एवढ्याशा गोष्टीवर नाराज होऊन निशा माहेरी निघून गेली ह्याचे साकेतला नवल वाटत होते. पण साकेतच्या घरच्यांना मात्र ह्याचे खूप वाईट वाटत होते. त्यांच्या मते सुनेला नाराज करणे म्हणजे घरच्या लक्ष्मीचा अवमान करणे होते. शिवाय निशा सध्या घरात नवीन आहे म्हणून ती या घरात रुळेपर्यंत तरी तिला सांभाळून घेणे गरजेचे होते.
त्यामुळे घरच्यांनी साकेतला निशाला समजावून घरी घेऊन यायला सांगितले. साकेतला सुद्धा हे प्रकरण फार लांबवायचे नव्हते म्हणून तो सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला आणायला तिच्या घरी गेला. त्याला आलेलं पाहून निशाला आनंद झाला. आपल्या शिवाय साकेतला अजिबात करमत नाही हे पाहून ती सुखावली.
ह्याला आपला रुसवा सहन होत नाही हे पाहून तिचा अहंकार देखील सुखावला. तिने लगेच परत जायची तयारी केली. आशाताईंनी जावई बुवांसाठी साग्रसंगीत स्वयंपाक केला. जेवण वगैरे आटोपून साकेत आणि निशा जायला निघाले तेव्हा वसंतराव मुद्दाम साकेत ला म्हणाले.
” हे पहा साकेत राव…आम्ही आमच्या मुलीला खूप लाडात वागवले आहे…तिला कधीच नाराज केले नाही…त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीची काळजी घ्यावी असेच आम्हाला वाटते…”
साकेतने काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. वसंतराव त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यामुळे तो नेहमीच त्यांचा मान राखायचा.
साकेत आणि निशा घरी आले. साकेतच्या घरच्यांना सुद्धा आनंद झाला. साकेत आणि निशा एकमेकांच्या सहवासात खूप आनंदात होते. पण निशाचा हट्टी स्वभाव काही केल्या जात नव्हता. उलट साकेतचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो आपल्या साठी काहीही करू शकतो ह्या जाणिवेतून निशा आणखीनच हट्टी बनत चालली होती.
घरी सगळं काही आपल्याच मर्जीने व्हावं हा तिचा अट्टाहास होता. ती स्वयंपाक घरात कामाला हात लावायची नाही पण अधून मधून जाऊन तिच्या जावांना सूचना नक्की देऊन यायची. आज जेवणात हे करा, काल भाजीत तिखट जरा जास्तच झालं होतं आज कमी करा ह्या सूचना ती सर्रास द्यायची. तिच्या जावा सुद्धा तिच्या सूचनांना प्रेमळ सल्ला समजून तसं वागायच्या.
ती स्वयंपाकात लक्ष घालायला लागलीय हे पाहून तिच्या सासू सासऱ्यांना सुद्धा आनंद व्हायचा. एकदा तिने स्वयंपाक घरात जाऊन तिच्या जाऊबाई ना सांगितले की आज रात्रीच्या जेवणात आलू मटार ची भाजी करा म्हणून. रात्री सगळे जेवायला बसले तेव्हा आलू मटारच्या जागी वांग्याची भाजी पाहून निशा म्हणाली.
” काय हो जाऊबाई…तुम्हाला आलु मटारची भाजी करायची सांगितली होती ना मी…मग तुम्ही ही वांग्याची भाजी कशाला केलीत…साधी सांगितलेली गोष्ट कळत नाही का तुम्हाला…मला नाही खायची ही भाजी…मला आलू मटारच खायचे आहेत…माझ्यासाठी आताच करा…”
निशाचे बोलणे ऐकुन सगळेच तिच्याकडे पाहू लागले. निशा असे काही बोलेल असे त्यांना वाटलेच नव्हते. आताशा तिच्या जाऊबाईंना ही तिच्या बोलण्याचा राग आला. त्या निशाला म्हणाल्या.
” म्हणजे…जरुरी नाही की तू जी सांगशील तिचं भाजी व्हायला हवी म्हणून…आणि मात्र सोलायला एवढा वेळ नव्हता म्हणून घाईघाईने ही भाजी केलीय…आणि तुला आलू मटारची भाजी खायची इच्छा आहे तर तू जा अन् स्वतःसाठी स्वतःच कर…”
” मी कशाला स्वयंपाक घरात काम करायचे…माझ्या घरी मी कधीच काम केले नाही…पण तुम्हाला तर सवय आहे ना कामाची…तुम्ही कुठे एवढ्या हायफाय घरातून आल्यात…आणि मी कुठे पंचपक्वान्न करायला सांगितले होते…फक्त एक भाजीच तर करायला सांगितली होती…ते ही तुम्हाला जमलं नाही…” निशा म्हणाली.
” अगं निशा…तोंड सांभाळून बोल…त्या मोठ्या आहेत…तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का…?” साकेत मध्येच म्हणाला.
आता मात्र निशा तोंड फुगवून आत निघून गेली. यावेळी निशाच्या सासू सासर्यांना आणि तिच्या जावांना तिचे वागणे अजिबात पटले नव्हते. साकेतच्या मोठ्या भावाला पण आपल्या बायकोला असे बोललेले पटले नव्हते. साकेतने सगळ्यांची माफी मागितली. आणि निशाला समजावून सांगेन असे आश्वासन सुद्धा दिले.
थोड्या वेळाने साकेत त्याच्या रूममध्ये आला आणि निशाला म्हणाला.
” निशा…तू का बोललीस वहिनींना…वहिनी या घरची मोठी सून आहे…तू त्यांना अशी काम नाही सांगू शकत…आणि तिच्या माहेरच्या परिस्थीती बद्दल बोलणं खूप चुकीचं होतं… एकतर ज्या बद्दल तुला माहिती नाही त्याबद्दल तुझं बोलणं बनत नाही…आणि त्यांची माहेरची परिस्थिती चांगली नसेल तरीही त्याबद्दल बोलण्याचा तुला काही अधिकार नाही…”
” पण त्या घरच्या सगळ्यांचे काम ऐकतातच ना…मग मी सांगितलेलं काम करायला काय कमीपणा वाटतो का त्यांना…” निशा रागाने म्हणाली.
” घरातील मोठ्यांचे काम ऐकणारच त्या…पण तू त्यांच्यापेक्षा लहान आहेस…तू त्यांना काम सांगू शकत नाहीस उलट त्यांना प्रत्येक कामात मदत करायला हवीस…त्या तुझ्याशी प्रेमाने वागतात, बोलतात ह्याचा तू गैरफायदा घेतलास आजवर…पण यापुढे तू सुद्धा त्यांच्या बरोबरीने स्वयंपाकघरात काम करायला पाहिजेस…निदान सगळं शिकायला सुरुवात तरी कर…” साकेत तिला म्हणाला.
” मी ही असली घरगुती कामं करणार नाही…मी काय त्यांची सेवा करू का आता…?” निशा तणतणत म्हणाली.
यावर साकेतने बरेचदा समजावून सांगितल्यावर ही निशा ने ऐकले नाही. आता तर छोट्या छोट्या गोष्टी वरून सुद्धा निशा नाराज व्हायची आणि माहेरी निघून जायची. शेवटी साकेतच नमतं घ्यायचा आणि तिला परत घेऊन यायचा. आशाताई तिला खूप समजावून सांगायच्या की संसार म्हटलं की तडजोड आलीच. पण निशाने ऐकले नाही. वसंतराव सुद्धा मुलीच्या वागण्याला प्रोत्साहन द्यायचे.
असेच एकदा भांडण करून निशा माहेरी गेली. आता साकेतने सुद्धा ठरवले होते की तो स्वतःहून तिला आणायला जाणार नाही. निशा सुद्धा खूप रागात होती. वसंतराव मात्र निशाच्या रागाला खतपाणी घालत होते. बरेच दिवस झाले तरीही निशा स्वतःहून यायचं नाव काढत नाहीय हे पाहून साकेतच्या घरच्यांनी पुन्हा त्याला समजावले.
साकेत चे सुद्धा निशावर प्रेम होते पण तिने तिच्या स्वभावात बदल घडवून आणावा म्हणून तो तिला कधी प्रेमाने, कधी रागाने तर कधी अबोला ठेवून समजावू पाहायचा. पण आधीच अहंकारी स्वभाव आणि त्यात वडिलांचे समर्थन यामुळे निशा काहीच ऐकायला तयार नव्हती.
तरीही साकेत तिला समजवायला आणि परत आणायला तिच्या घरी पोहचला. यावेळी साकेत घरी आल्यावर निशा त्याच्याशी शब्दानेही बोलली नाही. वसंतराव सुद्धा त्याच्याशी नीट बोलत नव्हते. आशाताईंनी मात्र त्याला सन्मानाने बसवले. त्याची प्रेमाने विचारपूस केली. त्याने सांगितले की तो निशाला घ्यायला आला आहे तेव्हा आशाताईंनी निशाला बोलावून आणले. निशाला पाहून तो म्हणाला.
” निशा…मी तुला घ्यायला आलोय…झालं गेलं विसरून जा अन् घरी चल…आपण नव्याने सुरुवात करूयात…तू फक्त तुझ्या स्वभावात थोडासा बदल कर…सगळं ठीक होईल…?”
निशा काही बोलणार त्या आधीच तिचे बाबा म्हणाले.
” ती येणार नाही…”
” येणार नाही…पण का…?” साकेत ने विचारले.
” तिची एक अट आहे…” वसंतराव म्हणाले.
” अट…? ती कोणती ?” साकेतने आश्चर्याने विचारले.
” ती तुमच्या घरी राहायला येणार नाही…तुम्हाला तिच्यासोबत पुढे संसार करायचा असेल तर तुम्हाला इथे राहायला यावं लागेल…” वसंतराव म्हणाले.
” काय…?” साकेत मोठ्याने म्हणाला.
” हो…तुम्ही तयार असाल तर आपण पुढचं बोलू…नाहीतर बोलून काही फायदा नाही असे समजा…” वसंतराव म्हणाले.
आता मात्र साकेतला धक्काच बसला. आपल्याला स्वतःच घर असताना घर जावई म्हणून का राहायला सांगत आहेत हे त्याला कळत नव्हते.
” पण असे का बाबा…आमचं तर इतकं मोठं घर आहे…तिथे निशाला कसलाही त्रास नाही…सगळं काही व्यवस्थित आहे…मग कशाला…?” साकेत ने विचारले.
” आमची निशा तिथे खुश राहू शकत नाही…” वसंतराव म्हणाले.
” मी माझे घर सोडून इथे घर जावई म्हणून कधीच राहणार नाही…” साकेत म्हणाला.
” मग मी सुद्धा तिथे राहायला येणार नाही…” निशा मध्येच म्हणाली.
” प्लिज असे नकोस म्हणून निशा…हे बघ लहान सहान वाद तर होतच राहतात…म्हणून काय इतका टोकाचा निर्णय घ्यायचा का…?” साकेत म्हणाला.
” तिने निर्णय घेतलाय…तुम्ही जर इथे येऊन राहायला तयार नसाल तर निशाला तुमच्यापासून घ’टस्फो’ट हवाय…” वसंतराव म्हणाले.
” काय..?” साकेत जवळ जवळ ओरडलाच.
” होय…तुम्ही विचार करून कळवा…नाहीतर डिव्होर्स पेपर घरी पोहचून जातील तुमच्या…” वसंतराव म्हणाले.
साकेतने निशाकडे पाहिले तर निशाने दुसरीकडे तोंड फिरवले. साकेत हताश पणे निशाच्या घरून बाहेर निघाला. साकेत बाहेर जाताच निशा वसंतरावांना म्हणाली.
” बाबा…तुम्ही हे घ’टस्फो’टाचे कशाला बोललात…आपलं तर तसं काही ठरलेच नाही ना…”
” अगं ते मी तसेच म्हणालो…घ’टस्फो’ट म्हटलं की त्यांच्यावर जरा दबाव येईल…मग आपोआप आपली अट मान्य करतात की नाही ते बघ…” वसंतराव म्हणाले.
क्रमशः
भाग ३ –
तुझ्याविना मी – भाग ४
©® आरती निलेश खरबडकार.