आज देशमुखांच्या घरात पूजा होती. त्यानिमित्ताने सगळी साग्रसंगीत तयारी केलेली दिसत होती. सोसायटी मधील महिला आणि दूरचे नातेवाईक एक एक करून येत होते. पूजेला सुरुवातच होणार होती. बायका आपापसात कुजबुज करत होत्या. बाजूच्या सामंत काकू म्हणाल्या.
” ह्याचं पण भलतंच काहीतरी सुरू असतं हा…पूजा करतायेत ते ठीक आहे एकवेळ…पण त्या निमित्ताने घराची सजावट काय केलीय…आणि देशमुख बाईंच्या चेहऱ्यावर तर आनंद काय ओसंडून वाहतोय की काय असे दिसत आहे…एकुलत्या एक मुलाचा घटस्फोट झालाय पण ह्यांना मात्र काही फरकच पडलेला दिसत नाही…”
” हो ना…निदान काही दिवस तरी थांबायचे असते…ह्यांना पाहून तर काही झालंय असे अजिबात वाटत नाहीय…” यादव बाई बोलल्या.
” पण का झाला ह्यांच्या मुलाचा घटस्फोट…?” सोसायटीत नवीनच राहायला आलेल्या परांजपे काकूंच्या सुनेने राजश्रीने प्रश्न विचारला.
” मुलगा तर चांगला विदेशात सेटल आहे…चांगला शिकलेला आहे…चांगली नोकरी सुद्धा करतो…दिसायला तर भारी देखणा…त्याला कोणी घटस्फोट द्यायचा विचार सुद्धा नाही करू शकत…त्यांच्या सूनेतच काहीतरी खोट असेल…दिसायला सुंदर होती…पण त्याच्या बरोबरीची पण पहायची असती ना एखादी…” सामंत काकू उत्तरल्या.
” आणि मी तर ऐकलंय की एका खेड्यातली मुलगी त्यांनी त्यांच्या मुलासाठी सून करून आणली होती…” यादव बाई नाक मुरडत बोलल्या.
” ऐकलंय की तिचं सुद्धा दुसरं लग्न झालंय मागच्या महिन्यात…आता मात्र तिच्या बरोबरीचा एखादा खेडूत मुलगा बघितला असेल…” पाटणकर बाई बोलल्या.
आणि यावर सगळ्या जणी दिलखुलास हसल्या.
इतक्यात देशमुख बाई तिथे आल्या. आणि त्यांनी सगळ्यांची हसतमुखाने चौकशी केली. कोणाला काही हवंय का म्हणून विचारले. आणि नंतर पूजेच्या तयारीला लागल्या. इतक्यात किचन मधुन त्यांची सून मधुरा चहाचा ट्रे घेऊन आली आणि तिने सगळ्या बायकांना चहा दिला. तिच्याकडे पाहून सगळ्या बायका अवाक् झाल्या.
कारण अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच तर तिचा डिव्होर्स झाला होता. आणि ही इथे काय करतेय. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक भलेमोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. सगळ्या एकमेकींकडे बघून डोळ्यांनीच एकमेकींना खुणावत होत्या. मधुरा मात्र त्यांना चहा देऊन पुन्हा घरातील कामाला लागली.
तिला पाहून तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट कुठेच दिसत नव्हतं. घटस्फोट होऊन सुद्धा ही इथे इतकी हसतमुखाने का बर वावरते य हे कोडं बायकांना सुटत नव्हतं.
मधुरा…पंचवीस वर्षांची असताना म्हणजे जवळपास दीड वर्षांपूर्वी तिचे लग्न मयंक सोबत झाले. मयंक जर्मनी ला एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करायचा. मागची सहा वर्षे तिथेच राहत होता. वर्षातून एकदा घरी यायचा. तो घरी आला की घरचे त्याला लग्न कर म्हणून सांगायचे. सुरुवातीला तो विषय टाळायचा पण एकदा त्याची आई नीलिमाताई त्याला म्हणाल्या.
” मयंक… बाळा नोकरीत तर तू प्रगती करतोच आहेस…आता लवकरच लग्नाचा सुद्धा विचार कर…एकदा का तू लग्न करून स्थायिक झालास की आम्हाला सुद्धा तुझे टेंशन राहणार नाही बघ…तू जी मुलगी पसंत करशील ती आम्हाला मान्य असेल…नाहीतर तुझ्या पाहण्यात एखादी मुलगी असेल तर खूपच चांगले…शेवटी संसार तुम्हा दोघांचा आहे…त्यामुळे तुझी पसंती महत्त्वाची…”
” नाही आई…माझ्या पाहण्यात अजुन तरी कोणी नाही…तुम्ही मुली पाहिल्यात तरी चालेल मला…” मयंक म्हणाला.
आणि निलिमाताई आणि वसंतरावांना खूप आनंद झाला. इतका मोठा विदेशात नोकरी करणारा मुलगा अजूनही आपल्या आईवडिलांच्या पसंतीची सून आणणार म्हटल्यावर दोघांनाही कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. दोघांनीही वेगाने काम सुरू केले. कारण मयंक फक्त महिनाभरासाठी सुट्टीवर आला होता.
आणि एक दोन मुली पाहिल्यानंतर देशमुख दाम्पत्यांनी मधुरा ला पाहिले. दिसायला सुंदर, इंग्लिश लीटरेचर मधून पदवी सुद्धा घेतली होती. खेड्यात राहणारी असली तरी तिच्यात भरपूर आत्मविश्वास दिसत होता. दोघांनाही एकाच नजरेत मधुरा आवडली होती. आता फक्त मयंक चा होकार बाकी होता.
आईवडिलांना पसंत पडली म्हणून मग मयंक सुद्धा तिला पाहायला गेला आणि तिला पाहताक्षणीच त्याने तिला होकार दिला. पण मुलगा विदेशात राहतो म्हणून तिच्या घरचे थोडे साशंक होते. पण वसंतराव देशमुखांचे नाव खूप मोठे होते. अडल्या नडलेल्या ना मदत करणारे म्हणून त्यांची ख्याती होती. म्हणून मग मधुराच्या वडिलांनी जास्त विचार न करता आपल्या मुलीचा हात मयंक च्या हातात दिला.
मयंकची सुट्टी फार कमी वेळ असल्याने लवकरच लग्न आटोपून घ्यावे म्हणून लग्नसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला. आणि अगदी काही दिवसातच मधुरा देशमुखांची सून बनून घरी आली. लग्नानंतर दोघा नवरा बायको ला फक्त दहा दिवस सोबत राहायला मिळणार होते कारण त्यानंतर लगेच मयंक ला जर्मनीला परतायचं होतं.
तो जर्मनीला गेल्यावर मग मधुराच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून तिला तिच्या सोबत घेऊन जाणार होता. तोवर मधुरा इथेच राहणार होती. दोघेही एकमेकांबरोबर चा प्रत्येक क्षण या दहा दिवसांत पुरेपूर जगले होते. आणि मयंक त्याच्या सहवासाच्या अनंत आठवणींची ठेव मधुरा कडे ठेवून पुन्हा जर्मनी ला निघून गेला.
मधुरा मात्र इथे सासरी चांगलीच रमली होती. नीलीमाताई आणि वसंतरावांना तर मधुराच्या रूपाने घरात चैतन्याचा वावर असल्यासारखेच वाटायचे. दोघांनाही मुलगी नव्हती. म्हणून त्यांनी मधुराला अगदी मुलीसारखा जीव लावला होता. मधुरा ने सुद्धा त्यांना आपल्या आईवडिलांची जागा दिली होती.
मयंक जर्मनी ला गेल्यावर आधी रोज दिवसातून एकदा कॉल करायचं नंतर मात्र दोन तीन दिवसातून एकदा त्याचा कॉल यायला लागला. आणि आधी त्याच्या बोलण्यात जो प्रेमाचा ओलावा जाणवायचा तो मात्र आता कुठेतरी हरवल्या सारखा वाटायचं मधुराला. पण मोठी नोकरी म्हणजे जबाबदारी देखील मोठी असेल आणि शिवाय तो परदेश. कितीही म्हटलं तरी कामाचा ताण तर येतच असेल असा विचार करून मधुरा स्वतःला समजवायची.
घरातील कामे करूनसुद्धा मधुराला बराच मोकळा वेळ मिळायचा. मग वेळ जावा म्हणून तिने तिच्या सासू सासर्यांकडे नोकरी करण्याची परवानगी मागितली. त्यांनीही तिला नोकरी करण्याला प्रोत्साहनच दिले. जर्मनीला जाईपर्यंत इथे नोकरी करेल तर तिचा वेळही चांगला जाईल या उद्देशाने वसंतरावांनी त्यांच्या मित्राच्याच शाळेत तिला शिक्षिका म्हणून रुजू केले.
आता मधुरा चा वेळही चांगला जात होता. तरीही नवीन लग्न आणि नवऱ्याचा हवाहवासा सहवास याच्या ओढीने ती मनातून केव्हाच जर्मनीला पोहचली होती. आता ती सगळ्या कागदपत्रांची पूर्तता व्हायची आणि मयंक जवळ जायची वाट पाहत होती. ती बरेचदा मयंक ला म्हणायची की लवकरात लवकर सगळी प्रक्रिया पूर्ण करून घे. पण मयंक मात्र विषय टाळायचा. मधुरा मात्र अजूनही त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असल्याने तिला या गोष्टी लक्षात नाहीत यायच्या.
पण वसंतरावांच्या मात्र हळूहळू लक्षात यायला लागले होते. ते जेव्हा मधुराला जर्मनीला पाठवायचा विषय काढायचे तेव्हा तेव्हा मयंक विषय दुसरीकडेच नेऊन ठळक मुद्दा मुद्दाम दुर्लक्षित करायचा. वसंतराव मयंक चे वडील असले तरीही ते प्रत्येक गोष्टीकडे चौकसपणे बघायचे.
आताही त्यांना मयंक च्या वागण्यात काहीतरी वेगळं वाटत होतं. कारण लग्नाला आता सहा महिने होत आले होते तरीही मयंक स्वतः मधुराला घ्यायला आलेला नव्हता आणि त्याने काही पर्यायी व्यवस्था देखील केलेली नव्हती. शिवाय तो मधुराला दोन तीन दिवसातून एकदा फोन करतो ही बाब सुद्धा त्यांना नीलिमा ताईंकडून समजली होतीच.
क्रमशः.
जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)