अंजु सतरा वर्षांची एक चुणचुणीत मुलगी. नुकतीच वयात आलेली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या आईवडिलांसह आनंदाने राहत होती. घरात आईवडील, एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. छोटे पण सुखी कुटुंब. घरात सुख नांदत होते. पण त्यांच्या या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागणार होती. भविष्यात त्यांच्यापुढे काहीतरी अनपेक्षित घडणार होते.
आणि ह्याला कारण ठरली अंजु. अंजु शेजारीच राहणाऱ्या एका पुरुषाच्या प्रेमात पडली. साधारण पस्तिशीचा असणारा अरुण तिला आवडायला लागला. अरुणने अंजुला मोठमोठी स्वप्न दाखविली. लग्नानंतर अगदी राणी सारखे ठेवणार. तिच्यासाठी प्रसंगी चंद्र तारे तोडून आणायला मागेपुढे पाहणार नाही. आणि त्याच्या या बोलण्याने अंजु त्याच्यावर भाळली. तिला आता अरुण समोर काहीच दिसत नव्हते.
दोघांचेही बोलणे, भेटणे सुरूच होते. पण एके दिवशी ह्या सर्व प्रकरणाचा सुगावा अंजूच्या वडिलांना लागला आणि त्यांनी अंजूला धमकीवजा समज दिली. अंजुच्या वडिलांना अरुण बद्दल सर्वकाही माहिती होते. दिवसभर मजुरी करून रात्री दारू मध्ये पैसे उडवायचा.
त्याची आधी दोन लग्ने झाली होती. मात्र एका बायकोने ह्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तर दुसरी सहा महिन्यातच माहेरी निघून गेली. आणि त्याच्याबद्दल इतके सर्व माहिती असताना कुठलाच बाप आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात देणार नाही.
पण अंजु मात्र आता समजण्याच्या पार पलीकडे गेली होती. तिला वाटायचं ती सिनेमातील एखादी नटी आहे. जिला तिच्या विलन असणाऱ्या वडिलांनी तिच्या प्रियकरापासून दूर ठेवलंय. अगदी स्वप्नांच्या दुनियेत वावरणारी अंजु घरच्यांचे काही ऐकतच नव्हती.
तिच्या घरच्यांनी मात्र तिला आता घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. त्यांना वाटले होते की काही दिवस गेल्यानंतर अंजु आपोआप समजेल. पण त्यांचा हा विश्वास फोल ठरवत एके दिवशी अंजु अरुणसोबत घरातून पळून गेली.
एका मंदिरात जाऊन दोघेही लग्न करून घरी परतले. अंजू च्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा अंजूच्या आयुष्यात आता पुढे काय होणार ह्याची चिंता तिच्या आईवडिलांना लागून राहिली.
आपली मुलगी आपल्या शेजारीच राहते पण आपण तिला भेटू शकत नाही ह्या विचाराने अंजूच्या आईचे डोळे सतत पाणावत. लग्न झाल्यावर देखील घरच्यांनी अंजुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण अंजुने कुणाचेही काहीच ऐकुन घेतले नाही.
तिने तिच्या आईवडिलांना अपमानित करून घरातून काढून दिले तर आपल्या भावा बहिणीवर काठी घेऊन मारायला गेली. अंजु आता परतणार नाही हे एव्हाना सर्व घरातील मंडळींना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी आता अंजु च्या नशिबावर सर्व काही सोडले होते.
जसजसे दिवस जात होते तसतसे अरुणचे वागणे बदलत होते. अरुण दारू पिऊन यायचा आणि अंजुच्या घराबाहेर जोरजोराने भांडायचा. अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायचा. तुमच्या मुलीला कसं तुमच्या नजरेसमोर पळवून नेलं हे सांगताना त्याला फार अभिमान वाटायचा. अरुण चे हे बोलणे ऐकून अंजुचा भाऊ रागाने अरुण च्या अंगावर धावून जायचा. अंजु सुद्धा नवऱ्याची बाजू घेऊन तिच्या माहेरच्या लोकांशी भांडायची.
दिवसेंदिवस भांडणं वाढायला लागली होती. अरुण जाणूनबुजून अंजूच्या भावासमोर नको ते बोलायचा. अंजुच्या वडिलांना मात्र आता या भांडणांची भीती वाटत होती. आणि ते या सर्वांना कंटाळले देखील होते. म्हणून त्यांनी तिथले राहते घर विकून दुसऱ्या ठिकाणी घर घ्यायचे ठरवले. आणि काही दिवसांतच अंजुच्या माहेरचे तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले.
आई वडील जवळ असताना त्यांची किंमत नसलेल्या अंजूला ते निघून गेल्यावर मात्र त्यांची खूप आठवण यायची. त्यांच्याशी वाईट वागल्याचा तिला आता थोडा पश्चात्ताप व्हायला लागला होता. इकडे अरुणचे रात्री दारू पिऊन घरी येणे वाढले होते.
अंजुने एक दोनदा त्याला दारू न पिण्याबद्दल हटकले होते तेव्हापासून त्याने अंजुला मारहाण करणे सुरू केले. आणि त्याच दिवसांमध्ये अंजुला कळले की ती आई होणार आहे. तिला वाटले बाळाची बातमी ऐकून अरुण सुधारेल. जबाबदारीने वागेल. पण असे काहीच झाले नाही. उलट आता अंजुची दोन वेळ खाण्याचीही सोय होते नव्हती. गरोदरपणात तिला आता मजुरीला जाण्याची वेळ आली होती.
इकडे अरुण आता अंजुसोबत रोज भांडण करायचा. सुरुवातीला ” तू…मेरी जिंदगी है…” म्हणणारा अरुण आता ” तुम्ही ने मेरी जिंदगी खराब की हैं…” म्हणायला लागला होता. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी बरबाद झालोय. तुझा पायगुण खराब लागला म्हणून रोज तिला घालून पाडून बोलायचा. अशाच परिस्थितीत तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण त्या मुलाची अंजूसोबत आबाळ होत होती. शेवटी मुलगा एक वर्षाचा झाल्यावर अंजु त्याला घेऊन लोकांच्या शेतात मजुरीला जायला लागली.
अंजुला आता कळत होते की तिच्या वडिलांनी तिच्या आणि अरुणच्या लग्नाला का विरोध केला होता. एका मुलाची आई झाल्यावर तिला तिच्या आईच्या मनाची झालेली घालमेल कळत होती. अरुण चांगला माणूस नाही हे आईबाबा ओरडून सांगत असतानाही तिने त्यांचे ऐकले नव्हते.
अंजुच्या आईवडिलांनी अरुणचे त्याच्या दोन्ही बायकांबरोबरचे वागणे बघितले असल्यामुळे ते अंजुला समजावून सांगत होते. तिला आता खूप पश्चात्ताप होतो पण आता तिला एक मुलगा असल्याने ती मागे फिरू शकत नाही. तिच्या घरच्यांनी सुद्धा तिची कधी चौकशी केली नाही.
अंजुने अरुणच्या प्रेमासाठी आपल्या आईवडिलांच्या प्रेमाला नाकारले होते. पण ते खरंच प्रेम होते का ?
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेम कधी चुकत नाही. पण बरेचदा चुकते ती आपली निवड. आपली निवड चुकलेली असताना आपण सर्व दोष मात्र प्रेमालाच देतो. पण प्रेम हे आंधळेपणाने न करता डोळसपणे केलेले कधीही बरे…नव्हे का ?
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार Google.