पण राधिकाने मात्र तिच्या सासरेबुवांना तिच्या सासूबाईंची सेवा करायला घरी येण्याची परवानगी मागितली. सासरेबुवांनी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला लागलीच घरी यायला सांगितले. आणि राजेश व राधिका पुन्हा घरी राहायला आले. राधिकाने अडगळीची खोली स्वतःसाठी तयार करून घेतली होती.
ती घरातील कामे आणि सासूबाईंनी सेवा दोन्ही इमाने इतबारे करू लागली. सासूबाईंची हाक ऐकून अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्यासाठी हजार राहायची. अगदी राजेशसुद्धा पडेल त्या कामात राधिकाची मदत करायचा. घराची सगळी जबाबदारी राधिकाने घेतली हे पाहून मयुरी निश्चिंत झाली. तिची आधीची दिनचर्या पुन्हा सुरू झाली. मैत्रिणींसोबत फिरणे, शॉपिंगला जाणे हे नित्याचेच झाले.
हे सगळेच महेश आणि राजेशची आई पाहत होती. आजारी असली तरीही घरात काय चाललंय ह्याची तिला पुरेपूर कल्पना होती. आपण राधिकाला कधीच मानाने, आपुलकीने वागवलेले नसतानाही ती आपला इतका विचार करते ह्या जाणिवेने त्यांचे दिले भरून येत. राजेशसाठी सुद्धा त्यांचा जीव खूप तुटत होता.
दिवसामागून दिवस जात होते. आईच्या आजारपणाला महेश आणि मयुरी हे कंटाळले होते. त्यातच त्याच्या वडिलांना कुणीतरी आईला दुसऱ्या एका शहरातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी बराच खर्च येणार होता. तेव्हा महेश त्याच्या बाबांना म्हणाला.
” बाबा.. आईचा कॅन्सर आता बरे होईल असे काही वाटत नाही…आणि इथे तर इलाज सुरूच आहे ना…मग कशाला दुसरीकडे घेऊन जायचं…आजवर लाखो रुपये गेलेत आईच्या आजारपणात…यापुढे सुद्धा पैसे लावले तर यात फक्त पैशांची बरबादी होईल…त्यापेक्षा तो पैसा सदुपयोगी लागलेला बरा…”
महेशचे बोलणे ऐकून त्याच्या बाबांना सर्वप्रथम त्यांच्या कानावर विश्र्वासच बसला नाही. ते महेशला म्हणाले.
” तू काय बोलतोयस हे तुझ्या लक्षात तरी येत आहे का…?अरे ती तुझी आई आहे…तिच्या बाबतीत तू असा कसा बोलू शकतोस…”
” हो बाबा…मला वाटतं तुम्ही जरा प्रॅक्टिकल विचार करावा…डॉक्टरांनी आपल्याला आधीच कल्पना दिली आहे की आईच्या बरे होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत…डॉक्टरांना काय फक्त पैसा ओढायचा असतो पेशंट कडून…” विजय म्हणाला.
” त्याचा विचार तू करू नकोस…माझ्याकडे माझ्या बायकोचा इलाज करण्यासाठी पुरेसा पैसा आहे…आणि की समर्थ आहे तिच्यासाठी…” बाबा रागातच त्याला म्हणाले.
त्यावर महेश जास्त काहीच बोलला नाही. बाबांनी आईला दुसऱ्या शहरात नेण्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईला दुसऱ्या शहरातील दवाखान्यात हलवणार होते. त्या दिवशी राजेश घाईघाईने घरी आला आणि त्याच्या वडीलांजवळ जाऊन म्हणाला.
” बाबा…माझ्याकडे हे एवढे पैसे जमा आहेत…तुमच्याकडे असू द्या…आईसाठी कामी पडतील…लागल्यास आणखी काहीतरी सोय करेन….” असे बोलून स्वतःजवळ असलेली रक्कम त्याच्या वडिलांच्या हाती दिली.
थोडीथोडकी नव्हे तर चार लाख रुपये त्याने त्याच्या वडिलांच्या हातात दिले होते. ते पाहून त्याचे वडील चक्रावलेच. ते राजेशला म्हणाले.
” एवढी मोठी रक्कम कुठून आली तुझ्याकडे…?”
” मी आजवर केलेली कमाई आहे बाबा…आईला गरज आहे म्हणून बँकेतून काढून आणली…” राजेश म्हणाला.
राजेशचे बोलणे ऐकून त्याच्या बाबांना नवलच वाटले. आपल्या मुलाने कधी एवढी प्रगती केली त्यांना कळलेच नाही. किंबहुना त्यांनी कधी त्याच्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते. पण आज ऐनवेळेस त्याने त्यांची मदतच केली होती. त्यांनी जास्त विचार न करता दुसऱ्या दिवशी राजेशच्या आईला दुसऱ्या दवाखान्यात दाखवले. राजेश सोबत होताच. डॉक्टरांनी आईला तपासून सांगितले की बरे होण्याचे काही चांचेस आहेत म्हणून.
डॉक्टरांच्या सांगण्याने सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळेच नव्या आशेने आईच्या सेवेला लागले. डॉक्टरांचे प्रयत्न, आईची इच्छाशक्ती आणि घरच्यांची अहोरात्र सेवा या सगळ्यांच्या परिणामस्वरूप आई लवकरच बरी झाली. आणि बरी होऊन आपल्या घरी आली. आई बरी झाली हे पाहून मयुरी पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन त्यांना लाडीगोडी लावायला लागली.
मयुरीला वाटत होते की आई बरी झाली आहे तर राधिकाने आता त्यांच्या घरी निघून जायला हवे. बरेचदा ती बोलण्यातून अप्रत्यक्षपणे त्यांना तशी आठवण करून देत असे. राधिका आणि राजेश सुद्धा घरातून जायच्या तयारीत होतेच. पण आता दिवाळी खूपच जवळ होती. आणि निदान दिवाळी तरी आई बाबांच्या सोबत साजरी करावी म्हणून राजेश तिथेच राहत होता.
दिवाळीचा दिवस आला आणि राधिकाने दिवाळीच्या पूजेची तयारी केली. नेहमीप्रमाणे महेश आणि मयुरी पूजेच्या वेळेला तयार होऊन खाली आले. मयुरीने आज अख्खा दिवस फक्त स्वतःची तयारी करण्यातच घालवला होता. राधिका मात्र आज दिवसभर किचन मध्ये राबत होती. पूजेची वेळ झाली तशी विजय आणि मयुरी पूजा करायला बसू लागले इतक्यात त्याची आई त्याला म्हणाली.
” थांब महेश…आजची पूजा राजेश आणि राधिका करतील…”
आईचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या महेशने आईला विचारले.
” पण का आई…म्हणजे नेहमी तर मीच करतो ना पूजा…”
” नेहमी तूच तर करतोस ना मग आज तुझ्या मोठ्या दादाला करू दे…तो सुद्धा या घरातील मोठा मुलगा आहे…” बाबांनी उत्तर दिले.
आई आणि बाबांचे बोलणे ऐकुन राजेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण डोळ्यातील पाणी दडवून तो पूजेला बसला. पूजा संपन्न झाली. राजेश आणि राधिका खूपच आनंदात होते. आज पहिल्यांदा विजयच्या समोर घरचा मुलगा असल्याचा मान दिल्या गेला होता त्याला. पण विजय आणि मयुरीचे मात्र तोंड पडले होते. पूजा झाल्यावर आई बाबांच्या पाया पडताना राजेश आपले अश्रू रोखू शकला नाही. ते पाहून आई त्याला म्हणाली.
” काय झाले…का रडतो आहेस…?”
” काही नाही आई…असेच…” राजेश म्हणाला.
” दुःखाचे मळभ आता दूर निघून गेलेत बाळा…आता आपल्यापैकी कुणीच रडायचं नाही…” आई त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली.
राजेश पुढे काही बोलूच शकला नाही. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले.
” उद्या कामावर जाऊ नकोस…घरीच थांब…आपल्याला एक महत्त्वाचे काम आहे…”
” महत्त्वाचं काम… कुठलं काम बाबा…” राजेशने विचारले.
” मी उद्या घरी माझ्या एका मित्राला बोलावले आहे…तो सिव्हिल इंजिनिअर आहे…मी त्याला आपल्या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम करायला दिले आहे…तेव्हा त्याची डिझाईन नेमकी कशी असावी हे तू ठरवायचे…” बाबा म्हणाले.
यावर राजेश काही बोलणार इतक्यात महेश म्हणाला.
” पण वर बांधकाम का करणार आहोत आपण…आणि दादाच्या पसंतीने का…म्हणजे अचानक हे सगळं का…?” महेशने विचारले.
” राजेशसाठी…मी ठरवलंय की राजेश आता इथेच राहणार…हे घर दोन भावांसाठी लहान आहे म्हणून मग वरच्या मजल्यावर राजेशसाठी वन बीएचके बांधकाम करणार आहे…” बाबा म्हणाले.
” पण तो तर राहतोय ना तिकडे विद्युत नगरला…म्हणजे त्याचं चांगलं चाललंय तिकडे…” महेश म्हणाला.
” हो…पण यापुढे इथेच राहणार…आम्हाला गरज आहे त्याची…आमची दोन्ही मुलं आम्हाला सारखीच आहेत आणि दोघांनीही आमच्या जवळच राहावं अशी आम्हा दोघांची इच्छा आहे…” बाबा म्हणाले.
” पण मला काहीही न विचारता तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता…” महेश म्हणाला.
आजवर घरातील कुठलाच निर्णय महेशच्या सहभागाशिवाय झालेला नसल्याने त्याने ह्या निर्णयावर नाराजी दर्शवली. पण बाबा यावेळी मात्र ठाम होते. ते महेशला म्हणाले.
” हे घर अजूनही माझं आहे…आणि या घराबद्दल अजूनतरी सगळे निर्णय मीच घेणार…आणि तेच योग्य आहे…तुझ्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रॅक्टिकल विचार आहे…” बाबा म्हणाले.
हे ऐकून महेश वरमला. आईच्या उपचारा दरम्यान त्याने बाबांना जे म्हटले होते ते आठवून तो ओशाळला. राजेश आणि राधिका दोघेही आई बाबांचे बोलणे ऐकून भरून पावले होते. त्याला पाहून बाबा म्हणाले.
” राजेश…तू काही बोलत का नाही आहेस…तुला माझा प्रस्ताव आवडला नाही का…?”
राजेश काही बोलू शकला नाही. त्याने तशीच बाबांना मिठी मारली आणि म्हणाला.
” मला मान्य आहे…तुम्ही जे म्हणाल ते सगळच मान्य आहे…फक्त मला तुमच्यापासून कधी दूर नका करू…” राजेश म्हणाला.
त्यावर आई आणि बाबा दोघांनाही भरून आले. आपण आजवर दोन भावांमध्ये भेदभाव केल्याचा पश्चात्ताप त्यांना होत होता. आई राजेशला म्हणाली.
” नाही करणार…या आधी जी चूक झाली ती यापुढे कधीच होणार नाही…माझ्या चुका दुरुस्त करण्याची दुसरी संधी म्हणून परमेश्वराने मला ठीक केले असावे कदाचित…यापुढे हा मायेचा पदर त्याच्या सगळ्याच लेकरांवर सारखाच सावली देईल…” आई म्हणाली.
आणि त्या दिवशी नंतर घरात पुन्हा कधीच भेदभाव झाला नाही. ना मुलांमध्ये, ना सूनांमध्ये. सगळ्यांसाठी नियम सारखेच होते. आणि प्रेमसुद्धा. महेश आणि मयुरी आधी तर हा बदल स्वीकार करू शकले नव्हते पण हळूहळू का होईना घरातल्या मोठ्यांचा मोठेपणा त्यांनी स्वीकारला. मयुरी राधिकाला मोठ्या जावेचा मान देऊ लागली आणि घरातील सर्वच निर्णयात महेश इतकाच राजेशचा सहभाग देखील व्हायला लागला. राजेशचे बाबा आता घरी येणाऱ्या पाहुण्यांना राजेशबद्दल गर्वाने सांगत.
आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाने त्यांना चांगल्या आणि वाईटात फरक करायला शिकवले होते. आवडता आणि नावडता हा फरक तर त्यांनी केव्हाचा पुसून टाकला होता.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.