” मग आता तुला कसं कळलं की तुला गैरसमज झाला होता…?” आई ने विचारले.
” तो नंबर सीमा ताईचा होता… आताच ताईचा कॉल येऊन गेला आणि मला कळलं की माझ्या हातून खूप मोठी चूक झालीय…मी लगेच तिची माफी मागतो जाऊन…आणि तिला परत घेऊन येतो…” असे म्हणून कुणाल पुन्हा चावी शोधू लागला.
त्याची आई मात्र विचारात पडली. थोड्याच वेळात कुणाल ला गाडीची चावी मिळाली आणि ती जायला निघाला. इतक्यात त्याच्या आईने त्याला मागून आवाज दिला.
” थांब कुणाल…”
” काय झाले आई…?” कुणाल ने विचारले.
” आत्ताच नको जाऊस…” आई म्हणाली.
” पण का आई…?” कुणाल ने विचारले.
” कारण आत्ताच ते सगळे रागात असतील…तुला गैरसमज झाला होता हे कळल्यावर ते उगाच तुला काहीबाही बोलतील…आणि कदाचित कल्याणी सुद्धा घरी यायला आढेवेढे घेईल…आणि घरी आली तरी तुला मात्र तिच्याशी फक्त चांगलच वागावं लागेल…” आई म्हणाली.
” पण मग मी आत्ता काय करावं असं तुला वाटतं…?” कुणालने आईला विचारले.
” तू आत्ताच थांब…आणि त्यांना अजिबात माहिती पडू देऊ नको की ती निर्दोष आहे हे तुला कळलं म्हणून…” आई म्हणाली.
” पण का आई..?” कुणाल ने विचारले.
” कारण त्यांची मुलीची बाजू आहे…काहीही करून ते पुन्हा आपल्या हातापाया पडायला येतील आणि तिला ठेवून घ्या म्हणतील…मग आपण सुद्धा त्यांच्यावर उपकार केल्यासारखे तिला पुन्हा घरी घेऊन येऊ…म्हणजे ती आपणहून घरी येईल आणि आयुष्यभर आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहील…” कुणालची आई म्हणाली.
कुणाल ने सुद्धा विचार केला आणि त्याला त्याच्या आईचे म्हणणे पटले सुद्धा. त्याने कल्याणीच्या मनाचा अजिबात विचार केला नाही. इकडे कल्याणी मात्र स्वतःच्या नशिबाला कोसत होती. अचानकच हे सगळे काय होऊन बसले हे तिला कळतच नव्हते. कुणालने सुद्धा अजुन एकही फोन केला नव्हता.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या नवऱ्याच ते राक्षसी रूप पाहून तिला त्याची किळस येऊ लागली होती. त्याने काहीही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता आपल्याशी असे वागणे कल्याणीला अजिबात पटले नव्हते. एव्हाना तिच्या या अवस्थेत घरी येण्याने शेजारी पाजारी सुद्धा तिच्या आई वडिलांना आडून आडून प्रश्न विचारू लागले होते. ती जेव्हा थोडी सावरली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्याजवळ हा विषय काढला.
” कल्याणी… बाळा…तू बरी आहेस ना आता…?” तिच्या वडिलांनी विचारले.
” हो बाबा…मी बरी आहे…” कल्याणी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली.
” मग तू काय ठरवलं आहेस…?” बाबांनी तिला थेट प्रश्न विचारला.
” कशाबद्दल बाबा…?” कल्याणी ला बाबांच्या बोलण्याचा रोख कळला नव्हता म्हणून तिने विचारले.
” कुणाल रावांबद्दल…” बाबा म्हणाले.
” मी खरंच काही केलेलं नाही बाबा…ते असे का वागले मला खरंच काहीच कळत नाही आहे…” हे बोलताना कल्याणी स्वतःचे अश्रू रोखू शकली नाही.
” मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा…तू काहीही केलेलं नाहीस हे मला माहिती आहे…तुझे निष्पाप असणे तुझ्या डोळ्यात दिसतेय मला…” बाबा तिला सावरत म्हणाले.
” मी माझ्या परीने चांगला संसार करण्याचा खूप प्रयत्न केला बाबा…पण त्यांनी फक्त एका गैरसमजुती मुळे माझे काहीही ऐकुन न घेता मला निर्जीव वस्तूप्रमाणे मारले बाबा…त्या दिवशी मी त्यांचे जे रूप पाहिले त्यानंतर मला आता तिथे जायचं नाही…मला प्लिज तिथे जायला सांगू नका बाबा…” कल्याणी कळवळून म्हणाली.
” नाही सांगणार तुला जायला…खरं म्हणजे माझं म्हणणं सुद्धा हेच होतं पण तुझ्या आयुष्याचा निर्णय तुला विचारणं सुद्धा मला महत्त्वाचं वाटलं म्हणून तुला विचारलं…त्या दिवशी तुला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हाच मी ठरवलं होतं की माझी मुलगी आता तिथे राहणार नाही…तुला ते सुखात ठेवतील असे वाटल्याने मी तुझं लग्न त्यांच्याशी लावून दिलं होतं…पण जर तू तिथे सुखात नसशील तर मी तुला फक्त लोक काय म्हणतील या पायी तिथे परत जायला कधीच सांगणार नाही…” कल्याणीचे वडील म्हणाले.
इकडे कल्याणीला जाऊन एक महिना होत आला तरीही तिच्या घरून काही फोन नाही ना कुठला निरोप नाही म्हणून कुणाल ला अस्वस्थ वाटायला लागले होते. त्याला कल्याणी ची खूप आठवण येत होती. आपल्याला नशीबाने मिळालेली इतकी सुंदर बायको त्याला गमवायची नव्हती पण तरीही तिच्या घरचे तिला स्वतःहून आणून सोडतील म्हणून त्याने कसेबसे इतके दिवस काढले होते. पण आता मात्र त्याला काळजी वाटत होती. कारण कल्याणी ने अजूनही त्याला एकही फोन केलेला नव्हता. तिचा फोन जरी तिथेच राहिला असला तरी ती घरून कुणाच्या तरी फोन वरून आपल्याशी बोलेल असेच त्याला वाटत होते.
आता मात्र त्याने आई आणि बाबांकडे हट्टच धरला की त्याला कल्याणी ला पुन्हा घरी घेऊन यायचं आहे. सुरुवातीला आईने नकारच दिला पण कुणाल मे सुद्धा जास्तच हट्ट केला. तेव्हा मात्र त्याच्या आई बाबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी एका नातेवाईकाकडे कल्याणी साठी निरोप पाठवला. मात्र कल्याणी किंवा तिच्या घरच्यांनी त्यांच्या निरोपाला काहीच उत्तर दिले नाही.
मग मात्र कुणाल आणि त्याचे आई वडील कल्याणीच्या घरी आले. त्यांना घरी आलेलं पाहून कल्याणी च्या घरी कुणाला जास्त आनंद झाला नाही. कुणाल च्या आईला वाटले होते की कल्याणीच्या घरच्यांना त्यांना पाहून खूप आनंद होईल. ते आपल्याला कल्याणीला सोबत घेऊन जा म्हणून विनवण्या करतील. पण इथे परिस्थिती मात्र वेगळीच होती.
कुणाल आणि त्याच्या आई वडिलांना चहा पाणी दिले आणि कल्याणी च्या वडिलांनी सरळ विषय काढला.
” आता इकडे कसं काय येणं केलंत…?”
” कसं काय म्हणजे…? अहो तुम्ही तर एकदाही कॉल वा काही निरोप पाठवला नाही…” कुणालचे वडील म्हणाले.
” पण तुम्ही तर त्याच दिवशी तुमचा निर्णय मला सांगितला होतात की यापुढे तुमच्या मुलीला आमच्या घरात काही जागा राहणार नाही म्हणून…” कल्याणीचे वडील म्हणाले.
” मुलांचं लग्न झालेलं आहे आपल्या…आणि असं अचानक सगळं काही तोडून कसं चालेल…?” कुणालचे वडील म्हणाले.
” पण माझी मुलगी तर चारित्र्यहीन आहे ना…तुमच्या भाषेत सांगायचं झाल्यास तिची बाहेर भानगड सुरू आहे…मग आता तुम्हाला ती कशी काय चालणार आहे…?” कल्याणीचे वडील खोचक पणे म्हणाले.
” हो…तरीपण आम्ही तिला एक संधी देऊ शकतो…फक्त यापुढे चांगली राहा म्हणावं…आमच्या शब्दाच्या पुढे ती गेली नाही पाहिजे…” कुणालची आई म्हणाली.
” आणि तिने यानंतर फोन वापरू नये आणि अगदी महत्त्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर सुद्धा निघू नये…” कुणालने सुद्धा आपले मत मांडले.
” आमच्या या अटी मान्य असतील तर आम्ही पुन्हा एकदा विचार करू शकतो तिला नांदवायचा…” कुणालच्या आईने दुजोरा दिला.
” आम्हाला तुमची कुठलीही अट मान्य नाही आणि आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरी नांदायला पाठवणार सुद्धा नाही…” कल्याणी चे वडील निर्धाराने म्हणाले.
” असं कसं चालेल…तुम्ही तर चांगला संसार मोडायला निघालात…तुमची मुलीकडची बाजू असून सुद्धा तुम्ही असे बोलताय…तुम्ही तर आमच्या हातापाया पडायला पाहिजे होते…पण तुमचं तर उलटच सुरू आहे…मुलाची बाजू असून आम्ही स्वतःहून तुमच्याकडे आलोय तर तुम्हाला आता नखरे सुचत आहेत…आमच्या मुलाला तर कोणतीही चांगली मुलगी मिळेल दुसऱ्या लग्ना साठी पण मुलीसाठी सगळं इतकं सोप्पं नसतं…म्हणून तुम्हीसुद्धा तुमचा हट्ट सोडा आणि गुमान तुमच्या मुलीला तिचा संसार करायला पाठवून द्या…” कुणालची आई म्हणाली.
” माफ करा…पण तुम्ही फक्त एका गैरसमजाच्या आधारे माझ्या मुलीला इतके मारले की ती जवळपास अर्धमेली झाली होती…तुम्हाला प्रकरणाची शहानिशा सुद्धा करावीशी वाटली नाही…आणि तिने तसे केले असते तरीही तिला अशी मारहाण करणे कितपत योग्य झाले असते…मुळात नवऱ्याने आपल्या बायकोवर हात उचलणे किती चुकीचे आहे ह्याची जाणीव सुद्धा झालेली नाही तुम्हाला अजुन…स्वतःची चूक असूनसुद्धा तुम्ही ती कबूल न करता आम्हाला मुलिकडची बाजू आहे म्हणून सांभाळून घ्यायला सांगताय…चूक झाल्यावर तुम्ही लगेच माफी मागितली असती तरीही आम्ही काही विचार केला असता पण इतके दिवस झाले तरीही तुम्हाला स्वतःच्या चुकीची जाणीव सुद्धा झाली नाही…तुमच्या सारख्या लोकांच्या घरी तिला नांदायला पाठवण्या पेक्षा ती आयुष्यभर माहेरी राहिली तरीही माझी काही हरकत नाही…” कल्याणी चे बाबा निर्धाराने म्हणाले.
त्यानंतर कुणाल आणि त्याच्या आई वडिलांनी कल्याणी च्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण कल्याणी चे वडील आपल्या मुलीच्या निर्णयाच्या बाजूने ठाम राहिले आणि कल्याणी ला पुन्हा त्यांच्या घरी पाठवायला नकार दिला. कल्याणीची आई आणि भाऊ सुद्धा कल्याणी सोबत ठामपणे उभे राहिले होते.
त्यानंतर लवकरच कुणाल आणि कल्याणीचा घटस्फोट झाला. कुणालला त्यानंतर आपल्या चुकीची जाणीव झाली पण तोवर खूप उशीर झाला होता.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.