” तुमच्या मुलीच्या प्रियकराचा फोन आला होता…तिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे बाहेर…” कुणाल दात खाऊन बोलला.
” असं नाही असू शकत…तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कुणालराव…माझी कल्याणी अशी नाहीच…” कल्याणीचे वडील काकुळतीला येऊन म्हणाले.
” तुम्ही तर असेच म्हणणार ना…पण मी तुमच्या बोलण्यात येणार नाही…घ्या तुमच्या लेकीला आणि चालते व्हा येथून…” कुणाल म्हणाला.
” हे काय बोलताय तुम्ही… अहो लग्नाला अजुन दोन महिने सुद्धा नाही झाले आणि तुम्ही असे तिला माघारी पाठवाल तर लोक काय म्हणतील…?” कल्याणीचे वडील म्हणाले.
” हा विचार तिने आधी करायला पाहिजे होता…मला अशी बायको नकोय…मी नाही वागवणार तिला यापुढे…तुम्ही तिला घेऊन जा…” कुणाल म्हणाला.
” अहो पण आपण बसून बोलू ना यावर…एकदम असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ तुम्ही…” कल्याणीचे वडील म्हणाले.
त्यानंतर कल्याणीच्या सासूबाईंना पाहून हात जोडून म्हणाले…
” ताई…तुम्ही तरी समजावून सांगा ना ह्यांना…माझी मुलगी खरंच अशी नाही हो…”
त्यावर कल्याणीच्या सासूबाईंनी नाक मुरडले आणि त्या म्हणाल्या.
” पाहिले हो आम्ही तुमच्या मुलीचे थेर…या वयात आणखी काय काय पाहायला लावणार तुमची लेक काय माहित…माझ्या साध्या सरळ मुलाचं आयुष्य बरबाद केलंय तुमच्या मुलीने…आता तिला माझ्या घरात जागा नाहीच…”
त्यानंतर कल्याणी चे वडील तिच्या सासूबाईंच्या पायात पडणार इतक्यातच कल्याणी कशीबशी भिंतीचा आधार घेत स्वयंपाक खोलीच्या बाहेर आली. आणि तिच्या वडिलांची नजर तिच्यावर गेली. नेहमी पद्धतशीर राहणारी त्यांची मुलगी जेव्हा अशा अवस्थेत त्यांच्या समोर आली तेव्हा क्षणभर त्यांना काही सुचलेच नाही.
नेहमी असणारी केसांची लांब वेणी आज अर्धवट सुटली होती. तिच्या गोऱ्या अंगावर मारण्याचे काळे निळे डाग अगदी स्पष्ट दिसत होते. अगदी जवळपास प्रत्येक अंगावर मारायचे निशाण स्पष्ट दिसत होते. सतत चैतन्याने घरभर वावरणारी कल्याणी आज स्वतःच्या पायावर नीट उभी सुद्धा होऊ शकत नव्हती.
तिला अशा अवस्थेत पाहून तिच्या वडिलांच्या काळजात चर्र झालं. अगदी कुणीतरी आपल्या काळजावर घाव घातल्यागत वाटलं त्यांना. ते भानावर येऊन लगेच तिच्या जवळ गेले. त्यांना पाहून कल्याणीचा अश्रूंचा बांध फुटला आणि ती त्यांना बिलगून ओक्साबोक्सी रडायला लागली. त्यानंतर कशीबशी तिच्या वडिलांना म्हणाली.
” बाबा…मला खूप मारले ह्यांनी…तुम्ही मला इथे सोडून जाऊ नका बाबा…मला पण सोबत घेऊन चला…”
तिच्या चेहऱ्यावरील ती भीती, तिचा तो विलाप तिच्या वडिलांना सहन झाला नाही. तिची अवस्था पाहून त्यांनी तिच्या सासरच्यांशी नंतर एक चकार शब्द देखील उच्चारला नाही. त्यांनी सरळ तिला तिची बॅग घ्यायला लागली आणि तिला घेऊन घरी निघाले.
कुणाल सुद्धा त्यांच्याशी किंवा कल्याणीशी त्यानंतर एक शब्द देखील बोललेला नव्हता. संध्याकाळी कल्याणी तिच्या माहेरी पोहचली. कल्याणीच्या सासरहुन तातडीने बोलावणे आले तेव्हाच तिच्या आईला काहीतरी विपरीत घडल्याची भीती वाटली होती. पण कल्याणीला या अवस्थेत पाहून त्या माऊलीला आपल्या मुलीच्या उद्ध्वस्त संसाराची जाणीव झाली.
त्यांनी कल्याणीला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आणि तिथेच पुन्हा एकदा कल्याणी च्या अश्रूंचा बांध फुटला. तिने आईला सगळा घडलेला प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी प्रमाणे तिच्या आईला सुद्धा आपल्या मुलीवर विश्वास होता. त्यांनी तिच्या डोक्यावरून एक आश्वासक हात फिरवला आणि कल्याणी ला त्या स्पर्शाने मायेची ऊब जाणवली. व ती आता थोडी शांत झाली होती.
तिच्या लहान भावाला सुद्धा आपल्या ताईची ही अवस्था बघवत नव्हती. कल्याणीच्या माहेरी आज एकूणच दुःखाचं वातावरण होतं. सगळ्यांच्याच नजरेत काळजी दिसत होती पण कुणीच काही बोलत नव्हते. फक्त एकमेकांना आश्वासक नजरेने आधार देत होते.
तिकडे कुणालच्या घरी मात्र काहीच न झाल्याच्या आविर्भावात सगळेच वावरत होते. कुणालचे वडील जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना घडलेला सगळा प्रकार कळला होता. पण त्यांनी सुद्धा कुणालला योग्यच ठरवले. थोड्या वेळाने जेव्हा कुणाल त्याच्या रूम मध्ये आला तेव्हा लक्षात आले की कल्याणी तिचं बरंच सामान घरीच विसरली होती.
आणि तिचा फोन सुद्धा तिथेच रूम मध्ये पडलेला होता. कुणाल ने सहज म्हणून तिचा फोन हातात घेतला तेव्हा मघाशी आलेल्या नंबर वरून चार मिस्ड कॉल आलेले पाहिले. आता त्या मुलाला काहीही करून सोडणार नाही या उद्देशाने त्याने पुन्हा एकदा त्या नंबर वर फोन केला.
पलीकडून कुणीतरी फोन उचलला. कुणाल त्या समोरील व्यक्तीला शिव्या देणार इतक्यात समोरून एक ओळखीचा आवाज आला.
” हॅलो…”
आणि त्या आवाजाने कुणाल जरासा चमकला. हा आवाज आपल्या मोठ्या ताईचा आहे हे ओळखायला त्याला अजिबात वेळ लागला नाही. तो लगेच म्हणाला.
” सीमा ताई…तू या नंबर वरून कशी काय बोलतेस…?” कुणाल अवाक् होऊन म्हणाला.
” अरे हा माझा नवीन नंबर आहे…ह्यांनी कालच नवीन फोन आणि नवीन नंबर सुद्धा दिला मला…तुला तर माहीतच आहे की आधीचा फोन संकेत ने कूलर च्या पाण्यात टाकला होता म्हणून बिघडला होता…म्हणून मग हा नवीन नंबर सुरू केला काल…तुझ्या नंबर वर कॉल लागला नाही म्हणून कल्याणीच्या नंबरवर फोन केला होता मी… पण हा संकेत मध्ये आला आणि माझ्या हातून फोन घेऊन गेला आणि बोलणं होऊ शकलं नाही…त्यानंतर बऱ्याच वेळाने जेव्हा मी फोन पाहिला तेव्हा कल्याणीचे मिस्ड कॉल बघितले….पण तेव्हा थोडी कामात असल्याने आता फोन केला मी…आता पण कुणी उचलला नाही फोन…” सीमाताई म्हणाली.
” अगं ताई हा फोन बेडरूम मध्ये होता…आवाज आला नाही बाहेर म्हणून नाही उचलला…” कुणाल चाचरत बोलला.
” इतक्या वेळेपासून कुणीच पाहिला नाही…दे जरा कल्याणी ला फोन…चांगलीच बोलते तिला आता…आता तिला कॉल उचलायला सुद्धा सवड नाही का…?” सीमा ताई जरा चेष्टेने म्हणाली.
” ती इथे नाही आहे…नंतर तुमचं बोलणं करून देतो…” कुणाल कसाबसा म्हणाला.
” ठीक आहे…मी सुद्धा आता जरा कामात आहे…नंतर करते तुला फोन…” सीमाताई म्हणाली.
सीमाताईने फोन ठेवल्यावर कुणाल क्षणभर स्तब्ध उभा राहिला होता. आपण आज छोट्याशा गैरसमजातून किती भयंकर कृत्य केलं ह्याची त्याला जाणीव झाली होती. क्षणात त्याचा राग निघून गेला आणि तो आपल्याच कृत्याने खजील झाला. आपण कल्याणी ला किती अमानुषपणे मारहाण केली हे आठवून तो स्वतः सुद्धा हादरलाच.
त्याने लगेच जाऊन कल्याणीची माफी मागायची ठरवली. तो घाईतच त्याच्या रूम मधून बाहेर आला आणि आपल्या बाईक ची चावी शोधू लागला. त्याला असे घाई घाईने काहीतरी शोधताना पाहून कुणालची आई म्हणाली.
” काय झालं कुणाल..? काही शोधत आहेस का…?”
” हो आई…माझ्या गाडीची चावी शोधत आहे…?” कुणाल जरा घाईतच म्हणाला.
” कुठे जायला निघाला आहेस का..?”
” हो आई…कल्याणीला आणायला जातोय…”
” काय…? हे काय नवीनच सुचलं तुला…तूच तर तिला घरातून निघून जायला सांगितलं ना थोड्या वेळापूर्वी…मग तिला आणायचा विचार का करत आहेस तू…अरे तिच्यासारखी वाईट चारित्र्याची बाई नकोय आपल्याला…” आई रागातच म्हणाली.
” नाही आई… माझं चुकलं…तिला समजून घेण्यात मी कमी पडलो…” कुणाल म्हणाला.
” काय बोलत आहेस तू…तुला तरी कळतंय का…तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे हे तूच सांगत होतास ना…?” आई म्हणाली.
” आई…माझा गैरसमज झाला होता ग…तिच्या फोनवर एक अनोळखी नंबर आला आणि मी काहीही विचार न करता तो फोन तिच्या एखाद्या प्रियकराचा असेल हे मनातल्या मनात ठरवून टाकले…” कुणाल म्हणाला.
क्रमशः
अविश्वास – भाग ३