केशव बाहेरून आत आला. हात पाय धुतले आणि तसाच जेवणाच्या ताटावर बसला. बायको रागातच त्याला म्हणाली.
” मी केव्हापासून जेवणासाठी तुमची वाट बघत आहे…इतका उशीर का करता तुम्ही रोज…आणि सकाळी एकदा जाताच ना मंदिरात…मग संध्याकाळी परत कशाला जायचं…”
” तेवढंच मनाला समाधान मिळतं बघ…आणि मंदिर इथे जवळच तर आहे…मी तर म्हणतो तू पण यायला पाहिजे रोज…”
” तुम्ही करता ना लागेल तेवढा देवधर्म… तेवढा पुरेसा नाही का… उठता बसता सतत तुमच्या मुखी विठ्ठलाचं नाव असतं पण विठ्ठलाने काय केलं आपल्यासाठी…अहो लग्नाला इतकी वर्ष झाली पण एक मुल पण नाही दिलं त्याने आपल्या ला…किती नवस केले…उपास केले… पंढरीच्या वाऱ्या केल्या पण त्याने कधीच आपल्यावर कृपा केली नाही… आणि मला आता देवावर विश्वास राहिला नाही…”
” अशी हार मानून चालेल का यशोदा…आपल्या नशिबात मुल असेल तर आज ना उद्या होईलच…पण मुल नसेल तरीपण काय देवावरचा विश्वास ढळू द्यायचा का…अग त्या देवाने आपल्याला खूप काही दिले आहे…त्याचा विसर पडून चालेल का…?”
” पण मला हे सगळं नकोय…मला फक्त एक मूल हवंय…मला ही आई व्हायचंय…तुमच्या त्या देवाला दिसत नाही का माझी अवस्था…का इतका निष्ठुर झालाय तो आपल्यावर…तुम्ही इतकं काही करता सगळ्यांसाठी…नेहमी म्हणत की चांगुलपणात ईश्वराचा वास असतो…पण तोच ईश्वर आपल्या बाबतीत मात्र फार निष्ठुर झालाय…”
” धीर ठेव यशोदा…आपल्यासाठी जे चांगलं देव तेच देतो आपल्याला…” केशवचे बोलणे सुरूच होते इतक्यात त्याचा फोन खणानला…केशव ने फोन उचलला तर तिकडून त्याचा लहान भाऊ माधव बोलत होता…
” हॅलो…बोल माधवा…”
” कसा आहेस दादा…”
” मी बरा आहे…तू ठीक आहेस ना…घरी सर्व ठीक आहे ना…”
” हो दादा…घरी सर्व ठीक आहे…फक्त थोड्या पैशांची गरज होती…”
” किती पाहिजेत सांग मला…”
” पन्नास हजार हवे होते दादा…”
” ठीक आहे…पाठवतो मी उद्या…तू काळजी नको करुस…”
” ठीक आहे दादा…ठेवतो फोन…”
आणि माधवा ने फोन ठेवला. दोघा भावांच फोन वरील संभाषण ऐकुन यशोदा ने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“. हे बघा…तो देव तर आपली परीक्षा पाहतोच पण हे घरचे लोक सुद्धा काही कमी नाही…काम पडलं की फोन करायला तयार पण कधी तब्येतीची विचारपूस करायला फोन करणार नाहीत…कधी बहीण तर कधी भाऊ…दोघांनाही काय सतत पैशाचं काम पडत देवाला माहीत….मी गावी गेले की मला मुल नाही म्हणून सतत हिणवणार पण घरी काही कार्यक्रम असला की कामे करून घ्यायला मीच पाहिजे…तुम्हाला सांगते एक दिवस हेच घरचे आपल्याला अजिबात विचारणार नाहीत बघा…तुम्ही मात्र दिवसभर राब राब राबता आणि सगळे पैसे बहीण भावांवर खर्च करता…गावी इतकी शेती आहे आपली…पण कधीच पिकांचा हिशोब दिला नाही त्यांनी…दर सणाला त्याची बायको नाव सोन्याचा दागिना करते…दर दोन चार वर्षांतून भाऊजी जमीन विकत घेतात…मग त्यांच्याकडे पैशांची काय कमी असणार आहे…”
” अग…कधीकधी खरंच पैशाचं काम पडते त्याला…आणि आपलं आहेच तरी कोण ज्यांच्यासाठी आपण कमावणार…आपल्याला मुल नाही…दोघेच नवरा बायको असतो…मग आपलं जे काय आहे ते त्यांचंच नाही का…?”
केशव हसून म्हणाला आणि हात धुवायला गेला. यशोदा ला मात्र घरच्यांचं हे वागणं अजिबात आवडत नसे.
यशोदा आणि केशवच्या लग्नाला पंधरा वर्षे होऊन गेली होती. पण दोघांनाही अजुन मूलबाळ नव्हते. अनेक डॉक्टरांना दाखवले पण काहीच फरक पडला नाही. त्यातच केशावच्या लहान भावाचे लग्न झाले आणि वर्षभरातच त्यांच्या घरी पाळणा हलला. आणि यशोदेला मुल नाही म्हणून सासुरवास सुरू झाला. लहान जावेच्या मुलाला खेळवण्याची सुद्धा उजागरी नव्हती यशोदेला. केशव ची आई तर आता केशव च्या दुसरं लग्न कर म्हणून मागे लागली होती. पण यशोदे वर मनापासून प्रेम असलेल्या केशव ने दुसऱ्या लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि यशोदे ला घेऊन शहरात त्याच्या कामाच्या ठिकाणी आला.
इथे आल्यावर यशोदा सासुर वासापासून वाचली पण आई न होण्याचे शल्य तिला सतत टोचत राहिले. एखादेवेळी सणाला गावी जायची तेव्हा घरचे सतत तिला टोमणे द्यायचे. आणि ती सगळा दोष देवालाच द्यायची.
केशव शहरात भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. गावीही भरपूर शेती होती पण सगळी शेती आता त्याचा लहान भाऊ माधव पाहायचा. केशव चा व्यवसाय सुद्धा देवाच्या कृपेने भरभराट करत होता. पण त्याच्या घरच्यांना वाटायचे की केशव ला मुल नसल्याने त्याला पैशाचं काही काम नसेल आणि यशोदा तिच्या माहेरच्यांना पैसे देत असेल म्हणून वरचेवर त्याचा भाऊ त्याच्याकडून पैसे घ्यायचा. बहीण सुद्धा अधून मधून त्याला पैसे मागत राहायची.
केशवचे वडील विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. केशवसुद्धा त्यांच्या सोबतीने दरवर्षी वारीला जायचा. लहान असल्यापासूनच केशवने विठ्ठलाला आपला सखा मानले होते. आणि मोठे होता होता विठ्ठलाला त्याने आपले सर्वस्व मानले होते. त्याला सतत हा विश्वास वाटायचा की आपल्यावर आलेली सर्व संकटे विठ्ठल स्वतःच दूर करेन.
त्याने त्याच्या संसाराची काळजी विठ्ठलाला वाहिली होती. त्याला वाटायचं की त्याच्या नशिबात मूलबाळ असेल तर आज ना उद्या आपल्याला मुल होईलच. नाहीतर जसे विठ्ठलाने ठेवले त्यातच समाधान मानावे. पण यशोदाचे मात्र त्याच्या या बोलण्याने अजिबात समाधान व्हायचे नाही. मातृत्वाची आस आणि समाजाने वांझ म्हणून केलेल्या अपमानाने तिचा स्वभाव चिडचिडा झाला होता.
आधी केशवसोबत मनापासून विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या यशोदेला आता नेहमीच वाटायचं की विठ्ठलाने आपल्यावर अन्याय केला आहे. आणि तिने विठ्ठलाची भक्ती सोडून दिली होती. पण केशव वर तिचे मनापासून प्रेम असल्याने तिने त्याच्या विठ्ठलभक्ती त जास्त आडकाठी आणली नाही. पण वेळोवेळी ती तिचा राग व्यक्त करायचीच.
असेच दिवस चालले होते. एके दिवशी घरातच यशोदा चक्कर येऊन पडली. केशव ने लगेच तिला दवाखान्यात नेले तेव्हा कळले की ती आई होणार आहे. आई होण्याची आशा अगदीच धूसर झाल्यावर हा अचानकपणे मातृत्वाचा वरदान लाभल्याने यशोदा आणि केशवला खूप आनंद झाला होता. केशव ने मनोमन विठ्ठलाचे आभार मानले. यशोदा ला तर काय करू आणि काय नको असे झाले होते.
यशोदा आई होणार ही बातमी केशव च्या घरी सांगितल्यावर त्याची आई खूप खुश झाली पण त्याचा भाऊ मात्र खुश झाला नाही. त्याला मनातून माहिती होतं की दादाला एकदा मुल झालं की शेतीत सुद्धा त्याचा वाटा द्यावा लागणार आणि दादा कडून येणारी मदत सुद्धा कमी होईल. कारण त्याला वाटले होते की दादाला आता कधीच मुल होणार नाही. पण स्वतःची नाराजी न दाखवता त्याने दादाचे अभिनंदन केले.
केशव यशोदाला खूप जपत होता. त्याला अगदी यशोदा कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. तो यशोदाची हरप्रकारे काळजी घेत होता. त्याच काळात संपूर्ण भारतात कोरोना पसरल्याने लॉक डाऊन मुळे सर्वकाही बंद होते. त्यामुळे केशव सुद्धा घरीच होता. त्याचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. आणि जवळ बचत म्हणावी तेवढी केली नव्हती. पण जे काही होतं त्यामध्ये बाळंतपणाचा खर्च आरामात भागला असता. पण जे जसं ठरवलंय तसं होईलच ह्याची काही शाश्वती नसते. केशवच्या बाबतीत सुद्धा हे असच घडलं.
यशोदाचे बाळंतपण सुखरूप पार पडले. विठ्ठलकृपेने यशोदा आणि तिची नवजात मुलगी दोघींचीही तब्येत चांगली होती. दोघींना हॉस्पिटल मधून घरी आणले. आठ दिवसांनंतर मुलीची तब्येत हळूहळू बिघडायला लागली. तिला ताप येत होता आणि औषध दिल्यावर फक्त थोडा वेळ आराम पडायचा आणि पुन्हा ताप यायचा.
क्रमशः
तू सकळ जगाचा त्राता – भाग २ (अंतिम भाग)