सुलोचनाताईंनी राधाच्या वडिलांना फोन केला आणि तातडीने त्यांना घरी बोलावून घेतले. राधाच्या वडिलांनी तिच्या काळजीने अर्ध्या तासाची वाट पंधरा मिनिटातच पार केली. ते घरी आले तेव्हा राधा घराच्या एका कोपऱ्यात अपराध्यासारखी उभी होती. काय होतंय ते राधाच्या बाबांना कळतच नव्हतं. ते आल्या आल्या सुलोचनाताईंना पाहून म्हणाले.
” सुलू आक्का…काय झालंय…इतक्या तातडीने का बोलावलस…?”
” तूझ्या मुलीचे प्रताप सांगायला…” सुलोचना ताई रागाने म्हणाल्या.
” म्हणजे…? मला कळलं नाही…काय झालंय नेमकं…?” राधाचे वडील म्हणाले
” तूझ्या मुलीने आमच्या तोंडाला काळ फासलय…लग्न झाल्यावर सुद्धा परपुरुषाला लपून छपून भेटते ही…आज तर हिला धीरजला लपून भेटताना रंगेहाथ पकडलय…ते ही धीरजच्या बायकोने…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” काहीही बोलू नकोस आक्का…खोटं आहे हे…माझी राधा अशी वागुच शकत नाही…मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या मुलीला काहीही बोलणार म्हणून…” राधाचे वडील म्हणाले.
” वा रे वा…मुलगी गुन्हा करते आणि बाप त्या गुन्ह्यांवर पांघरून घालायचं काम करतो…माझ्या मुलाने समाजात तुमची नाचक्की होण्यापासून वाचवले…तुझ्या मुलीशी लग्न केलं… इतकंच नाही तर त्याने तिला शब्दानेही दुखावले नाही…आणि तुझ्या मुलीने काय केलं…नवरा दोन दिवस बाहेरगावी काय गेला तिने हे सगळं सुरू केलं…मी कधी विचारही करू शकत नव्हते की राधा हे सगळं करेन…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” तुझा काहीतरी गैरसमज झालाय आक्का…माझी राधा अशी कधीच वागणार नाही…” राधाचे वडील म्हणाले.
” तुला काय म्हणायचे आहे…मी खोटं बोलतेय का…तुम्ही संस्कार देण्यात कमी पडलात ते अजूनही कबूल करणार नाहीयेस का…?माझ्यावर विश्वास बसत नसेल तर या मीनाक्षीला विचार…नाहीतर शनायाला विचार…नाहीतर धीरजलाच विचार…” सुलोचनाताई म्हणाल्या.
त्यावर राधाच्या वडिलांनी धीरजकडे पाहिले. धीरज त्यांना पाहून म्हणाला.
” मी स्वतःहून नव्हतो गेलो…तिनेच मला तिथे यायला सांगितले होते…” धीरज म्हणाला.
त्यासरशी राधा त्याच्यावर धावून गेली आणि म्हणाली.
” तू कशाला खोटं बोलतो आहेस नीच माणसा…खरं सांग ना…”
” त्याच्याशी काय बोलत आहेस…मी स्वतः पाहिलंय ना तुला तिथे…” शनाया म्हणाली.
” हे सगळे खोटे बोलत आहेत बाबा…सगळ्यांनी मिळून कट केलाय माझ्या विरोधात…” राधा तिच्या वडिलांना म्हणाली.
” स्वतःच खोटारडी आणि चारित्र्यहीन असणारी तू आमच्यावर आरोप करते आहेस…लाज नाही वाटत का तुला… चल निघ माझ्या घरातून…परत तोंड नको दाखवूस…” सुलोचना ताई तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढत म्हणाल्या.
तितक्यात राधाचे वडील सुलोचनाताईंना म्हणाले.
” आक्का…माझ्या पोरीला घराच्या बाहेर धक्का द्यायची हिम्मत तरी काही झाली तुम्हा लोकांची…लक्षात ठेवा तिचा बाप अजुन जिवंत आहे…आणि मी जिवंत असताना माझ्या मुलीचा अपमान सहन करू शकत नाही…”
” मग घेऊन जा तिला आणि पुन्हा कधीच पाठवू नकोस… बरं झालं तूच माझ्या माधवच्या स्थळाला नाकारलेस… वाचलो आम्ही…नाहीतर आणखी एक चारित्र्यहीन मुलगी आमच्या पथ्थ्यावर पडली असती..” सुलोचनाताई हातवारे करत म्हणाल्या.
” बरं झालं मीच नकार दिला…नाहीतर तुमच्या सारख्या मतलबी लोकांमध्ये माझी लेक गुदमरून गेली असती…आणि राधाला तर नाहीच पाठवणार…जिथे माझ्या मुलीचा सन्मान केल्या जात नाही तिथे नाहीच पाठवणार…चल राधा…पुन्हा कधी अशा स्वार्थी आणि खोटारड्या माणसांचं तोंड सुद्धा बघायचं नाही आपल्याला…” राधाचे वडील तिला सोबत घेऊन जात म्हणाले.
आणि राधा फक्त अंगातल्या कपड्यानिशी तिच्या बाबांच्या सोबत बाहेर पडली ती सरळ तिच्या गावातच गेली. इकडे मीनाक्षी, धीरज आणि शनाया भलतेच खुश झाले होते. मीनाक्षीलातर राधा अजिबात आवडलीच नव्हती. शनायाच्या मनात तर राधा बद्दल तेव्हाच आकस निर्माण झाला होता जेव्हा धीरजने तिच्यामुळे तिला जवळपास सोडूनच दिले होते.
आज तिला राधाचा बदला घेण्याची संधी मिळाली म्हणून तिने हे सगळे घडवून आणले होते. राधाच्या मागे धीरजला जाताना तिने आधीच पाहिले होते. आणि तिने दोघांच्या मधील सगळं संभाषण ऐकले सुद्धा होते. पण केवळ राधाचा बदला घेता यावा म्हणून तिने राधावर हा खोटा आळ घेतला होता. आणि धीरज तर राधा आणि राघवला वेगळं करायला टपलेलाच होता.
राधा आणि राघवच लग्न झालंय तेव्हापासूनच त्याला राघवचा प्रचंड प्रमाणात राग आलेला होता. पैशांच्या मोहापायी त्याने शनायाशी लग्न तर केले होते पण राधाच्या प्रेमात सुद्धा तो पडलेलाच होता. शनाया जवळ असतानाही उठता बसता त्याला केवळ राधाचेच भास व्हायचे.
तिचे ते सोज्वळ रूप. गोरापान रंग, हरिणी सारखे डोळे, लांब केस, हाताने घडवल्या सारखे नाक आणि ओठ आणि त्यावर हसताना तिच्या गालावर पडणारी खळी. सगळं काही त्याला स्पष्ट आठवत होतं. आणि आज त्याने राधाला जेव्हा साडीवर तयार झालेलं पाहिलं तेव्हा तर तिच्या रूपाने त्याला वेडच लावले होते.
आधी तर त्याची इच्छा तिला समजावून सांगून पुन्हा आपल्या जाळ्यात ओढायची होती. पण राधा त्याला बधली नाही. वरून त्याच्या कानाखाली सुद्धा लगावली. म्हणून मग शनायाने जेव्हा राधावर खोटे आरोप केले तेव्हा त्यानेही तिच्या सुरात सूर मिसळला. आणि ह्या प्रकारे त्याने एकाच बाणाने दोन शिकारी केल्या होत्या. राघवने सुद्धा त्याच्यावर हात उचलला होता. मग त्याचाही त्याला बदला घ्यायचा होता.
राधाच्या बाबांनी तर झाल्या प्रकाराचा धसकाच घेतला होता. राधाच्या आईला तर आता फक्त वेड लागायचं बाकी होतं. काका, काकू मात्र अजूनही त्यांच्या मागे राधालाच दोष देत होते. राधा तर एकदमच निराशेच्या गर्तेत सापडला होती. रात्रभर तिच्या डोळ्याला झोपच लागली नाही.
पण आपल्यावर लागलेल्या आरोपापेक्षाही जास्त दुःख तिला राघवपासून दूर झाल्याचं होत होतं. राघव सगळं ऐकून आपल्यावर विश्वास ठेवेल का ह्याच गोष्टीचा तिला सारखा सारखा विचार येत होता. दिवसभरात अनेकदा तिला राघव तिला घ्यायला आलाय असा भास झाला होता.
राघवच्या जवळ होती तेव्हा शरीराने आणि मनाने तिने त्याला आपली सर्वस्व अजूनही अर्पण केलेले नव्हते. पण त्याच्यापासून दूर राहिल्याने तिला तिच्या प्रेमाची जाणीव आणि तीव्रता दोन्ही कळत होती. आपलं राघव वर खूप प्रेम आहे आणि आपण राघव शिवाय राहू शकत नाही हे तिला कळलं होतं. पण हे जे काही झालंय त्या नंतर राघवची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा तिला अंदाज येत नव्हता.
तिने राघवला फोन लावला पण तो ही लागला नाही. राघव प्रवासात असल्याने नेटवर्क मिळत नव्हतं. पण राधा ने ही एक फोन केल्यावर दुसरा फोन केला नाही. झाल्या प्रकारानंतर तिची हिंमतच होत नव्हती. तिला सारखं वाटत होतं की राघव झाल्या प्रकारावर कसा व्यक्त होईल. केशवराव त्या रात्री उशिरा घरी आल्याने त्यांना राधाला घरातून काढून दिलंय ह्याचा अजिबात थांगपत्ता लागला नाही. माधव तर रात्रभर शेतातच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्त्याच्या वेळेवर राघव घरी पोहचला. आल्यावर सर्वप्रथम तो आपल्या रूममध्ये गेला. राधा कुठेच दिसत नव्हती. मग फ्रेश होऊन तो खाली आला आणि किचन मध्ये बघीतले तर राधा तिथेही नव्हती. आज राधाच्या ऐवजी मीनाक्षी नाश्ता बनवत होती. मग राघवने मीनाक्षीलाच विचारले.
” वहिनी…राधा कुठेच दिसत नाहीये…?”
त्यावर कुत्सित हसत मीनाक्षी वहिनी म्हणाली.
” तिला तर आईंनी हाताला धरून काढून दिलंय…आता पुन्हा नाही यायची घरी…”
” काय…?” राघव जवळ जवळ किंचाळलाच.
त्याचा आवाज ऐकून केशवराव आणि सुलोचनाताई दोघेही खाली आले. माधव सुद्धा आताच घरी आला होता. दरवाज्यातच त्याने राघवची किंकाळी ऐकली. आणि धावतच राघव जवळ आला. आणि राघवला म्हणाला.
” काय झालं राघव…?”
राघव नुसता रागाने लालबुंद झाला होता. तेव्हा केशव रावांनी त्याला विचारले.
” काय झालंय राघव…तू असा मोठ्याने का ओरडलास…?”
राघव काहीही न बोलता त्याच्या आईजवळ गेला आणि विचारले.
” आई…वहिनी म्हणतेय ते खरे आहे का…?”
” काय म्हणतेय मीनाक्षी…?” सुलोचना ताईंनी विचारले.
त्यावर मीनाक्षी पुढे येऊन म्हणाली.
” आई…राघव भाऊजीनी मला राधा कुठे आहे ते विचारले तेव्हा मी सांगितले की तुम्ही तिला हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढलंय म्हणून…”
आता मात्र सगळेचजण रागात सुलोचना ताईंकडे पाहू लागले. तेव्हा सुलोचना ताई म्हणाल्या.
” आणखी काय करायला पाहिजे होतं मी तिच्यासोबत…आपल्या राघवशी लग्न केलं आणि त्या धीरज बरोबर अजूनही संबंध होते तिचे… काल शनायाने दोघांना गोठ्यात बोलताना रंगेहाथ पकडले… वरून आम्हालाच खोटे म्हणत होती…म्हणून मग तिच्या बाबाला बोलावले आणि तिला कायमचं माहेरी पाठवून दिले…”
हे ऐकून राघव मटकन खाली बसला. आईला काय बोलावे आणि काय नको ते त्याला कळत नव्हते. मग केशवराव सुलोचना ताईला म्हणाले.
” काय…? हे काय केलं तुम्ही राघवची आई…आपल्या घरच्या सुनेला असे धक्के देऊन हाकलून दिलत तुम्ही… हे करताना तुला एकदाही आम्हाला सांगावस वाटलं नाही…”
‘ नाहीतर काय करायला हवं होतं मी…अशा चारित्र्य हिन मुलीला घरात ठेवून काय करणार होते…तिची लायकीच नव्हती आपल्या घरात राहायची…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” आणि जर हे सगळं खोटं निघालं आणि राधा खरी निघाली तर…” माधव म्हणाला.
” असे शक्यच नाही…पूर्णपणे शहानिशा करून झालीय माझी…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” म्हणजे…?” माधवने विचारले.
” म्हणजे शनाया तिला स्वतःच हाताला धरून घरात घेऊन आली होती…तिनेच सांगितले की ती आणि धीरज गोठ्यात बोलत होते… मग आम्ही तिला विचारले तर तिने सगळं काही मीनाक्षीवर ढकलले…म्हणाली की तिनेच मला गोठ्यात दूध लवकर पाहिजे म्हणून सदा काकाला सांगायला पाठवले होते…”
” म्हणजे…तू नव्हते का पाठवले तिला गोठ्यात…?” माधवने विचारले.
” नाही तर…मी कशाला पाठवेल तिला गोठ्यात…माझ्या तोंडावर खोटं बोलत होती ती… मी पण सांगितलं की मी तिला नव्हत पाठवलं म्हणून…” मीनाक्षी साळसूदपणे म्हणाली.
मीनाक्षीचे बोलणे संपत नाही तोवर माधव तिच्याजवळ आला आणि तिला एक जोरात कानाखाली मारली. काय होतंय हे क्षणभर मीनाक्षीला कळलं सुद्धा नाही. आजवर माधव कधीच आवाज चढवून सुद्धा बोलला नव्हता तिच्याशी. आणि आज त्याने सरळ तिच्यावर हात उगारला.
गाल चोळत ती गोंधळून माधव कडे पाहतच राहिली. केशवराव, सुलोचना ताई आणि राघव सुद्धा माधवच्या या अनपेक्षित कृतीने गोंधळले होते. केशवराव त्याला काही बोलणार इतक्यात माधवच मीनाक्षीला रागाने पाहत म्हणाला.
” तू नव्हतं पाठवलं तिला गोठ्यात…?”
” नाही… म्हणजे…मीच… ते..त्याच…?” मीनाक्षी काहीच बोलू शकत नव्हती. तिची भीतीने गाळण उडाली होती. मग माधवच पुढे रागाने म्हणाला.
” बाबा…हिने माझ्यासमोर राधाला गोठ्यात जायला सांगितले होते…तिने अनेकदा जायला नकार दिला पण हिने जबरदस्तीने तिला गोठ्यात पाठवले होते…”
हे ऐकून मीनाक्षी खूपच घाबरली. सुलोचनाताई तर एका जागी थिजल्या जणू आणि राघवने आपले डोके पकडले.
” काय…? अशा का वागलात तुम्ही सूनबाई…? का केलात स्वतःच्याच जाऊवर इतका खालच्या स्तरावरचा आरोप…?” केशवरावांनी मीनाक्षीला विचारले.
मीनाक्षीला तर काय बोलावे आणि काय नको ते कळतच नव्हते. मग माधव पुन्हा म्हणाला.
” मी तुला काय विचारतोय…सांग लवकर…”
मग मीनाक्षी बोलायला लागली.
” मीच तिला गोठ्यात पाठवले होते…ती खूप नाही नाही म्हणत होती पण मी काहीच ऐकले नाही…मी तिला जबरदस्तीने पाठवले…”
” काय…अगं मग तू खोटं का बोललीस…का माझ्या राधावर चुकीचं आळ घेतला…का तिला दोषी ठरवलं…का…?” राघव काकुळतीला येऊन म्हणाला.
” मला राधाचा पहिल्या दिवसापासूनच खूप राग यायचा…” मीनाक्षी म्हणाली.
” पण का…?” माधवने विचारले.
” कारण मला राघव भाऊजीच मग माझ्या मावसबहिणीशी लावायचा होतं…पण ही राधा अचानकच लग्न करून घरात आली…शिवाय तिच्या बाबांनी तिच्या मोठ्या बहिणीसाठी तुमच्या स्थळाला नकार दिला होता त्याचाही राग आला होता मला खूप…” मीनाक्षी कचरत बोलली.
” काय…?अगं तुला याबद्दल माहिती तरी काय आहे ग…? मामांनी कावेरीसाठी माझ्या स्थळाला का नकार दिला त्याचं कारण माहिती आहे का तुला…त्यात मामांची काहीही चूक नव्हती…त्यांनी जे काही केले ते फक्त अन् फक्त माझ्यासाठी केले…काहीही माहिती नसताना तू त्या साध्या भोळ्या राधाला काय भोगायला लावलेस…” माधव म्हणाला.
” म्हणजे…त्यांनी का नकार दिला ते तुला माहिती आहे…?” सुलोचना ताईंनी माधवला आश्चर्याने विचारले.
” हो… मीच त्यांना तशी विनंती केली होती…” माधव म्हणाला.
” काय…?” सगळेच एका सुरात ओरडले.
क्रमशः.
माधवने मामाला त्याच्या स्थळाला नकार देण्याची विनंती का केली असेल…? राघव आणि राधा च्या नात्याचे भविष्य काय असेल…? धीरजला त्याचा गुन्ह्याची शिक्षा मिळेल का..?” हे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.
खुप छान
पुढील भागाची आतुरता
धन्यवाद 😊🙏
Saglech part khupach apratim. Utkantha vadhvanare. Mast likhan kelay. Keep it up.
Thank you so much 😊🙏