एके दिवशी अचानक आदित्यला फोन आला की त्याच्या वडिलांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झालाय ताबडतोब हॉस्पिटलला या म्हणून. तो लगेच हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे गेल्यावर कळले की त्याच्या वडिलांच्या हाताला थोडा मार लागलाय. डॉक्टरांनी हाताला आधीच मलमपट्टी केली होती. त्याचा मोठा भाऊ सुद्धा तिथे पोहचला होता. डॉक्टरांनी ह्याला काही औषधं लिहून दिली आणि लगेच आणायला सांगितली. मोठा भाऊ वडीलांजवळ थांबला.
तो औषध आणायला बाहेर जाणार इतक्यात त्याला ती दिसली. त्याने तिला पाठमोरीच ओळखली होती. ती रेवतीच होती. तिला पाहून ती क्षणभर स्तब्ध झाला. त्याला सगळेच आठवत होते. थोड्याच वेळात तो भानावर आला आणि तिच्याशी बोलायला जाणार तोवर ती कुठेतरी निघून गेली होती. तो आजही तिच्याशी बोलू शकला नव्हता. पण तिला पाहून त्याच्या मनातील विचार पुन्हा सुरू झाले.
साधारण वर्षभरापूर्वी ची गोष्ट असेल. त्या दिवशी रेवती कितीतरी वेळ तशीच कॉफी शॉप मध्ये बसून होती. आदित्यची वाट पाहत. त्याचे हे आता नेहमीचेच झाले होते. पाच मिनिटात येतो म्हणून पूर्ण एक तास उशिरा यायचा तो. आजही त्याची तीच तऱ्हा होती. शेवटी एकदाचा आदित्य आलाच. आतापर्यंत वैतागून असलेल्या रेवतीची आदित्यला बघून कळी खुलली. तिचं असच व्हायचं. त्याला पाहून तिचा सगळा राग निघून जायचा. तो तिला म्हणाला…
” सॉरी यार रेवती…आज पुन्हा उशीर झालाय ना मला…”
” हो…पण इट्स ओके…” रेवती हसून म्हणाली.
” बोल…इतकं काय महत्त्वाचं होतं की आपली उद्याची भेट आजच ठरवलीस तू…” आदित्य ने विचारले.
” काल घरी सुशीला मावशी आल्या होत्या…त्यांनी आईला माझ्यासाठी काही स्थळे सुचवली…आईने कसेतरी तिला टाळले…पण नंतर आई अन् बाबा दोघेही मला म्हणाले की एकदा आदित्यच्या घरच्यांची आणि आमची भेट करून दे मग आम्ही लग्नाची बोलणी उरकून घेऊ म्हणून…” रेवती म्हणाली.
” त्यांना सांग ना आताच काय घाई आहे म्हणावं…अजुन आपण आपल्या करीअर मध्ये स्थिरस्थावर थोडेच झालोत…” आदित्य म्हणाला.
” आज नाहीतर उद्या होऊच…आणि तसेही आपण चार वर्ष झाले एकमेकांना भेटून…पुढेही सोबतच असणार आहोत…फक्त आपलं नातं बदललेल असेल…नवरा बायको म्हणून कायम एकमेकांच्या सोबत राहू शकतो आपण…” रेवती म्हणाली.
” तरीही मला अजून वेळ हवाय…मी आताच आई बाबांना नाही सांगू शकत…माझे बाबा खूप रागीट स्वभावाचे आहेत ग…त्यांचा मूड पाहून सांगेन ना त्यांना…आताच राहू देत…” आदित्य म्हणाला.
” पण मला जास्त वेळ थांबता येणार नाही…तुझ्यावर विश्वास ठेवून मी वर्षभरापूर्वी माझ्या आई बाबांना आपल्याबद्दल कल्पना दिली आहे…त्यांना सांगितलंय की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे…आणि त्यांना माहिती झाल्यावर त्यांना आपल्या लग्नाची घाई हिने साहजिकच आहे…तू प्लिज समजून घे…” रेवती म्हणाली.
” तुझ्या बाबांना पण काय घाई आहे यार…मी सांगणार आहे ना…पण फक्त काही दिवसच थांब…” आदित्य म्हणाला.
आणि नेहमीप्रमाणे आजही रेवतीने आदित्यच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
आदित्य आणि रेवतीची भेट त्यांच्या कॉलेज मध्ये झाली होती. सुरुवातीला मैत्री होती पण हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. जेव्हा त्यांना खात्री झाली की दोघेही एकमेकांसोबत आयुष्य घालवायला तयार आहेत तेव्हाच दोघांनी ही ठरवले होते की आपल्याबद्दल आपल्या घरी सांगायचे.
ठरल्या प्रमाणे रेवतीने एके दिवशी तिच्या आई वडिलांनी त्याच्याबद्दल विषय काढला. जुन्या काळातील असलेले आईवडील सुरुवातीला हे ऐकून गोंधळात पडले होते. रेवती ची निवड चांगली की वाईट हे दोघेही ठरवू शकत नव्हते. पण शेवटी त्यांचा त्यांच्या मुलीवर विश्वास होता आणि हाच विश्वास आता त्यांनी तिच्या निवडी बद्दल दाखवायचा ठरवला होता.
रेवतीच्या वडिलांनी आदित्यला भेटायची इच्छा बोलून दाखवली. रेवतीने एके दिवशी आदित्यला तिच्या घरी बोलावले आणि त्याची व आई बाबांची भेट घडवून आणली. आदित्य तिच्या आई वडीलांना ही आवडला होता. फक्त आता आदित्यच्या आई बाबांना कळवायचे बाकी राहिले होते.
रेवती जेव्हा आदित्यकडे विषय काढायची तेव्हा आदित्य मात्र सांगणे पुढे ढकलायचा. आदित्यचे वडील शहरातील नामांकित उद्योजक होते. कर्तृत्वासोबतच करारी स्वभाव देखील होता. घरात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जाई. घरातील सगळेच त्यांना घाबरायचे. चांगल्या गोष्टीला त्यांनी तसा कधी विरोध केला नव्हता. आणि त्यांचा स्वभाव सुद्धा चांगला होता. पण सगळे उगाच त्याच्याबद्दल मनात भीती बाळगून असायचे.
आदित्य सुद्धा असाच त्यांना भित होता. त्यामुळे त्याने अजूनही रेवतीबद्दल घरी सांगितले नव्हते. त्याला तसेही वाटायचे की रेवतीने तिच्या घरी सांगितले आहे त्यामुळे रेवतीच्या घरचे थांबतील त्याच्यासाठी. आणि घरी जेव्हा लग्नाचा विषय निघेल तेव्हा सांगू म्हणून आदित्यने रेवतीबद्दल अजुन घरी कोणालाच सांगितले नव्हते. आणि रेवतीला समजावणे त्याच्यासाठी त्याच्या बाये हाथ का खेल होता. त्यामुळे तो निश्चिंत होता.
पण इकडे रेवतीच्या वडिलांच्या मनातील धाकधूक मात्र वाढतच होती. आपल्याला सांगून पूर्ण वर्ष झालं तरीही ह्याने ह्याच्या घरच्यांची आणि आपली भेट घडवून आणली नाही हे कुठेतरी त्यांना खुपत होते. पण रेवतीमुळे ते गप्प होते.
एके दिवशी रविवारी आदित्यची चुलत बहीण श्रुती तिच्या घरी आली. ही चुलत बहीण बऱ्याच वर्षांपासून शिक्षणा साठी शहरातून बाहेर राहायची. दोघीही लहानपणी एकाच शाळेत होत्या. सुट्टीत ती घरी यायची तेव्हा मित्र मैत्रिणीकडे फेरफटका मारायची. तिला आदित्य आणि रेवतीबद्दल थोडीफार कल्पना होती. ती सहज म्हणून रेवतीला म्हणाली.
” काय मग रेवती…आदित्य आणि तुझं अजूनही सुरूच आहे की ब्रेकअप झालाय…”
” काहीतरीच काय ग…आम्ही अजूनही सोबतच आहोत…आणि लवकरच लग्न सुद्धा करणार आहोत.. ” रेवती म्हणाली.
” पण मी तर ऐकलय की आदित्यसाठी मुली बघणे सुरू केलंय…घरच्यांना काही कल्पना नाही का तुमच्याबद्दल…” श्रुतीने विचारले.
श्रुतीचे बोलणे ऐकुन रेवती जागेवरून उडालीच. मग स्वतःला सावरत म्हणाली.
” अजुन आदित्यने त्याच्या घरी सांगितलेलं नाही…पण तो म्हणाला होता की लवकरच सांगेन…आणि त्याच्या लग्नाचा अजुन विषयही घरी निघाला नाही असेही म्हणाला होता तो मला…” रेवती अस्वस्थपणे म्हणाली.
” अच्छा…मग सांगेल तो घरी…कदाचित घरचे तुझ्याबद्दलच बोलत असावेत मग…” श्रुती म्हणाली.
थोड्या वेळाने श्रुती रेवतीच्या घरून निघून गेली पण तिचे बोलणे मात्र अजूनही रेवतीच्या कानात घुमत होते. तिने आज तातडीने आदित्यला भेटायला बोलावले. आज सुद्धा आदित्य उशिरा आला. मात्र आज रेवती रागात होती. ती आदित्यला म्हणाली.
” तुझी उशीर करायची सवय अजुन गेलेली दिसत नाही…”
” म्हणजे” आदित्यने विचारले.
” म्हणजे प्रत्येक बाबतीत उशीरच करणार आहेस का…?” रेवती ने विचारले.
” तू काय बोलत आहेस मला अजून कळत नाहीय…जरा स्पष्ट सांगतेस का…?” आदित्य म्हणाला.
” मी ऐकलंय की तुझ्यासाठी मुली पाहणे सुरू केलंय…” रेवती म्हणाली.
” तुला कोणी सांगितलं…?” आदित्य जरा गडबडून म्हणाला.
” ते महत्वाचं नाही सध्या…तू फक्त हो की नाही ते सांग…?” रेवती ने विचारले.
” हो म्हणजे…अजुन फक्त विषय निघालाय…मुलगी पसंत वगैरे नाही केली…मी घरी तुझ्याबद्दल सांगणारच आहे…” आदित्य सारवासारव करत म्हणाला.
क्रमशः
नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )