कल्याणी आणि कुणाल ह्यांच्या लग्नाला जवळपास महिना झाला होता. कल्याणी अजूनही घरातल्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होती. सगळ्यांना काय हवं काय नको ते विचारत होती. कल्याणीच्या सासरी तिचे सासू सासरे, नवरा आणि ती असे एकूण चारच सदस्य होते. एक नणंद घराचा कारभार एकहाती सासूच्या ताब्यात होता. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची जास्त हिम्मत होत नसे. अगदी कल्याणी च्या सासरेबुवांची सुद्धा.
कल्याणी तिच्या सासूबाईंच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण तिने कितीही आणि काहीही केलं तरी तिच्या सासूचे समाधान व्हायचेच नाही. ती प्रत्येक काम मनापासून आणि चांगलं करते हे त्यांनाही माहिती होते पण त्यांना ते कबूल करायचं नव्हतं. निदान तिच्यासमोर तर नाहीच नाही. कारण त्याने ती उगाच डोक्यावर बसेल असा त्यांचा पक्का समज होता.
पण कल्याणी मात्र तिचे प्रयत्न करतच होती. कुणाल सुद्धा कल्याणी सारखी बायको भेटल्याने खूप खुश होता. कल्याणी दिसायला खूपच सुंदर होती. लांब कुरळे केस, गोरा रंग, त्यावर रेखीव डोळे आणि चाफेकळी नाक, तिच्या सडपातळ बांध्यावर साडी अगदीच शोभून दिसायची. कुणाल तर तिच्या रुपावरच भाळला होता.
त्यामानाने कुणाल दिसायला खूपच साधारण होता. आणि त्यावर त्याचा सावळा रंग. त्याला स्वतःबद्दल कुठेतरी न्यूनगंड वाटायचा. पण कल्याणी ला मात्र तो जसा आहे तसाच आवडला होता. तिच्यासाठी बाह्य सौंदर्या पेक्षा महत्त्वाची गोष्ट होती मनाचे सौंदर्य. त्यामुळे कुणाल आपल्यामानाने दिसायला जरा साधरणच आहे ही गोष्ट तिने ध्यानीमनी देखील आणली नव्हती.
पण कुणालला मात्र सतत ही गोष्ट छळत राहायची. त्याला सतत वाटायचे की कल्याणी दिसायला सुंदर आहे त्यामुळे तिला आज ना उद्या आपल्यापेक्षा सुंदर असणारा कुणी आवडायला लागला तर. आणि त्याची हीच शंका त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तो सतत कल्यानीवर लक्ष ठेवायचा.
तसा तिच्यावर संशय करावा असे कोणतेच कारण आजवर कुणालाला मिळाले नव्हते. पण तरीही कुणालच्या मनात असलेला संशय काही निघत नव्हता. तो काही ना काही कारणाने सतत कल्याणीच्या मागेपुढे करायचा. तिला घराबाहेर निघायला नकार द्यायचा. तिला बाहेर काही काम असेल किंवा शेजारी काही काम असेल तर तो नेहमीच तिच्या सोबत असायचा.
लोकांना आणि कल्याणी ला सुद्धा वाटायचे की कुनालचे कल्याणीवर खूप प्रेम आहे आणि याच भावनेने कल्याणी सुखावून जायची. आपली जोडीदाराची निवड खरंच खूप चांगली आहे असे वाटून ती स्वतःशीच हसायची. सासूला सुद्धा वाटायचे की कुणाल आता बायकोचा पदर धरून फिरतो. आणि ह्यामुळे कल्याणीच्या सासुबाई तिच्यावर आणखीनच रुष्ट झाल्या होत्या.
कल्याणी मात्र ह्याच आशेवर होती की आज ना उद्या सासुबाई सुद्धा आपल्यावर प्रेम करायला लागतील. तिच्या संसारात ती खूप आनंदात होती. एकदा तिचे वडील सुद्धा तिला भेटायला म्हणून तिच्या घरी आले होते. तेव्हा तिच्या सासूबाईंनी त्यांच्यासमोर तिच्या बद्दलच्या तक्रारींचा मोठा पाढाच वाचून दाखवला होता. पण कुणाल आणि कल्याणीला सोबत पाहून त्यांना खूप समाधान वाटले होते. आणि आपली लेक तिच्या सासुलाही लवकरच आपलेसे करेल ह्याचा विश्वास त्यांना सुद्धा वाटतच होता.
एकंदरीत वरवर पाहता सगळच सुरळीत आणि चांगलं सुरू होतं पण हे सगळं जितकं चांगलं दिसत होतं तितकं चांगलं ते नक्कीच नव्हतं.
एके दिवशी कल्याणीच्या नंबर वर एका अनोळखी नंबर वरून कॉल आला. आणि त्यावेळी नेमका कल्याणीचा फोन कुणाल जवळ होता. कुणालने तो कॉल उचलला आणि हॅलो म्हटले. पण समोरून कुणीच बोलत नव्हते. आणि थोड्या वेळाने कॉल कट झाला.
त्यानंतर कुणालने दोन वेळा त्याच नंबर वर कॉल केला पण आता समोरून कुणीही कॉल घेत नव्हतं. झालं. बोला फुलाला गाठ पडली. एवढंच कारण पुरेसं होतं कुणालला. कल्याणीच्या चारित्र्यावर संशय घेण्यासाठी. तो ताडताड त्याच्या खोलीतून निघून स्वयंपाकघरात आला. कल्याणी पोळ्या लाटत होती. कुणालने तिच्या मागून जाऊन सरळ तिच्या केसांना पकडले आणि जोरात केस ओढून तिला जमिनीवर पाडले.
नेमकं काय होतंय हे कळायच्या आतच कल्याणी जमिनीवर आदळली होती. तिने स्वतःला सावरुन समोर पाहिले तर समोर कुणाल अतिशय क्रोधित मुद्रेने तिच्याकडे पाहत होता. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिला एक जोरात कानाखाली मारली.
आपला प्रेमळ नवरा आज नेमका असं का वागतोय हे कल्याणीला अजिबात कळत नव्हतं. आणि कुणाल तिला काही बोलायला संधी सुद्धा देत नव्हता. कुणाल ने तिला लाथा, बुक्क्या आणि केस ओढून खूप जास्त मारले होते. कल्याणीच्या गोऱ्या शरीरावर आज मारण्याचे व्रण उमटले होते.
स्वयंपाक घरातील करपलेल्या पोळीच्या वासाने आणि घरात काहीतरी आदळआपट होत आहे ह्याचा जरा अंदाज आल्याने शेजारी गेलेली कल्याणीची सासुबाई घरात परतली. तोवर कुणालने कल्याणीला खूप मारले होते. कुणाल असे का वागतोय हे त्याच्या आईलाही कळत नव्हते. समोरचे चित्र पाहून एका क्षणाला त्यांनाही भीती वाटून गेली. त्यांनी कुणालला विचारले.
” काय झालं कुणाल…? असे का मारत आहेस तिला…?”
आईचा आवाज ऐकून कुणाल तिला मारायचे थांबला आणि म्हणाला.
” हिच्या प्रियकराचा फोन आला होता हिला… बरं झालं मी उचलला म्हणून आज कळलं मला की ही काय गुण उधळत आहे ते…किती दिवसांपासून सुरू आहे काय माहित…मला फसवत होती…मला तर आधीच संशय होता हिच्यावर…आज सापडलाच तावडीत…” कुणाल त्वेषाने म्हणाला.
” मला तर आधीच दिसत होते की हीची लक्षणे ठीक नाहीत म्हणून…तूच सतत हिच्या मागेमागे फिरायचास…आता कळलं ना तुला…?” सासुबाई एकदम आत्मविश्वासाने म्हणाल्या.
तसे पाहता सासूबाईंना सुद्धा मनातून कुठेतरी माहिती होते की कल्याणी तशी मुलगी नाहीय ते. पण आज ती कुणालच्या नजरेतून उतरली ह्याने त्यांचा अहंकार खूप सुखावला होता. आपला बायकोच्या आहारी गेलेला मुलगा पुन्हा त्यांच्याकडे परत येतोय ह्या जाणिवेने त्यांच्यातल्या एका संवेदनशील स्त्री कुठेतरी हरवली होती. त्यांनी शक्य तेवढं कुणालचे कान आणखीनच भरले.
कुणालच्या हातचा एखाद्या जनावरासारखा मार खाऊन अर्धमेल्या झालेल्या कल्याणीला कुणाल आणि त्याच्या आईचे बोलणे नीट कळत नव्हते पण एवढं ती नक्कीच समजली होती की कुणाचा तरी तिला फोन आलेला म्हणून. कल्याणीला काहीच कळत नव्हते.
इकडे कुणालने मात्र रागात कल्याणीच्या वडिलांना फोन लावला आणि तातडीने त्यांच्या घरी यायला सांगितले. कल्याणी च्या वडिलांना मात्र काहीच कळत नव्हते. ते काळजीतच आपल्या लेकीच्या सासरी पोहचले. कल्याणी मात्र अजूनही स्वयंपाकघरातच एका भिंतीच्या आधाराने टेकून बसली होती. कल्याणीच्या वडिलांची नजर आल्या आल्या कल्याणीलाच शोधत होती. मात्र कल्याणी त्यांना अजून दिसली नव्हती.
कुणाल त्यांना दरवाजात पाहताच मोठ्या आवाजात म्हणाला…
” या…आलात तुम्ही…तुमच्या मुलीने काय थेर चालवली आहेत पाहा…तुम्ही तर फार ग्वाही देत होतात ना की आमची कल्याणी खूपच साधी, सरळ आणि संस्कारी आहे म्हणून…”
” अहो पण झालंय तरी काय कुणालराव…?” कल्याणी च्या वडिलांनी जरा घाबरतच विचारले.
क्रमशः
अविश्वास – भाग ३