सानवी आणि सुमितचे नुकतेच लग्न झाले होते. सानवीच्या सासरची मंडळी स्वभावाने खूप चांगली होती. त्यांना सानवीचे खूप कौतुक होते. सानवीचा स्वभाव देखील तसाच गोड होता. ती देखील सर्वांच्या मनाला तेवढीच जपायची.
सानवीची नणंद रेणू त्याच शहरात राहायची. त्यामुळे दर आठवड्याला माहेरी एखादा चक्कर ठरलेलाच असायचा. सानवी अगदी हसतमुखाने रेणुचा पाहुणचार करायची. ताई ताई म्हणून सतत रेणूच्या मागेपुढे करायची.
सानवीचे सासू सासरे नेहमीच रेणुसमोर सानवीचे कौतुक करायचे. रेणुला मात्र ते आवडायचं नाही. घरातील सर्वजण काय तिचं एवढं कौतुक करतात हे रेणूला कळायचं नाही. रेणू मात्र तिच्या आईला नेहमीच सांगायची. सुनेचं एवढं कौतुक नको करुस…नाहीतर डोक्यावर बसेल तुझ्या…
पण रेणुची आई तिला नेहमीच म्हणायची की ज्याप्रकारे सानवीने आपल्या सर्वांना आपले मानले आहे तसेच आपण देखील तिला आपलेसे केले पाहिजे. पण रेणू मात्र तिच्या मतावर ठाम होती.
सानवी आणि सुमितच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले होते. लग्नानंतर सानवीचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे सुमितने गिफ्ट म्हणून तिच्यासाठी छान सोन्याची नथ आणली होती. सानवीला ती नथ खूप जास्त आवडली होती. लग्नानंतर सुमितने तिला दिलेले पहिले गिफ्ट ती आयुष्यभर सांभाळून ठेवणार होती. ती उत्साहाने ती नथ सर्वांना दाखवत होती. एके दिवशी रेणू घरी आली असता सानवीने तिलासुद्धा ती नथ दाखविली. रेणूला पण ती नथ खूप आवडली होती.
काही दिवसांनी रेणू तिच्या माहेरी आली असता सानवीकडे आली आणि म्हणाली की तिला एका कार्यक्रमात जायचे आहे म्हणून तिला सानवीची नथ घालायला म्हणून हवी आहे. दोन तीन दिवसात परत करेन. सानवीने जास्त विचार न करता लगेच ती नथ रेणूला घालायला दिली.
त्यानंतर बरेचदा रेणू माहेरी आली पण सानवीची ती नथ मात्र आणायची नाही. सानवीला वाटायचे की रेणू ताईंना एकदा त्या नथीची आठवण करून द्यावी. पण रेणूचा स्वभाव आधीच चिडका असल्याने ती काही बोलायची नाही. पण ती नथ म्हणजे सुमितने लग्नानंतर दिलेलं पहिलं गिफ्ट असल्याने तिला ती नथ हवी होती.
शेवटी सानवीने रेणूला त्या नाथीची आठवण करून दिली तेव्हा सानवीच्या अपेक्षेप्रमाणे रेणू चिडली आणि सानवीला म्हणाली…
” काय ग वहिनी तू पण…एक साधी नथच तर आहे…मला तिची डिझाईन आवडली म्हणून ठेवून घेतली मी…नाहीतरी माझ्या दादानेच तर दिली आहे…अशी कोणती तुझ्या माहेराहून घेऊन आली आहेस.”
” तसं नाही ताई… मी फक्त आठवण करून दिली होती..
.तुम्हाला आवडली असेल तर तुमच्याकडेच असू द्या…” सानवी चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली. तिला वाटले आपण उगाच रेणू ताईला आठवण करून दिली.
सानवी आणि रेणुमधील बोलणे सानवीच्या सासूबाईंनी ऐकले होते. पण त्या तेव्हा रेणूला काहीच म्हणाल्या नाहीत. आठ दिवसांनी रेणू परत तिच्या माहेरी आली. रेणू आणि तिची आई बोलत असताना तिची आई म्हणाली…
” अगं रेणू…आम्ही सोसायटी च्या बायका मिळून एक नवीन वर्षाच्या निमित्ताने एक छानसा कार्यक्रम करायचे ठरवले आहे…सगळ्या बायकांनी गुलाबी रंगाची साडी घालून यायचे ठरवले आहे…आता तुला तर माहिती आहे ना की माझ्याकडे गुलाबी रंगाची चांगली साडी नाहीये…तर तू मला तुझी मागच्या दिवाळीला घेतलेली साडी आणून देशील ना..”
” अग आई…ती साडी कशाला…माझ्याकडे आणखी एक साडी आहे ना गुलाबी रंगाची ती आणून देईल ना मी..” रेणू म्हणाली.
” का ग…ती साडी का नाही…?” आईने विचारले.
” अग आई..ती साडी आनंदने मला आमच्या पहिल्या दिवाळीला गिफ्ट केली आहे…मी पण फक्त एकदा घातली ती साडी…मी तुला दुसरी साडी आणून देईल ना…” रेणू म्हणाली.
” तुला तुझ्या नवऱ्याने दिलेली साडी तू चांगली जपून ठेवणार आणि तुझ्या वहिनीला तिच्या नवऱ्याने तिच्या वाढदिवसाला दिलेली नथ तिने एकदाही वापरलेली नसताना तू स्वतःकडे ठेवून घेणार…हे योग्य आहे का..?” आई म्हणाली.
” अग पण आई…मी ठेवून घेतली म्हणून काय झालं…माझ्या दादानेच तर आणली आहे ना…मग त्यावर माझा अधिकार नाही का..?” रेणू म्हणाली.
” तुझा तुझ्या दादावर पूर्ण हक्क आहे…पण तो त्याच्या बायकोला जर काही गिफ्ट देत असेल तर त्या गिफ्टवर सर्वस्वी तिचा अधिकार आहे…तुला आठवत असेलच मागच्या वर्षी तुझ्या नंदेने तुला तुझ्या बांगड्या घालायला मागितल्या होत्या…तेव्हा तू स्पष्ट नकार दिला होतास तिला… सानवी सुध्दा तुला नकार देऊ शकली असती …तू जेव्हा तिच्या माहेरचा उल्लेख केलास तेव्हा सुद्धा ती तुला उलट उत्तर देऊ शकली असती पण तिने तसे केले नाही…कारण तिचा स्वभाव मुळातच चांगला आहे…” आई म्हणाली.
” म्हणजे ती चांगली आणि मी चुकीची आहे असे म्हणायचे आहे का तुला…” रेणू म्हणाली.
” तू वाईट की चांगली असे मी म्हणतच नाही आहे…पण याबाबतीत तू चुकली आहेस असं मला वाटतं…जेव्हापासून ती लग्न करून या घरात आली आहे तेव्हापासून तू कधीच तिच्याशी मनमोकळेपणाने बोलली सुद्धा नाहीस…आपल्या नशिबाने अशा चांगल्या व्यक्ती आपल्या नशिबात येत असतात…पण त्यांना आपल्या आयुष्यात टिकवून ठेवणे आपले काम आहे…मी तुला समजावून सांगण्याचे काम केले आहे…आता तुला पुढे काय करायचंय ते तुझं तू ठरव…” आई म्हणाली.
रेणू विचारात पडली. ती तेथून तडक तिच्या घरी गेली. तिने रात्रभर आईच्या बोलण्याचा विचार केला तेव्हा तिला कळले की तिचे खरंच चुकले आहे. ती दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरी आली आणि सानवीला भेटून तिची नथ तिला परत दिली. आणि तिच्या वागणुकीबद्दल माफी सुद्धा मागितली.
दोघीही नणंद भावजय नी एकमेकींना मिठी मारली आणि त्या दिवशीपासून त्यांच्या गोड नात्याची नवी सुरुवात झाली.
समाप्त.
फोटो साभार – pixel free images
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.