” पण म्हणून काय एखाद्याच्या वजनावरून किंवा दिसण्यावरून ऐन मंडपात लग्नाला नकार द्यायचा का..?” मुलाची बहीण म्हणाली.
” तरीही ती लग्न मंडपात आली होती ना…पण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तो स्वतःला दारू पिण्यापासून रोखू शकला नाही…नवरदेव आला तेव्हा तो अक्षरशः झिंगत होता हे सगळ्यांनीच पाहिलंय…आणि अशा दारुड्या मुलाला मांडवात नकार देणे काही चुकीचे नाही…” सुनीलराव समोर येत म्हणाले.
” काहीही काय लावलय मघापासून… दारु प्यायला… दारू प्यायला…दारू कोण नाही पित आजकाल…जरा मोठमोठ्या शहरात जाऊन पहा…लोक सर्रास पितात…आजकाल तर मुलीसुद्धा पितात…” मुलाची बहीण म्हणाली.
” माणूस असो वा बाई असो…दारू पिणे ही आमच्या दृष्टीने चुकीचीच गोष्ट आहे…अन् दिवसरात्र नशेत राहणे हे तर आयुष्याला घातक आहे…तुम्हाला तर माहितीच असेल ना…नाही म्हणजे तुमचा भाऊ सुद्धा खूप जास्त आजारी पडला होता ना दारू पिण्यामुळे…” सरलाताई म्हणाल्या.
आता मात्र सगळेच गप्प बसले. ह्यांना रवीच्या तब्येतीबद्दलची माहिती कुठून मिळाली हाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता.
इकडे ज्या बाईने सरलाताईंना हे सगळे सांगितले होते ती तर कशीबशी आपलं तोंड लपवत पाहुण्यांच्या मागे उभी राहिली होती.
पण सरलाताईने जर सांगितलं तर आपण सगळ्यांच्या रागाचे कारण होऊ ही भीती तिला वाटत होती. तिने तर अगदी सहज म्हणून सरलाताईंना ते सांगितले होते. सरलाताई दूरची नातेवाईक आहे म्हणून ती बोलून गेली. आपली विनाकारण गप्पा मारण्याची सवय इतकी घातक आहे ह्याची जाणीव आयुष्यात पहिल्यांदाच तिला होत होती.
इकडे नवरदेवाकडच्या मंडळींना तर काय बोलू आणि काय नको असे झाले होते. पण गप्प बसून कसे चालेल म्हणून नवरदेवाचे वडील बोललेच. ते म्हणाले.
” तुम्हाला एवढं सगळं आधीच माहिती होतं तर मग आधीच नकार का नाही दिला…बोलावून एवढा अपमान का केला…तुम्ही फसवलय आम्हाला…ह्या लग्नासाठी आमचा किती जास्त खर्च झालाय ह्याची तुम्हाला काही कल्पना सुद्धा नसेल…पण आम्ही सुद्धा तुम्हाला तसे नाही सोडणार…आम्हाला लग्नाचा सगळा खर्च हवाय तुमच्याकडून…नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ…” रवीचे वडील म्हणाले.
” मला खर्च नकोय बाबा…मला नंदिनीशी लग्न करायचे आहे…” रवी बरळला.
मग सुनिलराव त्यांच्याकडे पाहत म्हणाले.
” आम्ही तुमच्याशी चांगले बोलतोय म्हणून फायदा घेऊ नका…तुम्ही आमची अशी फसवणूक केल्यावरही आम्ही शांततेने तुमच्याशी बोलतोय…तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतोय ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि आम्ही मुकाट्याने ऐकून घेणार…आणि तुम्ही काय पोलिसात तक्रार देणार…तक्रार तर आम्ही देऊ…सत्य लपवून लग्न करायला निघालेत म्हणून…तसेही तुमच्या दारूत झिंगणाऱ्या मुलाला पाहून त्यांना खरं काय ते कळायला उशीर लागणार नाही…”
आता मात्र ते सगळे खरोखरच गप्प बसले. परत निघून जाण्याशिवाय त्यांच्याजवळ काही उपाय नव्हता. शालूआत्या सुद्धा त्यांच्यासोबत निघून गेली. सुरुवातीला त्यांनी लग्न मोडल्याचा दोष शालू आत्याला द्यायचा प्रयत्न केला पण शालू आत्याने मोठ्या शिताफीने रवीच्या आज दारू पिण्यामुळे लग्न मोडले असा उलट आरोप लावला. त्यामुळे आता त्यांच्याजवळ कोणाला बोलायला म्हणून काहीच नव्हते.
इकडे नकुल आणि नंदिनीच्या पाठवणीची तयारी सुरू होती. प्रकाशराव मुद्दामहून कशातच रस दाखवत नव्हते. स्वतः सरलाताई आणि सुनीलराव दोघेही समोर येऊन प्रत्येक कार्यात पुढाकार घेत होते. आणि उषाताई मात्र हे पाहून मनातून समाधानी होती की आपली नंदिनी चांगल्या लोकांच्या घरात सून म्हणून जात आहे.
नकुल मात्र झाल्या प्रकाराने आणखीनच चिडला. आधीच त्याला लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. आता तर कुठे त्याच इंजिनिअरिंग संपून नोकरी करायला लागला होता. चोवीसाव्या वर्षी कोण लग्न करतं असे वाटून त्याला लग्न केल्याचा पश्चात्ताप होत होता.
शिवाय अशाप्रकारे लग्न झालंय म्हणून आपले मित्र आपल्याला चिडवतील, चारचौघात आपलं हसं होईल म्हणून आधीच त्याला कसेतरी वाटत होते आणि त्यात ह्या सगळ्या विधी. पण आईबाबांचा शब्द त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांच्यावर खूप प्रेम आणि मनात खूप आदर होता त्याच्या. म्हणून तो गपगुमान बसलेला होता.
नंदिनीची पाठवणी करण्यात आली आणि नंदिनी नकुल सोबत संसार करायला सासरी निघून गेली. अशा परिस्थितीत तिची पाठवणी झाल्याने तिच्या आईला खूपच जास्त रडू येत होते. आणि नंदिनीची अवस्था तर खूपच वाईट होती. नंदिनीचे बाबा झाल्या प्रकाराने नंदिनी आणि तिच्या आईवर खूप जास्त रागावलेले होते. म्हणून ते सुद्धा नंदिनीशी जाताना काहीच बोलले नाही.
त्यामुळे तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली होती. नंदिनी ची पाठवणी झाल्यावर ते तिच्या आईशी सविस्तर बोलणार होते आणि सगळं काही आटोपल्यावर नंदिनीच्या आईला त्यांची खूप भीती वाटत होती. पण अजूनही काही पाहुणे घरात असल्याने ते गप्प होते.
इकडे नंदिनी अर्ध्या तासात सासरी पोहचली सुद्धा. अपेक्षेप्रमाणेच नकुलचे लग्न झालेले पाहून सगळेच आश्चर्यात होते. आणि नकुलला त्यांच्या नजरा कळत असल्याने तो सुद्धा खूप जास्त ओशाळला होता. नजर चोरून तो आतमध्ये जायचा प्रयत्न करत होता पण सरलाताईंनी त्याला थांबवत म्हटले.
” थांब नकुल…मी आधी नंदिनीच्या गृहप्रवेशाची तयारी करते आणि मग तुम्ही घरात या.. “
” याची खरंच गरज आहे का आई…? मी थकलोय… माझं डोकं सुद्धा दुखत आहे…” नकुल त्राग्याने म्हणाला.
” अरे बस दोन तीन मिनिटात होईल…” सरलाताईंना त्याच्या मनस्थितीची जाणिव होत होती.
त्यांनी लवकर गृहप्रवेश आटोपला आणि नवीन जोडप्याला घरात घेतले. नकुल लगेच जाऊन त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला राहून राहून दिवसभरातील गोष्टी आठवत होत्या. इकडे कितीही साधेपणाने गृहप्रवेश केला तरी नकुलच्या लग्नाची बातमी वेगाने गावात पसरली होती.
गावातील बायका आता विचारपूस करायला येत होत्या. तुम्ही लग्नासाठी गेल्या आणि येताना सरळ नवरीलाच घेऊन आलात ह्या प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडले होते. पण सरलाताई सुद्धा प्रत्येकीला तितक्याच शांततेने उत्तर देत होत्या.
लग्न जुळवताना मुलाकडच्यांनी केलेली फसवणूक आणि त्यामुळे ऐन वेळेवर आणि नकुल ला लग्न करायला सांगितले हे सुद्धा सांगत होत्या. काही बायका हळहळ व्यक्त करून तुम्ही खूप चांगलं केलत असे म्हणत होत्या. तर काही बायका हे नशिबातच असेल म्हणून झालेलं सगळं नशिबावर सोडून देत होत्या.
काही तोंडावर गोड बोलून बाहेर जाऊन वाईट साईट बोलत होत्या तर काहींना खरोखर सरलाताई आणि सुनील रावांच कौतुक होतं. नंदिनीला पाहून मात्र सगळे पाहतच राहत होते. नंदिनी इतक्या टेंशन मध्ये असली तरीही नक्षत्रासारखी दिसत होती पोर. सरला ताईंनी तिला स्वतःच्या खोलीत नेले.
नंदिनीने हातपाय धुतले आणि सरलाताईंनी तिला चहा आणि बिस्किटे आणून दिली. चहा बिस्किटे पाहून नंदिनी ला आता पोटातल्या भुकेची जाणीव झाली होती. दिवसभर तिने काहीच खाल्लेले नव्हते. तिने भराभर चहा बिस्किटे खाल्ली. तिला असे घाईघाईने खाताना पाहून क्षणभर सरलाताईंना गलबलून येत होते.
नंदिनीची आई घरी असलेल्या पाहुण्यांचे करण्यात व्यस्त असल्या तरी त्यांचे सगळे लक्ष प्रकाशरावांकडे होते. त्यांना पाहूनच त्यांच्या मनात किती राग उफाळून आलाय ह्याची जाणीव त्यांना होत होती. शिवाय आजी मघापासून त्यांच्याजवळच होती. दोघांची हळू आवाजात बोलणी सुरूच होती.
आजी सुद्धा उषाताईंकडे रागाने पाहत होत्या. जास्तीत जास्त पाहुणे संध्याकाळीच निघून गेले पण काही दूरच्या गावचे पाहुणे अजूनही घरीच होते. त्यामुळेच प्रकाशराव आणि आणि गप्प होते. पाहुणे मंडळी प्रकाशरावांना समजावून सांगत होते. जे होतं ते चांगल्यासाठीच असे पटवून देत होते.
प्रकाशरावांना मात्र आपल्या बायको आणि मुलीमुळे आपली झालेली फजिती आणि अपमान एवढंच आठवत होतं. आजी त्यातल्या त्यात आणखीनच आगीत तेल ओतत होत्या. कारण आज सगळ्यात जास्त फजिती तर त्यांच्या लाडक्या मुलीची झाली होती. उषाताईंची लहान बहिण उमा सुद्धा आज तिथेच मुक्कामी राहिली होती. आपल्या मोठ्या बहिणीला आधार म्हणून.
क्रमशः
उषाताईंना पुढे आपल्या नवऱ्याच्या रागाचा कसा सामना करता येईल…? नंदिनी पुढे आणखी काय वाढून ठेवलं असेल…? नकुल नंदिनी शी चांगले वागेल का…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.