आता…मी आधीच सांगितलं होतं की माझ्या भरवशावर मुलं जन्माला घालू नका… माझ्याकडून बाळ सांभाळायची अपेक्षा करू नका…तेव्हा माझं काही ऐकलं नाही… आणि आता तुला वाटतंय की समर्थचं सगळं मी केलं पाहिजे…मग तुझ्या एकटीच्याने काही होत नसेल तर यात मी काय करणार…” सुरेखा ताई मंजिरिला दोष देत म्हणाल्या.
” तुमच्याकडून कामे झाली नसती किंवा तुम्ही खूप थकलेल्या असत्या तर की तुमच्याकडून कसलीही अपेक्षा केली नसती…पण स्वतःच्या भाचीच्या बाळंतपणासाठी गेलेल्या तुम्हाला सुनेच्या बाळंतपणात साधी छोटीशी मदत सुद्धा करता आली नाही…तुमच्या भाचीला तुम्ही कशाचीही कमी पडू दिली नाही…तिला साधं अंथरुणावरून उतरू सुद्धा दिले नाही आणि मला साधं काय हवं काय नको एकदाही विचारले नाही…उलट मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असताना तुम्हीच मला म्हणाल्या होतात की माझ्याच्याने काही होणार नाही तू अबॉर्शन कर म्हणून…मग भाचीचं करायला कसं जमलं तुम्हाला… माझ्याबाबतीत अन् त्यातल्या त्यात स्वतःच्या नातवंडांच्या बाबतीत अशा का वागल्या तुम्ही…?” मंजिरी तावातावाने बोलत होती.
आता मात्र सुरेखा ताईंकडे बोलायला काहीच नव्हते. कारण मंजिरी खरं बोलत होती. त्या अशा का वागल्या ह्याच उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं. खरं तर मंजिरी अबॉर्शन करेन असं त्यावेळी त्यांनाही वाटलं नसेल. पण त्यावेळी अन् आताही त्यांना मंजीरीला कुठल्याही प्रकारची मदत करायची नव्हतीच. सगळ्यांसाठी सगळं करायला तयार असणाऱ्या सुरेखा ताईंनी सुनेच्या बाबतीत मात्र दूजाभाव केला. आणि मंजिरी ने बोलून दाखवल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळली होती. त्या आतमधून खजील झाल्या होत्या. पण मंजिरी समोर हे कबूल करायची त्यांची हिम्मत होत नव्हती.
इकडे सासूबाई काहीच बोलत नाही आहेत म्हटल्यावर आपण आज जरा जास्तच बोलून गेलोय ह्याची मंजिरीला जाणीव झाली. ती पुढे सुरेखा ताईंना म्हणाली.
” तुम्ही आजवर माझ्याशी कशाही वागलेल्या असलात तरी मी मात्र तुमच्या बाबतीत कधीच वाईट विचार केला नाही आई…मी कधीच समर्थ ला तुमच्या पासून दुरावण्याचा विचार केला नाही…समर्थला आजीचं प्रेम मिळावं असं मलाही वाटतं…पण प्रेम मिळवणं इतकं सोप्पं असतं का आई…त्यासाठी आपल्याला सुद्धा समोरच्याला प्रेम द्यावं लागतं…आणि मुलांना तर प्रेमाची भाषा सगळ्यात आधी कळते… प्रेमावर अधिकार सांगता येत नाही आई…प्रेम तर जिंकावं लागतं…प्रेमासोबत जबाबदाऱ्या सुद्धा येतात त्यांना पार पाडावं लागतं…” मंजिरी म्हणाली आणि तिथून निघून गेली. सुरेखाताई तिथून वळून त्यांच्या खोलीकडे जायला निघाल्या तेव्हा मागे बघतात तर सुहास उभा होता. त्याच्या नजरेत बघून त्यांना कळलं होतं की मंजिरीच्या बोलण्याशी कुठेतरी तो सुद्धा सहमत आहे. काहीही न बोलता तो त्याच्या खोलीत निघून गेला.
सुरेखाताईंना मात्र आता खूप पश्चात्ताप होत होता. कधीही उलटून न बोलणाऱ्या मंजिरी ने आज सुरेखाताईंना आरसा दाखवला होता. शिवाय सुहास कधीही तक्रार करत असला तरी आपल्या वागण्याने तो आजवर बराच दुखावला आहे याची जाणीव त्यांना आज पहिल्यांदा झाली. सासुपणा गाजवण्यात त्यांनी बरेच काही गमावले होते. पण ह्या सगळ्यांची जाणिव झाल्यावर मात्र आता त्या आपली चूक सुधारणार होत्या. उद्यापासून एका खाष्ट सासू ऐवजी एक गोड आजी बनून आपल्या नातवाच प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करणार होत्या.
इतरांकडून मान सन्मानाची, प्रेमाची अपेक्षा करताना आपण त्यांच्याशी साधी प्रामाणिकपणे नाती सुद्धा निभावत नाही.
समाप्त.