ती जीप जवळ आली तेव्हा राघवच्या लक्ष्यात आले की ती पोलिसांची पेट्रोलिंग जीप होती. ती जीप त्यांच्या जवळ येऊन थांबली तेव्हा आणि त्यातील एक पोलीस उतरून त्यांच्या जवळ गेले आणि राघवला विचारले.
” कुठे चाललात..? आणि अंधार पडल्यावर इथे का थांबलेले आहात..?”
” सर आम्ही मुंबई ला जातोय…आणि गाडी पंक्चर पडली म्हणून इथे थांबलो आहोत…” राघव म्हणाला.
” आणि ही मुलगी कोण आहे…?” त्यांनी विचारले.
” माझी बायको आहे…” राघवने उत्तर दिले.
” बायको…?”
ते पोलीस राधाला न्याहाळत म्हणाले.
राघव चांगले इस्त्रीचे कपडे घालून आणि राधा घरच्याच कपड्यात निघाली होती. सोबत बॅग नाही ना काही नाही. एक बॅग फक्त राघवच्या पाठीवर दिसून येत होती. त्यातूनच राधा खूप जास्त गोंधळलेली आणि घाबरलेली दिसत होती. पोलिसांनी तिला काही विचारले पण ती मात्र अडखळत पोलिसांना उत्तरे देत होती.
आधीच आपण बाबांच्या अपरोक्ष घरातून निघून आलोय ह्याचं टेंशन आणि अशा निर्जन ठिकाणी अंधारात गाडी बंद पडल्याचे टेंशन. आपण बाबांचं मन दुखावले म्हणून आपल्यासोबत असे होत आहे ही अपराधीपणाची बोच अधून मधून डोकं वर काढत होती.
तेवढ्यातच राघवच्या लक्षात आले की आपला राधासोबत एकही फोटो नाही म्हणून. लग्न झाले त्या परिस्थिती जोड्याने फोटो वगैरे काढणे तर दुरापास्तच होते. आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी त्याची आई भयंकर रागावलेली असल्याने तिच्या समोर दोघांचा फोटोचा विषय सुद्धा नाही निघाला.
त्यानंतर दोघे कुठेही बाहेर फिरायला गेलेले नसल्याने सोबत फोटो नव्हतेच. मग काय पोलिसांनी ह्यांचे काहीही न ऐकता ह्यांना सरळ पोलीस स्टेशनला नेले. आता मात्र राघव पार संकटात सापडला होता. काय करावे आणि काय नको हे त्याला अजिबात कळत नव्हते.
पोलिसांनी राधाला व्यवस्थित बसवून चौकशी करायला सुरुवात केली. राघव आणि राधा दोघांनाही आपापली ओळखपत्रे दाखवायला सांगितले. आणि दोघांच्याही घरच्यांना कॉल कडून इथे बोलवायला सांगितले. आता मात्र दोघांचीही पंचाईत झाली. घरच्यांना कॉल करणे टाळण्यासाठी राघवने विनंती केली पण त्यावरून तर पोलिसांना आणखीनच संशय आला.
इकडे धीरजच्या आईने धीरज आणि शनायाचे बोलणे राघवच्या आईला सांगितले होते. आणि सुलोचना ताईंना आपण शनाया आणि धीरजच्या बोलण्यात आल्याचा अजूनच पश्चात्ताप होत होता.
दुसरीकडे राघव आणि राधाकडे घरच्यांना कॉल करण्यावाचून काही पर्याय राहिला नाही. राघवने स्वतःच्या घरी कॉल केला आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितले. योगा योगाने त्यावेळी धिरजची आई राघवच्या घरीच होती. केशवराव हॉल मध्येच बसलेले होते. त्यांचा फोन खणानला आणि त्यांनी फोन उचलून हॅलो म्हटले. तिकडून राघव म्हणाला.
” बाबा…तुमची एक मदत पाहिजे होती…”
” काय…आणि तू कुठे आहेस आता…?” केशवरावांनी विचारले.
” मी पोलिस स्टेशन मध्ये आहे सध्या…मी अन् राधा दोघेही…” राघव म्हणाला.
” काय…पोलिस स्टेशन मध्ये…?”
आता मात्र केशवराव अक्षरशः मोठ्याने ओरडलेच.
त्यांचा आवाज ऐकून सुलोचना ताई आणि धीरजची आई सुद्धा काळजीत पडल्या. आणि मग राघवने त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्यावर केशवराव, सुलोचना ताई आणि माधव तिघेही लगेच राघवकडे जायला निघाले. आता प्रश्न होता राधाच्या घरी फोन कसा करावा आणि राधाच्या घरच्यांची ह्याच्यावर काय प्रतिक्रिया असेल ह्याचं.
पण सांगावं तर लागणारच होतं. राधा त्यांची मुलगी होती आणि यावेळी ती कशी आहे आणि कुठे आहे ते तर कळवावच लागणार होतं. मग जे काही होईल त्याला सामोरे जाण्याची राघव ने तयारी केलेली होतीच. मग राघव ने त्यांना फोन करून त्यांनाही परिस्थितीची जाणीव करून दिली आणि ते सुद्धा लगेच राधाला यायला निघाले.
दोन तासात दोघांच्याही घरचे पोलीस स्टेशनला हजर झाले होते. एव्हाना या दोन तासात पोलिसांनाही ह्या दोघांच्या बोलण्यातील सत्यता जाणवत होतीच. पण खात्री करून घ्यायला घरच्यांची गरज होतीच. सर्वात आधी सुलोचना ताई, केशवराव आणि माधव तिथे पोहचले. राघव आणि राधाला पाहून सुलोचनाताई म्हणाल्या.
” काय रे राघव…सूनबाईला मुंबईला घेऊन जायचच होतं तर चांगल्या तयारीने जायचं असतं…आणि बाईक वर एवढ्या दूरचा प्रवास करणार होतास का तू…?”
आता नेमकं काय बोलावं ते राघवला कळत नव्हते. इतक्यात केशवराव आणि माधवने पोलिसांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर केला होता. लग्नात एक दोन जणांनी नवरी आणि नवरदेवाचे फोटो काढले होते ते सुद्धा माधवला कुणीतरी पाठवले होते. ते फोटो ही त्यांनी पोलिसांना दाखवले.
दोघांच्या लग्नाची स्टोरी ऐकून पोलिसांना सुद्धा आश्चर्य आणि कुतूहल वाटले होते. तोवर राधाच्या घरचे सुद्धा आले होते. राधाचे वडील, आई आणि चुलत भाऊ असे तिघेही आले होते. राधाला पाहून आई तिच्या जवळ गेली. बाबांना पाहून राधाला जरा भीतीच वाटली. ती त्यांच्या पासून नजर चोरत होती.
बाबा राधा जवळ गेले आणि म्हणाले.
” राधा…तुझ्याशी तर मी बोलणारच आहे पण आधी मला राघवशी बोलायचे आहे…”
आता मात्र राधा आणखीनच घाबरली आणि राघव ला जरा टेंशनच आले. पण आज जे होईल ते पाहून घेऊ असे म्हणून राघव राधाच्या बाबांचे बोलणे ऐकले सज्ज झाला. राधा चे बाबा राघव जवळ गेले आणि म्हणाले.
” मला माफ कर राघव…”
राघव आणि तिथल्या सगळ्यांनाच हे ऐकून नवल वाटले. राधाचे बाबा राघवला चांगलेच सूनावतील असे सगळ्यांनाच वाटले होते. अगदी पोलिसांना ही. राधा तर आश्चर्याने पाहतच राहिली. राघवला तर यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळतच नव्हते. मग राधाचे बाबाच त्याला म्हणाले.
” माझ्याकडून खूप मोठी चूक झाली…एखाद्या वेळी आपण एकच गोष्ट पकडुन ठेवतो…त्यामुळे इतर अनेक चांगल्या गोष्टींवर आपलं लक्षच जात नाही…की सुद्धा त्या दिवशी घडलेल्या घटने पुढे दुसरं काहीच लक्षात ठेवत नव्हतो… ज्या राघवला अंगाखांद्यावर खेळवले त्यालाच झोपडीत राहायला भाग पाडले मी…माझ्या काही लक्षातच येत नव्हते…आणि आताही मला माझी चूक कळली नसतो तर मी त्याहून मोठी चूक करून बसलो असतो…” हे बोलताना त्यांनी कृतज्ञतेने राधाच्या आईकडे पाहिले.
” म्हणजे…? तुमचा राग निघून गेलाय का ?” राघवने विचारले.
” अर्थातच…” राधाचे बाबा म्हणाले.” माझ्या राधासाठी तूच सर्वथा योग्य आहेस..आणि हे मला कळलय…”
” अरे वा…खूपच छान…देर आये दुरुस्त आये…” केशव राव म्हणाले.
नंतर राधा चे बाबा केशवरावांना म्हणाले.
” मला माफ करा दाजी…मी काही वाईट बोलून बसलो असेल तर…रागाच्या भरात माझ्या काहीच लक्षात येत नव्हते…”
” मला नाही वाटत की तुझं काही चुकलय…म्हणजे माझ्या मुलीसोबत जर असे काही झाले असते तर मी सुध्दा असेच वागलो असतो…कदाचित यापेक्षा ही जास्त…तुझा राग रास्तच होता…” केशवराव म्हणाले.
” हो…बरोबर बोलत आहात तुम्ही…माझ्या चुकीमुळे खूप काही सहन केलंय राधाने…त्यामुळे ह्याचे हे वागणे मलाही चुकीचे वाटत नाहीत…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” तरीपण मला माफ कर आक्का…” राधाचे बाबा म्हणाले.
” आता या जुन्या गोष्टी कुणीही उगाळू नका…आता नव्याने नात्यांची सुरुवात करूयात…आनंदाने…जुन्या आठवणींना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बंद करून ठेवू…जेणेकरून जुन्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही…” केशव राव म्हणाले.
” चला मग…आता निघुया…” माधव म्हणाला.
तेव्हा तिथले पोलीस राधाच्या बाबांना म्हणाले.
” पण नक्की ठरलंय ना तुमचं…नाहीतर तुमच्या धाकाने पुन्हा बिचाऱ्या या नवरा बायकोला पळून जावे लागेल…”
आणि यावर सगळेच दिलखुलास हसले. राधाचे बाबा त्यांना म्हणाले.
” हो…पक्क ठरलंय…आणि पुन्हा मी अशी चूक केली तर माझी कानउघडणी ठरलेलीच आहे…” राधाच्या आईकडे पाहून मिश्किल हसत म्हणाले.
तसे पोलिसांचा निरोप घेऊन सगळे जण पोलीस स्टेशनच्या बाहेर निघाले आणि आपापल्या गाडीत जाऊन बसले. राधा मात्र अजूनही बाहेरच उभी होती. नेमकं कुठल्या गाडीत बसावं हे तिला अजूनही कळलं नव्हतं बहुतेक. मग राधाची आई तिला म्हणाली.
” बघ बाई…तुझ्या बाबांचा मूड बदलायच्या आधी एकदाचं ठरव तुला नक्की कुणीकडे जायचं ते…” आईचं ऐकताच राधा पटदिशी जाऊन राघवच्या शेजारी जाऊन बसली.
हे पाहून सगळेच जन हसले. राधा मात्र आपल्या या वेंधळेपणावर चक्क लाजली. आणि अशाप्रकारे चक्क पोलिस स्टेशन मधून राधाची सासरी पाठवणी झाली.
आणि थोड्याच वेळात गाडी शिरजगावात म्हणजेच राधाच्या सासरी पोहचली. यावेळेला मात्र राधाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. सुलोचना ताईंनी मीनाक्षी ला आपण निघालो असण्याचे सांगितले होते आणि मीनाक्षी ने सुद्धा स्वतःच्या मनानेच राधाच्या जोरदार स्वागताची तयारी केली होती.
माधव आणि सुलोचनाताई दोघेही तिच्यावर रागावलेले आल्याने आणि स्वतःची चूक लक्षात आल्याने सगळ्यांची माफी मागावी म्हणून तिने ही तयारी केली होती. आता सगळं काही चांगलं झालंय म्हटल्यावर आपण ही आपल्या चुकांची माफी मागायला हवी म्हणून हा तिचा प्रयत्न होता. आणि तिचा हा प्रयत्न बऱ्याच प्रमाणात माधवला आवडला देखील होता.
राधा आल्यावर तिचे जय्यत स्वागत झाले. राधा आणि राघव दोघेही खूप आनंदात होते. त्यांना आनंदात पाहून सुलोचना ताई आणि केशवराव दोघेही आनंदात होते. पण धीरज आणि शनाया मात्र ह्या सगळ्यांनी खूपच नाराज झाले होते. राधा आता कायमची माहेरी गेली असेच या दोघांना वाटले होते. त्यामुळे धीरजची खूपच चिडचिड होत होती.
धीरजला जेव्हा आईकडून कळाले की राधा आणि राघव घरातून पळून गेलेत तेव्हाच खरंतर त्याचा तिळपापड झाला होता. पण त्याला वागले होते की निदान राधाचे बाबा या सगळ्याला विरोध करतील आणि राधाला घरी घेऊन जातील. पण त्यांचा विरोध मावळला हे ऐकून तर तो आणखीनच चिडला होता.
शिवाय राधा आणि राघव कडे पाहून स्पष्ट कळत होतं की दोघेही नखशिखांत प्रेमात आहेत. आणि ते पहिल्यापासून तर त्याचा जळफळाट झाला होता. बऱ्याच वेळा पासून त्याची चिडचिड सुरूच होती. पण मध्येच त्याला आठवले की आपलं राधासोबत लग्न नाही झालं तरीही आपल्याला शनायाच्या बाबांची इस्टेट मिळणार आहेच की. मग मात्र त्याच्या भळभळणाऱ्या जखमेवर जरा फुंकर बसल्या सारखे झाले. पण अजूनही प्रक्रिया सुरू झाली नाही ह्याची त्याला आठवण झाली. त्याने शनायाला आवाज दिला. शनाया तिथे आली तेव्हा तो तीला म्हणाला.
” शनाया…मी काय म्हणतोय…आपण आता तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीसंबंधी सगळे काम उरकून घेऊयात…दोन चार दिवसात आपल्याला ऑफिससुद्धा जॉईन करायचं आहे…”
आता मात्र शनाया सुद्धा रागाने त्याला म्हणाली.
” काय सारखं तुझ्या बाबांची प्रॉपर्टी, तुझ्या बाबांची प्रॉपर्टी लावलंय…आज नाही तर उद्या होईलच…आणि तूच तर बोलला होतास ना की तू लग्न माझ्यावरच्या प्रेमापायी करत आहेस म्हणुन…”
” हो…ते ही खरंय…पण कधी ना कधी करायचं आहेच ना…आता सुट्टी आहेत म्हणून म्हणतोय…पण याचा अर्थ असा नाही की माझा त्या संपत्तीवर डोळा आहे म्हणून…” धीरज म्हणाला.
” तुला माझ्या बाबांच्या संपत्तीत काही रस नाही ना…आणि तू त्यासाठी लग्न सुद्धा नाही केलंस…बरोबर ना…” शनायाने विचारले.
” बरोबरच…” धीरज म्हणाला.
” तर मग ऐक…माझ्या बाबांनी माझ्यासाठी कुठलीच प्रॉपर्टी ठेवलेली नाहीये…तू कदाचित विसरला असशील पण मी तुला एकदा सांगितले होते की शेवटच्या काळात माझे बाबा कर्जबाजारी झाले होते आणि म्हणूनच त्यांन त्यांची सगळी जमीन विकून कर्ज फेडावे लागले होते आणि त्याचा धसका घेतल्यानेच माझे बाबा लवकर गेले…” शनायाने खुलासा केला.
” काय…?” हे बोलताना धीरज नखशिखांत हादरला होता. असेही काही असेल ह्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. क्षणात जणू त्याचे विश्वच बदलून गेले होते. लग्न झाल्या दिवसांपासून ते आजपर्यंत तो फक्त प्रॉपर्टीचा विचार करून मन रमवत होता. पण आज त्याला कळले की हे सगळं मृगजळ होतं म्हणून. तो अतीव संतापाने शनायाला म्हणाला.
” मग खोटं का बोललीस तू…?”
” कारण तू राधा मध्ये गुंतत चालला होतास…एकदा का तुझं लग्न झालं असतं तर मला अलगदपणे बाजूला फेकून दिले असतेस तू…आणि मला तेच नको होतं…कुण्या दुसऱ्या व्यक्तीसाठी तू मला नाकारलेले मला चालले नसते…आणि म्हणूनच मी हे सगळे केले…” शनाया म्हणाली.
आता मात्र धीरज काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हताच. विचार करून करून त्याच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. इतके दिवस पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. विशेष मेहनत न करता आपल्याला घबाड सापडलंय असे वाटून तो वेगळ्याच विश्वात वावरत होता. पण जणू कुणीतरी त्याचे पंख छाटून त्याला धाडकन जमिनीवर पाडल्यागत अवस्था झाली होती त्याची.
स्वतःच दुःख ना कुणाला सांगू शकत होता ना लपवू शकत होता. ज्या पैशांच्या मोहापायी त्याने राधाला भर लग्नाच्या दिवशी एकटे सोडले होते तो पैसा तर केवळ एक मृगजळच होता. ज्या पैशांपायी त्याने आपल्या आई वडिलांच्या आयुष्यभर कमावलेल्या नावाला सुरुंग लावला होता तो पैसा त्याला कधीच भेटणार नव्हता.
आता शनायाला बोलूनही काहीच फायदा नव्हता. कारण शनाया कुणाचही ऐकून घेणाऱ्यातील नव्हतीच. उलट तिने धीरज लाच जेरीस आणले असते. म्हणून धीरज काहीच करू शकला नाही. पण त्याला मात्र कळून चुकले की आपण राधासोबत वाईट केल्यानेच आपल्यासोबत हे घडत आहे म्हणून. धीरजच्या वाटेला आयुष्यभराचा पश्चात्ताप आला होता. या धक्क्यातून निघायला धीरजला अजूनही बराच काळ लागणार होता.
इकडे राधा आणि राघवचा संसार मात्र सुखाने फुलला. झाल्या प्रसंगापासून सुलोचनाताई नखशिखांत बदलल्या होत्या. खरं समजल्यापासून मीनाक्षीसुद्धा राधाशी अगदी सख्ख्या मोठ्या बहिणीसारखी वागायची. इकडे राधाच्या बाबांनी सुद्धा तिच्या आईला माहेरी जाण्याची परवानगी दिली होती. उलट ते सुद्धा बायकोच्या माहेरी जाऊन सगळ्यांची माफी मागून आले होते. राधा आणि राघवला सुखात पाहून दोघांचे ही आईबाबा सुखाने भरून पावले होते.
समाप्त.
आपण कथेला दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपली खूप आभारी आहे. माझ्या इतर कथांप्रमाणे माझी ही कथा देखील सत्यघटनेपासून प्रेरित आहे. मी लहान असताना अशीच एक घटना घडलेली ऐकली होती. ऐन हळदीच्या दिवशी नवरदेव त्यांच्या प्रेमिकेसह पळून गेला आणि त्या मुलीचे लग्न तिच्या आतेभावाशी लावण्यात आले होते. त्याच गोष्टीचा धागा पकडून हा एवढा कल्पना विस्तार केलाय. आपल्याला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.
©®आरती निलेश खरबडकार.
अप्रतिम कथा, मी सहसा कधी व्यक्त होत नाही, पण असाच FB वर माझे पान ह्या ग्रुपवर हया कथेचा भाग वाचला आणि तिथुनच कथेच्या प्रेमात पडलो, १-२ दिवस तर कोणत्या वेळेस कथा अपलोड होते ह्यात गेले, मग रोज रात्री झोपण्याच्या अगोदर भाग वाचत राहिलो,
खरंच खुप छान होती कथा.👌
लिहिते रहा.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chhan suruwat Keli & shewathi titkach sukhad storycha
मितवा खूपच छान कथेची मांडणी करण्यात आली आहे.
धन्यवाद .