समिधा आणि सुबोधच लग्न होऊन फक्त पाच महिनेच झाले होते. घरातील सगळेच लोक खुप चांगले होते. सासुबाई आणि नणंद कल्याणी तर तिला कुठल्याच कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. नवीन सुनेचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं.
सुबोध सोबत बाहेर फिरायला जाणे तर रोजचेच झाले होते. सासूबाईंनी म्हणजेच नीलिमाताईंनी सुद्धा समिधाचे सगळेच लाड पुरवले, मग ते खाण्या पिण्याच्या बाबतीत असो वा कपड्यांच्या बाबतीत. समिधा सुद्धा या सगळ्यांमुळे स्वतःच्या नशिबावर खूपच खुश होती.
पण नव्या नवलाईचे दिवस संपत नाहीत तोवर एक वाईट बातमी त्यांना मिळाली. सुबोधच्या वडिलांना दिनकररावांना कॅन्सर झाल्याचे निदान लागले आणि हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचे सावट आले. सासुबाई तर काळजीने पार सुकून गेल्या. मागच्याच वर्षी सासरेबुवा रिटायर्ड झाले होते. त्यांनी आणि सासूबाईंनी मिळून कितीतरी प्लॅन बनवले होते.
दोघांना मिळून अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायचे होते. अनेक नवीन ठिकाण पाहायची होती. आणि मुख्य म्हणजे सासरे बुवांना आपल्या बायकोची प्रत्येक हौस पूर्ण करायची होती. ज्यासाठी त्यांना त्यांच्या तारुण्यात कधी वेळच मिळाला नाही. नीलिमाताई सतरा वर्षांच्या असताना त्यांचे आणि दिनकर काकांचे लग्न झाले होते.
त्यांचे लग्न झाल्यावर वर्षभरातच सुबोधचा जन्म झाला आणि त्या त्याच्या संगोपनात व्यस्त झाल्या. पुढे पाच वर्षांनी जेव्हा कल्याणी झाली तेव्हापासून तर मुलांचं करण्यातच त्यांचं सगळं आयुष्य गेलं होतं. दिनकर रावांना सुद्धा त्यांचं लग्न झाल्यावर सहा महिन्यातच सरकारी नोकरी लागली होती आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शहरात राहावं लागलं होतं.
म्हणून निलिमाताई मुलांना घेऊन घरीच असायच्या. दिनकरराव फक्त सुट्टीमध्ये घरी येत असत. पण नीलिमा ताईंनी अगदी नेटाने संसार केला. सासू सासर्यांची सेवा करण्यापासून ते मुलांचं शिक्षण वगैरे सगळच त्यांनी चांगलं केलं. पण मागच्या दहा वर्षांपूर्वी दिनकर रावांची तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली आणि मग त्यांनी तिथेच घर घेऊन निलीमाताई आणि मुलांना त्यांच्याजवळ घेऊन आले.
तेव्हा कुठे दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळू लागला होता. आणि जेव्हा आता सगळा वेळ एकमेकांसाठी खर्च करायचा असे ठरले तेव्हा या आजारपणाने डोके वर काढले होते. नीलिमाताईंना तर काही सुचेनासे झाले होते. तरीही दिनकर रावांसमोर त्यांनी अजिबात तसे दाखवले नाही.
त्या दिवसरात्र त्यांची सेवा करू लागल्या होत्या. आणि त्यांना पाहूनच दिनकर रावांना सुद्धा आजाराशी लढण्याची हिम्मत येत होती. नीलिमा ताई सतत त्यांच्या सोबत असायच्या. मग ते दवाखान्यात असोत वा घरी. त्या दिनकररावांच्या खाण्या पिण्यापासून ते त्यांच्या औषधापर्यंत सगळीकडे लक्ष द्यायच्या. शिवाय त्यांना भेटायला येणाऱ्या जाणाऱ्यांची सुद्धा विचारपूस करायच्या.
पण या नादात त्यांचे घरातल्या कामांकडे दुर्लक्ष झाले. म्हणजे त्यांनी यावेळी घरकामापेक्षा आपल्या नवऱ्याच्या तब्येतीला प्राधान्य दिले. आणि म्हणूनच घरातील सगळ्या कामांची जबाबदारी समिधावर येऊन पडली. सुरुवातीला समिधाला काही विशेष वाटले नाही. तिला वाटले की सासुबाई लवकरच घरातली सगळी कामे करायला लागतील आणि आपण पुन्हा पूर्वीप्रमाणेच फिरायला मोकळे.
पण खूप दिवस झाले तरीही दिनकर रावांच्या तब्येतीत फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे अजूनही नीलिमा ताई घरकामाकडे वळल्या नव्हत्या. आणी यामुळे घरातील सगळ्या कामांची जबाबदारी समिधा आणि तिची नणंद कल्याणी हिच्यावर पडली होती. वडिलांच्या आजारपणामुळे कल्याणी सुद्धा तिचा अभ्यास कॉलेज मध्ये न जाता घरूनच करत होती.
पण समिधाला मात्र आता घरकाम करण्याचा कंटाळा आला होता. तिने तसे उघडपणे सुबोधला बोलून दाखवले पण सुबोधने तिची समजूत घातली. तो म्हणाला की बाबा आता आजारी आहेत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे त्यांची सेवा करणे. आणि शिवाय कल्याणी पण आहेच ना मदतीला. समिधाने तेवढ्यापुरते सुबोधचे म्हणणे ऐकले पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा तिची तिच बडबड सुरू झाली.
अशातच एके दिवशी तिला कळलं की ती आई होणार आहे. घरी सगळ्यांनाच ही गोड बातमी ऐकून खूप आनंद झाला. नीलीमाताई आणि दिनकरराव तर घरी नातवंडं येणार म्हणून क्षणभर आपले दुःख विसरले देखील. आता सगळेजण तिची खूप काळजी घ्यायला लागले होते. दिनकर रावांच्या तब्येतीत सुद्धा फरक पडायला लागला होता.
घरी सगळीकडे आनंदी आनंद होता. पण समिधाच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी सुरू होते. तिने सुबोधकडे हट्ट केला की तिला वेगळे राहायचे आहे. सुबोध मात्र तिच्या मागणीने खूप व्यथित झाला. आपले वडील आजारी असताना समिधाच्या मनात असा विचार तरी कसा येऊ शकतो असे सुबोधला वाटले. त्याने तिची खूप समजूत काढली. पण ती मात्र काही ऐकायलाच तयार नव्हती.
तिला आता फक्त सुबोध सोबत राहायचे होते. घरातील लोक म्हणजे आता तिला कटकट वाटत होती. तिला फक्त राजा राणीचा संसार करायचा होता. सुबोधला मात्र आपल्या कुटुंबासोबत च राहायचे होते. त्याला या कठीण काळात आपल्या घरच्यांचा आधार बनायचे होते. पण समिधा ने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. ती घरातल्या सगळ्यांशी भांडून तिच्या माहेरी निघून गेली.
एव्हाना घरातल्या सगळ्यांना कळले होते की समिधाला वेगळं राहायचं आहे म्हणून. समीधाचे वागणे पाहून घरातल्या सगळ्यांनाच वाईट वाटले होते. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त वाईट नीलिमा ताईंना वाटले होते. जोवर दिनकर रावांची तब्येत चांगली होती तोवर त्यांनी समिधाला कुठल्याही कामाला हात लावू दिला नव्हता.
अगदी मुलीप्रमाणे काळजी घेतली होती तिची. तिला हवं नको ते बघितले. तिचे सगळे लाड पुरवले. एवढंच नव्हे तर मना प्रमाणे सगळच करायचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं. पण तिनेच आपल्याला अशा वाईट प्रसंगी सोडून जावं हे त्यांना सहन होत नव्हतं. आधीच नवरा आजारी, मुलीचं अजुन लग्न झालेलं नाही आणि आता सुनेला सुद्धा तिचा वेगळा संसार थाटायचा आहे ह्याने नीलिमा खचून गेल्या होत्या.
पण मग त्यांनी स्वतःशीच ठरवले की वेगळं झाल्याने जर मुलाचा संसार वाचत असेल तर तेच ठीक. निदान त्यांच्या होणाऱ्या बाळाला आई आणि वडिलांचं सुख तरी मिळेल. आणि त्यांनी सूबोधला सांगितले समिधाला घेऊन वेगळे राहायला. सुबोध ला आईचे म्हणणे अजिबात पटले नव्हते. तो प्रसंगी समिधा ला सोडायला तयार होता पण आई वडिलांना नाही.
पण निलिमाताईंनी सुबोध ला त्याच्या होणाऱ्या बाळासाठी निदान वेगळा राहा असे खूप समजावून सांगितले तेव्हा तो नाईलाजाने तयार झाला. पण जवळच कुठेतरी घर घेऊन रोज आई बाबांना भेटायला येणार या अटीवर तो तयार झाला.
क्रमशः
आनंदी आनंद गडे – भाग २ (अंतिम भाग)