सुमन तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची. तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, लांब केस, सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. सुमन अगदी मनमिळावू स्वभावाची, तिच्या बाबांची तर खूप लाडकी होती.
सुमनच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण ते सुखात होते. पण हे सुख त्यांच्या आयुष्यात फार काळ टिकलं नाही. अचानक त्यांच्या आयुष्याने अनपेक्षित असे वळण घेतले. सुमनच्या वडिलांना एका दुर्धर आजाराने ग्रासल. त्यांनी बऱ्याच डॉक्टरांना दाखविले पण त्यांना कोणाचाही गुण आला नाही.
त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. आपली शेवटची वेळ जवळ आली आहे हे त्यांना कळून चुकले. त्यांची एकच इच्छा होती की त्यांच्या नजरेसमोर सुमन चे लग्न व्हावे. सुमन चे लग्न झाले की ते तिच्या काळजीतून मुक्त होणार होते.
सुमनने सुद्धा त्यांच्या इच्छेचा मान राखत लग्न करायला होकार दिला. लगेच नातेवाईकांना कळवण्यात आले. दोन चार स्थळे पाहिल्यानंतर त्यांना एक स्थळ पसंत आले. मोहन हे त्या मुलाचं नाव.
मोहनचे हायवेवर स्वतःचे एक लहानसे गॅरेज होते. घरी फक्त आई आणि ती राहायचा. वडील बऱ्याच वर्षांपूर्वी वारले होते. आणि एक बहिण होती तिचे लग्न झाले होते. घरची परिस्थिती सुद्धा बरी होती.
मोहनला आणि त्याच्या आईला सुमन पसंत पडली. आणि बघता बघता आठ दिवसात मोहन आणि सुमनचे लग्न पार पडले. तिच्या वडिलांनी तब्येत खराब असल्याने त्यांनी अगदी साधेपणाने लग्न केलं.
आपल्या मुलीचे लग्न आपल्या डोळ्यासमोर लागले हे बघून सुमन च्या वडिलांना खूप आनंद झाला. लग्न झाल्यावर सासरी जाताना सुमनला खूप रडू आले. तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून ती खूप रडली. तिच्या वडिलांनी तिची समजूत घातली आणि तिची सासरला पाठवणी केली.
सासरी गेल्यावर सुमनने तिच्या गोड स्वभावाने सर्वांचीच मने जिंकली. तिचा संसार सुखाचा होता पण तिला सतत तिच्या आजारी वडिलांची आठवण यायची आणि तिला रडू यायचं. तिचा नवरा तिच्या मनातलं ओळखून मध्ये मध्ये तिला तिच्या आई वडिलांच्या भेटीला घेऊन जायचा.
असेच तीन महिने निघून गेले. आणि अचानक एके दिवशी सुमनला फोन आला की तिच्या वडिलांची तब्येत खूप जास्त खराब झालीय. सुमन तातडीने तिच्या वडिलांना भेटायला गेली. सुमन च्या वडिलांचा जीव जणू सुमन मध्येच अडकलेला होता. सुमनने त्यांची भेट घेतली आणि तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि थोड्याच वेळात आपले प्राण सोडले. सुमनला खूप दुःख झाले.
काही दिवस माहेरी राहून सुमन पुन्हा तिच्या सासरी आली. तिने तिच्या आईची खूप विनवणी केली की तू सुद्धा माझ्यासोबत माझ्या घरी राहायला चल. पण तिच्या आईने नकार दिला. म्हणून मग सुमनने तिच्या चुलत भावांना तिच्या आईकडे लक्ष द्यायला सांगितले आणि ती मोहन सोबत तिच्या घरी आले.
मोहन आणि सुमन दोघेही एकमेकांच्या सहवासात अगदी आनंदात होते. सुमनची सासू सुद्धा तिचे खूप कौतुक करायची. असाच राजा राणीचा संसार सुरू असताना सुमनला दिवस गेले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे कोडकौतुक करताना दिवस कसा जायचा ते देखील त्यांना कळायचं नाही. मग सुमनला आणखी एक मुलगी झाली. तेव्हा सुमनची आई तिला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन गेली होती.
सुमन माहेरी असताना मोहन पाच सहा दिवसांतून एकदा सुमनला आणि मुलांना भेटायला तिच्या माहेरी यायचा. मोहन घरी आला की सुमनची आत्या कावेरी तिच्या घरी येऊन बसायची. आणि तासनतास त्यांच्या गप्पा चालायच्या. आणि इथूनच परत सुमन च्या आयुष्याने परत एक अनपेक्षित असे वळण घेतले. ज्याची तिने कल्पनाही केली नसेल.
कावेरी सुमनच्या वडिलांची सावत्र बहीण होती. सुमन पेक्षा पाच सहा वर्षांनी मोठी असेल. लग्न झाल्यावर काहीच दिवसात माहेरी परत आली होती. तिचा नवरा तिला बऱ्याचदा परत न्यायला आलेला पण कावेरी मात्र काही केल्या परत गेली नाही. मग तिच्या नवऱ्याने कावेरीशी काडीमोड घेतला आणि दुसरं लग्न केलं. तेव्हापासून कावेरी माहेरीच असायची.
कावेरी दिसायला खूप सुंदर होती. गोरा रंग आणि भुरे डोळे यांनी तर तिच्या सौंदर्याचा आणखीन भर टाकलेली. कावेरी आणि सुमनच बऱ्यापैकी पटायचं. त्यामुळे सूमनला कावेरीच आणि मोहनच एकमेकांशी बोलणे खटकायच नाही. पण इथेच सुमनची चूक झाली. कावेरीच्या सौंदर्याने मोहनवर भुरळ घातली होती. कावेरीला सुद्धा मोहन आवडायला लागला.
सुमनचा नवरा कावेरीच्या नादाला लागला. आता तो दर दोन दिवसांनी चक्कर मारायचा. हळूहळू त्याच्यातील बदल सुमनला सुद्धा कळायला लागला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
कावेरी आणि मोहन हे प्रेमात फार दूरपर्यंत निघून आले होते. मोहनने सुमनला त्याचे कावेरीवर प्रेम असल्याचे सांगितले. आणि तो आणि कावेरी लग्न करणार हे सुद्धा सांगितले. मोहनने सुमनला घटस्फोटाची मागणी केली. सुमन तर पार हादरून गेली.
इतक्या दिवस नेटाने चालवलेला संसार असा एकाएकी उद्ध्वस्त झाला होता. तरीही सुमनने हार मानली नाही. तिने मोहनला घटस्फोट द्यायला नकार दिला. मोहन सुद्धा जिद्दीला पेटला होता. त्याला काहीही करून कावेरीशी लग्न करायचं होतं.
सुमन घटस्फोट देत नाही म्हटल्यावर त्याने अन् कावेरीने एके दिवशी मंदिरात जाऊन लग्न केले. मोहनच्या आईने सुद्धा त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण कावेरीच्या प्रेमात पार वेडा झालेला मोहन आता काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मोहन कावेरीला घेऊन त्याच्या घरी गेला.
सुमनने खूप आकांडतांडव केला. पण काहीच उपयोग झाला नाही. तिने त्याला त्यांच्या प्रेमाची आठवण करून दिली. त्यांच्या मुलाच्या शपथा दिल्या. पण कशाचाही काहीही उपयोग झाला नाही. कावेरी ला सुद्धा तिने लाख विनवण्या केल्या. माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोड म्हणून. पण कावेरी ने सुद्धा तिचं काहीएक ऐकलं नाही. शेवटी सुमन त्याच्या विरुद्ध कोर्टात गेली. कोर्टाच्या तारखा सुरूच होत्या.
काही दिवसांनी मोहन सुमनच्या घरी आला आणि त्याच्या मुलाला जबरदस्तीने स्वतःच्या सोबत घेऊन गेला. सुमनने खूप आरडा ओरडा केला पण मोहनने तिचे काहीच ऐकले नाही. सुमन च्या मुलाला सुद्धा जायचं नव्हतं पण तो चार वर्षाचा चिमुकला करणार तरी काय?
सुमन आता तिच्या आईच्या आधाराने तिच्या मुलीला घेऊन राहत होती. आधीच तिच्या नवऱ्याने तिला सोडलेले. त्यामध्ये तो आटा तिच्या मुलालाही तिच्यापासून दूर घेऊन गेला होता. सुमन ची मुलगी अजुन खुप लहान होती. कोर्टात सुद्धा ती एकटीनेच जायची..
तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला साथ नाही दिली. कारण कावेरी सुद्धा त्याच घरची मुलगी होती म्हणून. हाताशी असलेला पैसा आता संपत आला होता म्हणून सुमन गावातच शेतात मजुरीला जाऊ लागली. तिच्या मुलीला तिची आई सांभाळायची.
सुमन आता नैराश्याने पर खंगली होती. सतत विचार केल्याने तिची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. तिला सतत तिच्या मुलाची आठवण यायची.
दुसरीकडे कावेरीला सुमनच्या मुलाची अडचण झालेली. ती त्याला सतत त्रास द्यायची. कधी त्याला मारायची तर कधी उपाशी ठेवायची. ते लेकरू आईची आठवण काढत रडत रडत तसच झोपी जायचं. मग त्याला त्याची आजी म्हणजेच सुमनची सासू सांभाळायची. ती कावेरी बद्दल मोहनकडे तक्रार करायची पण मोहनने तिचे काहीच ऐकले नाही. इकडे सुमनची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. ती तिच्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ व्हायची.
सुमन आधीच खूप जास्त दुःखी होती त्यामध्ये आणखी भर पडली. तिची आई एकाएकी तिला सोडून गेली. अगदी अल्पशा आजाराचे निमित्त ठरले. त्याने तर सुमन आणखीनच जास्त खचली. पण तिच्या मुलीकडे पाहून कशीबशी सावरली. तिला आता तिच्या मुलांसाठी जगायचं होतं. एक ना एक दिवस तिला तिचा मुलगा परत मिळेल याच आशेवर ती जगत होती.
हळूहळू सुमनने कोर्टात जाणे कमी केले. आता तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. ती गावातच मजुरी करायची आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायची. एकीकडे तिच्या मुलीला मोठं होताना बघून तिला आनंद व्हायचा तर दुसरीकडे स्वतःच्या मुलाचा विचार करून ती दुःखी व्हायची. कधी देवाला तर कधी तिच्या नशिबाला दोष द्यायची. तरीही रोज देवाला प्रार्थना करायची की तिचा मुलगा तिला परत मिळावा.
पण म्हणतात ना कर्माचे फळ आपल्याला इथेच मिळते. कावेरी आणि मोहनच्या लग्नाला चार वर्ष झाले होते. एके दिवशी अचानक कावेरीला साप चावला. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. कावेरीच्या प्रेमात असलेल्या मोहनला खूप दुःख झाले.
इकडे कावेरीच्या मृत्यूची बातमी सुमनला कळली. कावेरी गेल्याचे तिला थोडे दुःख ही झाले. पण नंतर तिला कावेरीमुळे झालेला त्रास आठवला. ती कसल्याश्या निर्धाराने घरामध्ये गेली. तिची आणि तिच्या मुलीचे कपडे एका बॅग मध्ये बांधले आणि बस पकडून तडक मोहनच्या घरी आली.
कावेरी गेल्यामुळे दुःखी असलेला मोहन सुमनला पाहताच तिच्या अंगावर धावून गेला. तिला हाकलून द्यायला लागला. पण इतक्यात सुमनचा मुलगा पुढे आला. त्याने त्याच्या आईला ओळखले आणि त्याने तिला मिठी मारली. सुमन तर तिच्या मुलाला भेटून आनंदाने वेडी झाली होती. दोघेही मायलेक बराच वेळ एकमेकांना बिलगून रडत होते.
इतक्यात मोहन परत सुमन च्या अंगावर धावून आला. सुमनने तिच्या दिशेने येणाऱ्या मोहनला मागे जोराचा धक्का दिला. मोहन दूर जाऊन पडला. सुमन आज दृढ निश्चय करून आली होती. ती आता तिच्या मुलाजवळच राहणार होती. मोहन उठून परत तिच्याकडे यायला लागला. तेव्हा सुमनचा मुलगा आणि सासू त्याच्या समोर उभे राहिले.
” इतके दिवस स्वतःच्या मर्जीने वागलास तू…या मायलेकरांची ताटातूट केलीस…स्वतःच्या मुलीला पोरक केलंस…आणि त्याची शिक्षा सुद्धा तुला मिळाली…आता सुमन इथेच राहणार…तिला कोणीही बाहेर काढू शकत नाही…मी बघतेच तू तिला कसा बाहेर काढतो ते…” सुमन ची सासू तिच्या मुलाला म्हणजेच मोहनला म्हणाली.
” ही इथे राहणार नाही… एे चल निघ इथून…” मोहन रागाने म्हणाला.
” मी इथून जायला आलेली नाही…मी हे आधीच करायला हवे होते…मी गप्प बसले होते म्हणूनच तुमची हिम्मत झाली मला त्रास द्यायची…माझा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही कधीच सुखी राहू शकले नसते.. मी इथे काही तुमच्यासाठी आलेली नाही…मी माझ्या मुलांसाठी आली आहे…आजवर हिम्मत केली नाही पण आता कळतंय की चूक झाली…तुमच्या सारख्या नालायक माणसाची बायको म्हणवून घेण्यात मला काडीमात्र रस नाही…पण माझ्या मुलांना त्यांच्या हक्काचं घर हवंच…आणि तो त्यांचा अधिकार आहे…कावेरी ला तर तिच्या चुकीची शिक्षा मिळालीच पण तुम्हालाही आयुष्यभर असच दुःखी राहावं लागेल…मी इथून कुठेही जाणार नाही… खबरदार मला हात लावाल तर… आणि तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नसेल तर तुम्ही खुशाल हे घर सोडून निघून जाऊ शकता…” सुमन निर्धाराने बोलत होती.
तिने जणू आज रौद्ररूप धारण केले होते. ती आज कुणालाही घाबरत नव्हती. तिच्या या रूपाला पाहून मोहन सुद्धा मनातून घाबरला होता. सुमन ची सासू आणि तिचा मुलगा तिला घेऊन घरात गेले. मोहन चुपचाप बघत होता. पुढे काही बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही.
सुमन आज पुन्हा त्या घरी नांदायला आली होती. पण मोहनची बायको म्हणून नव्हे तर तिच्या मुलांची आई म्हणून. तिने मोहनला आयुष्यभर माफ केले नाही. त्याच्याच घरी राहून त्याच्याच नजरेसमोर तिने तिच्या मुलांना लहानाचे मोठे केले. चांगले शिक्षण दिले आणि त्यांचे लग्न ही लावून दिले. पुढे मोहनने सुमनची माफी मागितली पण सुमनने कधीही त्याला नवरा म्हणून तिच्या आयुष्यात जागा दिली नाही. तो फक्त तिच्या मुलांचा बाप होता. एक असा बाप जो कधीच चांगला बाप होऊ शकला नाही….
©आरती लोडम खरबडकर.