विभा एक गृहकृत्यदक्ष गृहिणी होती…तिच्या घरी तिचे सासू सासरे, नवरा, ती आणि तिचा चार वर्षांचा मुलगा सोहम असे छोटे कुटुंब एकत्रितपणे राहायचे…विभा प्रत्येक कामात निपुण होती…एक चांगली सून, चांगली आई आणि चांगली बायको होती…तिच्यात फक्त एकच वाईट सवय होती. ती म्हणजे ती स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायची नाही. घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची मात्र स्वतःकडे फार दुर्लक्ष करायची…
विभाच्या पोटात दोन दिवसांपासून दुखत होते. तरीही ती अंगावरचे दुखणे सहन करून घरातील कामे नेहमीप्रमाणेच करत होती. घरघुती उपायांनी ठीक होईल म्हणून अंगावर दुखणे काढत होती. मध्येमध्ये तिला बरं वाटायचं. आपोआप ठीक होईल म्हणून अशा छोट्या मोठ्या दुखण्यावर ती कायमच दुर्लक्ष करायची.
तिचा नवरा तिला सकाळीच म्हणाला की आज दिवसभर आराम कर. संध्याकाळपर्यंत बरं वाटलं नाही तर आपण दवाखान्यात जाऊन येऊ. पण विभा ने यावेळी सुद्धा त्याचे काही ऐकले नाही. मी ठीक आहे. मला थोड्या वेळात बरे वाटेल म्हणून पुन्हा घरच्या कामाला लागली होती.
आज सहज म्हणून तिच्या घरी तिची मैत्रीण पूनम आलेली होती. तिला पाहून विभाला आनंद झाला. ती म्हणाली…
” अग पुनम…आज खूप दिवसांनी आलीस बघ…तुला बघुन खूप आनंद झाला…”
” अग मलापण खूप दिवसांपासून यायचंच होतं इकडे…आज याच रस्त्याने शारदा काकूंच्या घरी जात होते…म्हटलं तुला भेटून जावं..” पूनम म्हणाली.
” शारदा काकूंकडे कशाला ग…आज काही विशेष आहे का..” विभाने विचारले.
” हो ग…त्यांच्या नातवाचा पहिला वाढदिवस होता आज म्हणून आले होते…”
” हो का…कशी आहे ग त्यांची नवी सूनबाई…त्यांच्या पहिल्या सूनेपासून सुद्धा त्यांचा एक नातू आहे ना…त्याला नीट वागवते का ग ती ?”
” नीट तर तेव्हाच वागवणार ना जेव्हा तो इथे राहत असेल…”
” म्हणजे…तो त्यांच्यासोबत राहत नाही का..?”
” अग त्यांची पहिली सून कांचन आजारपणात वारल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी त्यांच्या नातवाला त्यांच्या घरी घेऊन जायची तयारी दाखविली होती…पण शारदा काकू आणि त्यांच्या मुलाने त्यांना नकार दिला…म्हणाले होते की आमचा मुलगा आहे आम्ही व्यवस्थित सांभाळू…”
” हो ग…मी पण ऐकले होते कुणाकडून तरी…”
” त्यांची पहिली सून कांचन वारल्यानंतर मुलाचा सांभाळ करायला आई हवी म्हणून त्यांनी अवघ्या दोन महिन्यातच त्यांच्या मुलाचे लग्न लावून दिले होते. पण पुढे एका महिन्यातच शारदाकाकू त्यांच्या नातवाला घेऊन त्यांच्या गावाकडच्या घरी राहायला निघून गेल्या…त्यांच्या नवीन सुनेने त्या मुलाला सांभाळायला नकार दिला म्हणे…आणि त्यांचा मुलगा सुद्धा काहीच बोलला नाही…आता त्यांच्या दुसऱ्या सुनेला सुद्धा मुलगा झालाय आणि तो आता एक वर्षाचा सुद्धा झालाय…पण तरीही तो अजूनही त्याच्या आजीकडे गावीच राहतो…” पूनमने सांगितले.
” पण शारदा काकू त्यांच्या मुलाला सांगत का नाही की त्या मुलाला पण आई वडिलांचं प्रेम हवंय…त्याला सुद्धा इथेच शहरात त्यांच्याकडेच ठेवा म्हणून…” विभाने विचारले.
” शारदा काकूंनी त्याला बरेचदा म्हटले की माझ्याच्याने आता जास्त कामे होत नाहीत…तू यशला सुद्धा इथेच तुझ्याकडे ठेव तर तो टाळाटाळ करतो…आणि इतर कुणी विषय काढला तर सांगतो की शारदा काकूंना त्याचा लळा लागलाय म्हणूनच त्या पाठवत नाहीत त्याला शहरात म्हणून…” पूनम म्हणाली.
“अरे देवा…इतक्या लहान वयात त्या मुलाला काय काय सहन करावे लागत आहे ना…कांचन खूप छान होती…पण एका छोट्याशा आजारपणात ती अवघ्या सहा महिन्यांच्या यशला सोडून देवाघरी निघून गेली…आणि कांचनचा नवरा इतका बदलेल असे वाटले नव्हते…कांचन आणि यश वर खूप प्रेम करायचा ना तो…आणि आता स्वतःच्या इतक्या लहान मुलाला स्वतःपासून दूर ठेवतोय…खरंच किती लवकर बदलतात ना लोकं…” विभा म्हणाली.
” हो ग…आणि शेवटी आई ती आईच असते ग विभा…अगदी चार दिवसांच्या तापीमुळे गेली ग ती…सुरुवातीला साधी ताप होती…तिने दुर्लक्ष केले आणि ताप डोक्यात गेली…मग काही तिला वाचवता आले नाही…ती गेल्याने तिच्या नवऱ्याला आणि सासूला काही विशेष फरक पडला नाही…अगदी दोन महिन्यात त्यांनी दुसरी सून घरात आणली…पण कांचन मुलगा मात्र आईच्या प्रेमाला मुकला ग…” पूनम म्हणाली.
पूनमचे बोलणे ऐकून विभा विचारत पडली. विभा सुद्धा तब्येतीकडे दुर्लक्ष करायची. मात्र कांचनचा विचार करून विभाला तिची चूक कळली होती. पूनम थोड्या वेळाने तिच्या घरी निघून गेली पण विभा मात्र विचारातच होती.
संध्याकाळी विभाचा नवरा घरी आला. त्याला पाहताच विभा म्हणाली..
” अहो…मला जरा बरं वाटतं नाहीय…चला आपण दवाखान्यात जाऊन येऊ..”
एरव्ही तिला कितीही म्हटले तरी दवाखान्यात जायला टाळाटाळ करणारी विभा स्वतःहून दवाखान्यात जायचं म्हणतेय हे ऐकुन तिच्या नवऱ्याला नवल वाटले. पण विभाने मात्र ठरवले होते की यापुढे स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही. तिला कळून चुकले होते की तिच्या घरच्यांसोबत तिने स्वतःलाही जपायला हवे. ती जेव्हा स्वतः निरोगी असेल, आनंदी असेल आणि परिपूर्ण असेल तेव्हाच ती तिची कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडू शकेल.
क्रमशः
©आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला फॉलो करा.