सुधीर ऑफीस मधून नुकताच घरी आला आणि आल्या आल्या त्याने दोन्ही मुलांना आवाज दिला…
” प्रिशा, आरव…लवकर या…बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय ते…”
आवाज ऐकून दोन्ही मुळे धावत आली. सुधीर ने दोघांच्या ही हातात खेळण्यातील कार ठेवली. दोघेही खुश झाले. दोघांनीही सुधीर ला एक एक गोड पापा देऊन थँक्यू म्हटले आणि दोघेही नवीन कार घेऊन खेळू लागले. दोघांनाही खेळताना पाहून सुधीर खूप खुश झाला. पण मीना मात्र हे सगळं पाहून किचन मध्ये धुसफूस करू लागली. पण मुलांच्या बाललीला पाहण्यात गुंग झालेल्या सुधीरला तिची नाराजी लक्षात आली नाही. मग थोड्या वेळाने ती स्वतःच चहाचा कप घेऊन बाहेर आली आणि त्याला चहा देत म्हणाली.
” आजकाल खूप पैसा उतू जातोय ना तुमचा…?”
तिचे कोड्यात बोलणे न समजल्याने सुधीर ने तिला विचारले.
” म्हणजे…मला कळले नाही तुला काय म्हणायचे ते…जरा स्पष्ट सांगतेस का…?”
” आजकाल पैशांची जी उधळण लावलीय ना तुम्ही त्याबद्दल बोलत आहे…” मीना रागातच म्हणाली.
” पैशांची उधळण…? आणि मी…? अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का…?”
” हो…सगळं काही कळतंय मला…मी मागच्या वेळेला म्हटले होते की मला सोन्याचा नेकलेस हवाय तर काय म्हणाला होतात…पैसे नाहीत…कुठून देऊ…? आणि आज बरे बहिणीच्या मुलावर उधळायला पैसे आहेत तुमच्याकडे…”
” बहिणीच्या मुलावर उधळायला म्हणजे…? अगं किती लहान आहे तो…फक्त अडीच वर्षांचा…आपल्या प्रिशापेक्षा सुद्धा चार महिन्यांनी लहान आहे तो…आणि मी त्याच्यावर असे किती पैसे उधळलेत…?”
” हल्ली रोज रोज सुरू आहे ना तुमचं… कधी महागातले चॉकलेट आण तर कधी खेळणे आण…मला काय दिसत नाही का…?”
” अगं.. फक्त त्याच्यासाठी आणतो का… प्रिशासाठी सुद्धा आणतोच ना…”
” प्रीशा साठी खर्च करणे तुमचे कर्तव्यच आहे…ती मुलगी आहे तुमची…पण आरव कुठे आपल्या घरचा मुलगा आहे…त्याच्यासाठी त्याचे वडील आणत बसतील…आपण कशाला आपल्या मुलीच्या वाटणी चे त्याला देत बसायचे…”
” अगं तू काय बोलत आहेस ते तुझं तुला तरी कळतंय का…? एवढ्या लहान मुलाबद्दल असे बोलताना तुला काहीच वाटत नाही का…? अर्पिता आधीच खूप स्वाभिमानी आहे…तिने आजवर माझ्याकडून कधीच कसली अपेक्षा केली नाही…आणि तिचा नवरा किती नीच माणूस आहे हे तुला सुद्धा माहीत आहे…तरीही तो आरव साठी काही करेल असे तुला वाटतेय का…? ” सुधीर रागाने म्हणाला.
” त्यांचं ते पाहत बसतील…आणि संसार म्हटलं की अशा छोट्या मोठ्या कुरबुरी चालणारच…मग काय असे नवऱ्याचे घर सोडून माहेरी येऊन बसायचे का…?” मीना म्हणाली.
” छोट्या मोठ्या कुरबुरी…? अगं त्याच पहिलं लग्न आणि मूल लपवून ठेवून त्याने अर्पिता शी लग्न केले…आणि इतकं सगळं समोर आल्यावर सुद्धा तिने त्याच्याजवळ राहावं असं वाटतंय का तुला…?” सुधीर ने आश्चर्याने विचारले.
” पण तो म्हणतोय ना तो दोन्ही बायकांना वागवायला तयार आहे म्हणून…आणि घरचा सुद्धा चांगला श्रीमंत आहे…मग काय हरकत आहे…?” मीना म्हणाली.
मीनाचे बोलणे ऐकून सुधीर चा राग अनावर झाला. तो रागाने थरथरतच जाग्यावरून उठला आणि मोठ्याने मीनाला म्हणाला.
” तू स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बद्दल असा विचार करते आहेस ह्याची खरं तर तुला लाज वाटायला हवी…पण तरीही तू मोठ्या धीटपणे माझ्या समोर हे बोलून दाखवते आहेस…ते ही काय सख्ख्या बहिणी बद्दल…यानंतर जर असा विचार जरी मनात आणलास तर याद राख…” असे म्हणून सुधीर रागातच तिथून निघून गेला.
मीना मात्र रागाने धुसफूसत खोलीत निघून गेली. सुधीर आजवर कधीच तिच्याशी मोठ्या आवाजात बोलला नव्हता. पण आज तर चक्क धमकी देऊन गेला होता. अर्पिता आल्यापासून सुधीर आपल्याशी असा वागायला लागला आहे अशी मीनाची ठाम समजूत झाली आणि मनातील अर्पिता बद्दलचा राग अधिकच वाढला.
अर्पिता मिनाची एकुलती एक नणंद. सुधीर ची लहान बहीण. घरात सगळ्यांचीच लाडकी. तिचे शिक्षण पूर्ण झाले अन् घरच्यांना तिच्या लग्नाचे वेध लागले. दोन चार स्थळे पाहून अरविंद चे स्थळ त्यांना पसंत पडले. चांगली नोकरी होती. चांगलं घर होतं.
आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अरविंद. शिवाय त्याच शहरात स्थायिक होता. त्यामुळे सगळ्यांना हे स्थळ अर्पिता साठी साजेसे वाटले आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यावर काही दिवस सगळं काही छान सुरू होतं.
लग्नानंतर अरविंदच्या काही गोष्टी अर्पिताला खटकायच्या. पण तरीही त्या दुर्लक्षित करून ती छान पैकी संसार करत होती. घरच्यांना सुद्धा लेकीला चांगला संसार करताना पाहून समाधान वाटायचे. लवकरच अर्पिताला बाळाची चाहूल लागली. तिकडे सुधीरची बायको सुद्धा प्रेग्नेंट होती. घरी दोन नातवंडं येणार म्हणून घरचे खूप आनंदात होते.
लवकरच मीना ने एका गोड मुलीला जन्म दिला. तिचे नाव लाडाने प्रिशा ठेवण्यात आले. आता अर्पिताच्या बाळाची वाट पाहणे सुरू होते. लवकरच अर्पिता बाळंतपणासाठी माहेरी येणार होती. अशातच एके दिवशी अचानक सुधीरला अर्पिता चा फोन आला आणि तिने तातडीने त्याला त्याच्या घरी बोलावले. सुधीर लगेच अर्पिताच्या घरी पोहचला.
थोड्याच वेळात जेव्हा सुधीर अर्पिता ला घेऊन घरी आला तेव्हा तिला बघून घरच्यांना धक्काच बसला. रडून रडून सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, पांढरा पडलेला चेहरा अन् सारखे रडणे. घरच्यांनी तिला नेमके काय झाले ते विचारले. अर्पिता काही सांगूच शकली नाही. मग सुधीरनेच घरच्यांना सगळे सांगितले.
त्याने सांगितले की अरविंदचे अर्पिताशी लग्न होण्याच्या आधी सुद्धा एक लग्न झाले आहे. त्याने त्याच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका मुलीशी बरेच आधी लग्न केले होते आणि त्यांना एक तीन वर्षांचा मुलगा सुद्धा होता. हे सत्य अरविंदच्या आई बाबांना सुद्धा माहिती होते.
त्यांचा अरविंदच्या लग्नाला विरोध होता कारण त्याची बायको दुसऱ्या जातीची होती. म्हणून अरविंद ने कधी तिला घरी आणलेच नाही. त्याने त्याचे लग्न समाजापासून लपवून ठेवले. आणि आता समाजाला दाखवण्यासाठी जातीतील मुलीशी लग्न करायचे म्हणून अर्पिताशी लग्न केले होते. टूर च्या निमित्ताने तो कधी पहिल्या बायको जवळ राहायचा तर कधी अर्पिता जवळ.
साध्या सरळ अर्पिताच्या हे कधी लक्षातच आले नाही. सासू सासर्यांनी सुद्धा हे सर्व लपविण्यात अरविंदला मदतच केली होती. पण यावेळेला अरविंद बऱ्याच दिवसात पहिल्या बायकोकडे जाऊ शकलेला नव्हता. त्यामुळे तिच्या सहनशक्तीचा अंत होऊन ती सरळ अरविंदच्या घरी आली आणि तिथेच सगळे सत्य अर्पिताच्या समोर आले.
अर्पिताच्या तर पायाखालची जमीनच सरकली. अर्पिताला खूप मोठा धक्का बसला होता. तिने अरविंदला याबाबत जाब विचारला असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. पण शेवटी त्याला सत्य कबूल करावे लागले. पण त्यातही त्याने निर्लज्ज पणाचा कळस गाठत अर्पिताला सगळं काही सहन करून पूर्वी प्रमाणे सोबत राहण्याचा सल्ला दिला.
त्याला त्याच्या कृत्याचा काहीच पश्चात्ताप होत नव्हता. त्याचे आई वडील सुद्धा त्याचीच साथ देत होते आणि ती मुलगी आम्हाला पसंत नाही, आम्ही तिला कधीच स्वीकारणार नाही, आम्ही तुलाच आमची खरी सून मानतो म्हणून आपल्या वागण्याला योग्य ठरवत होते.
अर्पिताला तर काहीच सुचत नव्हते. म्हणून तिने तिच्या दादाला फोन करून तातडीने बोलावून घेतले. सुधीरला हे कळल्यावर त्याचा खूप संताप झाला आणि त्याने अरविंदच्या सरळ दोन कानाखाली लगावल्या. त्यानंतर अर्पिताला घेऊन घरी निघून आला. सुरुवातीला मीनाला अर्पिता बद्दल सहानुभूती वाटत होती.
पण हळूहळू तिला वाटायला लागले की घरच्यांना आता अर्पिता शिवाय काहीच सुचत नाही. प्रत्येक जण फक्त अर्पिता चे मन जपण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र मीनाची चिडचिड व्हायला लागली. तिला वाटायचे की आज ना उद्या अर्पिताच्या अन् तिच्या नवऱ्या मधील प्रॉब्लेम सुटतील आणि अर्पिता तिच्या सासरी निघून जाईल.
अर्पिताला बाळ झाल्यावर का होईना पण त्यांचे मतभेद संपतील आणि बाळासाठी का होईना अर्पिता अरविंद च्या चुकांना पाठीशी घालून त्याच्या घरी राहायला जाईल पण हळूहळू मीनाच्या लक्षात आले की अर्पिता आता बहुधा कधीच सासरी जाणार नाही. घरचे सुद्धा तिला पाठवायच्या मनस्थितीत नव्हते.
म्हणूनच तर अर्पिताला मुलगा झाल्यावर जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्या माहेरच्यांनी सांगितले की आता झाले गेले विसरून निदान लहान मुलासाठी तरी तिला परत नांदवायला पाठवा तेव्हा आम्ही अविनाशने केलेल्या फसवणुकी साठी त्याला कधीच माफ करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले.
अर्पिताचे दुःख सगळेच जाणून होते. आधीच लाडाची लेक आणि त्यातच एवढ्या लहान वयात एवढे मोठे दुःख पदरात आले. त्यामुळे घरातले तिचं मन राखायचा प्रयत्न करायचे. त्यातच सुधीर तिला हवे नको ते विचारायचा. सुधीर स्वतःच्या मुलीसाठी जे करायचा ते सगळेच तो अर्पिताच्या मुलासाठी सुद्धा करायचा.
जे खेळणे प्रिशासाठी यायचे तेच आरवसाठी सुद्धा यायचे. आणि तेच मीनाला आवडायचे नाही. तिला वाटायचे की आरव तिच्या मुलीच्या वाटणीचे घेतोय. आरवमुळे प्रिशाचा हक्क डावलला जातोय. त्यामुळे आता ती अर्पिता सोबतच आरवचा सुद्धा राग करायला लागली होती. बघता बघता आरव मोठा व्हायला लागला. आणि तो दोन वर्षांचा झाल्यावर अर्पिता ने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
क्रमशः
नात्यांचे वर्तुळ – भाग २