तसे पाहिल्यास दुसऱ्या दिवशी नंदिनीची मांडवपरतनी आणि सत्यनारायण करणे अपेक्षित होते पण नंदिनीच्या माहेराहून तसा काहीच फोन आला नसल्याने सरला आत्याने घरातल्या घरातच सत्यनारायणाची पूजा करून घेतली. कारण त्यांना माहिती होते की प्रकाशरावांना सध्या खूप राग आलेला आहे.
आणि त्या रागाच्या भरात कदाचित ते नंदिनीला किंवा नकुलला अपशब्द बोलू शकतात आणि आधीच चिडलेला नकुल ते ऐकून आणखी चिडेल म्हणून त्यांनी नंदिनीला मांडव परतनीसाठी जायचा आग्रह केला नाही. नंदिनीला सुद्धा घरी जायची जरा भीतीच वाटत होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत प्रकाशरावांच्या घरातील जवळपास सगळीच मंडळी गेली. राहिली फक्त उषाताईंची बहिण उमा. उषाताईंचा भाऊ सुधीर सुद्धा काल घरी जाऊन आज पुन्हा परतला होता. कारण त्याला माहिती होते की कालच्या प्रसंगाने प्रकाशराव खूप जास्त रागात होते आणि त्यांचा राग उषाताईवर निघेल म्हणून त्यांना समजावण्यासाठी आणि त्यांचा राग घालवण्यासाठी म्हणून तो आज पुन्हा आला होता. त्याला पाहताच प्रकाशराव म्हणाले.
” बरं झालं सुधीर तू आलास…?”
” मी तर सहज म्हणूनच आलो होतो…” सुधीर आपल्या येण्याचा हेतू लपवत म्हणाला.
” ते तर ठीक आहे…पण आता आलाच आहेस तर तुझ्या बहिणीला तुझ्यासोबत घेऊन जा…” प्रकाशराव उषाताई कडे नजर रोखत म्हणाले.
हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. प्रकाशराव रागावतील ह्याची कल्पना तर सगळ्यांनाच होती पण त्यांचा राग या टोकाला जाईल ह्याची कल्पना कोणीच केलेली नव्हती. उषाताई तर त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. उमा आणि सुधीर सुद्धा एकदम धक्क्यात होते. सुधीर त्यांना म्हणाला.
” हे काय बोलताय तुम्ही भाऊजी…मला माहिती आहे तुम्हाला राग आला आहे…पण म्हणून ताईला माहेरी पाठवणार आहात का…?” सुधीर म्हणाला.
” जिला माझ्या मान अपमानाची काळजी नाही…माझ्या शब्दाला जिच्या नजरेत महत्त्व नाही…तिच्यासोबत राहून तरी काय फायदा…” प्रकाशराव रागाने म्हणाले.
” भाऊजी…एवढी वर्षे झालीत तुमच्या लग्नाला आणि एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही तिला माहेरी जायला सांगणार आहात का..?” उमा म्हणाली.
” हो…तिने जे काही केलंय त्यामुळे की कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो…मला आजवर गर्व होता की मला हीच्यासारखी बायको आणि नंदिनी सारखी मुलगी मिळाली आहे…पण हिने एकाच दिवसात ह्या सगळ्यावर पाणी फिरवलं…माझा, माझ्या बहिणीचा आणि आम्ही आजवर कमवलेल्या नावाचा अपमान केलाय हिने…मी हिला माफ नाही करू शकत…निदान सध्या तरी नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” अहो…असे काय बोलताय…तुम्ही शांततेने विचार केला तर तुम्हाला सुद्धा कळेल की मी बरोबर केलंय म्हणून….तुम्हाला आधी माहिती असतं तर तुम्ही सुद्धा नाहीच म्हटलं असतं ना…अन् शालू ताईंनी लग्न जुळवताना आपल्याला चुकीची माहिती दिली हे कसे काय विसरू शकता तुम्ही…?” उषाताई त्यांना समजावत म्हणाल्या.
” लग्न जुळवताना थोडफार इकडे तिकडे होतच…शिवाय आपण सुद्धा कुठे सांगितलं होतं त्यांना की आमची नंदिनी खूप आगाऊ पोर आहे… ऐन मांडवातून धावत बाहेर निघून येईल म्हणून…” आजी समोर येऊन तावातावाने बोलली.
” नंदिनीचं काहीच चुकलं नाही…ती बिचारी त्याला नशेत पाहून घाबरली होती…तिने योग्यच निर्णय घेतला…आणि पुढे जाऊन तुमच्या ते लक्षात येईलच…” उषाताई समजावत म्हणाल्या.
” कसला योग्य निर्णय घेतला तिने…काय आहे त्या सरलाच्या घरी…आत्ताच तर तो नकुल नोकरीवर लागला आहे…ते सुद्धा प्रायव्हेट…असा किती कमवत असेल तो…आणि त्यांची परिस्थीती सुद्धा आपल्यापेक्षा काही फार चांगली नाही… त्यांच्याशी सोयरिक करून आपलं काही नावलौकिक होणार नाही…पण रवीशी लग्न झालं असतं तर समाजात आपली प्रतिष्ठा कैकपटीने वाढली असती…” सासुबाई म्हणाल्या.
” त्या तशा दारुड्या आणि खोटारड्या मुलाला कोण आपली मुलगी देईल…?” उषाताई म्हणाल्या.
” तुझ्या माहिती साठी सांगतो… त्याचं लग्न झालंय…अगदी थाटामाटात…अन् नंदिनी पेक्षा चांगल्या मुलीशी झालंय… मुलिकडच्यांनी लग्नाला होकार द्यायला एका क्षणाचाही विलंब केला नाही…अन् त्यांच्या मुलीनेही घरच्यांचे ऐकून खाली मान घालून त्याच्या गळ्यात वरमाला घातली…” प्रकाशराव रागाने म्हणाले.
” काय…?” उषाताईंना फार आश्चर्य वाटले.
” होय…तुझ्या मुलीने नकार दिला म्हणून त्याचे लग्न नाही थांबले…” आजी म्हणाली.
” कसे लोक असतील ना…काहीही शहानिशा न करता सरळ तिचं लग्न लावून दिलं त्यांनी…” उषाताई म्हणाल्या.
” हो…कारण सगळ्यांना अशा चांगल्या घराण्याशी सोयरिक करायची असते…आणि लोकांच्या बायका मुली त्यांच्या आज्ञेत असतात…मी तुम्हाला जरा जास्तच सूट दिली म्हणून तुम्ही मला असा दिवस पाहायला लावलात…पण यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” अहो भाऊजी असे काय करत आहात…? ताईने जे काही केलं ते सगळं तुमच्या मुलीच्या भल्यासाठीच केलंय ना…” उमा म्हणाली.
” नाही…ते सगळं त्यांनी मला कमीपणा दाखवून देण्यासाठी केलंय…सगळ्या गावासमोर मला मान खाली गेली पाहिजे म्हणून…माझ्या बहिणीचा किती अपमान झाला ह्यामुळे…तिच्या सासरी तिची काय किंमत राहिली असेल आता…” प्रकाशराव म्हणाले.
” अहो पण तो मुलगा…” उषाताई काहीतरी बोलणार या आधीच प्रकाशराव त्यांना थांबवत म्हणाले.
” दारूच पित होता ना…लग्न झाल्यावर सुधारला असता…पण म्हणून काय ऐन लग्नाच्या दिवशी लग्न तोडायच का…लोक प्रतिष्ठेसाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार होतात…अन् तुम्ही दोघी मायलेकी साधं लग्नाला तयार नाही झालात…मी बोललो होतो ना की पुढे पटलं नाही तर घरी परत ये म्हणून…पण माझं कुणीच ऐकलं नाही…आता तू काही दिवस तुझ्या माहेरी निघून जा…मला तुझं तोंडही पहायचं नाहीये सध्या…” प्रकाशराव म्हणाले.
प्रकाशराव काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. तरीही त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सुधीर आणि उमा ने. उषा ताईंनी तर कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्यांना माहेरी जाऊन राहायची वेळ येईल.
पण प्रकाशराव सध्या भयानक रागात होते. आणि त्यांच्या आईंनी त्यांना आणखीनच भडकवले होते. रवीच्या लग्नाच्या बातमीने तर ते जरा जास्तच बिथरले. त्यांना वाटत होते की हे सगळे काही फक्त उषाताईंमुळे झाले आहे म्हणून. त्यांच्या आईने त्यांना समजावून सांगितले की उषाला धडा शिकवायचा असेल तर तिला माहेरी पाठव.
माहेरचे दोन दिवसात परत पाठवतील तेव्हा तिला कळेल की तिने नवऱ्याच्या विरोधात जाऊन किती चूक केली आहे ते. प्रकाशराव काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. उषाताईंकडे आता माहेरी जाण्यावाचून काही पर्याय शिल्लक नसल्याने उषाताई भावासोबत माहेरी निघून आल्या. सोबत निखिल होताच.
आजीने त्याला घरी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने आईसोबत जाण्याचा खूप हट्ट केला. मग प्रकाशरावांनी सुद्धा रागाने जायचे असेल तर जा मला कुणाची गरज नाही असे म्हणत निखिलला सुद्धा त्यांच्यासोबत पाठवले. सुदैवाने उषाताईच्या माहेरचे चांगले लोक होते.
त्यांना तर आपल्या मुलीने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे खूप कौतुक वाटत होते. प्रकाशरावांचा राग शांत झाला की ते सुद्धा तिला समजावून घेतील हा त्यांना विश्वास होता. म्हणून घरच्यांनी त्यांचे आनंदाने माहेरी स्वागत केले होते.
नंदिनीच्या आयुष्यात सुद्धा अचानकच खूप बदल होत होते. आजची पूजा आटोपल्यानंतर नंदिनीची रवानगी नकुलच्या खोलीत करायची होती. अर्थातच नंदिनी आणि नकुल दोघेही याबाबत फारसे अनुकूल नव्हते पण त्या दोघांनी लग्न केलंय म्हटल्यावर एका रूम मध्ये राहणं सुद्धा त्याचा एक भागच होता.
तसे करायला नकार दिला असता तर सरला आत्याला काय वाटेल म्हणून दोघांनीही काही आपला आक्षेप व्यक्त केला नाही. नंदिनी स्वतःची बॅग घेऊन नकुलच्या रूममध्ये गेली. नकुलने सुद्धा त्याच्या कपाटातील एक छोटा कप्पा तिला खाली करून दिला होता. नंदिनी काही न बोलता त्यामध्ये आपले सामान लावत होती. मग नकुल स्वतःहून तिला म्हणाला.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
उषाताईंवर असलेला प्रकाशरावांचा राग कमी होईल का…? नंदिनी पुन्हा एकदा उजळ माथ्याने तिच्या माहेरी येऊ शकेल का…? नकुलच्या मनातील गैरसमज दूर होईल का…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.