सुजाताचे सासरे ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारे सुजाताशी वागायचे. सुजाताची सासू मात्र पूर्णपणे बदलली होती. सुजाता खूप आनंदात होती. ती तिच्या सासू सासर्यांमध्ये तिच्या आई बाबांना पाहायची. इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात स्थैर्य आले होते.
रेवा आता तिच्या माहेरी जरा कमीच यायची. आली तरी सुजाताशी थोडी बरी वागायची. आईला वाटायचं की रेवा तिच्या संसारात चांगली रमली आहे म्हणून ती माहेरी कमी येत आहे. तिची आई तिच्यासाठी खूप आनंदी होती. रेवा समजूतदार झालीय असा समज त्यांचा झाला होता.
रेवाला मात्र वाटायचं की आता बाबांनी त्यांची जवळपास सगळीच इस्टेट आपल्या नावाने दिलीय त्यामुळे आपल्याला सुजाता पासून असुरक्षितता वाटून घेण्याची काहीच गरज नाही. मिळून मिळून तिला अन् तिच्या बाळाला काय मिळेल असे वाटून ती मनातूनच सुजाताला हिणवायची.
सगळं काही सुरळीत सुरू होतं. सुजाताला आता पाचवा महिना लागला होता. एकदा सुजाताचे सासरे आणि तिच्या सासुबाई एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. येताना त्यांच्या गाडीला जबर धडक बसली. दोघांचा ॲक्सिडेंट झाला.
सासरे बुवांना फार काही लागले नव्हते पण सासूबाईंना खूप लागले होते. त्यांची तीन हाडे फ्रॅक्चर झाली होती. डोक्याला आणि कंबरेला सुद्धा मार लागला होता. सुजाताचे सासरे बुवा आपल्या बायकोला या अवस्थेत पाहून आणखीनच हादरले होते. काय करावं काय नाही त्यांना सुचत नव्हतं.
त्यांनी लगेच रेवाला फोन केला. बराच वेळ रेवाची वाट पाहिली पण रेवा लवकर आलीच नाही. मग त्यांनी सुजाताला फोन केला. सुजाता कशीबशी रिक्षा करून हॉस्पिटल मध्ये पोहचली. तिथे येताच सासूबाईंना जखमी आणि सासरे बुवांना असे हतबल पाहून ती सुद्धा खूप घाबरुन गेली.
काय करावं आणि काय नको हे तिला सुचत नव्हतं. डॉक्टर सासूबाईंच्या उपचार करत होते. हिने कसेबसे तिच्या सासरे बुवांना सावरले. त्यांना पाणी प्यायला दिले. तुम्ही काळजी करू नका आई ठीक होतील म्हणून वारंवार दिलासा देत होती. पण मनातून मात्र ती सुद्धा खूप घाबरली होती.
सासूबाईंचा तिला खूप आधार होता. आज त्यांना या अवस्थेत पाहून ती मनातून कोसळली होती पण ही वेळ खचून न जाता धीराने परिस्थिती हाताळण्याची आहे जाणून तिने तिचे अश्रू अलगद बोटांनी टिपून घेतले. थोड्या वेळाने रेवा तिथे आली. आईला अशा अवस्थेत बघून ती सुद्धा घाबरुन गेली.
परिस्थिती नाजूक होती. आईची अवस्था पाहून आता तिला घटनेचे गांभीर्य कळले होते. म्हणून तिने बाजूला जाऊन लगेच नवऱ्याला फोन केला. ती म्हणाली.
” अहो…जरा लवकर इथे हॉस्पिटल मध्ये या…आपल्याला वाटले होते छोटा मोठा अक्सिडेंट झाला असेल पण आईचा खरंच खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय…तुम्ही लवकर या हॉस्पिटल ला…”
तरीही तिथून 20 मिनिटांच्या अंतरावर राहणारा तिचा नवरा दीड तासाने तिथे आला.
आपल्या मुलीला आणि जावयाला आलेलं पाहून सुजाताच्या सासरे बुवांना आता जरा आधार वाटत होता. थोड्या वेळाने डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले.
” पेशंटच्या जीवावर असणारा धोका आता बऱ्यापैकी टळला आहे…तरीपण त्यांना रिकव्हर व्हायला खूप वेळ लागेल…त्या अजुन शुद्धीत आल्या नाहीत…शुद्धीत आल्यावर कळेल की अपघाताचा त्यांच्या स्मरणशक्तीवर किंवा डोक्यावर काय परिणाम झालाय ते…”
डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळ्यांना जरा बरे वाटले. तरीही त्या लवकर शुद्धीत याव्यात आणि पूर्णपणे ठणठणीत बऱ्या व्हाव्यात म्हणून देवांना प्रार्थना करणे सुरूच होते.त्या दिवशी रेवा, सुजाता आणि तिचे सासरे सगळेच दवाखान्यात थांबले होते. दुसऱ्या दिवशी सुजाताच्या सासुबाई शुद्धीवर आल्या.
मात्र त्या अजूनही नीट बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल अजूनही नीट अनुमान लावता येत नव्हते. आई शुद्धीवर आल्यावर रेवा तिच्या बाबांना नाश्ता आणि चहा घेऊन येते आणि अंघोळ करून येते असे म्हणून हॉस्पिटल मधून घरी निघून गेली.
खरे तर कालपासून आतापर्यंत सुजाता आणि तिच्या सासरे बुवांनी काहीच खाल्ले नव्हते पण आज सकाळपासून मात्र सुजाता च्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. सासरे बुवांना सुद्धा भुकेची तीव्र जाणीव झाली होती. आता सुजाताच्या सासुबाई शुद्धीत आल्या होत्या. त्यामुळे काळजी जरा कमी झाली होती.
त्यामुळे सुजाता च्या सासरे बुवांनी थोडा वेळ रेवा ची वाट पाहिली. कारण ती घरून नाश्ता आणि चहा घेऊन येणार होती. पण बराच वेळ ती न आल्याने त्यांनी तिथल्या कॅन्टीन मध्ये जाऊन सुजाता आणि स्वतः साठी नाश्ता आणला. या अवस्थेत सुजाताने असे उपाशी राहणे बरे नाही हे त्यांनाही कळत होते.
सुजाताने आणलेला नाश्ता खाल्ला. आताशा तिला थोडे बरे वाटत होते. त्यांनी सुजाता ला घरी जाऊन फ्रेश होऊन यायला सांगितले. मी इथे आहे त्यामुळे तू घरी जाऊन थोडा आराम कर असेही बजावले. रात्रभर सुजाता झोपू शकली नव्हती आणि तिने आराम करणे गरजेचे होते.
म्हणून मग सुजाता सासूबाईंची काळजी घ्या असे सांगून घरी निघून गेली. थोड्याच वेळात सुजाता पुन्हा हॉस्पिटल मध्ये आली. तिला पाहून तिचे सासरे बुवा म्हणाले.
” तू इतक्या लवकर कशी आलीस…? आराम करायचा असता ना जरा…”
” मी प्रयत्न केला बाबा झोपण्याचा…पण डोळे बंद केले की समोर आईच दिसायच्या…काळजीने मला झोप लागली नाही…म्हटलं घरी राहून काळजी केल्यापेक्षा इथे आईजवळ थांबलेलं बरं…” सुजाता म्हणाली.
” आणि हे काय आहे…?” सासरे बुवांनी विचारले.
” मी आपला डबा करून आणलाय…” सुजाता म्हणाली.
” अग एवढी दगदग कशाला…रेवा आणणार च आहे…” सासरे म्हणाले. पण मग लगेच त्यांच्या लक्षात आले की रेवा ने अजुन सकाळचा नाश्ता सुद्धा आणलेला नाहीये. मग ते गप्प बसले. संध्याकाळी पाचच्या सुमारास रेवा हॉस्पिटल मध्ये आली. येताना हातात पिशवी होती. ती पिशवी सुजाताच्या हातात देत म्हणाली.
” हे घे…नाश्ता घेऊन आलेय घरून…?”
” नाश्ता…यावेळी…” तिच्या बाबांनी विचारले.
” हो बाबा…सकाळी आणणार होते पण मी इतकी थकले होते सकाळ झोपले ती सरळ दुपारीच जाग आली…मला वाटलं तुम्ही कॅन्टीन मधून खाल्ले असणार सकाळी म्हणून हा संध्याकाळ साठी नाश्ता आणलाय…” रेवा कशी बशी तिची बाजू सावरत म्हणाली.
त्यानंतर थोडावेळ थांबून रेवा म्हणाली.
” बाबा…आता हॉस्पिटल मध्ये तुम्ही दोघे आहात तर मी जरा घरी जाऊन येते…काय आहे ना घरी मुलं आहेत…त्यांना पण बघावं लागेल…आणि आई तर शुद्धीवर आलीय त्यामुळे काळजी करायची आता काही गरज नाही…”
असे म्हणून बाबांचा होकार नकार न ऐकता ती निघून सुद्धा गेली. थोड्या वेळाने जेवण करताना सुजाता ने रेवा ने आणलेला डबा उघडुन पाहिला ते त्यात हॉटेल मधला ढोकळा अन् चटणी ठेवलेली होती. सुजाताने तो डबा तसाच बंद करू ठेवला आणि घरून आणलेले गरमा गरम जेवण सासू सासऱ्यांना जेवू घातले.
इकडे सुजाताने बाबांना विनवण्या करून थोडावेळ साठी घरी जाऊन आराम करायला पाठवले. सुजाताचे सासरे सुद्धा खूप थकले होते. एकतर या वयात फार दगदग झेपत नाही आणि त्यातच त्यांना सुद्धा मुका मार लागला होताच.
मग ते सुद्धा जास्त आढेवेढे न घेता घरी गेले. घरी जाऊन थोडे फ्रेश होऊन झोपी गेले. ते रात्री उशिरा त्यांना जाग आली. आपल्याला उठायला उशीर झाला म्हणून त्राग्याणे त्यांनी सुजाता ला फोन लावला आणि मला उठायला उशीर झाला आणि मी आता तिकडे यायला निघतोय असे म्हणाले.
सुजाताने मात्र त्यांना आज घरीच राहण्यासाठी विनवले. एकतर रात्र सुद्धा खूप झाली होती आणि सासूबाईंना पाहायला ती होतीच त्यांच्याजवळ. मग त्या दिवशी ते घरीच थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी कामवाल्या मावशींनी त्यांना चहा नाश्ता दिला आणि दवाखान्यात न्यायला म्हणून डबा सुद्धा तयार करून दिला.
हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहतात तर आज सुजाता च्या सासूबाई बऱ्यापैकी बोलायला लागल्या होत्या. आपल्या बायकोला असे बोलताना पाहून त्यांना खूप आनंद होत होता. रात्रभर आराम केल्याने त्यांना जरा बरं वाटत होतं.
दुपार पर्यंत सुजाता आणि तिचे सासरे सासुबाई जवळच होते. मग सासूबाईंनी तिला घरी जाऊन थोडा आराम करायला सांगितले. मग सुजाता सुद्धा घरी निघून गेली. घरी कामवाल्या मावशींना सुजाता ने रात्री सुद्धा घरी थांबा अशी विनंती केली होती. त्यानुसार मावशी सुद्धा तयार झाल्या होत्या.
इकडे सासरे बुवांनी आपल्या बायकोला तिला जखमी अवस्थेत बघून आपण किती घाबरलो होतो आणि आता तिला शुद्ध आल्यावर आपल्याला किती चांगले वाटत आहे ते सांगितले. डॉक्टरांना सुद्धा आता त्यांच्या तब्येतीचा अंदाज आला होता.
डॉक्टरांनी सांगितले की अपघाताचा त्यांच्या डोक्यावर काही वाईट परिणाम झालेला नाही. जखमा सुद्धा जास्त खोल नाहीत. तरीही कंबरेला लागल्याने आणि हाडे फ्रॅक्चर असल्याने त्यांना काही दिवस तरी हॉस्पिटल मध्ये ॲडमिट राहावे लागेल असे सांगितले.
सुजाता रोज हॉस्पिटल मध्ये यायची. दिवसभर सासुबाई सोबत थांबायची आणि रात्री घरी जायची. पण रेवा मात्र आता दोन तीन दिवसातून एकदा हॉस्पिटलला यायची. एकदा ती आली आणि तिच्या वडिलांना म्हणाली.
” बाबा…आणखी किती दिवस आईला इथे राहायचे आहे…?”
” अजुन आठ दिवस तरी राहावे लागेल…” बाबांनी सांगितले.
” इतके दिवस…आधीच तर महिना झालाय इथे हॉस्पिटल मध्ये येऊन…आणखी आठ दिवस म्हणजे किती खर्च होईल…आधीच हॉस्पिटल खूप महाग आहे…आपल्याला एखाद्या छोट्या दवाखान्यात आईला ठेवायला पाहिजे होतं…” रेवा म्हणाली.
” तू कधीपासून खर्चाची काळजी करायला लागलीस…?” बाबांनी तिला विचारले.
” खर्चाची काळजी नाही बाबा…मी तर असेच म्हणत होते…” रेवा गडबडत म्हणाली.
त्यानंतर आठ दिवसांनी सुजाताच्या सासूबाईंना डिस्चार्ज मिळाला. पण त्या दिवशी रेवा हॉस्पिटलला आलीच नाही. सुजाता आणि तिचे सासरे सासूबाईंना घेऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी रेवा आईला भेटायला आली. रेवाने आईची विचारपूस केली. तोवर सुजाता त्या दोघींसाठी चहा घेऊन आली. सुजाताला पाहून रेवा म्हणाली.
” हे बघ सुजाता…माझ्या आईची नीट काळजी घ्यायची…मी इथे नसले तरी पूर्ण लक्ष असते माझे तुझ्यावर…”
” अगं अशी काय बोलते आहेस…आजवर तीच करत आली आहे माझे सर्व…या अवस्थेत सुद्धा…ती नसती तर माझं काय झालं असतं देव जाणे…” सुजाता च्या सासुबाई म्हणाल्या.
सुजाता मात्र काहीच बोलली नाही. मग रेवा म्हणाली.
” मी काल येणारच होते आई…पण काल मला बरंच वाटत नव्हतं…”
” अच्छा…जावई तर मला काल म्हणाले की तुम्ही दोघे पार्टीला गेला होतात…” अचानक तिचे बाबा तिथे येत म्हणाले.
आपल्या नवऱ्याने आपले गुपित उघडे पाडल्याने रेवाला खरंतर त्याचा खूप राग आला होता पण तसे न दाखवत ती म्हणाली.
” म्हणजे मला काल बरं नव्हतं…पण ह्यांनी खूप आग्रह केला मला पार्टीला चल म्हणून…ते म्हणत होते की त्यांच्यासाठी गी पार्टी खूप महत्त्वाची आहे…तिथे ते एका मोठ्या बिल्डर ला भेटणार होते…आणि सगळे जण आपापल्या फॅमिली सोबत येणार होते म्हणून मला पण आग्रहाने घेऊन गेले ते…”
” ठीक आहे…हरकत नाही.. ” रेवाचे बाबा म्हणाले.
थोडावेळ आई सोबत गप्पा करून रेवा निघून गेली. जाताना सुजाताला बऱ्याच सूचना सुद्धा देऊन गेली. सुजाताची सुद्धा मागच्या काही दिवसात खूप दगदग झाली होती. त्यामुळे तिलाही आरामाची गरज होती. त्यामुळे कामवाल्या मावशीला सांगून आणखी एक मदतनीस बोलावून घेतली काही दिवसांसाठी.
मागच्या काही दिवसात सुजाताच्या सासऱ्यांचा खूप खर्च झाला होता. दवाखान्याचा खर्च सुद्धा खूप झाला होता. गाडीचे सुद्धा बरेच नुकसान झाले होते. अजूनही पुढे बराच खर्च येणार होता. तिच्या सासुबाई अजुन किती दिवस स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही ह्याचा सुद्धा अंदाज नव्हता.
त्यांच्या बँकेतील जमा ठेव आताशा बरीच कमी झाली होती. अशातच त्यांनी घेतलेल्या एका जमिनीच्या प्लॉटला चांगली किंमत मिळत होती. त्यांनी तो विकायचा असे ठरवले. पण मग त्यांच्या लक्षात आले की बाकी प्रॉपर्टी सोबतच तो प्लॉट सुद्धा आपण रेवाच्या नावाने केला आहे. मग त्यांनी तिला कॉल करून घरी बोलावून घेतले.
क्रमशः
सुजाताचे सासरे तो प्लॉट अडचणी शिवाय विकू शकतील का..? रेवा पुढे काही हरकत घेईल का…? सुजाता चे सासरे आर्थिक अडचणीत सापडतील का…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.