जगावेगळे नाते – भाग ३

“वास्तव हेच आहे की तुझा हा मुखवटा आज पूर्णपणे उतरला आहे!” आरोहीचा आवाज संपूर्ण बंगल्यात घुमला, “तू ज्या स्त्रीला तुझी पत्नी म्हणून आणलेस, त्याच स्त्रीच्या आत्मसन्मानाच तू माती केलीस! तू मला फसवलेस, माझ्या आई-वडिलांच्या विश्वासाशी खेळलास! पण लक्षात ठेव, मी आरोही आहे… खेड्यातून आलेली असली तरी माझ्यात स्वाभिमान नाही असे नाही. मला तुझा एक सेकंदही सहवास नकोय. तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाची पत्नी म्हणून या समाजात वावरायला मलासुद्धा आवडणार नाही. मला तुझ्यासोबत एक क्षणही राहायचं नाही, मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय!”

 

आरोहीच्या शब्दांनी आयुष आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले होते की आरोही घाबरून जाईल, गप्प बसेल, समाजाच्या भीतीने हे सगळं सहन करेल. पण आरोहीच्या त्या शब्दांमधील वजनाने त्याला हादरवून सोडले.

 

” तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय. मला मिळवायला कितीतरी मुली मरतात. कितीतरी मुलींचं स्वप्न असेल की आयुष सारखा नवरा मिळो. अन् तुला माझी पत्नी बनण्याच भाग्य मिळालंय तर तू ते लाथाडतेस.”

 

” हो. लग्न म्हणजे फक्त एखाद्याची पत्नी बनून मिरवणे नाही. तर लग्नात एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान, आपुलकी, खरेपणा, जबाबदारी असायला हवी. नाहीतर सगळं व्यर्थ आहे. आणि तुझ्यासारख्या मुलांवर लाख पोरी मरत असतील पण या चेहऱ्याच्या मागे जेव्हा तुझा हा खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल तेव्हा त्या पण हेच करतील जे मी करतेय.” आरोही त्याच्या नजरेत नजर देत म्हणाली. आणि तिची बॅग घेऊन तिथून निघून गेली.

 

आयुषला वाटले की घरच्यांनी समजावले की येईल लगेच परत म्हणून त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आरोही माहेरी परतल्यावर ही बातमी जेव्हा आरोहीच्या माहेरच्या लोकांना समजली, तेव्हा ते तात्काळ देशमुखांच्या घरी आले. त्यांनी सुरुवातीला वसंतराव आणि नीलिमाताईंवर रोष धरला, कारण त्यांना वाटले होते की या फसवणुकीत त्यांचेही कुटुंबीय सामील आहेत. पण जेव्हा आरोहीने स्वतः पुढे येऊन आपल्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितले की, बाबा, यात आयुष च्या आई वडिलांची काहीही चूक नाही, ते स्वतः फसवले गेले आहेत, तेव्हा माहेरच्या लोकांनी आरोहीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

 

आयुष एका आठवड्यानंतर पुन्हा जर्मनीला निघून गेला. त्याला वाटले की लांब गेल्यावर प्रकरण शांत होईल. पण आरोहीने एका क्षणीही न घाबरता पुण्याच्या न्यायालयात वकीलांमार्फत घटस्फोटाचा दावा (Divorce Petition) दाखल केला.

 

या संपूर्ण प्रवासात वसंतराव आणि नीलिमाताईंनी आरोहीची सावली होऊन साथ दिली. त्यांनी आयुषला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तू जर आरोहीला सन्मानाने घटस्फोट दिला नाहीस, तर तुझ्या नावावर असलेली पुण्याची कोणतीही संपत्ती किंवा जमिनीचा ताबा तुला मिळणार नाही आणि आम्ही तुझा संबंध कायमचा संपवू.”

 

आयुषला शेवटी कायदेशीर दबावामुळे आणि परदेशात अडकण्याच्या भीतीने काही महिन्यांनी भारतात यावे लागले. कोर्टात अत्यंत नाट्यमय युक्तिवादानंतर, अखेर कायदेशीररीत्या आयुष आणि आरोहीचा परस्परसंमतीने घटस्फोट (Divorce) मंजूर झाला. आयुषने कागदपत्रांवर सह्या केल्या आणि तो कायमचा पुन्हा जर्मनीला निघून गेला. तो जाताना वसंतरावांच्या पदरी केवळ पश्चाताप उरला होता.

 

घटस्फोटानंतर आरोहीने स्वतःला पूर्णपणे सावरले. तिने शिक्षकी पेशा अधिक जोमाने सुरू केला. शाळेतील चिमुरड्या मुलांच्या प्रेमाने आणि त्यांच्या भविष्याने तिच्या आयुष्याला एक नवीन अर्थ दिला. वसंतराव आणि नीलिमाताई आता तिला आपली सून नाही तर चक्क आपली मुलगी मानू लागले होते. ते तिला आपल्याच घरात ठेवण्यासाठी आग्रही होते, पण आरोहीने स्वतःच्या पायावर उभे राहून, मान ताठ ठेवून जगण्याचा निश्चय केला होता.

 

 

दिवस निघून जात होते. काळ सर्व काही विसरवतो असे म्हणतात, पण काही जखमांच्या खुणा मनावर कायम राहतात. वसंतरावांच्या मनात मात्र सतत एक सल होती की, त्यांच्या घरच्या चुकीमुळे एका गुणी मुलीचे आयुष्य अंधारात गेले.

 

अशातच एक दिवस, वसंतरावांचे जुने स्नेही आणि ज्या शाळेत आरोही शिकवायची त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त केशवराव देशमुखांच्या घरी आले.

 

केशवराव हे अत्यंत दिलदार आणि आधुनिक विचारांचे व्यक्ती होते. त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच वारली होती. त्यांना दोन मुले होती. मोठा मुलगा परदेशात स्थलांतरित झाला होता, तर त्यांचा लहान मुलगा निशांत हा त्यांच्यासोबतच राहत होता. निशांतला कॉर्पोरेट नोकरीत रस नव्हता, तर त्याला फोटोग्राफी आणि वन्यजीव चित्रणात (Wildlife Photography) आपले करिअर करायचे होते. तसेच तो आपल्या वडिलांच्या शिक्षण संस्थेच्या काही प्रकल्पांत मदत करत असे.

 

केशवरावांनी चहाचा कप हातात घेत थेट मुद्दाम विषयाला हात घातला.

 

“वसंता, मी जे ऐकतोय ते खरंय का? आरोही आणि आयुषचा कायदेशीर घटस्फोट झालाय?” केशवरावांनी अत्यंत आत्मीयतेने विचारले.

 

वसंतरावांनी मान खाली घातली, डोळ्यांत पाणी आणत ते म्हणाले,

 

“खरं आहे केशव… माझ्याच पोराने एका निरपराध आणि गुणी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मला स्वतःचीच लाज वाटतेय की मी असा नालायक मुलगा जन्माला घातला.

 

“यात तुझी काहीच चूक नाही मित्रा,” केशवराव खांद्यावर हात ठेवत म्हणाले,

 

“वाईट परिस्थिती माणसाच्या आयुष्यात येते, पण त्यावर मात करून कोण पुढे जाते हे महत्त्वाचे आहे. मी आरोहीला गेल्या दीड वर्षांत बघितलंय. ती किती कष्टाळू, प्रामाणिक आणि स्वाभिमानी मुलगी आहे हे मला माहीत आहे. म्हणूनच माझ्या मनात एक विचार आलाय… जर तुझी आणि आरोहीची हरकत नसेल, तर मी माझ्या लहान मुलासाठी, निशांतसाठी आरोहीचा हात मागू इच्छितो!”

 

वसंतराव आणि नीलिमाताई दोघेही चक्रावून गेले. वसंतराव म्हणाले,

 

“केशव! तू काय बोलतोयस? तुझा मुलगा अविवाहित आहे आणि आरोही घटस्फोटित… समाज काय म्हणेल? आणि तुमच्या घरचे लोक…”

 

“समाज काय म्हणेल याचा विचार करून जर आपण आयुष्य जगलो असतो, तर आज माणसाची प्रगती झाली नसती,” केशवराव ठामपणे म्हणाले,

 

“माझा निशांत सुद्धा खूप समजदार आहे. मी त्याच्याशी बोललो आहे. त्याने स्वतः आरोहीला शाळेच्या एका कार्यक्रमात फोटोग्राफी करताना पाहिले आहे आणि तिचा तो आत्मविश्वास त्याला आवडला आहे. तो तिला आनंदाने स्वीकारायला तयार आहे.”

 

जेव्हा हा प्रस्ताव वसंतरावांनी आरोहीसमोर ठेवला, तेव्हा आरोही आधी लग्नाबद्दल ऐकून हादरली. तिचा लग्नावरील, पुरुषांच्या शब्दांवरील आणि प्रेमावरील पूर्णपणे विश्वास उडाला होता. तिने या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला आणि त्यांना म्हणाली.

 

“काका, तुम्ही हे काय बोलताय? माझे आयुष्य आधीच एका वादळातून गेले आहे. मला आता कोणासोबतही नवीन बंधन नको आहे. मला माझे आयुष्य एकटीने आणि स्वाभिमानाने जगायचे आहे,” आरोहीने डोळ्यांत पाणी आणत स्पष्ट सांगितले.

 

पण नीलिमाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने समजावले,

 

“बेटा आरोही, सगळेच पुरुष आयुषसारखे स्वार्थी नसतात. निशांतला आम्ही जवळून ओळखतो. त्याचे कुटुंब तुझ्या भूतकाळाला नाही, तर तुझ्या या वर्तमानाला आणि तुझ्या आत्मसन्मानाला मान देणारे आहे. तू किमान एकदा त्याला भेटून तर बघ.”

 

आरोहीने शेवटी नीलिमाताईंच्या आग्रहास्तव आणि वसंतरावांच्या प्रेमाखातर निशांतला भेटण्याचे मान्य केले.

 

जेव्हा आरोहीची भेट निशांतसोबत झाली, तेव्हा तिला एका वेगळ्याच स्वभावाचा माणूस भेटला. निशांत अतिशय शांत, मितभाषी आणि कलासक्त तरुण होता. त्याने आरोहीला भूतकाळाबद्दल कोणताही प्रश्न विचारला नाही, उलट तिच्या स्वाभिमानाची आणि तिच्या महत्त्वाकांक्षेची प्रशंसा केली. त्याने तिला सांगितले,

 

“आरोही, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण भविष्य नक्कीच आपल्या हातात रंगवू शकतो. मला एक अशी जोडीदार हवी आहे जी माझ्या कलात्मक जगण्याला समजून घेईल, आणि मला खात्री आहे की तुम्ही ती व्यक्ती आहात.”

 

निशांतच्या त्या प्रामाणिक आणि निर्मळ वागण्याने आरोहीच्या मनातील भीतीचा बर्फ हळूहळू वितळू लागला. शेवटी, वसंतराव, नीलिमाताई आणि केशवरावांच्या आशीर्वादाने अत्यंत साध्या आणि मांगल्याच्या वातावरणात निशांत आणि आरोहीचा विवाह सोहळा संपन्न झाला.

 

आणि आज, त्याच नव्या संसाराच्या आणि समाधानाच्या सावलीत देशमुखांच्या घरी एका विशेष सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

 

जेव्हा भटजींनी उच्च आवाजात मंत्रोच्चार करत घोषणा केली, “मुख्य यजमानांनी आता पूजेच्या पाटावर येऊन बसावे…”

 

तेषॉलमध्ये उपस्थितांसमोर आरोही आणि निशांत दोघेही जोडीने अत्यंत आदराने, प्रसन्न चेहऱ्याने आणि अभिमानाने येऊन बसले.

 

सकाळी जिच्यावर कुजबुज सुरू होती, तीच आरोही आज एका नव्या नवरूपात, अत्यंत मानाने आणि अभिमानाने देशमुखांच्या घरात सून म्हणून नव्हे तर एक लेक म्हणून बसली होती. बाहेर उभ्या असलेल्या सुलोचना काकू आणि सुमन बाईंचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांना समजले नव्हते की या प्रसंगावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी.

 

वसंतराव आणि नीलिमाताई डोळ्यांत आनंदाचे अश्रू आणून त्या दोघांकडे पाहत होते. आज त्यांना खात्री पटली होती की, नियती जर एका हाताने सर्वकाही हिरावून घेत असेल, तर दुसऱ्या हाताने त्याहून कैक पटीने सुंदर आणि प्रेमळ असे काहीतरी परत देते.

घरात भटजींचे मंत्रोच्चार सुरू झाले आणि त्या पवित्र वातावरणात सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक समाधानाचे आणि विजयाचे गोड हसू पसरले.

क्रमशः

जगावेगळे नाते – भाग ४

Leave a Comment