मनस्वीला पाहायला पाहुणे आले आणि एका भेटीतच त्यांनी मनस्वी ला पसंत केले. खरंतर इतक्या लवकर पसंती वगैरे होईल ह्याची कल्पना नसल्याने मनस्वीच्या वडिलांची अजुन मनाची तयारी सुद्धा झाली नव्हती. पण त्यांच्या मोठ्या मुलीच्या सुहासीच्या सासरच्यांनी हे स्थळ सुचवले म्हणून ते पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाले होते.
पण मुलाकडच्यांनि मनस्वीला पाहताच होकार दिला. मनस्वीच्या बाबांनी स्वतःची पसंती कळवायला थोडा वेळ मागून घेतला. पण दुसऱ्याच दिवशी सुहासी च्या सासरेबुवांनी तिच्या वडिलांना फोन केला आणि खूप चांगलं स्थळ आहे. असा मुलगा शोधूनही मिळणार नाही असे सांगून त्यांना लवकर त्यांची पसंती आहे की नाही हे ठरवायचे सांगितले. अर्थातच आपल्याला होकार च अपेक्षित आहे हे सुद्धा अप्रत्यक्षपणे सांगायला विसरले नाही.
मनस्वीच्या वडिलांनी विचार केला की मुलगा मंदार खरंच चांगल्या घरातला वाटतोय. त्याला जितके पाहिले त्यावरून तर तो चांगला उत्साही वाटला. त्याला चांगली नोकरी सुद्धा आहे. शिवाय सुहासीच्या सासऱ्यांची आणि त्याच्या वडिलांची चांगलीच ओळख सुद्धा आहे. त्यामुळे मनस्वी साठी त्याचा विचार करायला हरकत नाही असा विचार करून त्यांनी एकदा मनस्वीचे मत सुद्धा विचारात घ्यायचे ठरवले.
मनस्वीला तिच्या वडिलांचा निर्णय मान्य होता. तिने ठरवले होते की लग्नाचा निर्णय हा तिच्यासाठी बाबाच घेतील. कारण ते नेहमीच त्यांच्या मुलींसाठी चांगलाच निर्णय घेतात हे मनस्वी आणि सुहासी या दोघींनाही माहिती होते.
सुहासी साठी समरचे स्थळ सुद्धा बाबांनी खूप मुलं पाहिल्यावरच पसंत केले होते आणि सुहासी आज तिच्या सासरी सुखाने नांदत होती. समर प्रत्येक बाबतीत एक चांगला नवरा आणि जावई ठरला होता. आणि मंदार सुद्धा समरच्या वडिलांच्या मित्राचाच मुलगा होता. समरचे वडील जरा हट्टी स्वभावाचे असेल तरीही सुहासीला मात्र त्यांनी आजवर चांगले सांभाळून घेतले होते.
शेवटी थोडाफार विचार करून मनस्वीच्या वडिलांनी या स्थळाला होकार दिला. आणि मंदार च्या घरच्यांनी साखरपुडा लवकरच उरकून टाकू असा तगादा लावला. आता लग्न ठरलंय म्हटल्यावर साखरपुडा लवकर करायला काही हरकत नाही म्हणून मनस्वीच्या वडिलांनी ते सुद्धा अगदी राजी खुशीने मान्य केले.
मंदारच्या घरच्या मंडळींनी सगळे काही आधीच ठरवून ठेवले होते. साखरपुडा कुठे करायचा, मुलीने आणि मुलाने कोणते कपडे घालावेत आणि जेवणात काय असावे ह्याची यादी त्यांच्याकडे तयारच होती. ती त्यांनी मनस्वी च्या वडिलांकडे आधीच सुपूर्द केली होती. मनस्वी च्या वडिलांना सुद्धा ह्यात काही गैर वाटलं नाही. कारण मुलाकडच्यांनी सांगितले नसते तरीही त्यांनी सगळं काही थाटातच केलं असतं.
साखरपुड्याची तयारी अगदी जोरदार चाललेली होती. सुहासी अगदी आनंदाने आणि मनापासून आईला सगळ्या तयारीसाठी मदत करत होती. सगळे आनंदात होते पण समर मात्र जरा गप्प गप्पच होता. हे लग्न ठरले तेव्हापासून तो मनमोकळे पणाने काही बोलला सुद्धा नव्हता. पण उत्साहाच्या भरात ते कोणाच्याच लक्षात आले नाही.
शेवटी दोघांचा साखरपुडा अगदी थाटात पार पडला. सगळ्या पाहुण्यांनी मुलाचे आणि मुलीचे खूप कौतुक केले. मंदार आणि मनस्वी दोघांनी सुद्धा आपापले नंबर एकमेकांना दिले आणि दोघांमध्ये फोन वर बोलणे सुरू झाले.
आधी लाजत लाजत बोलणारा मंदार हळूहळू अगदी गोड बोलायला लागला होता. मनस्वी सुद्धा या नव्या भावनेला अनुभवत होती. सुरुवातीला दिवसातून एकदा फोन करणारा मंदार आता तिला दर तासाला फोन करायला लागला होता. सुरुवातीला तिच्या मनाचा अंदाज घेणारा मंदार आता तिने कोणता ड्रेस घातलाय आणि दिवसभरात ती काय करणार आहे ह्याची सुद्धा काटेकोरपणे माहिती घेत होता.
मनस्वीला मात्र त्याचं तिच्यावर हक्क गाजवणे म्हणजे त्याचे प्रेम वाटायचे. पण सुरुवातीला फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबणार मंदार आता तिच्या शरीरयष्टी वर सुद्धा लक्ष द्यायला लागला होता. बोलताना सतत आता तो अशाच विषयांवर यायचा. मनस्वीला मात्र इतक्यात हे आवडायचे नाही. ती विषय बदलण्याचा प्रयत्न करायची पण मंदार थोड्याच वेळात त्याच विषयावर यायचा.
मनस्वी आपल्याला हवं ते उत्तर देत नाही म्हटल्यावर मंदार तिला बाहेर भेटायला बोलावू लागला. सुरुवातीला बाहेर कॉफी प्यायला जावू म्हणून बरेच वेळा त्याने तिला आग्रह केला. पण ती सतत काही ना काही कारण सांगून टाळत होती. कारण तिच्या वडिलांना मंदार सोबत बाहेर जाण्याची परवानगी मागायची तिची हिम्मत होत नव्हती.
शेवटी एकदा मंदारच मनस्वीच्या वडिलांना म्हणाला.
” बाबा…तुमची काही हरकत नसेल तर मी मनस्वीला बाहेर कॉफी प्यायला नेऊ शकतो का..?”
मंदार ने असे डायरेक्ट विचारल्यावर मनस्वीचे वडील नकार देऊ शकले नाहीत. पण लवकर घरी या असे सांगून त्यांनी दोघांना बाहेर जायला परवानगी दिली.
मनस्वी आणि मंदार बाहेर जायला निघाले. त्यांच्या घरापासून जवळच बरेच कॉफी शॉप असून सुद्धा मंदार मुद्दामहून शहरापासून जरा दूरच असलेल्या कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. मनस्वीला खरंतर हे आवडलेच नव्हते. तिने त्याला सौम्य शब्दात विरोध केला पण तिच्या वडिलांना सांगुनच बाहेर पडलो आहोत असे म्हणून त्याने तिला समजावले.
त्यानंतर कॉफी शॉप मध्ये सुद्धा अगदी कोपऱ्यातला टेबल पाहून बसला. आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि मनस्वी च्या अगदी बाजूच्याच टेबल वर जाऊन बसला. त्यानंतर त्याचे लाडिक चाळे सुरु झाले. मनस्वी खूपच अवघडली होती. त्याचं ते वागणं मनस्विला आवडत नव्हतं. पण तरीही हा आपला होणारा नवरा आहे म्हणून ती गप्प बसलेली होती.
मंदार कधी गप्पा करताना उगाच तिच्या हाताला मांडीला स्पर्श करायचा आणि कधी कधी तिच्या कानातल्यांची स्तुती करताना उगाच तिच्या गालांना स्पर्श करायचा. आज त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता. आणि मनस्वी ला सुद्धा ह्याची जाणीव झाली होती. ती काही बोलणार एवढ्यातच कॉफी आली. मनस्वी ने कशीतरी ती कॉफी घशाखाली उतरवली आणि मंदारला म्हणाली की
” आपल्याला बाहेर निघून खूप उशीर झालाय…आपल्याला घरी जायला हवे…बाबांना काळजी वाटेल…”
” अगं फार काही उशीर झाला नाही…आणि तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर तुझ्या बाबांना काही काळजी वाटणार नाही…आपण आज खूप फिरायचे…तुझा विश्वास आहे ना माझ्यावर…मग काही जास्त विचार करू नकोस…मी जसे म्हणेल तसे कर म्हणजे झाले…” मंदार म्हणाला.
आता मात्र काय बोलावे आणि काय नाही ते मनस्वीला सुचत नव्हते. शेवटी नाईलाजाने ती मंदार सोबत कॉफीशॉप च्या बाहेर निघाली आणि मंदार तिला घेऊन शहराच्या बाहेर डोंगराच्या दिशेने निघाला. मंदारला हे सगळं खूपच रोमँटिक आणि थ्रिलिंग वाटत होतं. पण मनस्वी मात्र मनातून घाबरलेली होती.
क्रमशः
तिचा सन्मान जपायलाच हवा – भाग २ (अंतिम भाग )