” तुला माहिती नाही आहे पण मी ज्या कोणत्या कॉलेज ला जायचो तिथे मुली नुसत्या माझ्या मागे पुढे फिरायच्या. पण मी कधीच कुणाला भाव दिला नाही…मी ठरवलं होतं की जिच्याशी माझं लग्न होईल मी फक्त तिच्यावरच प्रेम करेल…आणि ती नशीबवान मुलगी तू आहेस… आय नो तुला असे वाटत असेल की मी तुलाच का पसंत केले…पण मी आहेच असा…मी कितीही जास्त शिकलेला वा मॉडर्न असलो तरीही मला साधेपणाच खूप आवडतो…” धीरज बोलत होता.
राधाला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. धीरज मात्र बोलतच होता. शेवटी कुणीतरी ह्यांना आवाज दिला आणि धीरजचे बोलणे बंद झाले. मग दोघेही घरात गेले. धीरज ने तर आधीच आपली पसंती जाहीर केली होती. त्याच्या घरच्यांना सुद्धा राधा पसंत होती. राधाच्या घरच्यांनी तर आधीच होकार द्यायचे ठरवले होते. फक्त आता राधाला तेवढ्यापुरते विचारायचे राहिले होते. तसा घरच्यांनी तिच्या होकार नकाराला जास्त महत्त्व द्यायचे नाही हे आधीच ठरवले होते. तरीही नावापुरते विचारावे म्हणून तिची मोठी काकू तिला कोपऱ्यात नेऊन हळूच तिला म्हणाली.
” काय मग राधा…आवडला ना धीरज…?”
” मला काही कळत नाही आहे काकू…म्हणजे माझा नक्की काय निर्णय आहे ते मलाच कळत नाहीये…मला थोडा वेळ हवाय…” राधा गोंधळून म्हणाली.
” वेडी आहेस का तू…इतका चांगला मुलगा मिळतो का आजकाल…ते ही इतक्या लवकर…आणि नकार देण्यासारखे काय आहे ग त्याच्यात…?” काकू जरा रागातच तिला म्हणाली.
” तसं नाही काकू… मी कुठे नकार देतेय…मी म्हणतेय की मला फक्त थोडा वेळ हवाय म्हणून…” राधा कावरीबावरी होत म्हणाली.
” काही वेळ बिळ मिळणार नाही… तसही तुला काय कळतंय त्यातलं…त्यापेक्षा आम्ही जे म्हणू तेच ऐक…कारण आम्हाला अनुभव जास्त आहे…आणि असा मुलगा आणि असे स्थळ लवकर मिळत नाही…मी सगळ्यांना तुझा होकार कळवते..” काकू म्हणाली.
आणि राधाला म्हटल्याप्रमाणे काकू तिथून गेल्या आणि सगळ्यांना राधाचा सुद्धा होकार असल्याचे कळवले. घरात सगळ्यांना आनंदी आनंद झाला. लवकरात लवकर मुहूर्त काढायचे ठरवले. राधाला तर काय होतंय काय नाही हे सुद्धा कळत नव्हते. कारण तिला विचार करायला सध्यातरी मुभा नव्हतीच. शिवाय नकार द्यायला ना तिच्या जवळ कारण होते ना तेवढी तिची हिम्मत होती.
मग राधाने सुद्धा घरच्यांचा होकार हा स्वतःचा होकार आहे असे गृहीत धरले आणि सगळं काही राजी खुशीने करायचे ठरवले. शेवटी तिच्या घरचे तिच्यासाठी जो काही विचार करतील तो चांगलाच करतील हे तिला पक्के ठावूक होते आणि घरच्यांच्या आनंदातच तिचा आनंद होता. धीरजच्या स्थळाचा तिने मनापासून स्वीकार केला.
राधा आणि धीरजच्या साखरपुड्याची तारीख ठरली. बरोबर पंधरा दिवसा नंतरची. काकांच्या मुलीचं लग्न सुद्धा हिच्या मागोमाग करायचे असल्याने हिचं लग्न लवकर लावायचा काकांचा विचार होता. राधाच्या वडिलांना सुद्धा राधाचं लग्न लवकर करण्यात काही प्रोब्लेम नव्हताच. शिवाय धीरज सारखा जावई मिळाल्याचा आनंद होताच.
दोघांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली. साखरपुड्यासाठी चे कपडे दोघांच्याही पसंतीने घ्यायचे होते. म्हणून मग त्या दिवशी राधा आणि धीरज दोघांनीही शहरात जायचे ठरले होते. दोघांनाच सोबत कसे पाठवायचे म्हणून मग घरच्यांनी राघवला दोघांच्याही सोबत पाठवायचे ठरवले. कारण राघव नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांच्याही चांगलाच ओळखीचा होता. राघवला त्या दिवशी स्वतःचे सुद्धा काही काम होते पण मोठ्यांचा आग्रह मोडवला नाही म्हणून मग तो सुद्धा त्यांच्यासोबत जायला तयार झाला.
धीरजची कार घेऊन दोघेही राधाच्या घरी पोहचले. तिथून राधाला घेऊन शहराकडे निघाले. राघव कार चालवत होता आणि राधा आणि धीरज दोघेही कार मध्ये मागे बसलेले होते. सीट वर भरपूर जागा असूनही धीरज सारखा सारखा राधाच्या बाजूने यायचा आणि राधा अजूनच बाजूला सरकायची. असे करून शेवटी दोघेही गाडीच्या बरोबर एका बाजूला आले होते. धीरज राधाला म्हणाला.
” अगं सारखी सारखी तिकडे काय सरकत आहेस…माझ्यापासून काय लाजतेस…मी तुझा होणारा नवरा आहे…आपण आता एकमेकांशी मोकळेपणाने वागले पाहिजे…”
” न..न..नाही…म्हणजे तसं काही नाही…” राधा म्हणाली.
” नाही ना…मग बोल ना माझ्याशी…?”
” हो…बोला ना तुम्ही…मी ऐकत आहे…” राधा म्हणाली.
” मला सांग… माझ्या अशी कुणी तुझ्या इतकं जवळ आलं होतं का…?”
राधा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन त्याच्याकडे पाहत होती.
” म्हणजे…माझ्या आधी तुझा कुणी मित्र होता का…?” धीरज ने विचारले.
राधा काही न बोलता गोंधळून त्याच्याकडे पाहत होती.
” अगं म्हणजे बॉयफ्रेंड होता का एखादा…?” धीरजने डायरेक्ट विचारले.
” नाही…मला कुणीच बॉयफ्रेंड नव्हता… ” राधा म्हणाली.
” बरं आहे…नाही म्हणजे माझ्या बायकोने फक्त अन् फक्त माझ्याशीच एकनिष्ठ राहावे अशी माफक अपेक्षा आहे माझी…” धीरज म्हणाला.
त्यावर राधा कसनुशी हसली. पण मनातून मात्र तिला धिरजला नेमकं काय म्हणायचं आहे त्याचा अंदाज येत नव्हता. धीरज इकडल्या तिकडल्या गप्पा मारत होता. राघवला धीरजचे बोलणे ऐकू येत होते. आणि तो आपल्या समोर राधाला असे प्रश्न विचारतोय हे पाहून तो असहज होत होता. धीरजला राधाला नक्की काय विचारायचं आहे ते राघवच्या लक्षात येत होते. ते तिघेही शहरातील मार्केट मध्ये आले आणि धीरजच्या गप्पा बंद झाल्या.
आज फक्त दोघांनाही एंगेजमेंट साठीचे ड्रेस घ्यायचे होते. त्यामुळे फार काही खरेदी तशी नव्हतीच. त्यामुळे एकाच मोठ्या शोरुममध्ये ते गेले. तिथे गेल्यावर सगळ्यात आधी राधासाठी साडी घ्यायची असे ठरले. राघव जाणूनबुजून या दोघांच्याही मागे मागे राहत होता.
दुकानात सेल्समन ह्यांना अनेक साड्या दाखवत होता. तिथल्या एका मोरपंखी पैठणीवर राधाची नजर गेली. तिने ती साडी हातात घेतली आणि पाहू लागली. इतक्यात धीरज तिला म्हणाला.
” नको…अगं ठेव ती साडी…मला नाही आवडत तो रंग…जरा जास्तच गॉडी वाटत आहे…आणि स्वस्त पण वाटत आहे…” धीरज म्हणाला.
तशी तिने ती साडी खाली ठेवून दिली. त्यानंतर धीरज ने अनेक साड्या पाहिल्यानंतर एक फिकट गुलाबी आणि गोल्डन काठ असलेली साडी तिच्यासाठी पसंत केली आणि राधाची शॉपिंग संपली देखील. राधाला तिची पसंती त्याने विचारली देखील नाही. नंतर त्याच्यासाठी कपडे बघीतले. तेव्हा त्याने अनेक ड्रेस पाहून त्यामधील एक ड्रेस निवडला. राधाला साधं विचारलं देखील नाही.
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते असा विचार करून राधाने सुद्धा ह्या सगळ्याचा फारसा विचार केला नाही. मग सगळे दुकानाच्या बाहेर पडले. आता बाहेर काहीतरी खायचे आणि घरी निघायचे असा त्यांचा पुढचा कार्यक्रम होता. ते तिघेही गाडी जवळ आले. जवळच एक चांगले रेस्टॉरंट सुरू झाले होते. तिथेच जायचे ठरले. सगळे गाडीत बसले. धीरज आताही राधाच्या एकदमच जवळ जाऊन बसला. अगदी तिला खेटून. ती ह्याच्या अशा बसण्याने अवघडून गेली होती.
राघवने गाडी सुरू केली. इतक्यात धीरजचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर जे नाव झळकत होते ते पाहून धीरजच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. तो लगेच राधा पासून जरा दूर झाला. त्याला असे अचानक काय झाले ते राधाला कळतच नव्हते. धीरज एकसारखा फोनकडे पाहतच होता. बहुतेक फोन उचलू की नको ह्याचा विचार करत होता. मग फोन वाजयचा बंद झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण जरा विचित्रच वागलो म्हणून. मग तो राधाला म्हणाला.
” अगं हे क्रेडिट कार्ड वाले खूपच फोन करतात यार…नुसता कंटाळा येतो मला ह्यांचा…” तो चेहऱ्यावर उसने हसू आणत म्हणाला.
मग राधा सुद्धा काही बोलली नाही. राघव सुद्धा त्याचे बोलणे ऐकत होता. इतक्यात पुन्हा त्याच्या फोनची रिंग खणाणली. आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आता मात्र राघवने मागे वळून त्याच्या हातातील फोनकडे बघितले. स्क्रीन वरील नाव वाचून त्यानेही धीरज कडे आश्चर्याने पाहिले.
आता मात्र धीरज राघव आणि राधाला म्हणाला.
” मला जरा एक महत्त्वाचा फोन येतोय ऑफिसमधून… मी येतो लगेच बोलून…” असे म्हणत तो गाडीच्या बाहेर गेला.
राधा आणि राघव हे दोघे गाडीत बसून त्याची वाट पाहत होते. गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर असलेल्या पिशव्या पाहून त्याला कसलीशी आठवण आली आणि तो लगेच गाडीच्या बाहेर निघाला. निघताना राधाला पाहून म्हणाला.
” राधा मी लगेच जाऊन येतो…”
राधाने होकारार्थी मान हलवली आणि राघव घाईघाईने शोरुम मध्ये गेला आणि दोनच मिनिटात घाईत परतला देखील. तो परतला तेव्हा त्याच्या हातात एक पिशवी होती. तो घाईतच गाडीत येऊन बसला तेव्हा बघतो तर धीरज अजूनही आला नव्हता. त्याने राधाला विचारले.
” धीरज आलाच नाही का अजुन…?”
” नाही…” राधा म्हणाली.
मग त्याने जरा अंतरावर फोनवर बोलत असलेल्या धीरजला पाहिले. फोनवर बोलताना धीरज जरा जास्तच टेंशन मध्ये दिसत होता. राघव दुरून त्याचे हावभाव निरखत होता. इतक्यात राधा त्याला म्हणाली.
” काय झालं…? म्हणजे तू परत त्या कपड्यांच्या शोरुम मध्ये कशाला गेला होतास…आणि तुझ्या हातात ही पिशवी कसली आहे…?”
त्यावर राघव ने ती पिशवी तिच्या समोर धरली आणि तो म्हणाला.
” हे घे…हे माझ्याकडून तुझ्यासाठी छोटेसे गिफ्ट समज…”
” अरे पण ह्याची काय गरज होती…?” राधा म्हणाली.
” तसेही तुला लग्नात काहीतरी द्यायचे होतेच… मग हेच घेतले…” राघव म्हणाला.
मग राधाने ती पिशवी स्वतःजवळ ठेवून घेतली. राघव मात्र काळजीने धीरज कडे पाहत होताच. थोड्या वेळाने धीरजने आपला फोन ठेवला आणि पुन्हा गाडीकडे आला. आणि गाडीत बसून म्हणाला.
” अगं ह्या ऑफिस वाल्यांच खूपच अडत माझ्या वाचून…दिवसभर सारखे फोन करत असतात…”
राधा काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे बघून थोडी हसली. राघवने गाडी स्टार्ट केली. आणि तिघेही घराच्या दिशेने निघाले.
क्रमशः
धीरजला कुणाचा फोन आला असेल ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता…? राघवला त्याबाबत काही कल्पना असेल का…? राघव ने राधाला नेमके काय गिफ्ट दिले असेल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका…
©®आरती निलेश खरबडकार.
जिवलगा – भाग १
जिवलगा – भाग २