प्रीती बेडरूम मधून बाहेर येऊन बघते तर पंकज किचनमध्ये नाश्ता बनवत होता. त्याला नाश्ता बनवताना पाहून प्रीतीला खूप नवल वाटले. कारण यापूर्वी तिने त्याला कधीच किचन मध्ये काम करताना पाहिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली…
” तुम्ही कशाला बनवलात नाश्ता…मी करणारच होते… काल प्रवासामुळे थकले होते ना म्हणून उठायला थोडा उशीर झाला…” प्रीती थोडी असहजतेने म्हणाली.
” मी लवकर उठलो होतो म्हणून मी बनवला नाश्ता…कालचा प्रवास आणि नंतर घर आवरण्यात तू थकली हे माहिती होते मला…तू फ्रेश हो…तोपर्यंत मी नाश्ता टेबलवर आणून ठेवतो…पार्थ सुद्धा उठेल आता…” पंकज म्हणाला.
” पण मी असताना तुम्ही करणं बरं वाटतं नाही…” प्रीती म्हणाली.
” प्रीती…मला हे लहान लहान क्षण जगून घेऊ दे…इतकी वर्ष मी एकटाच होतो…कोणासाठी मायेने काही करण्याची संधीच मिळाली नाही ग…आणि नवरा बायकोने प्रत्येक गोष्टीत एकमेकांना साथ द्यायला हवीच…मग तो नाश्ता असो वा स्वयंपाक…” पंकज म्हणाला.
” हो…तेही बरोबर आहे म्हणा…” प्रीती हसून म्हणाली.
प्रीती फ्रेश होऊन आली आणि दोघांनी सोबत नाश्ता केला. दोन दिवस पंकज ने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती. त्या दिवशी पंकज प्रीती आणि पार्थ सोबत छान फिरून आला. पार्थ पंकज सोबत खूप खुश होता. आणि हळूहळू पंकज आणि प्रितीमधील दुरावा संपत होता.
इकडे पंकज च्या लहान भावाने प्रणितने त्याच्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या पल्लवीशी त्याच्या आईला न सांगता लग्न केले. त्याने आधी आईला तिच्याबद्दल सांगितले होते. पण आईने मात्र तिला घरची सून करून घेण्यास नकार दिला होता. म्हणून दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केले.
प्रणित आणि पंकजचे नाते भावांपेक्षा जास्त मैत्रीचे होते. म्हणून प्रणितने पंकजला ह्या गोष्टीची पूर्वकल्पना दिली होती. पंकज आणि प्रीती दोघांनाही प्रीती चांगली मुलगी वाटली. म्हणून पंकज ने दोघांच्या लग्नाला सहमती दिली होती. दोघांच्या लग्नात पंकज आणि प्रीतीने उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिला होता.
ते दोघे लग्न करून घरी आल्यावर मात्र आई प्रणित वर खूप रागावली. पल्लवीला नको ते बोलली. पण पल्लवी मात्र उलटून काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशीपासून सासूबाईंनी जे प्रितीसोबत केले होते तेच पल्लवी सोबत करायला सुरुवात केली.
पल्लवी मात्र गप्प बसून सहन करणारी नव्हती. प्रणितने पल्लवीला आईच्या स्वभावाची पुरेपूर कल्पना दिली होती. पल्लवीने आता आईला उलटून बोलायला सुरुवात केली होती. तिची सासू साखर आणि चहाला सुद्धा कुलूप लावून ठेवायची.
पल्लवी मात्र तिचे आवरून आणि घरची काम करून ऑफिसला निघून जाई. आणि दोघे घरी येताना बाहेरूनच काही तरी खाऊन यायचे. घरी आल्यावर पल्लवी सासुबाई पुरता स्वयंपाक करायची. पण तिच्या सासूबाईंना कळायचे की हे दोघे बाहेरून काहीतरी खाऊन येतात. आणि सासूबाईंना तिचा खूप राग यायचा. त्या पल्लवीला बोलायच्या पण पल्लवी जाणून बुजून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. त्याने तिची सासू आणखीनच चिडा यची.
त्यामध्ये तिची नणंद मध्ये मध्ये येऊन सासूचे कान भरायची. पण पल्लवी सुद्धा सासूला उलटून उत्तर द्यायची. सासूला आता प्रितीची आठवण यायला लागली होती. ती कशीही असली तरी तिने कधीच आपला अपमान केला नाही किंवा उलटून बोलली नाही हे त्यांना आठवायचे. पण त्यांना अजूनही आपण काही चुकीचे वागलो आहोत ह्याची जाणीव होत नव्हती.
सासुबाई पल्लवीला त्रास द्यायचा खूप प्रयत्न करायच्या पण पल्लवी मात्र जशास तसे उत्तर द्यायची. आणि आता तर प्रणित सुद्धा बायकोची बाजू घेऊन आईशी भांडत होता. महिन्याच्या शेवटी जेव्हा प्रणित आणि पल्लवीचा पगार झाला तेव्हा सासूबाईंना वाटले की प्रणित सोबत पल्लवी सुद्धा तिचा पगार त्यांना आणून देईल. पण झाले ते उलटेच.
पल्लवी ने तर तिचा पगार सासूबाईंच्या हातात दिला नाही पण प्रणितने सुद्धा त्याचा पगार आईच्या हातात दिला नाही. फक्त खर्चासाठी थोडे पैसे आईला दिले. आणि म्हणूनच आईला खूप राग आला होता. तिने प्रणितला याबद्दल जाब विचारला. तेव्हा प्रणित म्हणाला…
” आई…आमचं नवीन नवीन लग्न झालंय आता…आम्हाला सुद्धा हौसमौज करायची आहे…आणि खर्चाला पुरतील एवढे पैसे दिलेच ना मी तुला…आणि यापूर्वी मी आणि दादा सगळा पगार तुलाच आणून द्यायचो…ते पैसे सुद्धा तुझ्याकडे जमा असतीलच ना…”
” अच्छा… तुझं लग्न झालं म्हणून काय झालं…पंकज च पण लग्न झालं होतं ना…म्हणून त्याने त्याचा पगार मला आणून देणे बंद केले होते का…?…आणि त्याच्या बायकोने नाही कधी तुझ्या बायको सारखे रंग दाखवले..” आई रागाने म्हणाली.
” दादा आणि वहिनी तुझ्याशी चांगलेच वागले…पण तू त्यांच्याशी कशी वागलीस आई…वहिनीला किती त्रास दिलास तू…दादाला त्याच्या बायको आणि मुलापासून दूर राहायला भाग पाडले…इतके दिवस तो किती दुःखात होता ह्याची तर तुला जाणीव सुद्धा नसेल ना आई… अगं या दोन वर्षात त्याच्या मुलाचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता त्याने…आणि आता जेव्हा त्याला त्याच्या बायको आणि मुलासोबत राहायचं आहे तेव्हा तू त्याला घरातून बाहेर काढले…मग तूच सांग आई काय मिळालं त्याला चांगलं वागून…आणि की का म्हणून चांगलं वागू…?” प्रणित म्हणाला.
प्रणितचे बोलणे ऐकुन त्याची आई गप्प बसली. तो बोलला होता ते काही चुकीचं नव्हतं ह्याची जाणीव त्यांना होत होती. पण तरीही ह्यात आपली चूक आहे हे त्या स्वीकारत नव्हत्या.
इकडे पंकज, प्रीती आणि पार्थ मात्र खूप खुश होते. पंकज ला दुसरी संधी देण्याचा तिचा निर्णय सार्थ ठरला होता. तिने आजवर ज्या सुखाची कल्पनाही केली नसेल ते सुख आज तिच्या पदरात पडलं होतं. आणि प्रीती हे सुखाचे क्षण आनंदाने जगून घेत होती.
अधून मधून प्रणित सुद्धा पल्लवीला घेऊन त्यांच्या भेटीला यायचा. पार्थ त्याच्या काका काकूंसोबत खूप खेळायचा. पल्लवीला नेहमीच वाटायचं की आपण सर्व एकत्र राहिलो तर किती छान होईल. पण तो दिवस लवकर येईल असे काही वाटत नव्हते.
आता पल्लवीने सुद्धा एक नवीन अलमारी विकत आणली होती. आणि तिने बाहेरून मागवलेल्या खाऊ, सुकामेवा, मिठाई सर्व काही कुलुपात ठेवायला लागली होती. पल्लवी ला काहीही खायचे असले की ती गुपचूप तिच्या रूममध्ये जावून खायची.
हे पाहून तर सासूबाईंना खूपच राग यायला लागला होता. पण प्रणित आपल्या बायकोच्या बाजूने बोलायचा म्हणून त्याच्या आईचं तिच्यासमोर काही चालायचं नाही. एकदा पल्लवीची नणंद घरी आलेली होती. आणि तिने घरी आणलेली नवी आलमारी बघितली. ती आलमारी पल्लवीने आणली आहे आणि त्याला ती कुलूप लावून ठेवते हे माहिती पडताच तिच्या नणंदेला आयताच विषय सापडला.
ती पल्लवीला म्हणाली…
” काय ग वहिनी…एकाच घरात राहून तू आलमारी ला कुलूप लावतेस…आणि एकटीच चोरून चोरून खातेस…?”
” सासूबाईंनी काही मागितले तर मी काय त्यांना नाही म्हणणार आहे का…त्यांनी खुशाल माझ्याकडे येऊन मागावं…” पल्लवी म्हणाली.
” माझी आई तुला कशाला मागेल…या घरातल्या सगळ्या गोष्टींवर तिचाही अधिकार आहेच…घरी एक म्हातारी सासू आहे ह्याचं तरी भान ठेवायला हवे होते ना…तुला जराही माणुसकी नाही का…?” नणंद म्हणाली.
” आता बरी तुम्हाला माणुसकी आठवतेय…तेव्हा तुमची माणुसकी कुठे गेली होती जेव्हा प्रीती वहिनीच्या लपून बाहेरून खाऊ आणून खायच्या…आणि त्या प्रेग्नेंट असताना सुद्धा त्यांना काही खायची परवानगी नव्हती… साधा चिवडा खाण्यावरून तुम्ही त्यांना माहेरी पाठवलं…त्यांनी तिकडे काय सहन केलं असेल ह्याची कधी जाणीव झाली का तुम्हाला…
अन् त्या लहान मुलाने काय केलं होतं तुमचं…त्याला कुठली शिक्षा दिलीत तुम्ही…त्या एवढ्याशा मुलाला कधी भेटावसं सुद्धा नाही वाटलं तुम्हाला…अहो किती गोड मुलगा आहे तो…आणि इतकं सगळं करून तुम्ही उलट मलाच माणुसकी शिकवत आहात…कमाल आहे हो तुमची…” पल्लवी म्हणाली.
क्रमशः
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-९-अ/
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार इंस्टाग्राम
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका.
तुमच्या लहानपणीच्या अनुभवाबद्दल ऐकून तर खुप वाईट वाटलं. एखाद्या मुलीला पोसायची तयारी नसते. पण तिची कमाई खायला पुढे पुढे असतात. So sad. लग्नानंतर खरंच खुप गोष्टी change होतात. मला पण अनुभव आला. असं वाटत की लग्नच काय पण हा जन्मच नको.