” आक्कासोबतच राघव मामंजीचा पण मुलगा आहे ना बाबा…मग तो चांगला सुद्धा वागू शकतोच…” राधा म्हणाली.
” मी तुझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत राधा…मी जे काही करतोय ते फक्त अन् फक्त तुझा विचार करून…आणि तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून वागावं एवढीच माझी इच्छा आहे…जा…जाऊन तयार हो…” राधा चे बाबा म्हणाले.
इतका वेळ राधा आणि तिच्या बाबांचे संभाषण ऐकणारी राधाची आई आता पुढे आली आणि म्हणाली.
” अहो हे काय बोलताय तुम्ही…सरळ काडीमोड घ्यायचं म्हणताय…”
” मी सांगितलंय ना मला ह्या विषयावर आणखी काही बोलायचं नाही म्हणून…” राधाचे बाबा रागातच राधाच्या आईला म्हणाले.
” पण मला बोलायचं आहे ना…तुम्ही आपल्या मुलीबद्दल एकट्याने निर्णय नाही ना घेऊ शकत…आणि तो ही घ’टस्फो’टाचा…संसार म्हटलं की लहान मोठी संकटे येतच असतात…आणि निदान तिचा नवरा तरी चांगला आहे ना…शिवाय सुलू ताई स्वतः माफी मागायला आल्या होत्या…त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे ते पुरेसे नाही का…” राधाची आई म्हणाली.
” तुला माहिती नाही काय झालं ते…त्या दिवशी तू तिथे असतीस तर तुला कळलं असतं…म्हणून म्हणतो तू मध्ये बोलू नकोस…” राधा चे बाबा रागाने म्हणाले.
” मी नाही बोलेन पण राधा…तिचं काय…लग्न झालंय तिचं…स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तिला नाही का…?” राधाची आई म्हणाली.
” तिला तिचं भलं बुरं कळत नाही…आणि मी ठरवलंय एकदा…ह्यात बदल होणे नाही…” असे बोलून राधा चे बाबा तिथून निघून गेले.
राधा तिच्या आईला म्हणाली.
” आई… बाबाचा राग कधीच जाणार नाही का ग…? मला घटस्फोट नकोय…”
आई मात्र काहीच बोलत नव्हती. आईला तिच्या बाबांची एक जुनी आठवण आठवली. राधाच्या मामाच्या लग्नात राधाच्या मावशीला आणि तिच्या नवऱ्याला म्हणजेच दुसऱ्या जावयाला सगळ्या रीतींमध्ये सामील करून घेतले होते. अर्थात त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि दोघेही खूप हौशी सुद्धा होते. राधा च्या बाबांना अशा छोट्या छोट्या रीती करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता शिवाय त्यावेळी कावेरी अगदीच तान्ही होती म्हणून राधा ची आई सुद्धा जरा मागे मागेच होती. अशात राधा च्या बाबांना कुणीतरी गंमत मध्ये म्हटले की तुम्ही मोठे असून तुम्हाला मान नाही आणि ह्या लहान जावयाला तर जणू देव्हाऱ्यात बसवून त्यांची पूजा करायचीच बाकी ठेवलीय तुमच्या सासरच्यांनी.
बस…एवढे म्हणायचा अवकाश आणि राधा चे बाबा रागावले. लग्नात कोणाशीच बोलले नाहीत. आणि लग्न झाल्या बरोबर राधा च्या आईला घरी चल म्हणाले. राधाच्या आईने खूप समजावले पण राधाचे बाबा म्हणाले की तुला यायचं नसेल तर तू इथेच राहा. मग राधाच्या आईचा नाईलाज झाला. पण राधाच्या मामाला, आजी – आजोबांना तर खूपच मेल्याहून मेल्यासारखे झाले होते जावई रुसल्यावर.
पण राधा च्या बाबांना वाटत होते की त्यांनी त्यांच्यासोबतच त्यांच्या बायकोचा म्हणजेच राधा च्या आईचा सुद्धा अपमान केलाय. आणि म्हणूनच त्यांना त्यांचा इतका जास्त राग आला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कधीच कोणत्याही कार्यक्रमाला राधा च्या आईला तिच्या माहेरी जाऊ दिले नव्हते.
मग राधाचे आई बाबा, मामा मामी स्वतःच येऊन राधा च्या आईला भेटून जायचे. राधाच्या आईने आजवर अनेकदा त्यांना समजावून बघितले पण राधाच्या बाबांनी आपला निर्णय बदलला नाही. आता राधाच्या बाबतीत सुद्धा त्यांना तसाच राग आला होता. आणि आधी पेक्षा कितीतरी जास्त. त्यांच्या नजरे समोरून राधाला हाकलून दिल्याचं दृश्य काही केल्या हटतच नव्हते.
म्हणून त्यांना राघवचा चांगुलपणा, राधाशी लग्न करून त्याने त्यांची वाचवलेला मान सन्मान, सुलू ताईंची माफी, राधाच्या नजरेत असणारे राघव बद्दलचे प्रेम, राघवची राधासाठी काहीही करण्याची तयारी, काहीच दिसत नव्हते. राधा चे बाबा आता कोणाचंही काहीच ऐकणार नाही हे राधाच्या आईंनी जाणले होते. ते स्वतःचा निर्णय राधा च्या आयुष्यावर लादणार हे आईने ओळखले होते.
राधा चे बाबा एकटेच तालुक्याला निघाले होते. राधा ने येण्यासाठी नकार दिला म्हणून तिला सोबत नेता आले नाही. राधाची आई मात्र आता काळजीत पडली. ती राधाला जवळ बोलावून म्हणाली.
” राधा…मला राघवशी बोलायचे आहे…माझ्यासोबत चलतेस का…?”
” पण आई…बाबांना कळलं तर…” राधा म्हणाली.
” ती भीती काल रात्री नाही एका वाटली तुला…” आईने तिच्याकडे पाहत म्हणाले.
राधा डोळे विस्फारत म्हणाली.
” म्हणजे…तुला माहित होते…”
” नाहीतर काय… मी तुझी आई आहे…मला सगळंच कळतं…” आई म्हणाली.
” मग तू मला रागावली का नाहीस…?” राधा ने विचारले.
” तो नवरा आहे तुझा…त्यामुळे रागवायचा प्रश्नच येत नाही माझा…पण तुझ्या बाबांना कळलं असतं तर त्यांचा राग अनावर झाला असता…” आई म्हणाली.
” बाबांचा राग कधीच कमी नाही का होणार आई…त्यांनी हट्ट सोडलाच नाहीतर काय…?” राधा ने विचारले.
” त्यासाठीच म्हणतेय की मला राघव शी बोलायचं आहे…तू चल माझ्यासोबत…” आई म्हणाली.
त्या सरशी राधा च्या आईने राघवसाठी एका डब्यात नाश्ता आणि छोट्या थरमास मध्ये चहा घेतला. आणि राधाला घेऊन तिकडे निघाली. या दोघी मायलेकी तिकड जाताना राधाच्या दोन्ही काकूंनी पाहिले होते. ते पाहून लहान जाऊ मोठ्या जावेला म्हणाली.
” बघितलं ताई…राधाचे बाबा राघव ला घरात घ्यायला तयार नाहीत आणि ह्या दोघी मायलेकी त्याच्यासाठी चहा नाश्ता घेऊन जात आहेत…ह्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे ते बघा…”
” तसे नाही ग…ह्यांच्या मनात तर राघवला घरात घ्यायचं आहेच…पण भाऊजी काहीच ऐकायला तयार नाहीत…आणि ते आज बाहेरगावी गेलेत म्हणूनच ह्या राघव जवळ गेल्या आहेत…नाहीतर ह्यांची तशी हिंमतच झाली नसती…” राधाची मोठी काकू लहान काकूला समजावत म्हणाली.
इकडे ह्या दोघी मायलेकी झोपडीच्या बाहेर पोहचल्या. राघव बाहेरच खाटेवर बसून शेतीचे सौंदर्य न्याहाळत होता. शालिनी मामी दिसल्यावर राघव म्हणाला.
” मामी…तुम्ही इथे…?
” हो…तुझ्याशी बोलायचं होतं…” मामी म्हणाल्या.
” पण मामा…?” राघव ने विचारले.
” ते बाहेर गेलेत म्हणून आले आहे…मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे…” मामी म्हणाल्या.
” बोला ना मामी…” राघव म्हणाला.
” राधाचे बाबा सध्या काही ऐकण्याच्या तयारीत दिसत नाहीत…मला वाटतं तू राधाला घेऊन काही दिवसांसाठी दूर निघून जा…”
हे ऐकून राधा आणि राघव दोघांनाही धक्का बसला.
क्रमशः
राधा आणि राघव मामीचे खरंच ऐकतील का…? राधाच्या बाबांना हे कळल्यावर काय होईल…? की इथेही धीरज येऊन काहीतरी घोळ घालेल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©® आरती निलेश खरबडकार.