अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला दोन दोन हजारांची पेंशन मिळायची. त्यावर घर कसतरी चालायचं.
नेहमीप्रमाणे आज सुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेला जिलबीचा पुडा दिला. आणि म्हणाले.
” घे बाळ…तुला आवडते ना जिलबी…तुझ्यासाठी आणली आहे…”
” कशाला आजोबा…उगाच खर्च…यात कशाला पैसे खर्च केले…” अभय काळजीने म्हणाला.
” इतक्या लहान वयात इतकी जास्त काळजी नको करू बाळा…तुझा आजोबा आहे ना तुमची काळजी घ्यायला… भागेलच कसतरी…” आजोबा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.
” आणि तुमची चप्पल खराब झाली होती…ती केली का दुरुस्त…” अभय म्हणाला.
” हो रे बाळा…केली दुरुस्त…” आजोबा म्हणाले.
” ही घे जिलबी आणि खा…” आजोबा म्हणाले.
” हो आजोबा…मी राधाला बोलावून आणतो…आणि दोघे मिळून खातो…” अभय म्हणाला.
आणि अभयने बाहेरच खेळत असलेल्या त्याच्या लहान बहिणीला हाक मारली. दादाची हाक ऐकून ती लगेच त्याच्याजवळ आली. तिच्या हाती जिलबी देत अभय म्हणाला.
” ही घे…आजोबांनी आणली आहे…तुला खूप आवडते ना…”
” वा वा….जिलबी…लवकर दे ना…मला खूप आवडते…” राधा म्हणाली.
आणि अभय ने जिलबी खायला दिली. राधाला जिलबी खूप आवडली. तिने अगदी मनसोक्त खाल्ली. अभय फक्त राधाला जिलबी खाताना बघत होता. तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूनच त्याचे पोट भरत होते. तिचं खाऊन झालं आणि ती अभयला म्हणाली.
” माझं पोट भरलय दादा…आता तू खा…मी बाहेर खेळायला जाते…”
आणि लगेच खेळायला पळाली सुद्धा. अभय जिलबी खायला जाणार इतक्यात त्याला आठवलं की राधाला जिलबी खूप आवडते. ह्यातील जिलबी उरली तर तिला उद्याही खाता येईल. आणि त्याने जिलबी खाल्लीच नाही.
त्याला आठवले की मागच्या वेळी शेजारच्या काकूंच्या घरी टीव्ही पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांच्या मुलीला जिलबी खाताना पाहून राधाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि हे जेव्हा त्या काकूंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी टीव्ही बंद करून तिला जायला सांगितले आणि नंतरच त्यांच्या मुलीला जिलबी खाऊ घातली होती. अभय सुद्धा त्यावेळी तिथेच होता. त्याला खूप राग आला होता आणि त्याहूनही जास्त वाईट वाटले होते. पण तो काहीच करू शकत नव्हता. परिस्थिती मुळे त्याचे हात बांधले गेले होते.
अभय आणि राधा दोघेही भावंडं. अभय आठ वर्षांचा तर राधा सहा. दोघेही आपल्या आजी आजोबांकडे राहायचे. त्याच्या वडिलांना देवाघरी जाऊन एक वर्ष झालं. आता फक्त त्यांची आईच त्यांचा आधार उरली होती. वडिलांचं छत्र तर गमावलं होतं पण निदान आई आपल्या सोबत आहे ही जाणीवही त्यांना खूप आधार देत होती.
पण बाबांच्या गेल्यानंतर अभय आणि राधा त्यांच्या आईसोबत काही दिवसांसाठी त्यांच्या मामांच्या घरी गेले आणि तिथे कोणीतरी आईसाठी स्थळ सुचवले. आई सुद्धा सततच्या हलाखीच्या जीवनाला कंटाळली होती. मग तिने मन कठोर केलं आणि दुसऱ्या लग्नाला होकार दिला. पण तिच्या दुसऱ्या नवऱ्याला तिच्या मुलांना ठेवून घ्यायचं नव्हतं. मग आईचं लग्न झाल्यावर मुलांना तिथून पुन्हा त्यांच्या आजी आजोबांकडे पाठवून दिलं मामाच्या घरच्यांनी.
अभय आणि राधा दोघेही खूप रडले आईसाठी. त्यांना त्यांच्या आईसोबत राहायचं होतं. पण आईने सुद्धा स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. आणि सोबतच ही दोन्ही भावंडे पोरकी झाली होती. सुदैवाने त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना मायेने जवळ केले आणि त्यांच्या प्रेमाने का होईना अभय आणि राधाच्या दुःखावर थोडीशी फुंकर घातली.
तरीही राधाला तिच्या आई वडिलांची खूपच आठवण यायची. लहान पोर ती. आईच्या आठवणीने हमसून हमसून रडायची. अशावेळी मग अभय स्वतःचे दुःख लपवून तिचे अश्रू पुसायचा. तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा. राधा सुद्धा अभय ला तिचं सर्वस्व मानायची. राधाला काहीही त्रास होऊ नये म्हणून अभय सर्वतोपरी प्रयत्न करायचा.
अभय जसजसा मोठा होत होता तसतसा तो आणखीनच समजदार होत होता. अभ्यासात तर अभय आधीपासूनच हुशार होता. पण त्याला लहान वयातच हे कळून चुकले होते की आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. स्वतःसोबतच तो राधाच्या अभ्यासाकडे ही काटेकोरपणे लक्ष द्यायचा.
राधा सुद्धा आपल्या दादा सारखीच हुशार आणि समजदार होती. दोघांनाही आपल्या परिस्थितीची पुरेपूर जाण होती. आईवडील नसताना आपणच एकमेकांचा आधार बनायला हवे हे इतक्या लहान वयात सुद्धा दोघांना कळलं होतं.
अभय जसजसा मोठा होत होता तसतसा तो अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा इतर कामे करायला लागला होता. जेणेकरून तो घरी आर्थिक हातभार लावू शकेल. आणि सोबत अभ्यासही चांगला सुरू होता. दोघांचीही अभ्यासातील प्रगती पाहून त्यांचे शिक्षक सुद्धा त्यांच्यावर खुश होते. त्यांच्या शिक्षकांनी एकदा शाळेत सगळ्यांनाच स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली.
आपण चांगला अभ्यास करून परीक्षेत पास झालो तर भविष्यात चांगले अधिकारी बनू शकू हे अभयला कळले होते. त्याने त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना या बाबतीत खूप मार्गदर्शन केले.
अभय बारावी आणि राधा दहावी उत्तम मार्गांनी पास झाले.पण दुर्दैवाने त्याचा सगळ्यात मोठा आधार असणारे आजोबा त्याच वर्षी वारले. अभयला पुढे शिकायची खुप इच्छा होती पण घरची जबाबदारी घेणे सुद्धा गरजेचे होते. शिवाय राधाचं पुढील शिक्षण चांगलं व्हावं अशी अभयची इच्छा होती.
म्हणून अभयने पुढे मुक्त विद्यापीठात बी ए ला एडमिशन घेतली आणि सोबतच एका मोठ्या किराणा दुकानात नोकरी सुद्धा करू लागला. पण त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. जसजसे तो या जगातील कटू अनुभव घ्यायचा तसतशी आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची त्याची जिद्द वाढतच जायची.
पण एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्याने अभयला त्याचं दुर्दैव किती मोठं आहे ह्याची जाणीव झाली.
एके दिवशी अचानक सामान पोहचवायचे म्हणून तो एका घरी गेला. चांगलं आलिशान घर होतं. त्याने दाराची बेल वाजवली. आत मधून चांगले हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. एका वयस्कर स्त्री ने दरवाजा उघडला. तिला पाहून अभय जागीच थबकला. तिला पाहून आज अनेक वर्षे झालेली असली तरी पण आपल्या आईला तो कसा विसरू शकणार होता.
आईला पाहून त्याच्या भावनांचा बांध तो रोखू शकला नाही. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याने लगेच गालावरचे अश्रू हातांनी पुसून घेतले. त्याची आई अजूनही मैत्रिणींसोबत बोलण्यात बिझी असल्याने तिचे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. आईला पाहून तिला मिठी मारावी, तिच्या कुशीत डोकं ठेवून मनसोक्त रडाव असे अभय च्या मनाला वाटले. पण बुद्धी मात्र त्याला तसे करण्यापासून रोखत होते.
त्याच्या मनाचे आणि बुद्धीचे हे द्वंद्व सुरू असताना तो दारात तसाच काहीही न बोलता उभा आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्याचा तो गबाळा अवतार आणि चेहऱ्याला रुमाल बांधून असल्याने त्याच्या आईने त्याला नीट पाहिले नव्हते. आणि अनेक वर्षे न पाहिल्याने न भेटल्याने त्याला ओळखणे कठीण होते. त्याला तसेच उभे असलेले पाहून त्याची आई त्याला म्हणाली.
क्रमशः
जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)