आज संध्याकाळीच सायलीला लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार होते. सायलीला तिची आई येता जाता सारख्या सूचना करत होती. सगळं काही व्यवस्थित पार पडू दे म्हणून आजी देवाला सारखे हात जोडत होती. बाबा इतर तयारींमध्ये व्यस्त होते. पण सायली मात्र थोडी धास्तावलेली होती. सगळं काही नीट होईल का हा विचार तिच्या मनात सतत येत होता. तिला इतक्यात हे सर्व नको होतं. पण बाबांच्या पुढे हिचे काही चाललेच नाही. बाबांनी सांगितले की मी पसंत करेन त्या मुलाबरोबर तुला लग्न करावे लागेल आणि सायलीने खाली मानेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते.
अनिच्छेनेच का होईना सायली साडी नेसून तयार झाली. हलक्या गुलाबी रंगाची साडी आणि साधासा मेक अप. यातही अगदी नक्षात्रासारखी दिसत होती सायली. तिचा तो गोरा रंग, बोलके डोळे आणि कुरळे केस. सगळेच तिच्या सौंदर्यात भर घालत. आजीने लगेच बोट मोडून तिची दृष्ट काढली.
इतक्या बाबा सांगायला आले की पाहुणे आलेत. सगळेजण त्यांच्या स्वागताला दारापर्यंत गेले. रूम मध्ये आता सायली एकटीच होती. तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच म्हणाली…”इतके टेंशन नकोस घेऊ सायली…अजुन मुलाने पसंत थोडेच केलंय तुला…” आणि मग स्वतःशीच हसली सुध्दा. पण थोडेफार टेंशन तर अजूनही जाणवतच होते.
तिकडे हॉल मध्ये पाहुण्यांचे चहा पाणी झाले. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला. तेवढ्यात सायलीला सुद्धा तिथे बोलावणं आलं. सायली तिथे गेली आणि तिच्या आजीच्या बाजूला जाऊन बसली.
खाली मानेने तिथेच सोफ्यावर बसून मुलाची आई जे काही प्रश्न विचारत होती त्यांची उत्तरे देत होती. पण एक नजर एकसारखीच तिच्याकडे बघत होती. ती म्हणजे समर ची. समर राहून राहून तिच्याकडेच पाहत होता. आणि त्याच्याकडे न पाहताही हे तिच्या लक्षात येत होतं. आणि त्यामुळे सायली अधिकच गोंधळली होती. शेवटी समरच्या आईंचे प्रश्न संपले आणि सायली ने सुटकेचा निःश्वास सोडला.
सायली हॉलमधून तिच्या रूम कडे जायला निघाली. पण जाता जाता तिने एकदा समरकडे पाहिलेच. समर सुद्धा तिच्याकडेच पाहत होता. ती सुद्धा आपल्याकडे पाहतेय म्हटल्यावर तो जरा ओशाळला आणि दुसरीकडे पाहू लागला. त्याचा झालेला गोंधळ बघून सायलीला जरा हसूच आले. पण दुसऱ्याच क्षणी घरातील सगळी मंडळी इथेच आहेत हे आठवून तिने आपले हसू रोखून धरले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली.
त्यानंतर काही वेळाने पाहुणे सुद्धा निघून गेले. घरी आई, बाबा आणि आजी बराच वेळ त्या पहुण्यांबद्दल बोलत होते. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा निरोपाचा फोन आला. त्यांना सायली खूप पसंत पडली होती. आई बाबा अन् आजी तिघेही खूप खुश होते. सायली मात्र काळजीत पडली. विचारात पडलेल्या सायलीला पाहून तिच्या आईने तिला विचारले…
” सायली…काय झालंय…तू खुश नाही आहेस का…इतक्या काळजीत का वाटत आहेस…?”
” आई…मला वाटतं आपण मुलाकडच्यांना सगळं खरं खरं सांगायला पाहिजे…” सायली म्हणाली.
” अजिबात नाही…आणि हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही…निदान लग्नापूर्वी तरी त्यांना कळायला नकोच…इतका चांगला मुलगा हातातून जायला नको…” आई संतापून म्हणाली.
आता मात्र सायली एकदम गप्प बसली. खोटं बोलून लग्न करणे तिला अजिबात पटणारे नव्हते. पण आई बाबा ह्याला कधीच परवानगी देणार नाहीत हे सुद्धा तिला कळले होते. काय करावे आणि काय नको हे सायलीला सुचत नव्हते. असेच दिवस जात होते. दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांशी साखरपुड्याच्या तयारीबद्दल बोलायला सुद्धा लागले होते. भेटीगाठी सुद्धा वाढत होत्या.
समर ने कुठूनतरी सायलीचा नंबर मिळवला आणि तिला मेसेज केला. सायलीला मात्र त्याच्याशी बोलताना अवघडल्यासारखे वाटत होते. शेवटी एके दिवशी समर ने स्वतःहून तिला कॉफी शॉप मध्ये भेटायला बोलावले. सायली मात्र आता काळजीत पडली. तिने ही गोष्ट आईला सांगितली. आता होणारा नवरा एकदा भेटायला बोलवतो य म्हटल्यावर जायला काही हरकत सुद्धा नव्हती. आईने तिला जायची परवानगी दिली. पण जाताना सक्त ताकीद सुद्धा दिली. समरला काहीही खरे सांगायचे नाही.
सायली समरला भेटायला कॉफी शॉप मध्ये आली. समर दहा मिनिटे आधीच तिथे पोहचला होता. त्याची आणि सायलीची ही पहिलीच भेट असल्याने त्याला आज उशीर करायचा नव्हता. स्वाती ने समारला पाहिले आणि ती पाहतच राहिली. व्हाइट टी शर्ट आणि ग्रे जीन्स मध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. डोळ्यावरचा नंबरचा चष्मा सुद्धा त्याला अगदीच शोभून दिसत होता. दीसण्यावरून तर अगदीच सोज्वळ वाटत होता.
सायली जरा अवघडतच त्याच्या समोर गेली. तो सायली ला म्हणाला..
” हाय… कॉफी शॉप शोधायला जास्त त्रास नाही झाला ना…”
” नाही…ऑटो वाल्याने व्यवस्थित सोडले इथपर्यंत…” ती म्हणाली.
” छान…” समर सायली कडे पाहत पुटपुटला
” काय…?” सायलीने विचारले.
” ऑटोवल्याने इथवर व्यवस्थित सोडले ते छान…” तो जरा गोंधळून म्हणाला.
” अच्छा…” त्याने प्रत्यक्षात तिलाच छान म्हटले होते हे तिला आधीच कळल्याने तिने हसून म्हटले.
” तुम्ही काय घेणार…काय ऑर्डर करू तुमच्यासाठी…?” समरने विचारले.
” त्या आधी मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे…” सायली जरा गंभीर होत म्हणाली.
आता मात्र समर सुद्धा थोडा गंभीर झाला होता. सायली नेमकं काय बोलणार हा प्रश्न त्याला पडला होता. तो सायलीला म्हणाला.
” बोल ना…”
” खरं तर मला हे तुम्हाला आधीच सांगायचे होते पण सांगू शकले नाही…पण अजूनही फार वेळ गेलेला नाही…आणि जर आपल्याला जन्मभर हे नाते प्रामाणिकपणाने निभवायचे असेल तर त्याची सुरुवात तुमच्यापासून काहीही लपवून मला करायची नाही आहे…” सायली म्हणाली.
” तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे…” समर ने विचारले.
” माझ्या पाठीवर जळल्याचे डाग आहेत…फारसे मोठे सुद्धा नाहीत पण आहेत हे ही तितकेच खरे आहे…मी दोन वर्षांची असताना माझ्या पाठीवर चुकून गरम चहा सांडला होतं…लहानपणी पासूनच माझ्या आई बाबांना त्यामुळे माझ्या लग्नाची खूप काळजी होती… त्यांना वाटायचे की या डागामुळे त्यांच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही…म्हणून त्यांनी ही गोष्ट मला तुमच्या पासून लपवायला सांगितली…
त्यांच्या मते ही गोष्ट लग्नाच्या नंतर जर तुम्हाला कळली तर फारसा फरक पडणार नाही…मी त्यांना चुकीचं सुद्धा नाही म्हणू शकत कारण ते सर्वकाही माझ्या काळजीपोटीच करतायत…पण मला लग्नासारख्या पवित्र नात्याची सुरुवात खोटं बोलून नाही करायची…तुम्हाला खरं कळल्यावर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल…” सायली म्हणाली.
समर मात्र सायलीचे बोलणे अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. सायली चे बोलणे संपले तरीही समर गप्पच होता. त्याला पाहून सायली म्हणाली.
” काय झालंय…तुम्ही काही बोलत का नाही आहात…तुम्हाला माझा राग आला असेल तर तो साहजिकच आहे…कुणालाही आला असता…” सायली म्हणाली.
” पण मला नाही आलाय तुमचा राग…” समर म्हणाला.
” म्हणजे…?” सायली ने आश्चर्याने विचारले.
” म्हणजे आधी मी फक्त तुमच्या सौंदर्याच्या प्रेमात होतो…पण आज मला तुमच्या मनाच्या सौंदर्याचे सुद्धा दर्शन झाले…ज्याप्रकारे तुम्ही प्रामाणिकपणे मला सगळे खरे सांगितले त्यावरून तर मला तुम्ही अधिकच आवडायला लागल्या आहात…तुमचा सच्चेपणा अगदी काळजाला भिडलाय माझ्या…जोडीदार सुंदर असण्यापेक्षा प्रामाणिक असणे जास्त महत्वाचे वाटते मला…आणि तुम्ही तर सुंदर पण आहात आणि प्रामाणिक सुद्धा…खरंच तुम्ही मला आयुष्याच्या जोडीदार म्हणून लाभल्या तर माझ्या इतका नशीबवान मीच असेल…” समर म्हणाला.
आणि समरचे बोलणे ऐकून सायली मनापासून हसली. सायलीच्या मनावरचे ओझे आज कित्येक पटींनी कमी झाले होते. खऱ्या अर्थाने आज समर तिला मनापासून आवडला होता. त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमाची गाडी निघाली ती ठीक लग्नाच्या स्टेशन पर्यंत येऊन पोहचली. मोठ्यांच्या संमतीने आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभर एकमेकांचे मन जपत ती लग्नगाठ अधिकच घट्ट केली.
जेव्हा आयुष्यभराची सोबत करायची असते तेव्हा त्याची सुरुवात ही प्रामाणिक असणे खूप गरजेचे असते. खोट्या पासून केलेली सुरुवात बरेचदा नात्यांमध्ये कटूता निर्माण करते. तुम्हाला काय वाटतं ?
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.