पण हा सगळा वाद होताना पाटील सरांनी वेळेचे गांभीर्य ओळखून सावीच्या वडिलांना सागरच्या येण्याचे फोन करून कळवले होते. सावीच्या वडिलांना ही सूचना मिळताच ते तडक सावीच्या भावाला घेऊन तिथे आले. त्यांना दुरूनच येताना पाहून सागर पटकन गाडीवर बसून निघून गेला. जास्त वाद वाढू नये म्हणून सावीच्या वडिलांनी त्याचा जास्त पाठलाग केला नाही.
त्या दिवशी सावी लवकरच घरी निघून गेली. सागरच्या या कृत्यावर घरातील सगळेच रागात होते. सर्वात जास्त राग तर सावीला येत होता. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा तो एखाद्या निर्लज्ज माणसा सारखा पुन्हा तिच्या आयुष्यात यायच्या विचारात होता. पण यावेळी तिचा निर्धार ठाम होता. तिला त्याच्यासोबत राहायचे नव्हते. घरच्यांना सुद्धा तिचा हा निर्णय सर्वथा योग्य वाटला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा सावी पुन्हा शाळेत गेली तेव्हा साकेत सरांना पाहून तिला कालचा प्रसंग आठवला. आणि आपण किती त्वेषाने साकेत सरांसाठी सागरच्या समोर उभे ठाकलो होती हे तिला आठवले. हे आठवून ती सरांच्या समोर जरा अवघडली. तेव्हा साकेत सरांनी स्वतःहून बोलायला सुरुवात केली. साकेत सर म्हणाले.
” तुम्ही ठीक आहात ना मॅडम…?”
” हो… मी ठीक आहे…” सावी त्यांच्याकडे न पाहताच म्हणाली.
” कालच्या प्रसंगामुळे आपले कालचे बोलणे अर्धवटच राहिले…” साकेत सर म्हणाले.
” कोणते बोलणे…?” सावी विचार करत म्हणाली.
” तुम्ही काल श्रुतीला म्हणत होतात ना की तिने तुम्हाला आई म्हटलेलं तुम्हाला चालेल म्हणून…” साकेत सर म्हणाले.
त्यावर सावी काही बोलूच शकली नाही. ती नुसतं लाजली. आणि साकेत सरांपासून नजर चोरून उभी राहिली. मग साकेत सर पुढे म्हणाले.
” तुम्ही जेव्हा नव्याने शाळेत यायला लागल्या होत्या तेव्हा मला तुमचं खूप कौतुक वाटायचं…पण जसजसं मी तुम्हाला ओळखत गेलो तसतसं मी तुमच्या प्रेमात पडत गेलो…तुमचं कर्तृत्व, तुमची धडाडी, तुमचं निर्मळ मन, प्रसंगी सहनशीलता तर प्रसंगी कणखरपणा, नातं टिकवण्यासाठी कधी नमतं घेणं तर कधी आपल्या स्वाभिमानाला सर्वात आधी ठेवून इतरांना न जुमानणे….
तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या ह्या सगळ्या पैलुंच्या प्रेमात पडलोय मी…माझ्या मनात माझ्या जोडीदाराची प्रतिमा अगदी अशीच आहे…माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे…माझ्याबद्दल सगळे काही माहिती आहे तुम्हाला… श्रुतीची माझ्यावर असलेली जबाबदारी सुद्धा…तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून मला उत्तर द्या…
तुमच्या गतआयुष्यात ज्या घटना झाल्या त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला कठीण जाईल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे…पण तुमच्या मनात असे काहीच नसेल तर हे सगळं विसरून पुन्हा आपली मैत्री कायम राहील ह्याची की ग्वाही देतो…” साकेत सर म्हणाले.
त्यावर सावी काहीच बोलली नाही. ती काहीच बोलत नाही हे पाहून साकेत सर ओशाळले. त्यांना आधी वाटले होते की सावीच्या मनात देखील असे काही असावे. पण सावीच्या गप्प राहिल्याने त्यांच्या मनात धाकधूक वाढली होती. ते सावीला म्हणाले.
” मी बोललेले तुम्हाला आवडले नसेल तर आय एम व्हेरी सॉरी…कदाचित मी हे बोलायला नको होते…किंवा ही वेळ योग्य नसेल या सर्वांसाठी…” असे म्हणत ते तिथून जायला लागले. इतक्यात सावी त्यांना म्हणाली.
” तसे काही नाही…उलट मला आवडेल…”
” काय आवडेल…?” साकेत सरांनी विचारले.
” श्रुतीने मला आई म्हटलेले मला खूप आवडेल…तिने मला कायमस्वरूपी आई म्हणावे अशी माझीही इच्छा आहे…” सावी लाजत म्हणाली.
” म्हणजे…म्हणजे तुमचा होकार आहे…” साकेत सर आनंदाने म्हणाले.
त्यावर सावीने होकारार्थी मान हलवली. साकेत सर आणि सावी दोघेही खूप खुश होते. पाटील सरांना ह्या दोघांच्या मनाची अवस्था आधीच माहीत पडली होती. आणि त्याच दृष्टीने त्यांनी सावीच्या वडिलांशी याबाबत बोलून बघीतले होते. सावीच्या वडिलांनी ह्यावेळेला सगळे काही सावीच्या मर्जीने आणि पसंतीने होईल असे पाटील सरांना सांगितले होते.
इतक्या कमी वयात पोरीने खूप काही सहन केल्याची जाणीव त्यांना होती. शिवाय आपण मुलीसाठी जो मुलगा निवडलाय तो चुकीचा होता या जाणिवेने सुद्धा त्यांना अपराधी असल्या सारखे वाटत होते. म्हणूनच यावेळेला ते सगळं काही सावीच्या पसंतीने करणार होते. त्यांनी साकेत सरांबद्दल खूप काही चांगले ऐकले होते.
त्यांच्यामुळे गावातील अनेक मुले अभ्यासात प्रगती करत होती. परिस्थिती सामान्य असली तरी मुलगा मात्र शंभर नंबरी सोनं आहे हे ते जाणून होते. आणि दोघांचे लग्न झाले तर मुलगी गावातच राहील हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने चांगले होते.
शेवटी सावीने स्वतःच साकेत सरांबद्दल तिच्या घरी सांगितले. घरी सगळ्यांनाच हे ऐकून आनंदच झाला होता. साकेतची आई तर सावी त्यांच्या घरची सून बनून येणार म्हणून खूपच आनंदात होती. मात्र अजूनही सावीचा घटस्फोट राहिला होता. तेवढा एक कायदेशीर सोपस्कार पार पडला की मग काही काळजी उरणार नव्हती.
पण सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच सागरने घटस्फोट घ्यायला बराच त्रास दिला. सुरुवातीला तर त्याने कोर्टात सावीलाच चारित्र्यहीन ठरवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने सावी घरातून निघून गेल्यावर अती आत्मविश्वासाने श्वेता बरोबर सोशल मीडिया वर जे फोटोज् टाकले होते ते श्वेताच्या भावाने त्याच्या फोन मध्ये जपून ठेवले होते.
श्वेताचा आणि त्याचा ब्रेकअप झाल्यावर त्याने ते फोटो सोशल मीडिया वरून डिलीट केले होते. पण सेव्ह करून ठेवलेल्या फोटोंमुळे त्यांना या केस मध्ये बराच फायदा झाला. फक्त जो घटस्फोट लवकरात लवकर होणार होता त्या घटस्फोटाला जवळ जवळ एक वर्ष लागले. पण शेवटी सावीला घटस्फोट मिळालाच.
पण त्या एका वर्षात सावीने साकेतला समजून घेतले. आपला निर्णय योग्य आहे ह्याची तिला अनेकदा खात्री पटली. घटस्फोट झाल्यावर सावी आणि साकेतचे लग्न घरच्यांनी थाटामाटात लावून दिले. श्रुतीला आता तिच्या बाबांसोबत आई सुद्धा मिळाली होती. साकेतची आई तर इतकी चांगली सून दिल्याबद्दल देवाचे अनेक आभार मानत होती.
सावी सुद्धा साकेत सारखा जोडीदार मिळाल्याने खूप आनंदी होती. साकेत फक्त एक चांगला शिक्षकच नव्हता तर एक खूप चांगला व्यक्ती होता. अनेक वर्ष विश्वासघात सहन केलेल्या सावीला साकेतच्या रूपात एक प्रामाणिक जोडीदार मिळाला होता. आणि साकेतला सुद्धा सावी सारखी निर्मळ मनाची जोडीदार मिळाल्याने खूप खुश होता.
सागरने मात्र त्यानंतर अनेक वर्षे लग्नच केले नाही. त्याच्या चांगल्या सुरू असलेल्या संसारात त्याच्या एका चुकीमुळे वादळ आले. वरून आपली ती चूक सुधारण्या ऐवजी त्याने आणखी अनेक चुका केल्या. सावीने मात्र त्याची तो चूक पदरात घेत पोटतिडकीने आपला संसार वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न
केला होता.
पण क्षणिक मोहाला आणि आकर्षणाला आपले खरे प्रेम समजून त्याने सावीला स्वतःपासून कायमचे दूर केले होते. पण जेव्हा त्याला श्वेताचे खरे रूप कळले तेव्हा आपली चूक लक्षात न घेता केवळ आपल्या स्वार्थासाठी म्हणून त्याने सावीला परत मिळवू पाहिले. पण तोवर सावी त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती.
कुणीतरी खरेच म्हटले आहे की नात्याला एकदा गाठी पडल्या की मग त्या सोडवणे कठीण होऊन बसते. असेच सागर आणि सावीच्या बाबतीत घडले होते. नशिबाने सागरच्या पदरात सावी नावाचे अपार प्रेमाचे दान टाकले होते. पण तो ते ओळखू शकला नाही. ते म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते असेच काहीसे घडले होते त्याच्या बाबतीत. पण साकेतने मात्र या संधीचे सोने केले होते.
तुम्हाला काय वाटतं वाचकांनो. आपल्या सावीचा निर्णय योग्य आहे का…? मलातरी तिचा निर्णय अगदीच योग्य वाटतो…कारण जिथे आपल्या प्रेमाचा आदर केल्या जात नाही तिथे उगीचच थांबण्यास काही अर्थ नाही… उलट ज्या नात्यात आपल्याला प्रेम आणि सन्मान दोन्हीही एकत्र मिळतो अशा नात्यांचा सहर्ष स्वीकार करायला हवा…
समाप्त.
आपण माझ्या या कथेला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आपली खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कथा मालिकेसह… धन्यवाद !