” तुला काय वाटतं…असा कफल्लक झालेला तू मला तरी माझ्या आयुष्यात हवा असणार आहेस का…आणि तू काय मला सोडशील… मी स्वतःच तुला सोडतेय…म्हणूनच तर आज हे सगळं तुझ्यासमोर बोलून दाखवलं ना…आणि फसवणुकीची भाषा तू तरी न केलेलीच बरी…
स्वतःच लग्न झालेलं असताना बायकोला फसवून बाहेर अफेयर करताना कुठे गेला होता तुझा सच्चेपणा…तुझ्या बायकोला जेव्हा माझ्यासाठी रोज त्रास देत होतास तेव्हा नाही का वाईट वाटलं तुला…अरे इतक्या चांगल्या बायकोला तू फसवलेस….अर्ध्या संसारात साथ सोडून दिलीस… मग अशा माणसावर मी तरी कसा विश्वास ठेवणार होते…
मला तू उद्या एखाद्या दुसऱ्या मुलीच्या मागे लागून सोडले नसते ह्याची काय शाश्वती…तुझ्याजवळ पैसा असता तर मी निदान ती रिस्क तरी घेतली असती…पण आता तर त्याचीही शक्यता नाही…तरीही तुझ्यापेक्षा कैक पटीने बरी आहे मी…” श्वेता म्हणाली. आणि तावातावाने तिथून निघून गेली.
श्वेताने तिथून जाताच सागरने स्वतःच्या डोक्याला हात लावून घेतला. नेमकं काय घडलंय हे समजून घेण्यासाठी त्याला अजून काही वेळ लागणार होता. त्याचं डोकं सध्या काम करत नव्हतं.
इकडे एके दिवशी साकेत सरांच्या सोबत एक लहानशी चार वर्षांची मुलगी आली होती. साकेत सर आज जरा लवकरच शाळेत आले होते आणि सावी सुद्धा त्या दिवशी घरातून जरा लवकरच बाहेर पडली होती. त्या लहानशा गोड मुलीला पाहून सावी ची कळी खुलली. ती चिमुकली सुद्धा साकेत सरांच्या मागे मागे फिरत होती.
ती तिच्या बाललीला पाहण्यात दंग झाली होती. इतक्यात ती चिमुकली साकेत सरांना बाबा म्हणाली. ते पाहून सावीला आश्चर्य वाटले. कारण इतके दिवस झाले ती साकेत सरांना ओळखत होती पण कधीच त्यांनी त्यांच्या बायकोचा उल्लेख केला नव्हता.
हितेश सर जे नुकतीच आपली रजा संपवून पुन्हा शाळेत रुजू झाले होते ते सुद्धा एकदा साकेत सरांना गमतीने म्हणत होते की आता तुमच्या डोक्याला इतका ताण झेपणार नाही. तुम्ही लग्न करून घ्या म्हणून. मग जर सरांचे लग्न झालेले नसले तरीही ही मुलगी त्यांना बाबा का म्हणत असावी असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते.
इतक्यात साकेत सरांची आई शाळेत आली. त्यांनी त्या मुलीला जवळ घेतले. सावी तिथेच उभी असल्याने त्यांनी सा वीची सुद्धा प्रेमाने चौकशी केली. तेव्हा साकेत सरांनी साविची आणि आईची एकमेकींशी ओळख करून दिली.
साकेत सरांच्या आईने सावीला पाहून हसून सांगितले की साकेत नेहमी घरी तिचा उल्लेख करतो आणि तिने इतक्या कमी वेळात शाळेत सर्वांना कसा तिचा लळा लावला ते सांगत असतो. आई असे काहीतरी बोलेल अशी अपेक्षा नसलेले साकेत सर जरा ओशाळलेच.
मग थोड्या वेळाने त्यांची आई त्या चिमुकलीला घेऊन घरी निघून गेली. सावी साकेत सरांना तिच्याबद्दल विचारणारच होती पण शाळा सुरू व्हायची वेळ झाली होती. म्हणून मग तिने तेव्हा विचारणे टाळले. पण दुपारच्या सुट्टीत तिने हितेश सरांना मघाशी आलेल्या मुलीबद्दल विचारले.
तेव्हा तिला हितेश सरांनी सांगितले की ती छोटी मुलगी साकेत सरांच्या मोठ्या भावाची मुलगी श्रुती आहे म्हणून. साकेत सरांची वहिनी तिच्या बाळंतपणात मरण पावली होती. आणि आपल्या बायकोवर अतिशय प्रेम असणाऱ्या त्यांच्या भावाने ह्या सगळ्यांसाठी त्या नवजात मुलीला जबाबदार धरले होते.
आणि म्हणूनच त्यांच्या भावाने बायकोच्या माहेरच्यांना त्या मुलीला मी वागवणार नाही तेव्हा तुम्ही तिला सोबत घेऊन म्हणून सांगितले होते. त्यांच्या माहेरच्या लोकांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. शिवाय वहिनीच्या भावजयीचा ह्याला विरोध होता. म्हणून मग साकेत सरांनी समोर येत सगळी जबाबदारी स्वतः घेतली.
त्यांचा मोठा भाऊ नोकरीनिमित्ताने दुसरीकडे राहायला गेला. आणि साकेत सर आणि त्यांच्या आईने चिमुकल्या श्रुतीची सगळी जबाबदारी स्वतः घेतली. साकेत सर त्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावायचे. त्यांच्यासाठी ती त्यांचे सर्वस्व बनली होती. आणि श्रुतीला पण हाच आपला बाबा आहे असे वाटायचे.
हे सगळे सावीला कळल्यावर ती भारावून गेली. जिथे एक सख्खा बाप आपल्या आई नसलेल्या मुलीला वाऱ्यावर सोडतो तिथे एक व्यक्ती आपल्या भावाच्या मुलीला सख्ख्या मुलीपेक्षा ही जास्त जीव लावतो हे पाहून सावीच्या मनात साकेत सरांबद्दल असणारा आदर आणखीनच वाढला.
त्यानंतर श्रुती बऱ्याच वेळेला शाळेत यायची. एव्हाना तिची आणि सावीची चांगलीच गट्टी जमली होती. साकेत सरांना सावी च्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती होते. त्यांचा घटस्फोट होणार आहे ह्याची सुद्धा कल्पना होती. त्यामुळे आधी त्यांच्या मनात सावी बद्दल सहानुभूती होती.
पण त्यानंतर सावी ने ज्याप्रकारे ह्या सगळ्यांवर मात करत स्वतःला त्यामधून सावरले होते आणि एक उत्तम शिक्षिका म्हणून काम करत होती त्यावरून साकेत सरांना सावीचे खूप कौतुक वाटायचे. आणि हळूहळू साकेत सरांना सावी आवडायला लागली होती. पण सावी गावातल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातील मुलगी आहे.
शिवाय ते एका लहानशा गावातील साधारण शिक्षकाला त्यांचा जावई म्हणून पसंत करणार नाहीत हे माहिती असलेल्या साकेत सरांनी आपल्या भावनांना वाहवत जाऊ दिले नाही. पण जेव्हा ते श्रुती आणि सावीला एकमेकांसोबत बघायचे तेव्हा मात्र त्यांच्या मनात एक वेगळेच स्वप्न आकार घ्यायचे.
एके दिवशी दुपारी जेवणाच्या सुट्टीत सगळ्यांनी आपला डबा उघडला. सगळ्या शिक्षकांनी एकत्रच जेवण करावे असा मुख्याध्यापक पाटील सर ह्यांचा प्रेमळ हट्ट असायचा. कारण ह्यामुळे शिक्षकांमध्ये आपापसात सुसंवाद राहतो. अध्यापनात आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय ह्यांची माहिती सगळ्यांना होते असे त्यांचे मत होते.
त्या दिवशी सगळ्यांच्या डब्यात पोळी भाजी होती. फक्त एकट्या साकेत सरांच्या डब्यात फळं होती. तेव्हा हितेश सरांनी त्यांना विचारले.
” काय साकेत सर…? आज फक्त फलाहार घेणार का…?”
” हो…आज माझा उपवास आहे…” साकेत सरांनी उत्तर दिले.
” पण तुम्ही हे सगळं कधीपासून मानायला लागलात…जितकं मी तुम्हाला ओळखतो त्यावरून मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं मनापासून मानत नाही…” हितेश सर म्हणाले.
” हे खरंय की मी हे सगळं मानत नाही…माझ्यामते उपवास किंवा कर्मकांड न करताही परमेश्वराला प्रसन्न करता येते…” साकेत सर म्हणाले.
” मग हे उपवास वगैरे काय आहे…?” हितेश सरांनी विचारले.
” माझ्या आईला एकादशीचा उपवास असतो…पण आता वयोमानानुसार तिला जास्त वेळ उपाशी राहणे बरे नाही…शिवाय आता आईवर श्रुतीची जबाबदारी सुद्धा आहे त्यामुळे मीच तिला म्हटले की उपवास करत नको जाऊ…पण आमची आई खूपच श्रद्धाळू आहे…तिच्या मनाला ते पटत नाही…मग मीच तिला म्हणालो की तुझ्यावतीने सगळेच उपवास मी स्वतः करत जाईल…” साकेत सर म्हणाले.
” अच्छा…असे आहे तर…पण इकडे आल्यावर तुम्ही काय खाल्ले ते आईला थोडीच कळणार आहे…ही घ्या थोडी पोळी भाजी…” असे म्हणत हितेश सरांनी आपला डबा साकेत सरांच्या समोर ठेवला.
” नको…आईला जरी कळणार नसलं तरी माझं मलाच कळेल…आणि माझ्या अशा कृतीने मीच माझ्या नजरेतून पडेल…आईचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो मी नेहमीच जपत राहील…” साकेत सर म्हणाले.
यावर हितेश सरांनी आपला जेवणाचा डबा पुन्हा स्वतःकडे घेतला आणि जेवण करू लागले. पण साकेत सरांचे उत्तर ऐकून सावीच्या डोळ्यात मात्र वेगळीच चमक आली आणि ही चमक पाटील सरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. पाटील सर साकेतला म्हणाले.
” आईच्या मागे कामांचा व्याप होत आहे तर मग तुम्ही लग्नाचा विचार का नाही करत साकेत सर…?”
पाटील सरांचे बोलणे ऐकुन साकेत सरांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. पाटील सर इथे असे काही बोलतील ह्याची त्यांना अपेक्षाच नव्हती. पण तरीही त्यांना उत्तर देत साकेत सर म्हणाले.
” आजवर अनेक स्थळे आलीत…सगळ्यांची आधी पसंती असते…पण श्रुतीची गोष्ट कळताच सगळे बिचकतात…त्यांच्या मते मुलीला लग्न झाल्यावर नव्याची नवलाई न मिळता सरळ आईपणाची जबाबदारी मिळेल…ते ही कुण्या दुसऱ्याच्या मुलीची…अनेक जण मला असाही सल्ला देतात की की माझ्या श्रुतीला दादाकडे सोडून यावे…पण मला माहिती आहे की दादा श्रुतीला स्वीकारणार नाही…आणि जबरदस्ती मी तिला त्याच्याजवळ पाठवणार नाही…श्रुती फक्त माझी जबाबदारी नसून माझ्या काळजाचा तुकडा आहे हे कुणी समजून घेत नाही…”
साकेत सरांचे बोलणे ऐकताच सावी पटकन म्हणाली…
” अशी मुलगी सुद्धा लवकरच मिळेल तुम्हाला…जी तुमचं श्रुती वर असलेलं प्रेम समजून घेईल…तिला मनापासून स्वीकारेल…तुमच्या आयुष्यात असलेलं तिचं अढळ स्थान बदलण्याचा प्रयत्न करणार नाही…आणि तशीही श्रुती किती गोड मुलगी आहे…तिला तर पाहूनच कोणीही तिच्या प्रेमात पडेल…”
” पाहुयात पुढचं पुढे…” साकेत हसत म्हणाला.
सावीचे उत्तर ऐकून साकेत मनातल्या मनातच हसला होता. पाटील सरांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य पसरले. सावी नकळतपणे साकेत सरांच्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात पडली होती. फक्त तिचं मन ते मानायला तयार नव्हतं. कारण हे सगळं चूक की बरोबर ह्याचं द्वंद्व तिच्या मनात सुरू होतं.
दुसरीकडे सागर मात्र आता फक्त वेडा व्हायचा बाकी होता. श्वेताने केलेला एकूण एक खुलासा त्याच्यासाठी एकापेक्षा एक मोठा धक्का होता. तो तर खूपच आनंदात होता. कारण त्याला वाटले होते की आपले लहानपणीचे प्रेम आपल्याला मिळणार आहे. पण ते प्रेम तर फसवे निघाले.
सागर आता पुढे काय करेल…? दोघांचा घटस्फोट होईल का…? सागर पुन्हा सावीकडे परत जाईल की सावी नव्याने आयुष्याची सुरुवात करेल…? हे जाणून घेऊया पुढील भागात…
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)