धीरज घरी आला होता पण आल्यापासून एकदाही त्याला राधा दिसलीच नव्हती. राघव तेवढं दोन चार वेळा दिसला होता पण धीरज ला पाहून एकदाही त्याच्याकडे बोलला नव्हता. उलट त्याला टाळून निघून जायचा. राघव च्या घरचे सुद्धा त्याच्याशी अजिबात बोलत नव्हते.
मनातल्या मनात राघव म्हणाला की एकदा का शनायाची प्रॉपर्टी मला मिळाली की मग ह्या सगळ्यांना सांगतो. आज मला टाळणारे उद्या माझ्या मागे मागे फिरतील असे म्हणून तो स्वतःचा अहंकार कुरवाळत बसायचा. त्याने शनायाला बरेचदा त्याबद्दल आठवण सुद्धा करून दिली होती.
पण कायदेशीर बाबींना वेळ लागतो असे म्हणून तिने त्याचे बोलणे टाळले होते. धीरजला मात्र राधाला पाहायची खूप जास्त इच्छा होत होती. एकदा त्याला राघव दिसला. नेहमी प्रमाणेच धीरज दिसल्यावर राघव ने त्याचा रस्ता बदलला. तेव्हा धीरज जाणूनबुजून राघव जवळ आला आणि त्याला म्हणाला.
” काय राघव…मला टाळतो आहेस का…?”
” मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये…”
” का…मी सोडलेली बायको चालते तुला…पण माझं बोलणं नाही सहन करू शकत का…?”
धीरज चे बोलणे ऐकुन राघवचा राग अनावर झाला. त्याने जोरात जाऊन धीरज ची कॉलर पकडली आणि जोरात म्हणाला.
” ए…धीरज…जास्त डोक्यात जाऊ नकोस…तू इतकं सगळं केल्यावर तुला तसा सोडलाय ह्यातच धन्यता मान…”
” काय झालं…राधाचं नाव काढल्यावर राग आला वाटतं बाळाला…” धीरज त्याला चिडवत म्हणाला.
त्या सरशी राघवने त्याला एका धक्क्यात जमिनीवर पाडले आणि त्याच्या जवळ जात म्हणाला.
” तिचं नाव काढायची सुद्धा लायकी नाही तुझी…माझ्या बायकोचं नाव याच्यानंतर ओठावर जरी आलं ना तरी तुला काही बोलायच्या लायक नाही ठेवणार…गाठ बांधून ठेव…”
त्यानंतर धीरजने राघवला मारायला म्हणून हात उचलला तेव्हा राघवने तो हात हवेतच अडवला.
राघव त्याला आणखी काही बोलणार इतक्यात त्यांचा आवाज ऐकून बाजूचे लोक धावत आले. धीरजला पाहून ते म्हणाले.
” काय करताय तुम्ही लोक…आणि राघव तू तर असा नाहीयेस ना…कशाला ह्या धीरजच्या नादी लागतो आहेस…ह्याने तर सगळ्या गावाचं नाव खराब केलं आहेस…” तो माणूस राघवला म्हणाला.
तसा राघव तिथून जायला निघाला. पण धीरजला त्या माणसाच्या बोलण्याने आणि राघवच्या वागण्याने अपमानित झाल्यासारखे वाटत होते. ह्या अपमानाचा बदला घेईलच असे म्हणून त्याने स्वतःची कॉलर नीट केली.
राघवला दोन तीन दिवसांसाठी मुंबईला जावे लागणार होते. त्याच्या फळांच्या ताज्या रसांपासून पेय बनवण्याच्या कारखान्यासाठी फायनान्स मिळण्यासाठी त्यांना दोन चार कंपनी सोबत मीटिंग होती. राधाला राघव शिवाय घरात काही आधार लागत नव्हता. पण राघवचे जाणे खूपच महत्वाचे होते. म्हणून मग राधासुद्धा काहीच बोलली नाही.
राघव सकाळीच घरून मुंबईसाठी रवाना झाला होता. पण जाताना वडील केशवराव आणि माधव दादाला राधाची काळजी घ्यायला बजावले होते. सुलोचनाताई आताशा जरा राधाच्या बाबतीत हळुवार पणे बदलायला लागल्या होत्या. राधाचा लाघवी स्वभाव आणि तिची कामसू वृत्ती त्यांना मनापासून आवडली होती. शिवाय काहीही झाले तरी राधा त्यांची आवडती भाची होती. जास्त दिवस त्या राधाला. दूर राहू शकणार नव्हत्याच. फक्त अजुन त्यांनी तसे कबूल केले नव्हते.
संध्याकाळच्या वेळी मीनाक्षीने राधाला सगळ्यांचा चहा ठेवायचे सांगितले. राधा ने चहा ठेवला तर खरे पण आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात आज दूध बऱ्याच वेळा पासून बाहेरच ठेवलेले असल्याने दूध खराब झाले होते. म्हणून मग राधा बाहेर येऊन मीनाक्षीला म्हणाली.
” ताई…आज दूध सगळं खराब झालंय… गोठ्यातून दूध येईलच इतक्यात…दूध आलं की ठेवते चहा…”
” अगं सदा काकाला कसं कळणार की आपल्याला लवकर दूध हवंय म्हणून…ते उशीरच करतील नेहमीप्रमाणे…त्यांना जाऊन सांग…म्हणावं आताच दूध हवंय…जरा लवकर आणून द्या…” मीनाक्षी म्हणाली.
” पण ताई…मी आजवर कधी गोठ्यात गेलेले नाही…” राधा कचरत म्हणाली.
” आजपर्यंत गेलेली नाहीस म्हणजे काय…कधी ना कधी तर जावच लागेल ना…मग आज का नाही…की काम टाळायचा प्रयत्न करत आहेस…” मीनाक्षी तिरकसपणे म्हणाली.
” तसं नाही ताई…” राधा अडखळत म्हणाली.
” मग कसं आहे…तुला काय वाटतं…मी नाहीतर आईने जाऊन सांगावं का गोठ्यात…?” मीनाक्षी पुन्हा रागाने म्हणाली.
” तसं नाही ताई…मी लगेच जाते…” राधा म्हणाली.
मीनाक्षी आणि राधाचे हे बोलणे पायऱ्यांवरून येणाऱ्या माधव ने ऐकले होते. पण तो मीनाक्षीला काही बोलणार इतक्यात राधा लगेच गोठ्यात जायला निघाली. मग तो काहीच बोलला नाही. माधव ला शेतात जायला उशीर होत होता. आज रात्रभर पिकांना पाणी द्यायचे होते. दिवसा लोडशेडींग सुरू झाल्याने शेताला रात्रीच पाणी द्यावं लागायचं.
गोठा तसा फार दूर नव्हता. फक्त केशवराव आणि त्यांच्या भावाचं घर ओलांडल की लगेच मागच्या बाजूने त्यांचा गोठा होता. गोठा दोनही भावांचा मिळून होता. फक्त राधा आधी कधी गोठ्यात गेली नसल्याने तिला गोठ्यात जाणे जरा विचित्र वाटत होते. शिवाय धीरज गावात आल्यापासून ती बाहेर निघणे पूर्णपणे टाळत होती.
तरीपण आज राधा जेव्हा गोठ्यात जायला निघाली तेव्हा धीरजने तिला पाहिलेच. त्याला राधाशी बोलायचं होतं. आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं. आपण कसे भोळे आहोत आणि शना याने आपल्याला ब्लॅकमेल करून पळून जायला भाग पाडले ते तो राधाला सांगणार होता. पण राधा आता दुसऱ्या कुणाचीतरी बायको आहे हे तो सपशेल विसरला होता.
राधाने गोठ्यात जाऊन सदा काकांना आवाज दिला. सदा काकांनी नुकतेच गाईचे दूध काढले होते. राधा सदाकाकांना म्हणाली.
” काका…आज जरा लवकर दुध घेऊन घरी याल का…?”
” हो…लगेच येतो बाईसाहेब…” सदा काका म्हणाला.
राधा गोठ्यातून जायला निघाली तसा धीरज मागून आला. आणि सदाकाकाला म्हणाला.
” सदा काका…आई तुम्हाला तातडीने बोलावते आहे…तिला काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे…”
धीरज चा आवाज ऐकून राधा एकदमच दचकली. तिला लगेच तिथून निघून जायचं होतं. पण तो ऐन गोठ्याच्या दारात उभा असल्याने त्याच्या जवळून जाणं तिला नकोसं वाटल्याने ती तिथेच आडोशाला जाऊन पाठमोरी उभी राहिली. धीरज दारा जवळून हटला की आपण लगेच निघून जायचं हे तिने ठरवलं होतं. धीरजचे ऐकून सदाकाका धीरजला म्हणाला.
” पण दादा…मला जरा माधव दादाच्या घरी हे दूध द्यायचं आहे तातडीने…”
” आईला काहीतरी त्याहून जास्त महत्त्वाचं काम आहे…तुम्ही जा लगेच…” धीरज म्हणाला.
मग मात्र सदा काकांचं काहीच चाललं नाही. सदा काका जायला निघाले. धीरजचा आवाज ऐकून कटू आठवणींच्या गर्तेत सापडलेल्या राधाला कसेतरीच झाले. सदा काकाला धीरज काहीतरी पूर्व योजनेनुसार पाठवतोय हे तिच्या लक्षात येईस्तोवर सदा काका गोठ्याच्या बाहेर पडला सुद्धा होता.
राधा घाईघाईने त्याच्या मागून जायला निघाला. तसा धीरजने मागून तिचा हात पकडला. राधाला त्याचा ओंगळवाणा स्पर्श लगेच समजला. तिने त्याचा हात झटकला आणि एक सणसणीत कानाखाली वाजवली. साधी सुधी दिसणारी राधा अशी वागेल ह्याची जराही कल्पना नसलेल्या धीरजसाठी तो एक मोठा धक्का होता. तो राधाला म्हणाला.
” मला कळतंय तुला माझा राग आलाय…पण मी काय म्हणतो ते एकदा ऐकून तरी घे…”
त्यावर जळजळीत कटाक्ष टाकत राधा म्हणाली.
” मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये…मला तर तुझं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाहीये अजिबात…पुन्हा कधी मला दिसुही नकोस…”
आधी आपल्या मागेपुढे करणारी, आपल्यासोबत दिवस रात्र फोनवर बोलणारी राधा आपल्याला कानाखाली मारते, आपल्याला टाळते, एकेरीत बोलते आणि पुन्हा कधी तोंड दाखवू नको म्हणून सूनावते हे धीरजला सहन होणे शक्यच नव्हते. तरीही एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो तिला म्हणाला.
” मी काय म्हणतोय ते तू एकदा ऐकून तरी घे…अगं शनाया ने मला खूप जास्त ब्लॅकमेल केले म्हणून मला असे करावे लागले…माझा अन् तिचा काहीच संबंध नव्हता ग…तिला मी आवडायचो पण मला ती नाही आवडायची…पण तिने मला धमकीच दिली जीव देण्याची…मग मला जावच लागलं तिच्याजवळ…माझ्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो…”
पण राधाला आता त्याची एकही गोष्ट ऐकायची नव्हती. आणि त्याच तोंडही पहायचं नव्हतं. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून गोठ्यातुन बाहेर निघायला लागली. तर समोर शनाया उभी. राधा ने तिलाही टाळले आणि ती पुढे जाऊ लागली इतक्यात शनायाने मागून तिचा हात पकडला आणि म्हणाली.
” काय गं…दिसते तर खूप साधी सरळ…आणि असं लपून छपून दुसऱ्याच्या नवऱ्याला भेटायला लाज नाही का वाटत…की अजूनही जुनं प्रेम विसरू शकली नाहीस…” शनाया म्हणाली.
” तोंड सांभाळून बोल… ह्या तुझ्या नवर्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही…आणि इतकाच चांगला आहे तुझा नवरा तर त्यालाही विचार ना तो इथे काय करतोय ते…” राधा रागाने म्हणाली.
” त्याला तर मी पाहणारच आहे…पण आधी तुझ्याशी काही हिशोब चुकते करायचे आहेत…आधी त्याला नाही मिळवू शकलीस म्हणून माझ्या नवऱ्याला जाळ्यात ओढू पाहतेस काय… चल…आज सगळ्यांना तुझा खरा चेहरा दाखवते…”
आणि राधाचा हात पकडुन तिला ओढतच तिच्या घरी घेऊन गेली. धीरज सुद्धा तसाच त्यांच्या मागे गेला. घरात गेल्यावर मोठ्याने तिच्या सासूबाईंना आवाज दिला. तिथेच हॉलमध्ये बसून मोबाइलवर काड्या करणाऱ्या मीनाक्षी ला तर काहीच कळत नव्हते. शनाचा आवाज ऐकून सुलोचना ताई तिथे आल्या. समोर धीरज शनाया आणि राधाला पाहून नेमकं काय होतंय हे त्यांना सुद्धा कळले नाही. त्या शनायाला म्हणाल्या.
” काय ग…मोठ्यांनाही कसे बोलावे ह्याचे संस्कार तुझ्यात नाहीत हे तर मी त्या दिवशी पाहिलेच होते पण आज पुन्हा त्याची प्रचिती आली…आमच्या घरी हे असे मोठ्याने बोलणे खपवून घेतले जाणार नाही…आणि अशी परवानगी न घेता तोंड वर करून आमच्या घरात तू आलीच कशी…?”
” ओ धीरज च्या काकू…मला काही हौस नाहीये असं तुमच्या घरात यायची…आणि दुसऱ्यांवर संस्कार काढायच्या आधी तुमच्या ह्या सुनेचे कारनामे तरी पाहून घ्या…” शनाया त्यांना म्हणाली.
” काय बोलत आहेस तू हे…? स्पष्ट बोल…” सुलोचना ताई निर्वाणीच्या सुरात म्हणाल्या.
” तुमची ही सून लपून छपून माझ्या नवऱ्याला भेटते…आज तर मी स्वतःच पकडले हिला…”
” काय…?” सुलोचनाताई जोरात ओरडल्या. राधावर त्या कितीही नाराज असल्या तरीही राधा अशी वागेल ह्याच्यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मीनाक्षी सुद्धा अवाक् होऊन बघत होती. धीरज तर काहीच बोलत नव्हता. राधा मात्र स्वतःवर झालेला हा खोटा आरोप ऐकून स्तब्ध झाली होती. ती आत्याला म्हणाली.
” नाही आत्या…खोटं बोलतेय ही…मी तर कामासाठी गोठ्यात गेले होते…”
” अच्छा…तर आता ही खोटी सुद्धा बोलायला लागली तर…पण अशा गोष्टी कोणी कबूल करत नसतं…” शनाया म्हणाली.
” मी खोटं बोलत नाहीये…घरचं दूध खराब झालं होतं…म्हणून मीनाक्षी ताईनेच मला गोठ्यात सदा काकांना दूध लवकर आणायचे सांगायला पाठवले होते…तुम्ही मीनाक्षी ताईंनाच विचारा ना…” राधा आत्याला म्हणाली.
आता मात्र मीनाक्षीला झालेला प्रकार लक्षात आला. राधा गोठ्यात गेली आणि धीरज मागून आला असावा हे तिच्या लक्षात आलं. आता सगळं काही आपल्या साक्षी वर अवलंबून आहे हे सुद्धा तिला समजले. आधीच राधा वर राग असल्याने तिने ही या संधीचा उपयोग राधाला घरातून बाहेर काढण्यासाठी करून घ्यायचा असे ठरवले.
सुलोचना ताईंनी मीनाक्षीकडे पाहिले आणि तिला म्हणाली.
” मीनाक्षी…राधा बोलतेय ते खरे आहे का..?”
” नाही आई…मला नाही माहिती राधा काय म्हणतेय…मी नाही पाठवलं तिला कुठेच…” मीनाक्षी म्हणाली.
हे ऐकून राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मीनाक्षी ताईला म्हणाली.
” ताई…हे काय बोलताय तुम्ही…तुमच्या एका खोट्याने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडू शकतात… प्लिज खरे बोला…”
” हे बघ…तुझ्या या सगळ्या प्रकरणात तू मला नको ओढूस…मुळात तू असं वागायला च नको होतं…आमचे राघव भाऊजी बिचारे मनापासून हे लग्न निभावत आहेत अन् तू तुझ्या या पहिल्या प्रेमाला अजूनही लपून छपून भेटते आहेस…ज्यांच्यामुळे तुझी अन् तुझ्या घरच्यांची नाचक्की होण्यापासून वाचली त्यालाच फसवत होतीस…” मीनाक्षी पुन्हा साळसूदपणाचा आळ आणत म्हणाली.
मीनाक्षीचे बोलणे ऐकुन आता मात्र सुलोचना ताईंचा राग अनावर झाला. मीनाक्षी खोटे बोलणार नाही असे त्यांना वाटत होते. राधाने आपल्या राघवला फसवले असे वाटून त्यांचा तिळपापड झाला. राघव, माधव आणि केशवराव या तिघांपैकी एकही जण घरी नव्हता. आता मात्र राधाचं ऐकणार घरी कुणीच नव्हतं.
क्रमशः
सुलोचना ताई राधावर विश्वास ठेवतील का…? मीनाक्षीचे खोटे सर्वांसमोर येईल का…? धीरजला त्याने केलेल्या पापाची शिक्षा मिळेल का…? राघव राधा वर विश्वास ठेवेल का…? जाणून घ्यायला कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.
खुप छान