सागरच्या स्थळाबद्दल ऐकून राधाची आई म्हणाली.
” नाही जाऊबाई…मला हे स्थळ माझ्या राधा साठी अजिबात मान्य नाही…त्यापेक्षा मी राधाला घरीच बसवून ठेवेल…”
राधाच्या आईचे बोलणे ऐकून राधाच्या काकूला राग आला. त्या राधाच्या आईला म्हणाल्या.
” मान्य नाही म्हणजे काय…? इतकं सगळं झाल्यावर निदान मी एक मुलगा सुचवला हे कमी आहे का…? आता कोण होईल राधाशी लग्न करायला तयार…सागरला सुद्धा विनवण्या कराव्या लागणार तेव्हा कुठे तो तयार होईल…आणि एवढं नाकाने बोलायला काही उरलय का…तुम्ही आता उगाच नखरे दाखवू नका…निदान राधाचं लग्न झालं तर चारचौघात मानाने बसता तरी येईल तुम्हाला…”
हे सगळं बोलणं सुरु असताना धीरजचा ठावठिकाणा शोधायला गेलेला राघव सुद्धा तिथे आलेला होता. मोठ्या मामी नेमक्या कशाबद्दल एवढ्या रागात बोलत आहेत ते त्याला कळतच नव्हते. सागरच्या बद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना काकुंच हे बोलणं पटत नव्हतं.
पण वेळ कमी होता आणि एवढ्या लवकर दुसरा मुलगा शोधण्याची जबाबदारी घ्यायला कुणी तयार सुद्धा होत नव्हतं. तरीही राधाचे बाबा त्यांच्या वहिनीला म्हणाले.
” नाही वहिनी…माझी राधा मला जड नाही…पण मी सागरचा माझ्या राधा साठी विचार नाही करू शकत…”
आता मात्र मोठी काकू हातवारे करत बोलायला लागली.
” हिला घरी बसून ठेवाल हो तुम्ही…पण हीच्यामुळे माझ्या मेघाच्या लग्नात अडथळा आला तर…अशा मुलीच्या घरात कोण सोयरिक करणार आहे… राधामुळे माझ्या मुलीचं लग्न मोडले तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल…आणि ह्याला जबाबदार तुम्ही असाल…तुम्ही दोघे अन् तुमची ही राधा…”
आता मात्र राधाचे बाबा अन् आई दोघेही काकुंचे बोलणे ऐकून हादरलेच. इथे प्रसंग काय आणि ह्यांना कशाची पडली आहे ह्याचे त्यांना खूप नवल वाटत होते. हे सगळं सुरू असताना तिथे धीरजचा ठावठिकाणा शोधायला गेलेला राघव सुद्धा परतला. तो नुकताच परतल्याने त्याला काहीच कळायला मार्ग नव्हता. पण दगडासारख बसलेल्या शून्यात पाहत असलेल्या राधाला पाहून त्याच्या मनात जोरदार कळ उठली.
आता त्याला फक्त राधाच दिसत होती. बाकी सगळं बोलणं त्याच्या डोक्यावरून जात होतं. राधाची ती अवस्था पाहून क्षणभर तो सगळं काही विसरला. त्याची नजर राधावरून हटतच नव्हती. धीरज राधाला असं सोडून पळून गेल्याचा या क्षणी सगळ्यात जास्त राग त्याला येत होता.
” अहो वहिनी…काय बोलताय तुम्ही… असं काहीच होणार नाही…आज आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे…आपण सगळेच सोबत असलो तर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊ शकतो…” राधा चे बाबा मोठ्या काकूला म्हणाले.
” ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या वाटतात…पण प्रत्यक्षात असं काहीच नाही होत…मला वाटतं राधाची काकू बरोबर बोलतेय…आपण सागरचा विचार करायला हवा…” राधाचे मोठे काका म्हणाले.
राधाच्या वडिलांना आता काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. त्यांचा मोठा भाऊ असे काही बोलेल आही त्यांना अजिबातच अपेक्षा नव्हती. आता काका आणि काकू ह्यांच्या सुरात सगळ्यांनीच सुर मिसळायला सुरुवात केली होती. आणि तो गलका ऐकून राघव सुद्धा भानावर आला होता.
त्याला आता परिस्थितीचे गांभीर्य कळत होते. धीरज मिळत नसल्याने राधाचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावण्याचा विचार करत होते. जेव्हा त्याने सागरचे नाव ऐकले तेव्हा तर तो मनापासून घाबरलाच. कावेरीताईच्या लग्नात दारू पिऊन नवरदेवासोबत आलेल्या मुलीची छेड काढतानाचा सागर त्याला आठवला.
” राधाचं लग्न मी आज करायचा विचार जरी केला तरी सागर सोबत मी राधाचं लग्न लावणार नाही…”
” मग कुठे मिळेल तुम्हाला इतक्या लवकर मुलगा…?” काकू पुन्हा हातवारे करत म्हणाली.
यावर राधाच्या वडीलां जवळ बोलायला काहीच नव्हते. राघवचे लक्ष केशवरावांकडे गेले. ते बऱ्याच वेळचे त्यालाच पाहत होते. इतक्यात केशवराव राधाच्या बाबांना म्हणाले.
” तुमची काही हरकत नसेल तर मी राधाला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार आहे….”
अचानक केशवराव यांचे म्हणणे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. राघव सुद्धा त्याच्या बाबांकडे पाहतच राहिला. राधा तर एकदमच राधाच्या वडिलांनी सर्वात आधी जाऊन त्यांचे पायच पकडले. पण केशवरावांनी त्यांना सावरले आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही हात घेवून म्हणाले.
” हे काय करताय…?”
” असे झाले तर खूप होकार होतील तुमचे…” राधा चे वडील म्हणाले.
” उपकार कसले…राधा माझ्या घरी सून म्हणून येईल हे तर आमचं सौभाग्य असेल…”
राधाचे वडील पुढे काहीच बोलू शकले नाहीत. त्यांनी केशवरावांना सरळ मिठीच मारली. आणि त्या मिठीत असतानाच त्यांनी राघव कडे पाहिले. राघवच्या चेहऱ्यावर त्यांना समाधान दिसत होते. राघवला आपल्या निर्णयाचा राग वगैरे आलेला नाही आणि तो सुद्धा ह्यात राजी आहे हे केशवरावांना कळून चुकले होते.
मोठे काका केशव रावांना म्हणाले.
” पण बाप्पू…सुलूताईंचा आणि राघवचा होकार मिळेल का ह्याला…आणि सहानुभूती वाटून तुम्ही हा निर्णय घेत असाल तर उद्या तुम्हाला तुमच्या या निर्णयाचा पश्चात्ताप व्हायला नको…तुम्ही पुन्हा एकदा विचार करा…” मोठ्या काकांनी शंका उपस्थित केली.
” मी पूर्ण विचार करूनच म्हणतोय…राघव माझ्या शब्दाबाहेर नाही आहे आणि त्याच्या आईला मी बरोबर समजावून सांगेल… राधाला मी नाईलाजाने सून करून घेत नाहीये तर तिच्यासारखी सून आम्हाला मिळाल्याचा गर्वच वाटेल मला…” केशवराव पुन्हा निर्धाराने म्हणाले.
राधाचे वडील आनंदाने काहीच बोलू शकत नव्हते. त्यांना मुळात काय बोलावं ते कळतच नव्हते. त्यांची ती अवस्था बघून केशवराव म्हणाले.
” अहो लागा की आता तयारीला…वेळ खूप कमी उरलाय…”
असे म्हणताच सगळे जण तयारीला लागले. सगळं काही आधीच तयार होतं. फक्त वेळेवर राघवसाठी नवा ड्रेस घेतला. काय होतंय आणि कसं होतंय हे राधाला अजिबात कळत नव्हते. ती त्या मनस्थितीत नव्हतीच मुळी. आता फक्त घरचे जे सांगतील ते ऐकायचे एवढेच कळत होते तिला. तिच्या घरच्यांनी तिला राघव ऐवजी सागरशी लग्न करायला सांगितले असते तर ती त्यातही राजी झाली असती.
लगेच सगळ्या तयाऱ्या झाल्या आणि अवघ्या अर्ध्या तासात दोघांचं लग्न लागलं देखील. दोघांचे लग्न झाल्यावर राधाच्या आई बाबांचे टेंशन एकदमच निघून गेले. राघव खूप चांगला मुलगा आहे आणि ती आपल्या मुलीला खूप खुश ठेवेल ह्याची जाणीव त्या दोघांनाही होती. पण अचानकच राधाच्या आईला सुलूताईंची आठवण झाली.
आधीच स्वभावाने तापट असलेल्या सूलूताई ह्या लग्नाला नेमकी कशा पद्धतीने सामोरे जाईल हे अजूनही माहिती नव्हते. त्यात आधीच त्या राधाच्या बाबांवर रागावलेल्या होत्या. पण राघवच्या वडिलांनी सगळ्यांना सुलूताईंना लग्नाबद्दल सांगण्याची मनाई केली होती. म्हणून मग त्यांचाही नाईलाज झाला.
राधाच लग्न सागरशी न होता राघवशी झालंय ह्याचा काकूला जरा रागच आला होता. कारण त्यांनी सुचवलेल्या मुलाला राधाच्या आई बाबांनी सगळ्यांसमोर नकार दिला होता. पण राधाचं लग्न झालं की त्यांच्या मेघाच्या लग्नात अडथळा येणार नाही म्हणून ती काहीही न बोलता मुकाटपणे लग्न सोहळा बघत होती.
राघव आणि राधा लग्नाची सप्तपदी घेत होते. दोघेही अगदीच यंत्रवत सगळ्या रीती निभावत होते. राधाला तर काही कळतच नव्हते जणू. लग्न वगैरे पार पडले आणि राधाच्या पठवणीची वेळ झाली तेव्हा राधाला परिस्थितीचे गांभीर्य कळू लागले. तशी राधा आईच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली. आपण आता कायमचे दुसऱ्या घरी जाणार, आणि ते ही अशा पद्धतीने ह्याचा तिने कधी विचार सुद्धा केला नसेल.
तिचे रडणे पाहून घरात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. शेवटी सगळ्यांनी दोघी मायलेकींना समजावले आणि राधाची पाठवणी झाली. राघवचा एक मित्र गाडी चालवत होता तर राधा आणि राघव मागच्या सीटवर बसले होते. तिची नजर अजूनही शून्यात होती. अगदी सकाळपर्यंत तिने हा विचार सुद्धा केला नसेल की तिचं लग्न दुसऱ्या कुणासोबत होईल म्हणून.
केशवराव गाडीत समोरच्या सीट वर बसले होते. राधा आणि राघवला पाहून त्यांच्या डोळ्यात समाधान दाटून येत होते आणि आपल्या मुलावर गर्व सुद्धा वाटत होता. पण क्षणात त्यांच्या मनात सुलोचना ताईंचा विचार आला आणि मनात काळजीचे मळभ दाटून आले. सुलोचना ताई ह्यावर कशी व्यक्त होईल ह्याचा अंदाज त्यांना येत नव्हता.
सहजीवनाचा संपूर्ण काळ त्यांनी सुलोचना ताईंना आणि त्यांच्या निर्णयांना महत्त्व दिले होते. घरातील प्रत्येक निर्णयात सुलोचना ताईंचा सहभाग हा असायचाच. आणि आता जेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न झालंय आणि ते ही त्यांना न कळवता. त्यांना राग येणं तर स्वाभाविकच होते. पण केशव रावांना आपल्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता.
राधा त्यांची निवड सार्थ ठरवेल हे त्यांना मनोमन माहिती होते. तसेही जेव्हा राधा साठी स्थळ बघणे सुरू झाले होते तेव्हा केशवराव ह्यांनी सुलोचना ताईजवळ ह्याबाबत विषय काढला होता तेव्हा सुलोचना ताईंनी ह्यावर स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
त्यांच्या मते कावेरी साठी माधव चे स्थळ नाकारून त्यांनी त्यांचा अपमान केला होता आणि आता ह्या दोन घरामधील संबंध कधीच पूर्ववत होणार नव्हते. सोयरिक तर फार दूरची गोष्ट. म्हणून मग केशव रावांना काहीच करता आले नव्हते. पण आजची वेळच तशी होती. लवकर निर्णय घेतला नसता तर राधाचं लग्न त्या सागरशी लावलं सुद्धा असतं तिच्या काका काकूंनी.
केशवराव त्या सागरला आणि काकूंच्या बहिणीला चांगल्याच प्रकारे ओळखत होते. सगळ्यांनी मिळून राधाचं आयुष्य बरबाद केलं असतं हे त्यांना ठावूक होतं. शिवाय धीरज जे वागलाय त्यात तिची तर काही चूक नव्हती ना. पण असं काही झालं की समाज मुलीलाच दोष देतो. आणि त्यात सगळ्यात जास्त पुढे असतात त्या म्हणजे स्त्रिया.
अशा प्रसंगात जर स्त्रिया त्या मुलीच्या पाठीशी राहिल्या असत्या तर तिला दोष देण्याची कुणाची हिंमतच उरली नसती असे केशवरावांना वाटून गेले. पण आल्या प्रसंगाला तोंड तर द्यायचेच होते. शिवाय राधाच्या पाठीशी खंबीरपणे उभे सुद्धा राहायचे होते. म्हणून मग केशव रावांनी आधीचे सगळे विचार झटकले.
दोन गावांतील अंतर काही जास्त नव्हते. थोड्याच वेळात ते सगळे शिरजगावात पोहचले. लग्न आटोपून घरी पोहचायला अंधार पडत आला होता. तिथे पोहचताच सर्वप्रथम केशव राव गाडीच्या बाहेर उतरले. धीरज आणि राघवची घरे जवळ जवळ असल्याने राघव च्या घरी जायचे असल्यास धीरज च्या घरासमोरून जायला लागणार होते. आणि अर्थातच सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा देणे सुद्धा क्रमप्राप्त होतेच. धीरजच्या घरी सगळेच नातेवाईक जमले होतेच. सुलोचना ताई सुद्धा तिथेच होत्या.
क्रमशः
सुलोचना ताई राधाला सून म्हणून स्वीकारणार का…? राधा आणि राघव एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारू शकतील का…? पुढे दोघांच्याही आयुष्यात काय संघर्ष लिहिलेला असेल…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका…
©®आरती निलेश खरबडकार.
खुप सुंदर
पुढील भागाची आतुरता
धन्यवाद 😊🙏