कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सूने वाटत होते. रोज घरी आल्यावर मयुरी त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं ह्याची विचारपूस करायची. त्यावेळी मात्र कार्तिक चिडून “तुला काय त्याचं ?” असे म्हणायचा. तरीही त्याच्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा तीच चौकशी करायची.
आज मात्र त्याला खूप वाटत होते की तिने त्याचा दिवस कसा गेला ह्याची चौकशी करावी. पण नंतर लगेच आपण काय विचार करत आहोत हे कळल्याने त्याने तो विचार झटकला आणि बेफिकिरीने मोबाईल बघत सोफ्यावर बसला. अशातच रात्र झाली आणि त्याला भुकेची जाणीव झाली. आणि त्याने मोबाईलवरून जेवण ऑर्डर केले.
थोड्या वेळाने जेवणाचे पार्सल आले आणि तो जेवायला बसला. पहिलाच घास खाल्ल्यावर त्याला मयुरीच्या हातच्या जेवणाची आठवण आली. मयुरी अप्रतिम जेवण बनवायची. पण कार्तिकने कधीच तिच्या स्वयंपाकाची स्तुती केलेली नव्हती. आज मात्र प्रकर्षाने त्याला तिची आठवण येत होती. घरात एकाकीपणा वाटत होता.
कार्तिक झोपायला जाणार इतक्यात त्याला तिची अलमारी थोडी उघडी दिसली. आज बॅग भरताना बहुतेक चुकून तिच्या कडून उघडी राहिली असेल. त्याने आज पहिल्यांदा तिचं कपाट उघडुन पाहिलं होतं. कपाटात सगळं काही अगदी व्यवस्थित, टापटीप आवरून ठेवलेलं होतं. त्याचं कपाट तो नेहमीच अस्ताव्यस्त ठेवायचा. इतकं सुबक सगळं ठेवलेलं पाहून त्याला तिचं नवल आणि कौतुक सुद्धा वाटलं.
त्याला आठवले की एकदा तिने कपाट आवरून ठेवलेले असताना आपण तिला उगीच ओरडलो होतो. माझ्या वस्तूंना हात लावू नको म्हणून बजावलं होतं. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं.
तिच्या प्रत्येक कामात असाच टापटीपपणा होता.घरात आल्यापासून घराला तिने अगदी सुंदर आणि नीटनेटकं ठेवलं होतं. घराला तिचा हात लागल्यावर जणू जादूच झाली होती. घरातील परदे, पिलो कव्हर्स आणि इतर अनेक वस्तू तिने तिच्या कलाकुसरीने अगदी सुंदर बनवल्या होत्या.
पण ह्याचं कधी लक्षच गेलेलं नाही. त्याने तिच्या मेहनतीला कधीच पाहिले नाही. फक्त पाहिले तिचे साधे असणे. याला आस होती ती फक्त मॉडर्न दिसायला हवी याची. म्हणून त्याने या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की त्या व्यतिरिक्त अनेक असे गुण तिच्याजवळ आहेत. शिवाय ती मनापासून प्रेम करायची त्याच्यावर.
त्याला मात्र फक्त एवढंच वाटायचं की ही मॉडर्न दिसावी आणि हिला बघुन शनायाचा जळफळाट व्हावा. त्याने त्या व्यतिरिक्त तिला बायको म्हणून आपली जोडीदार म्हणून कधीच पाहिलं नव्हतं. शनाया वर असलेल्या मत्सरापोटी त्याने हिचा चांगुलपणा कधी बघितलाच नव्हता.
आज पहिल्यांदा ती त्याच्यापासून दूर गेली होती तेव्हा त्याला तिचा एक एक गुण लक्षात येत होता आणि कुठेतरी आपल्या वागण्याचं वाईट वाटत होतं.विचार करत असताना त्याच्या हाती तिची डायरी लागली. डायरी पहावी म्हणून त्याने डायरीचं पहिलं पान पालटलं. त्यावर तिचे अगदी मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर पाहून तो हरखून गेला.
त्याला आधी नेहमी वाटायचं की त्याचा हस्ताक्षर सुद्धा असंच सुंदर असावं. पण त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर कधीच होऊ शकलं नाही. ते सुंदर मोत्यासारखे हस्ताक्षर पाहून त्याला तिची डायरी वाचण्याचा मोह आवरला गेला नाही. पहिल्याच पानावर सुंदर अशी चारोळी लिहिलेली होती.
दडवू कुठवर मी डोळ्यातल्या आसवांना
तू ओळखून घे ना मनीच्या भावनांना
तुझेच गीत गावे, तुझेच नाव घ्यावे
वाटे तुझीच व्हावे, या कोवळ्या कळ्यांना
तो पुढे वाचू लागला. एकाहून एक सुंदर चारोळी, कविता लिहिलेल्या होत्या. तिचे लिखाण वाचून तो भारावून गेला होता. आपली बायको खरंच किती संवेदनशील ह्याची त्याला जाणीव झाली. आपण तिच्यातील इतर गुण न पाहता फक्त एका गोष्टीसाठी तिचा राग राग केला ही गोष्ट आठवून आता त्याला खूप वाईट वाटत होते.
जेव्हा त्याने स्वतःचा हट्ट बाजूला सारून शांततेने विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की नकळतपणे आपण मयुरीवर प्रेम करायला लागलो आहोत. आणि तिच्यापेक्षा योग्य बायको आपल्याला मिळूच शकली नसती. पण तिच्यासमोर व्यक्त व्हायला आपण उशीर केलाय ह्याची जाणीव त्याला झाली. आणि आणखी उशीर व्हायला नको म्हणून तो दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या गावी जायला निघाला.
इकडे लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी माहेरी आलेली मयुरी आनंदात होती. पण घरचे आडून आडून तिला कार्तिक चे नाव घेऊन चिडवत तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जात होता. आपण कार्तिकला आवडत नाही ह्या गोष्टीच्या जाणिवेने ती क्षणात उदास होऊन जायची.
ती अंगणातल्या झोपाळ्यावर विचार करत बसलेली होती.
इतक्यात तिची आजी तिला चिडवत म्हणाली.
” काय ग मयु…जावई बापूंना सोडून करमत नाही वाटतं…अशी उदास एकटीच बसलेली आहेस…”
” नाही आजी… असं काहीच नाही…मला करमतय इथे…” ती गोंधळत म्हणाली.
इतक्यात बाहेरून घराकडे येत कार्तिक म्हणाला.
” पण मला तुला सोडून अजिबात करमत नव्हतं…म्हणून मीच इकडे आलोय…”
त्याला पाहून मयुरीला आश्चर्य वाटले. कार्तिक ने आजीला नमस्कार केला. आणि आणि कार्तिक आल्याचे घरी सांगायला म्हणून तिथून घरात निघून गेल्या. इतक्यात मयुरी त्याला म्हणाली.
” तुम्ही इथे कसे…? म्हणजे काही काम होतं का…?”
” नाही…फक्त तुला सोडून करमत नव्हतं म्हणून आलोय इथे…” कार्तिक म्हणाला.
” पण तुम्हाला तर मी…” मयुरी अडखळत बोलली आणि अर्ध्यातच गप्प बसली.
” मला माहिती आहे…मी खूप त्रास दिलाय तुला…आणि त्याची जाणीव सुद्धा झाली आहे मला…स्वतःच्या चुकीची सुद्धा आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाची सुद्धा…आधीच बोलायला घुमा आहे मी…पण प्रेम व्यक्त करायला उशीर करून चालणार नाही हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या…म्हणूनच…” कार्तिक बोलताना तिथेच थांबला.
” म्हणूनच काय…” मयुरीने जरा अवघडतच विचारले.
मयुरी ने हे विचारताच कार्तिक एका गुडघ्यावर खाली बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला.
” म्हणूनच तुला सांगायला आलो आहे… आय लव्ह यू मयुरी…”
मयुरी नखशिखांत लाजली. इतक्यात दोघांचे ही लक्ष दाराकडे गेले. घरची सर्व मंडळी ह्या दोघांकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. त्यांना पाहून मयुरी ओशाळली आणि लाजून आत निघून गेली. मन मात्र अजूनही प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत होते. लग्नाला बरेच महिने झाले असले तरीही दोघांचा संसार खऱ्या अर्थाने आजपासूनच सुरू झाला होता.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.