शालूताईंनी दुसऱ्याच दिवशी फोन करून मुलाकडचे दहा दिवसांनी येऊन नंदिनीला पाहून जातील असे सांगितले. त्यांनी जणू आधी मुलाकडच्यांना नंदिनीचा फोटो दाखवला होता तो त्यांना खूपच आवडला हे सुद्धा त्यांनी सांगितले. घरचे तर खुपच खुश होते. नंदिनीच्या आजीला तर कधी लग्न ठरतंय आणि मी कधी सगळ्यांना सांगतेय की माझ्या मुलीने नंदिनीची सोयरिक एवढ्या मोठ्या घरात जुळवून आणलीय असे झाले होते.
नंदिनीचे बाबा आणि आजी तर आतापासूनच तयारीला करायला लागले. पाहुण्यांना काहीच कमी पडायला नको म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते. नंदिनी घरच्यांची दगदग पाहत होती. आपले बाबा आपल्यासाठी किती करतात ना हा विचार तिच्या मनात डोकावून गेला. पण मुलाकडच्यांनी पसंत केलं तर घरच्यांपासून दूर जावं लागेल ह्या विचाराने तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
बघता बघता दहा दिवस निघून गेले आणि मुलाकडची मंडळी नंदिनीला बघायला आली. सोबत शालू आत्या सुद्धा होतीच. पाहुण्यांची आरामाची व्यवस्था बाजूच्याच घरच्या बैठकीत केली होती. शालू आत्या नंदिनीच्या घरी आली होती. नंदिनीची मैत्रीण तिला तयार करत होती आणि नंदिनी मात्र अस्वस्थ होत होती. इतक्यात तिला शालू आत्या आणि तिच्या घरच्यांचा संवाद ऐकायला आला.
” काय गं शालुताई…मुलगा नाही आला सोबत…?” प्रकाशराव म्हणाले.
” त्याचे आई वडील अन् बहीण आलेत ना…तेच महत्त्वाचे…म्हणजे ह्यांनी होकार दिला तरच ही सोयरिक होईल…त्यामुळे मुलाचे बघणे काही महत्त्वाचे नाही…” शालू आत्याने उत्तर दिले.
” अहो पण शालू ताई…आजकालची मुलं अशा घरातील मोठ्यांच्या हो ला हो करत नाहीत…त्यांची पसंती सुद्धा महत्त्वाची असते लग्नासाठी…” उषाताई म्हणाल्या.
” का…? तुमच्या मुलीला मुलाला पाहायचं होतं का…? पण मुलगा तसा नाही हो…तो घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही…त्यांनी होकार दिला तर तो आनंदाने त्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करायला राजी होईल…त्याच्या घरच्यांचे संस्कारच तसे आहेत…” शालू आत्या उषाताईंकडे तिरकस पाहत बोलल्या.
आता मात्र त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत. पुढे शालू आत्या प्रकाशरावांना म्हणाल्या.
” मुलाला मी पाहिलेलं आहे…आमची खूप जुनी ओळख आहे…शिवाय मुलाने नंदिनीचा फोटो सुद्धा पाहिलाय…त्याला मुलगी पसंत आहे…मुलाचा फोटो मी सुद्धा मोबाईल वर पाठवला होता ना तुम्हाला…”
त्यावर प्रकाशराव काहीच बोलले नाही. खरे तर त्यांनाही मुलाला प्रत्यक्षात भेटायचं होतं. पण आपल्या मोठ्या बहिणीने सगळं काही पाहिलंय म्हटल्यावर ते काही बोलूही शकत नव्हते. नंदिनीची आजी स्वतःच्या मुलीची बाजू घेऊन म्हणाली.
” बरोबर बोलतेय शालू…तिने मुलाला पाहिल्यावर आपल्याला काय गरज आहे ना त्याला पाहायची…शिवाय शालूची नजर खूप पारखी आहे…चांगलं वाईट तुमच्यापेक्षा ही जास्त कळते तिला…आणि आता जास्त प्रश्न न विचारता तयारीला लागा…हातपाय धुवून पाहुणे मंडळी सरळ आपल्याच घरी येणार आहेत…”
आपल्या आईचे बोलणे ऐकून प्रकाशरावांना सुद्धा खात्री पटली आणि मग ते सुद्धा काहीच बोलले नाहीत आणि तयारीला लागले. नंदिनी च्या आईने गरमागरम पोहे करायला घेतले. सोबत चहाचं आधण सुद्धा ठेवलं. स्वयंपाक सुद्धा जवळपास तयारच होता. मदतीला बाजूच्याच मालती वहिनी आल्या होत्या.
थोड्याच वेळात पाहुणे मंडळी आली. सगळ्यात आधी त्यांना पाणी दिलं नी मग पोहे दिले. पोह्यानंतर चहा घेऊन मात्र नंदिनीला पाठवण्यात आले. मुलाची आई अन् बहीण तिला नीट निरखत होती. चालणं कसं आहे, बोलणं कसं आहे वगैरे वगैरे. त्यांनी नंदिनीला काही जुजबी प्रश्न विचारले. नाव, गाव, शिक्षण, वय वगैरे वगैरे.
जेव्हा त्यांनी तिच्या शिक्षणाबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितले की ती बी एस सी च्या दुसऱ्या सेमीस्टरला आहे अन् दोन आठवड्यांनी तिच्या परीक्षा होणार आहेत. तेव्हा तिच्या आईने स्वतःहून पुढे येत सांगितले की ती अभ्यासात खूप हुशार आहे आणि नेहमीच पहिल्या पाचात येते म्हणून. त्यावर त्याची आई अन् बहिणीने छान म्हणून स्माइल दिली.
त्यानंतर तिला पुन्हा खोलीत आत पाठविण्यात आले. नंदिनी चा जीव वरखाली करत होता. मुलाकडच्यांनी पसंत नाही केलं तर बरं होईल असा एक विचार तिच्या मनात तरळून गेला पण नंतर लगेच तिच्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिला तिच्या या विचाराचा राग येऊ लागला. ही सोयरिक व्हावी म्हणून बाबा देवाकडे प्रार्थना करत असतील आणि आपण मात्र केवळ स्वतःचाच विचार करतोय म्हणून तिला मनातून अपराधीपणाची भावना दाटून आली.
जेवण वगैरे करून संध्याकाळ च्या वेळी पाहुणे मंडळी निघून गेली. त्यांची भलीमोठी कार पाहून बऱ्याच लोकांनी प्रकाश रावांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली होती आणि हे माझ्या मुलीला पाहायला आले होते हे सांगताना सुद्धा प्रकाशरावांच्या डोळ्यात वेगळीच चमक येत होती. नंदिनी ला बाबांची अवस्था चांगलीच कळत होती.
दोन दिवसांनी शालूताईंचा फोन आला आणि त्यांनी मुलाकडच्यांचा होकार आहे हे सांगितल्यावर तर घरातील मंडळींच्या आनंदाला उधाण आलं. त्यांची काही अपेक्षा सुद्धा नाही आहे हे सांगितल्यावर प्रकाशरावांना ती भली माणसं वाटली. आजी तर आता प्रत्येकाजवळ शालू आत्याचे गुणगान करत थकत नव्हती.
” माझी पोरगी श्रीमंताघरी नांदतेय तरीपण ती भावाला विसरली नाही. भावाच्या पोरीचं भलं केलं हो पोरीने ही सोयरिक करून…” असे म्हणून आजी शालू आत्याच्या नावाने प्रशंसा करत होती. शालू आत्या त्यांचं पहिलं अपत्य म्हणून आधीपासूनच आजीची खूप लाडकी होती. प्रकाशराव सुद्धा त्यांच्या एकाप्रकारे आज्ञेत होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नव्हते.
आधीच घरात मान असणारी शालू आत्या लग्न करून जेव्हा श्रीमंतांघरची सून बनली तेव्हापासून तर त्यांच्या शब्दाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले होते. तशा त्या सुरुवातीला वर्षातून एकदा माहेरी यायच्या. पण आता मुलं मोठी झाल्यापासून दोन वर्षांतून एकदा चक्कर व्हायची त्यांची. इंदोर होते सुद्धा दूर. शिवाय घराची आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावरच होती.
त्यामुळे घरातील सगळं व्यवहार सुद्धा आपसूकच त्यांच्याकडे आला होता. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी वाहता वाहता त्यांचा स्वभाव करारी बनत गेला आणि पुढे त्या कधी गर्विष्ठ बनल्या हे त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही. माहेरी आल्या की सारखं त्यांना हे चालायचं नाही अन् ते चालायचं नाही. त्या आल्या की त्यांची नीट व्यवस्था करण्यात प्रकाशराव आणि उषाताई रात्र अन् दिवस एक करायचे. पण त्यांच्या सतत तक्रारीच असायच्या.
भावाच्या मुलांना कपडे किंवा खाऊ आणण्यात सुद्धा त्या आता दूजाभाव करायला लागल्या होत्या. श्रीमंत नातेवाईकांच्या घरी गेल्या की चांगले महाग कपडे न्यायच्या आणि जरा परिस्थिती जेमतेम असणाऱ्यांच्या घरी पाहुण्या म्हणून गेल्या की त्यांना मग स्वस्तातले कपडे असे नियम त्यांनी स्वतःशीच ठरवून घेतले होते. मग हाच नियम नंदिनी आणि निखिलसाठी काही आणताना लागू व्हायचा.
पण म्हणून उषाताईंनी काही त्यांच्या सेवेत कसूर ठेवली नाही. हल्ली तर शालू ताई फोन सुद्धा महिन्यातून एकदा करायच्या. नंदिनी आणि निखिल बद्दल तर फार कमी वेळा विचारपूस केली असेल त्यांनी. पण आता मात्र नंदिनी साठी ही सोयरिक करून त्यांनी मागच्या पुढच्या सगळ्याच गोष्टींचा कडवटपणा दूर केला होता.
शालूताईंनी सांगितले की मुलाकडच्यांना पुढच्याच महिन्यात लग्न करायचे आहे. शिवाय इंदूर वरून वारंवार ये जा करणे सोयीचे नसल्याने आता सरळ लग्नात सगळे एकत्र भेटुयात म्हणून. हे सगळं प्रकाशराव आणि उषाताईंनी जरा विचित्रच वाटले होते पण इथेही नंदिनीच्या आजीने त्यांची समजूत घातली.
” अरे त्यांना वाटलं असेल की आपली फार काही करायची ऐपत नसेल म्हणून सगळं काही एकत्रच करू असे म्हणायचे असेल त्यांना…आपलाच विचार करून करत आहेत ते सगळं…आणि त्यात चुकीचे ते काय… दोन्हीकडची पसंती झाली की लग्न ठरतात आणि एकदा ठरलं म्हणजे ते उशिरा होवो की लवकर ह्याचा काही फरक पडत नाही…” आजी म्हणाली.
” अगं पण एकदमच राजेशाही थाटात लग्न लावू शकत नसलो तरी निदान आपल्याला शोभेल असं थाटामाटात साखरपुडा आणि लग्न तर लावूच शकतो ना आपण आई…शेवटी एकच मुलगी आहे ना मला…” प्रकाश राव आईला समजावणीच्या सुरात म्हणाले.
” आहे तर मग काय सगळं काही पोरीवर उधळणार आहेस काय…? तुला एक मुलगा सुद्धा आहे हे विसरू नकोस…मुली काय शेवटी परक्याचं धन…त्यांच्यासाठी कितीही केलं तरी कमीच पडेल…आणि त्यांना नकोय ना जास्त मोठं लग्न तर आपण सुद्धा कशाला वायफळ खर्च करायचा…वाचत असतील तर वाचू दे ना पैसे…” आजी म्हणाली.
नेहमी प्रमाणे आताही प्रकाशराव आईला काहीच बोलू शकले नाहीत. त्यांना आईशी वाद घालायचा नव्हता. पण म्हणून नंदिनी साठी त्यांना जे काय करायचे होते ते करण्यापासून त्यांना कुणीच रोखू शकत नव्हतं. त्यांनी ठरवले होते की भलेही मुलाकडचे आता सरळ लग्नाच्या दिवशी येवोत पण लग्नाचा थाट पाहून त्यांना सुद्धा नवल वाटेल अशी व्यवस्था करायची म्हणून.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
नंदिनीचे लग्न निर्विघ्न पार पडेल का…? मुलाकडच्यांचं वागणं जरा विचित्र वाटतंय का…? नंदिनी च्या आयुष्यात पुढे काय होईल…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.